रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 838

‘जेएनयू’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारणीसाठी १० कोटी रुपये मंजूर

मुंबई, दि. १४ : नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) “छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन” केंद्र उभारण्याकरता राज्य शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज़ादी का अमृतमहोत्सव समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आला.

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून हा निधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला वितरित केला जाणार आहे.

हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्षे असून ते राज्य शासनातर्फे राज्यभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत आहे. याच निमित्ताने दिल्लीतील जेएनयू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, धोरण व राज्यकारभार पद्धती आणि तत्वज्ञान यांचा अभ्यास करणारे अध्यासन उभारावे, अशी कल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी मांडली. नवी दिल्ली येथे जेएनयूच्या कुलगुरू डॉ.शांतीश्री पंडित यांच्यासोबत मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या झालेल्या बैठकीत या संकल्पनेला आकार देण्यात आला. त्यानुसार जेएनयूने छत्रपती शिवाजी महाराजांवर अध्यासन उभारण्याची पूर्वतयारी सुरू केली.

या अध्यासनासाठी अभ्यासक्रम आखणे, विषय मांडणीसाठी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात विविध बाबीतील संशोधनासाठी राज्य शासन जेएनयू सोबत सहकार्य करणार आहे. या अध्यासनात  (१) अंतर्गत सुरक्षा, (२) पश्चिम हिंदी महासागरातील मराठा नौदल रणनीती, (३) गनिमी कावा (४) किल्ल्यांच्या तटबंदी संदर्भातील रणनीती, (५) मराठा इतिहास या विषयावर संशोधनात्मक कार्य होणार आहे. तसेच मराठी भाषेतूनही पदविका, पदवी आणि विद्यावाचस्पती पदवी (पीएच.डी) ची सुविधा तसेच मराठा साम्राजाची सैन्य व्यूहरचना, किल्ले व तटबंदी रचना यावरील अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार हे अध्यासन कार्य करणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा फक्त रणसंग्रामातील पराक्रमच नव्हे, तर त्यांचा राज्य कारभार, त्यांचे राज्य कारभारातील तत्वज्ञान, राज्य कारभाराकरिता उभारलेली सुसंघटित प्रशासकीय यंत्रणा, त्यांनी स्व-भाषेला राज्य कारभारात दिलेले महत्व, त्यांचे परराष्ट्र धोरण, देशातील विविध भागातील राज्यकर्त्यांना परकीय आक्रमण मोडून काढत स्वकीय राज्य उभारण्यास त्यांनी केलेली मदत, त्यांच्या राजकीय तत्वज्ञानाचा आणि राज्य कारभाराचा भारताच्या राजकारणावर आणि समाजमनावर झालेला दीर्घकालीन सकारात्मक परिणाम, थोरल्या महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य, त्यांनी अंगिकारलेली व्यवस्थापनाची तत्वे, त्यांचे शिक्षण, संस्कृती, मंदिरे, व्यापार, शेती, जलसंधारण आणि सिंचन, गाव वस्त्या व शहरांचे व्यवस्थापन आणि नियोजन, संरक्षण यंत्रणा या सर्व बाबतीतले धोरणे व व्यवस्थापन, परकी आक्रमकांबाबतचे धोरण, संत महात्म्यांबाबतचे धोरण अशा विविध अंगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आणि राज्यकारभाराचा अभ्यास होणे आवश्यक आहे, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार आणि धोरणे आजही आपल्याला मार्गदर्शक आहेत असे आपण म्हणतो, मात्र या सर्व बाबींची आधुनिक शैक्षणिक परिप्रेक्षात मांडणी होणे गरजेचे आहे, ते कार्य या अध्यासनाने साध्य होईल, असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु

मुंबई, दि. १४ : राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याकरिता व स्त्री भ्रूण हत्या रोखण्याकरिता राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु करण्यात येत आहे. या संकेतस्थळामुळे राज्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ (पीसीपीएनडीटी आणि एम.टी.पी) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मदत होणार आहे.

हे संकेतस्थळमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येत आहे.

पीसीपीएनडीटी आणि एमटीपी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता विविध उपक्रम आणि उपाययोजना यशस्वीपणे राबविण्यासाठी विविध योजनांची कार्यवाही करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी तसेच याविषयी कुठल्याही शंकेचे निरसन करण्यासाठी http://amchimulgimaha.in/ हे नवीन संकेतस्थळ सुरु करण्यात येत आहे.

या संकेतस्थळावर कोणीही तक्रार नोंदविल्यास ती तक्रार गोपनीय राहील व तक्रार देणाऱ्यास त्याची इच्छा असल्यास ते नाव देखील नोंदवू शकतील. पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत तक्रार निपटारा होऊन गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तक्रारीची अंमलबजावणी होऊन जर स्त्री भ्रूण हत्या रोखण्यास यश आले, तर तक्रारदारास शासनामार्फत खबरी बक्षीस योजनेअंतर्गत रक्कम रुपये १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. नागरिकांनी आरोग्य विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या संकेतस्थळाचा  लाभ घेऊन समाजातील जन्म लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यास सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे १५ व १६ मार्च रोजी ‘शिवसंवाद’: दोन दिवसीय विद्वत परिषद  

मुंबई, दि. १४: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे ‘शिवसंवाद’ या दोन दिवसीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार १५ व शनिवार १६ मार्च, २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील दीक्षांत सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाद्वारे विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन सत्र शुक्रवार दि. १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार, तंजावर संस्थानचे श्रीमंत राजश्री बाबाजी राजे साहेब  भोसले छत्रपती, महाराणी गायत्री राजे साहेब भोसले, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेच्या दोन्ही दिवशीच्या सत्रांमध्ये अनेक ख्यातनाम इतिहास अभ्यासक, लेखक, इतिहासकार व इतिहास संशोधकांची व्याख्याने होणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे केवळ इतिहासातील एक पर्व नसून आधुनिक भारताच्या जडणघडणीच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याने पुढे साम्राज्याचे रूप धारण करत भारताच्या राजकीयच नव्हे, तर आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे. या साऱ्या वाटचालीमागे छत्रपती शिवरायांच्या धोरणी दृष्टीची, युद्धनीती, व्यवस्थापन, राजनीती, विदेशनीती, अर्थनीतीची प्रेरणा आहे. याच विषयांवर व्यापकस्तरावर विद्वत संवाद घडवावा व या विचारमंथनातून छत्रपती शिवरायांच्या कार्याची आधुनिक काळातील प्रासंगिकता मांडली जावी, हा ‘शिवसंवाद’ परिषदेचा उद्देश आहे. १७ व्या ते २० व्या शतकापर्यंत, सुमारे तीन शतके वृद्धिंगत होत गेलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणांवर निर्माण झालेल्या मराठा साम्राज्याचे आपल्या इतिहासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्वातंत्र्यलढ्यात स्वराज्य, स्वातंत्र्य यांचे मूर्तिमंत प्रतिक म्हणून शिवराय स्वातंत्र्ययोद्ध्यांचे स्फूर्तीस्थान होते. या संपूर्ण इतिहासाचा ऊहापोह या परिषदेत होणार आहे.

इतिहासप्रेमींसाठी वैचारिक पर्वणी

या परिषदेत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचे ऐतिहासिक महत्त्व मांडणार आहेत. डॉ. उदय कुलकर्णी, १८ वे – १९ वे शतक म्हणजेच ‘मराठा शतक’ अशी मांडणी करणार आहेत. प्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे ‘लोककल्याणकारी शिवराय आणि त्यांची राजनीती’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ग्वाल्हेरचे इतिहास-अभ्यासक  नीलेश ईश्वरचंद्र करकरे ‘श्रीनाथ’ महादजी शिंदेंच्या कार्यावर आणि योगदानावर आपल्या व्याख्यानातून प्रकाश टाकणार आहेत. जेएनयूचे प्रा. डॉ. उमेश कदम शिवरायांच्या प्रभावाचा भौगोलिक आणि सांस्कृतिक वारसा मांडणार आहेत. इतिहास अभ्यासक डॉ. केदार फाळके, ‘शिवराज्याभिषेक – नव्या युगाचा प्रारंभ’, या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

दुसऱ्या दिवशी तंजावरचे मराठी पंडित डॉ. बी. रामचंद्रन ‘तंजावर भोसले घराण्याचे राष्ट्र-उभारणीतील योगदान’ या विषयवार बोलणार आहेत. बंगळूरच्या इतिहास अभ्यासिका मेधा भास्करन ‘छत्रपती शिवरायांची सैन्यव्यवस्था’ हा विषय मांडणार आहेत. अभ्यासक प्रसाद तारे त्यांनी संशोधन करून शोधून काढलेली शिवरायांची लघुचित्रे आणि शिल्पे उलगडून दाखविणार आहेत. अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर, ‘शिवपूर्व काळातील सत्ताधीश आणि त्यांची ध्येये’ या विषयातून शहाजीराजांच्या ऐतिहासिक कामगिरीचा आलेख श्रोत्यांसमोर मांडणार आहेत. सुरतचे डॉ. मकरंद जोशी ‘बडोदे संस्थानचा उज्ज्वल इतिहास’ उलगडून दाखविणार आहेत आणि अभ्यासक रविराज पराडकर हे छत्रपती शिवाजी महाराज, व्यवसाय, तंत्रशिक्षण आणि कौशल्य विकासाचे प्रेरणास्थान कसे ठरतात याविषयी व्याख्यान देणार आहेत.

या परिषदेस इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी अशा सर्वांनीच मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

राज्यातील ७ हजार ५०० शाळांमध्ये पर्यावरण सेवा योजना राबविणार

मुंबई, दि. १४ : राज्यात राबविण्यात येत असलेल्या पर्यावरण सेवा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ७ हजार ५०० शाळांमध्ये ही सेवा योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीद्वारे  रुजवावे या उद्देशाने राज्यात  पर्यावरण सेवा योजना राबवण्यात येते. सुरुवातीस राज्यातील १२ जिल्ह्यातील ५० शाळांमध्ये ही योजना राबवण्यात येत होती. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पुढील पाच वर्षांत राज्यातील ७ हजार ५०० शाळांमध्ये राबवण्यात येणार आहे.

स्थानिक पर्यावरणाशी निगडित समस्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष सहभाग व कृती समजून घेऊन त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी प्रोत्साहन देणे, निसर्ग व मानव यांचे नाते बालवयात बिंबवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

राज्यातील महानगरपालिका, नगर पालिका, नगर परिषद, ग्राम पंचायत क्षेत्रातील इच्छुक शाळा यासाठी अर्ज करू शकतात. ही योजना राबवण्यासाठी ५ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/03/202403141237574404.pdf”]

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/03/202403141244407704-1.pdf” title=”202403141244407704 (1)”]

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत होण्यासाठी सर्वांनी समन्वयाने नियोजन करावे : मंत्री गिरीष महाजन

नाशिक, दिनांक 14 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिल्या.
आगामी कुंभमेळा जिल्हास्तरीय बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीस आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, ॲड राहुल ढिकले, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, नाशिक महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी, स्मिता झगडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


मंत्री गिरीष महाजन म्हणाले, 2026-27 या वर्षामध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक शहर व त्र्यंबक येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून रस्त्यांच्या दुतर्फा आवश्यक सुविधा तसेच सौंदर्यीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत आगामी कुंभमेळ्यात साधुमहंत तसेच भाविकांची संख्या दुप्पटीने वाढेल याचा विचार करून कुंभमेळा काळात करण्यात येणारी पार्किंग व्यवस्था त्र्यंबकेश्वरजवळ करण्यात यावी. तसेच नाशिकमध्ये गोदावरीवर असलेल्या घाटांची दुरूस्ती, जलशुद्धीकरण केंद्रांचे अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे. कुंभमेळा कालावधीत नदी प्रदूषण होणार नाही यासाठी उपाययोजना, स्वच्छतागृह, सांडपाणी व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा, कायदा सुव्यवस्था, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था यांचे सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्ताचे कुंडाचा काही प्रमाणात विस्तार करता येतो का, याबाबत पुरातत्व विभागातील तज्ज्ञांचे तसेच तेथील पुरोहितांचे, साधुमहंतांचे देखील मार्गदर्शन घेण्यात यावे. जेणेकरून पर्वणी कालावधीत तेथे गर्दीचे नियंत्रण करणे शक्य होईल, असे ही मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी सांगितले.

केंद्र सरकार तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अतिशय सकारात्मक असल्याने 2026-27 या कालावधीत आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून घेण्याकरिता  केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी मनुष्यबळाची देखील मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासणार असल्याने त्यासाठी देखील नियोजन करण्यात यावे. मागील कुंभमेळ्याप्रमाणेच आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित व नियोजनबद्धरित्या पार पडण्यासाठी गेल्या कुंभमेळ्यात काम केलेल्या अधिकाऱ्यांची सेवा देखील यावेळी घेण्यात यावी, जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा लाभ येत्या कुंभमेळ्यासाठी होईल. पुढील जिल्हास्तरीय बैठकीत साधुसंत, पुरोहित यांना देखील आमंत्रित करावे. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे सूत्रबद्ध पद्धतीने व वेळेत पूर्ण करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात यावी. त्याचप्रमाणे कुंभमेळ्याच्या कामांचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी व सर्व संबंधित यंत्रणामध्ये समन्वय रहावा यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखील समिती स्थापन करण्याच्या सूचना ही यावेळी मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी दिल्या.

बैठकीच्या दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. त्या अनुषंगाने बैठकीस उपस्थित आमदारांनी कोणत्या स्वरुपाची कामे करणे आवश्यक आहेत त्या स्वरूपात सूचना मांडल्या. तसेच त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी देखील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर त्र्यंबकेश्वर येथील सद्यस्थितीची माहिती दिली.
00000000

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

मुंबई, दि. १४ : लोकसेवा हक्क कायद्याने नागरिकांना सेवा देण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सेवा देणे आपले कर्तव्य आहे. या भावनेने वेळेत नागरिकांना सेवा उपलब्ध करून देत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी केले.

मुंबई शहर जिल्ह्यातील नियोजन भवन येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणी संबंधित आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

श्री. श्रीवास्तव म्हणाले की, सेवा घेणे नागरिकांचा हक्क आहे. तसेच सेवा देणे अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. सेवा देण्यास विलंब झाला तर लोक सेवा देण्यात कसूर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. तसेच चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र व प्रोत्साहनपत्र देण्याचीही तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांना कायद्याने मिळणे अपेक्षित असलेली सेवा पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि त्याचबरोबर विहित केलेल्या कालमर्यादेत उपलब्ध करुन दिली पाहिजे. असे सांगून लोकसेवा हक्क कायद्याविषयी मार्गदर्शक सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ नागरिकांना सुलभरित्या व तत्परतेने घेता यावा यासाठी अधिकतम सेवा ऑनलाइन करण्याचा प्रयत्न आहे. काही तांत्रिक सुधारणा करून या सेवा ऑनलाइन आणि वेळेत देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न असतील, असे त्यांनी सांगितले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

येवला शहरातील येथील विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

नाशिक, दिनांक 14 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा : नागरिकांना आवश्यक सेवा- सुविधा मिळण्यासाठी येवला शहरात विकासाची कामे अविरत सुरू राहतील, असे विश्वास व्यक्त करत राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येवला
शहरात सुरू करण्यात आलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

येवला शहरातील विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकर्पण प्रसंगी मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सागर चौधरी यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित
होते.


शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामाची मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून पाहणी 
येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अतिशय भव्य दिव्य असा शिवसृष्टी प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पाच्या कामाची मंत्री छगन भुजबळ यांनी आज पाहणी करत कामाला अधिक गती देण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या
येवला शहरातील कामांचे आज झाले भूमिपूजन व लोकार्पण

1) रोकडोबा हनुमान मंदिर, बदापूर रोड,येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरात सभामंडप बांधणे कामाचे भूमीपूजन (रु. १५० लक्ष)
2) हुतात्‍मा स्‍मारक, येवला येथे हुतात्‍मा स्‍मारक येथे स्‍तंभ बांधणे व अनुषांगिक विकासकामे करणे या कामांचे भूमीपूजन. (रु. २६.३९ लक्ष)
3) येवला शहरातील गंगादरवाजा भागात राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज प्रवेशद्वाराचे बांधकाम करणे

४) येवला शहरातील प्रभाग क्र. १२ अनु.जाती वस्‍तीमधील भिमालयाजवळ बहुउद्देशीय सभागृह आणि अभ्‍यासिकेचे बांधकाम करणे. (रु. ७० लक्ष)
५) नागड दरवाजा सर्कल जवळ, येवला येथील इकरा स्विटस् ते हिंदुस्‍तानी मस्जिद पावेतो रस्‍ता कॉक्रिटीकरण व भुयारी गटार बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (रु. ५२.४५ लक्ष)
6) बुंदेलपुरा, येवला दिपक परदेशी यांच्‍या घरामागील बाजु पासुन ते नडे यांच्‍या घरापावेतो रस्‍ता कॉक्रिटीकरण व भुयारी गटार बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (रु. ५७.५५ लक्ष)
७) जब्रेश्‍वर खुंट, येवला येथील इंद्रनिल स्विटस् (गणपती मंदिर) ते जब्रेश्‍वर खुंट पावेतो रस्‍ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (रु. ८६.१५ लक्ष)
८) राजे रघुजी बाबा मंदिर परिसरात सभामंडपाचे लोकार्पण. (रु. ९८.४३ लक्ष)
९) विंचूर रोड, येवला येथे छ. संभाजीनगर राज्‍य मार्ग ते बोगार साहेब यांच्‍या घरापावेतो रस्‍ता कॉक्रिटीकरण व भुयारी गटार बांधकाम करणे कामाचे भूमीपूजन (रु. ४९.५३ लक्ष)
10) पटेल कॉलनी, संजीवनी स्‍कुल जवळ, येवला येथे आगमन व येवला शहरात पटेल कॉलनी भागात संजीवनी स्‍कुल ते आमदार यांचे बंगल्‍यापावेतो रस्‍ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे भूमीपूजन (रु. २६.५३ लक्ष)

000000

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची ‘दिलखुलास’ मध्ये १५ व १६ मार्च तर ‘जयमहाराष्ट्र’ कार्यक्रमात १५ मार्च रोजी मुलाखत

मुंबई, दि. १५: राज्य शासनाने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे शेतकरी तसेच पशुपालकांना पशुपालन व्यवसायात रोजगार निर्मिती होऊन उद्योजक होण्यास संधी उपलब्ध होणार असल्याचे, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सांगितले आहे.

पशुपालन व दुग्धव्यवसाय हा कृषीपूरक व्यवसाय न राहता तो शेती एवढाच मुख्य व्यवसाय म्हणून विकसित करण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पशुसंवर्धन आयुक्तालय व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रिकरण करुन पुनर्रचनेनंतर “आयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय” असे नामाभिधान करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बदलामुळे शेतकरी, पशुपालक व दुग्धव्यवसायिक यांच्या समोरील आव्हाने विचारात घेवून पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाची वाटचाल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय उद्योजकतेच्या दिशेने होण्यासाठी चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे व त्याद्वारे त्यांची आर्थिक उन्नती साधणे तसेच पशुपालक ते उद्योजक होण्यासाठी मिळणारा लाभ, याबाबत सचिव श्री.मुंढे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  ‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. मुंढे यांची मुलाखत शुक्रवार दि. 15, आणि शनिवार दि.16 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 15 मार्च 2024 रोजी दुपारी 4.00 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना

मुंबई, दि. १४ : शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील खासगी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या 11 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात येऊन आज याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही. तसेच थकबाकी देय होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

वित्त विभागाच्या 1 एप्रिल 2010 रोजीच्या शासन निर्णयान्वये सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेमध्ये सुधारणा करुन शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. याद्वारे 12 वर्षे व 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुज्ञेय करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.

तसेच ही योजना 5 जुलै 2010 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमधील एकाकी पदांना लागू करण्यात आली आहे. तथापि, राज्यातील मान्यताप्राप्त शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आपोआप लागू होत नसल्याने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात सातत्याने मागणी होत होती. तसेच उच्च न्यायालयाने 19 ऑगस्ट 2014 रोजी राज्यातील खासगी संस्थांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सत्वर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने राज्यातील खासगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/03/शिक्षकेतर-कर्मचाऱ्यांना-आश्र्वासित-प्रगती-योजना.pdf” title=”शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्र्वासित प्रगती योजना”]

 

जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत बाह्यवळण रस्त्यास १० कोटी ६८ लाखांचा निधी मंजूर

मुंबई, दि. १४: श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मंजूरी प्राप्त झाली असून त्यासाठी अधिकच्या १० कोटी ६८ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णयही नियोजन विभागाने जारी केला आहे.

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी १७ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या जिल्हास्तरीय बैठकीत श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत जेजुरी येथील बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच त्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार प्रस्ताव तयार करुन त्यास ११ मार्च २०२४ रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची आणि 13 मार्च 2024 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता घेण्यात आली.  त्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला. श्रीक्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी 20 जून 2022 रोजी मंजूर करण्यात आलेल्या 109 कोटी 57 लाख रुपयांच्या कामांमध्ये अधिकचे 10 कोटी 68 लाख रुपये मंजूर करुन हा नवीन बाह्यवळण रस्ता समाविष्ट करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या व जेजुरी शहरविकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सुमारे 349.45 कोटी रकमेचा श्री क्षेत्र जेजुरीगड तीर्थक्षेत्र विकास आराखाडा एकूण तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील विकास कामासाठी 109 कोटी 57 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यात आता  10 कोटी 68 लाख रुपये अधिकचे मंजूर करुन हा नवीन बाह्यवळण रस्ता समाविष्ट करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर 109 कोटी 57 लाख रुपयांच्या निधीतून,  मंदिर व संपूर्ण तटबंदीचे जतन व दुरुस्तीसाठी 11 कोटी 23 लाख रुपये, दीपमाळांचे जतन व दुरुस्तीसाठी 11 कोटी 25 लाख रुपये, उत्तर-पूर्व व पश्चिम पायर्‍या, 13 कमानी, सहायक संरचना जतन आणि दुरुस्तीसाठी 12 कोटी 22 लाख रुपये, ऐतिहासिक होळकर व पेशवे तलाव आणि इतर जलकुंडांचे जतन व दुरुस्तीसाठी 12 कोटी 56 लाख रुपये, मल्हार गौतमेश्वर मंदिर, लवथळेश्वर व बल्लाळेश्वर मंदिरांचे जतन व दुरुस्तीसाठी 2 कोटी 2 लाख रुपये, कडेपठार मंदिर दोन पायरी मार्गांचे जतन व दुरुस्तीसाठी 10 कोटी 73 लाख रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली. तसेच मूलभूत पायाभूत सुविधेअंतर्गत 12 कोटी रुपये, भूदृशे विकसित करण्यासाठी 18 लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे.

प्रत्यक्षात जुलै 2023 मध्ये कामाला सुरुवात झाली. दि. 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सप्टेंबरमध्ये मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात डागडुजीचे काम सुरू करण्यात आले. सध्या तटबंदीची दुरुस्ती व जतन, जेजुरी गडकोटातील सर्व ओवर्‍या, सज्ज्यावरील आतील भागात वॉटरप्रूफिंग, प्रदक्षिणामार्गावर दगडी पायऱ्या बसविणे, पूर्व दरवाजा व पश्चिम दरवाजाबाहेरील दगडी पायरी मार्ग तयार करणे ही कामे सुरू आहेत. पिंपळ वेशी परिसरात पायरी मार्ग दुरुस्ती, कठडे, कमान सुशोभीकरण, बानूबाई मंदिर, हेगडे प्रधान मंदिराबाहेरील कामे सुरू आहेत. मुख्य मंदिरातील गाभारा, सभागृहातील दगडी फरशी तसेच सभागृहातील दगडी खांबांच्या दुरुस्तीचे काम अद्याप बाकी आहे. होळकर व पेशवे तलावाच्या तटबंदीची दुरुस्ती, नवीन दगडी कामे प्रगतिपथावर आहेत.

०००

ताज्या बातम्या

विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

0
नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे...

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....