रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 837

तणावातही पोलिस अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावतात – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.15 (जिमाका) : पोलिस विभाग अत्यंत महत्वाचा विभाग आहे. समाजात शांतता, अलोखा राखण्याचे काम या विभागातील अधिकारी, कर्मचारी करत असतात. अलिकडे पोलिस विभागाचे काम प्रचंड वाढले आहे. कर्मचाऱ्यांची देखील कमतरता आहे, असे असतांना देखील प्रामाणितपणे कर्तव्य बजावले जातात, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

जिल्हा पोलिस दलाच्यावतीने येथील कवायत मैदान येथे बांधण्यात आलेल्या आरोग्यम् पोलिस हेल्थ क्लबचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप, कार्यकारी अभियंता दादासाहेब मुकडे आदी उपस्थित होते.

अलिकडे मोबाईल, इंटरनेटमुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. अशा गुन्हेगारीवर आळा घालने फार मोठे आवाहन आहे. आमचा पोलिस विभाग समर्थपणे या आवाहनाचा सामना करत आहे. पुर्वी पोलिसांकडे ठराविक कामे होती. अलिकडे पोलिस विभागाचे कार्यक्षेत्र देखील वाढले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासोबतच सामाजिक पोलिसिंग करावी लागते. त्यामुळे खाकी वर्दितीत पोलिस शिपाही खऱ्या अर्थाने समाजाचा मित्र म्हणून आता ओळखल्या जावू लागला आहे.

याठिकाणी सुरु करण्यात आलेला हेल्थ क्लब कामाचा ताण घालविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी बजावतांना आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी, असे पालकमंत्री म्हणाले.

आ.मदन येरावार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शरीर, मन तंदुरुस्त राहीले तर निकोप विचारांना चालना देते. पोलिस विभागाचे काम फार तान तणावाचे आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे. या ठिकाणी सुरु करण्यात आलेला क्लब खाजगी क्लबपेक्षाही उत्तम आहे. त्याची देखभाल दुरुस्ती देखील उत्तम रहावी, असे आ.येरावार यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन गोपाळ पाटील यांनी केले. सुरुवातीस पालकमंत्री व अन्य मान्यवरांनी हेल्थ क्लब नामफलकाचे अनावरण करून उद्घाटन केले. त्यानंतर येथील सोई-सुविधांची पाहणी केली.

अवधूतवाडी पोलिस स्टेशन ईमारत बांधकामाचे भूमिपूजन

येथील पंचायत समितीच्या समोरील जागेत अवधूतवाडी पोलिस स्टेशनची नवीन सुसज्ज ईमारत बांधण्यात येत आहे. या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते झाले. यावेळी आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालयात कैद्यांसाठी स्वतंत्र वार्ड

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कैदी बांधवांसाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला आहे. या वार्डचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते झाले. यावेळी आ.मदन येरावार, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अधिष्ठाता डॅा.गिरिष जतकर तसेच डॅा.सुरेंद्र भुयार, डॅा.पोटे उपस्थित होते.

000

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमुळे संस्कृती आणि परंपरांचे जतन – श्रीमंत बाबाजीराजे भोसले छत्रपती

मुंबई, दि. १५: छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज निर्माण केले आणि आपल्या येथील संस्कृती, परंपरा जपल्या गेल्या. त्याकाळच्या इतर शासकांची प्रतिमा आक्रमक अशी होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील जनतेसाठी स्वराज्य निर्मिती केली, असे प्रतिपादन तंजावर संस्थानचे श्रीमंत बाबाजीराजे भोसले छत्रपती यांनी केले.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने शुक्रवार दि. १५ व शनिवार १६ मार्च, २०२४ रोजी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील दीक्षांत सभागृहात ‘शिवसंवाद’ या दोन दिवसीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमंत बाबाजीराजे भोसले बोलत होते. महाराणी गायत्रीराजे साहेब भोसले, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आणि साप्ताहिक विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्रीमंत बाबाजीराजे भोसले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी जनतेला विश्वास दिला. त्यांच्या मनात स्वातंत्र्याची बीजे पेरली. मावळ्यांची साथ घेत स्वराज्य निर्मिती केली. विधायक पद्धतीने त्यांनी आपल्या स्वराज्याची निर्मिती केली. त्यावेळच्या इतर  शासकांचा राज्यव्यवहार हा जनतेवर जुलूम जबरदस्ती आणि इतरांवर आक्रमणाचा असा होता. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण आजही उठून दिसते आणि तब्बल साडेतीनशे वर्षांनंतरही त्यांचे नाव घेतले जाते, असे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील केवळ गड किल्ले नव्हे तर तो इतिहासही जपला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रधान सचिव श्री. खारगे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० ब्या वर्षानिमित्त महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.. स्वराज्य निर्मिती, छत्रपतींचा जीवन काल हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आरमार, शेती, अष्टप्रधान मंडळ स्थापन करून राज्यकारभार अशा कितीतरी गोष्टी या आजही सर्वांसमोर आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे  विचार लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महानाट्य आयोजित केले जात आहेत. आजच्या परिषदेच्या माध्यमातून आणि त्यात सादर होणाऱ्या शोधनिबंधातून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचेल, असेही त्यांनी नमूद केले.

सध्या महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्याइतके जागतिक वारसा स्थळे आहेत. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांना नामांकन मिळाले असून ते केंद्र सरकार मार्फत युनेस्को कडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री चवरे यांनी केले. या परिषदेच्या दोन्ही दिवशीच्या सत्रांमध्ये अनेक ख्यातनाम इतिहास अभ्यासक, लेखक, इतिहासकार व इतिहास संशोधकांची व्याख्याने होणार आहेत.

000

दीपक चव्हाण/विसंअ

 

 

विद्यार्थ्यांसाठी आता आठवड्यातील प्रत्येक शनिवार होणार ‘आनंददायी शनिवार’

मुंबई, दि. १५ : विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासिनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल. त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. विद्यार्थ्यांची गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल, तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

उपक्रमाचा उद्देश

विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे, शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे, संभाषण कौशल्य विकसित करणे, आत्मविश्वास व नैराश्येवर मात करण्याची क्षमता निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये प्राणायाम, योग, ध्यान-धारणा, श्वसनाची तंत्रे, आपत्ती व्यवस्थापनाची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण, दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना, रस्ते सुरक्षा, समस्या निराकरणाची तंत्रे, कृती, खेळ यावर आधारित उपक्रम माईंडफुलनेस (Mindfulness) वर आधारित कृती व उपक्रम, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य आदी कृतींचा समावेश असेल. या कृतींसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना असणार आहे.

आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असतांना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील कार्यपद्धतींद्वारे आनंददायी स्वरुपाचा होण्याच्या दृष्टिने शालेय शिक्षण आयुक्त आणि राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे संचालक यांच्यामार्फत एकत्रितपणे रुपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

दिलखुलास’,’जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अधिष्ठाता प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांची मुलाखत

मुंबई, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सर ज. जी. स्कुल ऑफ आर्ट या महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. विश्वनाथ साबळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

राज्यातील तसेच कलेच्या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबईत असलेले सर ज.जी स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालय ही अग्रगण्य कलाशिक्षण संस्था आहे. या क्षेत्रातही रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध असतात. त्याअनुषंगाने या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया, अभ्यासक्रमाचे महाविद्यालयाचे दरवर्षी भरणारे वार्षिक कला प्रदर्शनाचे स्वरूप, तसेच कलेच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी, याबाबतची माहिती प्रा. डॉ. साबळे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातुन दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रा. डॉ. साबळे यांची मुलाखत सोमवार दि. 18, आणि मंगळवार दि.19 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे, तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 16 मार्च 2024 रोजी सायं 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक पंकज चव्हाण यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००

जयश्री कोल्हे/विसंअ

जलसंधारण अधिकारी-गट ब पदाची परीक्षा रद्द – आयुक्त सुनील चव्हाण

मुंबई दि. 15 : “जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित” पदासाठी  20 व 21 फेब्रुवारी, 2024 रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील अशी माहिती मृद व जलसंधारणचे आयुक्त तथा राज्यस्तरीय निवड समिती अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली.

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट “ब” (अराजपत्रित) संवर्गातील  670 पदे सरळसेवेने भरण्यासाठी 19/12/2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा शासन मान्य टि. सी. एस. कंपनीमार्फत, राज्‍यातील 28 जिल्ह्यातील एकूण 66 केंद्रांवर 20/02/2024 व 21/02/2024 रोजी आयोजित करण्यात आली होती.

21/02/2024 रोजी सत्र 01 (सकाळी 9.00 ते 11.00) दरम्यान ARN Associate, ड्रिमलँड, नांदगाव पेठ, अमरावती शहर येथील परीक्षा केंद्रावर यश अनंत कावरे या परीक्षार्थीच्या प्रवेश पत्राच्या झेरॉक्स प्रतीवर खालील बाजूस A, B, C, D अशा स्वरुपात उत्तरेसदृष्य माहिती असल्याचे आढळून आले होते. या अनुषंगाने, गृह विभागाच्या अहवालानुसार, नांदगाव पेठ, अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलीस अहवालानुसार आजपावेतो एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये टिसीएस कंपनीचे अमरावती येथील स्थानिक कर्मचारी व त्यांचे प्राधिकृत ARN Associate, ड्रिमलँड, नांदगाव पेठ, अमरावती शहर या ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा देखील समावेश आहे.  सबब, परीक्षा घेणाऱ्या टिसीएस कंपनीतील या परीक्षा केंद्राशी संबंधित काही कर्मचारी या गैरप्रकारात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. यामुळे एकूणच या परीक्षेची विश्वासार्हता व पारदर्शकता यावर काही अंशी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या परीक्षेविषयी परीक्षार्थींच्या मनात संशय निर्माण होण्यास वाव मिळाला आहे. या प्रकरणी अनेक उमेदवारांकडून दिनांक 20 व 21 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करावी व या परीक्षेची प्रक्रिया पुन्हा नव्याने घ्यावी, अशी विनंती शासनाकडे विविध स्तरावर केलेली आहे.

या परीक्षेत झालेला गैरप्रकार प्रथमदर्शनी एका केंद्रापुरता दिसत असला तरी, एकूण परीक्षा कार्यपध्दती व पारदर्शकतेविषयी परीक्षार्थींच्या मनात काही संशय निर्माण करणारा ठरला आहे. या गृह विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंतच्या पोलीस तपासात अटक केलेल्या आरोपींची संख्या, मे. टि.सी.एस (TCS) या कंपनीचे स्थानिक कर्मचारी व त्यांच्या अमरावती शहरातील ARN Associate या प्राधिकृत ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा प्रथमदर्शनी काही अंशी सहभाग आढळून आलेला दिसतो. यामुळे ही परीक्षा रद्द करून फेर परीक्षा घेण्याची परीक्षार्थींची मागणी याबाबत सांगोपांग विचार होऊन, “जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित” या पदासाठी 20 व 21 फेब्रुवारी, 2024 रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील. तरी सर्व संबंधीत परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी,असेही आयुक्त श्री. चव्हाण यांनी सांगितले आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन दुरूस्तीसाठी २११ कोटी रुपयांचा निधी –  मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. १५ : विदर्भासाठी महत्त्वाच्या असलेल्या माजी मालगुजारी तलावांच्या प्रस्तावित प्रकल्पांपैकी ९७६ प्रकल्पांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीसाठी २११.५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता मिळाल्याची माहिती, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली.

माजी मालगुजारी तलाव म्हणजे पुरातन काळच्या जमिनदारांनी लोकसहभागातून, सिंचनासाठी तयार केलेले तलाव होते. या तलावात पावसाचे पाणी साठविण्यात येत असे. या तलावांतून पावसाळ्यानंतर अनेक हेक्टर शेतीस पिकांसाठी पाणी व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत असे यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी माजी मालगुजारी तलावांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने मंत्री श्री. राठोड यांनी नुकतीच बैठक घेतली होती.

विदर्भातील सुमारे ९,२८० माजी मालगुजारी तलावांपैकी सन २०२३-२४ मध्ये पहिल्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील ३४२ तलावांच्या दुरूस्तीसाठी ४४.०७ कोटी, भंडारा जिल्ह्यातील ७४ तलावांच्या दुरूस्तीसाठी २२.४१ कोटी, चंद्रपूर जिल्ह्यातील ४६० तलावांच्या दुरूस्तीसाठी १२०.३३ कोटी, व गडचिरोली जिल्ह्यातील १०० तलावांच्या दुरूस्तीसाठी २४.२४ कोटी असे एकूण २११.५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे.

मंत्री श्री. राठोड यांनी मालगुजारी तलावांच्या कामाच्या प्रस्तावांबाबत आढावा घेऊन लवकर निधी मिळण्यास मान्यता मिळावी, यासाठी पाठपुरावा केला आहे. तलावांच्या पुनरूज्जीवन व दुरूस्तीची कामे दर्जेदार होण्याकरिता संबंधित अधिकारी यांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही मंत्री श्री. राठोड यांनी दिल्या.

०००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरहद शौर्याथाँन – २०२४ स्पर्धेच्या लोगो, वेबसाईटचे अनावरण

मुंबई, दि. १५ : सरहद पुणे , भारतीय लष्कर  यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अर्हम  संस्था पुणे यांच्या सहकार्याने सरहद शौर्याथाँन- २०२४ स्पर्धेचे आयोजन ३० जून २०२४ रोजी झोजिला वाँर मेमोरियल ते कारगिल वाँर मेमोरियल या दरम्यान करण्यात येणार आहे. त्यासंबंधी स्पर्धेचा लोगो आणि संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

भारतीय लष्कराच्या वतीने प्रथमच झोजिला युध्द विजय अमृत महोत्सव आणि कारगिल युध्द विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सरहद शौर्याथाँन- २०२४(मॅराथॉन) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यास्पर्धेत भारतासह जगातील विविध देशातील धावपटू भाग घेणार आहेत.

गेली सहा वर्षे सरहदच्या वतीने कारगिल आंतरराष्ट्रीय मॅराथॉनचे आयोजन यशस्वीपणे कारगिल येथे केले आहे.  त्यासाठी भारतीय लष्कराने सरहद संस्थेला या स्पर्धेचे आयोजन करण्यास आमंत्रित केले आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिलांसाठी ४४ किमी मॅराथॉन,२५ किमी  मॅराथॉन,१० आणि ७.५ किमी आणि अंतराच्या स्पर्धा तसेच शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी ४ किमीची स्पर्धा घेतली जाईल आणि यास्पर्धेतील विजेत्यांना  रोख पारितोषिके दिली जाणार आहेत.

यावेळी सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार,स्पर्धेचे अर्हम संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्य समन्वयक डॉ. शैलेश पगारीया, स्पर्धा संचालक सुमंत वाईकर, तांत्रिक संचालक वसंत गोखले सरहदचे सुयोग गुंदेचा, रामदास खोपडे, अजित निबांळकर, संतोष बालवडकर, स्वयंम पगारीया उपस्थित होते.

यास्पर्धेचे मुख्य मार्गदर्शक मेजर जनरल सचिन मलिक (लडाख मुख्यालय) हे आहेत.

0000000

राजू धोत्रे/विसंअ

नायर महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचे लोकार्पण

मुंबई, दि. 15 : मुंबईसह राज्यातील नागरिकांचे प्रश्न सोडवून जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी शासन अनेक पातळ्यांवर काम करीत आहे. नागरीकांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे, यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांच्या निर्मितीमधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शासन काम करत असल्याचे, प्रतिपादन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नायर दंत महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीचा लोकार्पण सोहळा नायर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कार्यक्रमाला कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार यामिनी जाधव, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल, अति. आयुक्त सुधाकर शिंदे, अधीक्षक डॉ. नीलम अंद्राडे आदी उपस्थित होते.

नायर रूग्णालयाच्या विस्तारीत इमारतीमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, ही 11 मजली अगदी प्रशस्त इमारत आहे. महापालिकेची सर्व रूग्णालये आधुनिक सुविधांनी सज्ज बनविण्यात येणार आहेत. केईएम रूग्णालयात बंद पडलेल्या सहा वॉर्डांची दुरूस्ती करून हे वॉर्ड रूग्णांच्या सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज आहे. यामुळे 360 खाटांची संख्या वाढली आहे.  नायर रुग्णालयाच्या इमारत बांधकामामध्ये 20 कोटी रूपयांची बचतही करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले, ‘झीरो प्रीस्क्रीप्शन’ पॉलीसीच्या माध्यमातून विनामूल्य औषध उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी 3 हजार केाटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. औषधांसाठी एवढी मोठी तरतूद करणारी मुंबई ही जगातील पहिली महापालिका आहे. एका वर्षामध्ये आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी 7 हजार कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. दीडशे वर्षात 12 हजार  खाटा होत्या, शासनाने दीड वर्षात 5 हजार खाटांची संख्या वाढविली आहे.  महापालिकेचे  खर्चानुसार उत्पन्नही वाढले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  दिल्या.

मुंबई खड्डेमुक्त करण्यात येत असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,  शहरात ‘ अर्बन फॉरेस्ट’  तयार करण्यात येणार  असून सागरी किनारा मार्गाजवळ जवळपास 300 एकर जागेत जागतिक दर्जाचे ‘सेंट्रल पार्क’ तयार करण्यात येणार आहे. हा पार्क मुंबईचा ‘ऑक्सिजन पार्क’ ठरणार आहे. मुंबईत दळणावळणाची पायाभूत सोयी – सुविधांच्या विकासाची  कामे गतीने होत आहे. मेट्रो, रस्ते, अटल सेतू, सागरी किनारा प्रकल्प यामुळे मुंबई अधिक गतिमान होत आहे.  पायाभूत सोयी सुविधांच्या विकासाची 8 लाख कोटी रूपयांची कामे सुरू असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य  आहे. परकीय गुंतवणूकीतही राज्य देशात अव्वल  आहे.

मुंबई स्वच्छ करण्यासाठी सखोल स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.  मुंबईचे खरे हिरो हे सफाई कर्मचारी आहे. त्यांच्या 48 निवासी वसाहती आहेत, यामध्ये नागरी सुविधांच्या विकासाची कामे करण्यात येत आहे. सध्या 2 वसाहतींमध्ये कामे सुरू झाली आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी महापालिका त्यांचा खर्च उचलणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. प्रास्ताविक अधिक्षक डॉ. नीलम अंद्राडे यांनी केले.   कार्यक्रमाला अधिक्षक, डॉक्टर, विद्यार्थी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/विसंअ

मुतखड्यावर शोकव्हेव उपचार, आता विना वेदना मुतखडा पडणार बाहेर; गोरगरिबांचे पैसे वाचणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी हे यंत्र बसवणारे उत्तर महाराष्ट्रात जळगाव पहिले

जळगाव दि.15 ( जिमाका ) जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सुविधा मजबूत व्हाव्यात यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीतून अनेक उपकरण घेतली जे महाराष्ट्रात इतरत्र नाहीत. आता मुतखडयासाठी नव्या पिढीतील तंत्रज्ञान असलेले ‘स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी’ ही अद्यावत मशीनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दिली. अशी अद्यावत मशीन उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही ती जळगाव मध्ये बसविण्यात आली असून कोणतीही वेदना होणार नाही अशी ही मशीन काही सेंकदात मुतखडा फोडते आणि तें लघवी वाटे विना अडथळा बाहेर पडते. फक्त एक पॅरासिटॉमॉल गोळी खाऊन रुग्ण घरी जाऊ शकतो असे तज्ञ डॉक्टरांनी आपल्याला सांगितले. आता मुतखड्याच्या ऑपरेशनसाठी गोरगरीबाला हजारो रुपये मोजावे लागणार नाहीत. अशी सोय जळगाव मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचे आपल्याला समाधान असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखविली.

जिल्हा वार्षिक योजना निधी अंतर्गत मंजूर झालेल्या ‘ ई. एस.डब्लु. एल. सेंटर ऑफ एक्सलन्स ‘ चे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

यावेळी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, अरविंद देशमुख, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

या नव्या यंत्राद्वारे होणारी एक विना-शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे. जी मूत्रमार्गाच्या काही भागांमध्ये मुतखडे फोडण्यासाठी शॉकवेव्ह वापरते. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी हा किडनी स्टोनसाठी एक सामान्य उपचार आहे. कधीकधी या प्रक्रियेला स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी (Spark EM ESWL) म्हणतात. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी मुतखडे फोडण्यासाठी उच्च-उर्जा शॉक (उच्चदाब) लहरी वापरते. किडनी स्टोनचे छोटे तुकडे नंतर मूत्रमार्गात अधिक सहजतेने जाऊ शकतात.  शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी रुग्णाची वेदना कमी करण्यात मदत करु शकते. मूत्रपिंडातील (किडणी) मुतखडे काढून टाकण्यासाठी अधिक आक्रमक शस्त्रक्रिया टाळण्यात ते मदत करु शकते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगांव संस्थेमध्ये नवीनतम पिढीतील इलेक्ट्रोमॅग्नेटिक शॉकवेव्ह एमिटर टेक्नॉलॉजी (Spark EM ESWL) सह ही सर्वात स्वस्त आणि जागतिक दर्जाचे उत्पादन आहे. जे मत्रपिंड आणि मुत्राशयातील मुतखडे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास मदत करते.स्पार्क हे जागतिक उत्पादन आहे आणि कंपनी जगभरातील 50+ पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते. सदर कंपनी ISO13485 आणि CE1984 प्रमाणक आणि गुणवत्ता व्यवस्थपन मान 9001:2008 सह उत्पादन प्रदान करते.अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

000

वस्त्रोद्योग योजनांचा लाभ आता ई-टेक्सटाईल पोर्टलवर

मुंबई, दि. 15 : वस्त्रोद्योग विभागाच्या  एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार विविध योजनांकरिता ई-टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यात येत आहे. विविध योजनांमधील लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून त्यांना अनुदान/ अर्थसहाय्य वितरीत करण्यापर्यंतची सर्व कार्यवाही सदर प्रणालीमार्फत करण्यात येणार आहे. ही प्रणाली विकसित करण्यासंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वस्त्रोद्योग विभाग आणि आयसीआयसीआय (इंडस्ट्रीयल क्रेडीट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडीया) बँकेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. 

‘सिंहगड’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या सामंजस्य कराराच्यावेळी विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, उपसचिव श्रीकृष्ण पवार, आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रिय प्रमुख विकास देशमुख, बँकेचे प्रदेश प्रमुख सुमंत जोशी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाच्यावतीने वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार, यांनी तर आयसीआयसीआय (ICICI) बँकेचे विकास देशमुख यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

वस्त्रोद्योग विभागाच्या उद्योजकांसाठी असलेल्या विविध अनुदानित योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी आणि त्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी आयसीआयसीआय बँक ई-टेक्सटाईल, ऑफीस ऑटोमेशन नावाची प्रणाली विकसित करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात तेथील परिस्थितीनुसार लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील माहिती या ऑनलाईन पोर्टलद्वारे नागरिकांना मिळणार आहे. या पोर्टलमार्फत शासन आणि लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठीचे खाते सुरू करण्यात येणार आहे. बँकेमार्फत निधी शासनाच्या खात्यात आणि लाभार्थ्यांसाठी असलेल्या खात्यामधून विविध योजनांचे अनुदान पात्र लाभार्थांना वितरीत करण्यात येणार आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/ससं/

 

ताज्या बातम्या

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

0
रायगड जिमाका दि.२०: आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे अमरावती विभागातील गरजूंना ६ कोटी ८२ लाखांची मदत राज्यभरासह अमरावती विभागातील गरजू रुग्णांना अडचणींच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुख्यमंत्री वैद्यकीय...

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुखमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. २०: आगामी जानेवारीमध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६'च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत असून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने...

कामगार विमा योजनेतील रुग्णालयांबाबत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

0
मुंबई, दि.20 :  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत...

विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

0
नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे...