सोमवार, जुलै 21, 2025
Home Blog Page 780

निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव…

रायगड जिमाका दि. 6 – निवडणूक हा भारतीय लोकशाहीचा मोठा सर्वात  उत्सव आहे. या उत्सवात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. समाजातील सर्व घटकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा प्रयत्नशील असून एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही,याकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

बांगलादेश, झिम्बाब्वे, श्रीलंका, कझाकिस्तान या देशाचे प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या  पार्शवभूमीवर रायगड लोकसभा मतदार संघात २ दिवसीय अभ्यास दौऱ्यासाठी आले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या माहितीसत्रात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. किशन जावळे ह्यांनी विदेशी प्रतिनिधींच्या मंडळाला मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी पोलीस  अधिक्षक सोमनाथ घार्गे, केंद्रीय निरीक्षक संजीवकुमार झा, केंद्रीय खर्च निरीक्षक धिरेंद्रमणी त्रिपाठी यांसह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या चर्चेत विदेशी बांग्लादेशचे 2 प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी , जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग अधिकारी) कझाकिस्तान देशाचे 2 प्रतिनिधी नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन(केंद्रीय निवडणूक आयोग कझाकीस्तान), श्रीलंका देशाच्या सिलया हिलक्का पासिलीना(संचालक श्रीलंका) झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बाबे) हे सहभागी झाले होते.

यावेळी श्री जावळे यांनी ईव्हीएम- व्हीव्हीपॅट, आयटी उपक्रम, मतदार नोंदणी प्रक्रिया, विविध आय टी अप्लिकेशन, यंत्रणा प्रशिक्षण, रायगड जिल्हा माहिती तसेच मतदार जनजागृतीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.तसेच निवडणूक काळात माध्यमे आणि समाज माध्यम यांची भूमिका यावर सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

केंद्रीय निरीक्षक श्री. झा ह्यांनी मतदानाची टक्केवारी वाढावी ह्याकरिता प्रशासनाने राबविलेल्या अनेक योजना लोकांपर्यंत पोहचल्याने समाधान व्यक्त केले व कोणताही मतदार निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहू नये ह्या साठी सर्वतोपरी प्रयत्न करावे अशी आशा व्यक्त केली.

केंद्रीय खर्च निरीक्षक धिरेंद्रमणी त्रिपाठी यांनी निवडणूक काळात उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयोगाचे निर्देश आणि त्याची अतिशय पारदर्शी पद्धतीने होणारी अंमलबजावणी याबाबत माहिती दिली.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजनाची माहिती दिली.

यावेळी विदेशी प्रतिनिधी यांनी मोठ्या मतदारसंख्येचे नियोजन कसे केले जाते. प्रत्यक्ष कार्यक्रम राबविण्यात येणाऱ्या अडचणी याबाबत माहिती घेतली. तसेच निवडणूक खर्च विहित पद्धतीने आणि मर्यादेत होण्यासाठी निवडणूक आयोगाची कार्यवाही जाणून घेतली. या काळात सुरक्षा व्यवस्था कशी हाताळली जाते याबाबतही त्यांनी माहिती घेतली.

ह्या बैठकीनंतर, विदेशी प्रतिनिधींच्या मंडळाने मीडिया सेंटर ला भेट देऊन सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया वर सविस्तर चर्चा केली. उमेदवारारमार्फत चुकीची माहिती,दिशाभूल करणारी आश्वासाने किंवा माध्यमांवर होणार खर्च ह्याविषयावर सर्व देशांच्या प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी  मिडीया सेलमार्फत उत्तमरीतीने माध्यमे हाताळले जात असल्याबद्दल माध्यम कक्षाचे कौतुक केले.

00000

‘दिलखुलास’मध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची ‘लोकसभा निवडणुकांची तयारी’ विषयावर मुलाखत

मुंबई, दि. ६ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४’ जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी  जळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमासाठी मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार दि. ८ मे २०२४  रोजी  आणि गुरुवार ९ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील  यांनी ही मुलाखत घेतली आहे.

जळगाव जिल्ह्यात असलेले लोकसभा निवडणूक मतदार संघ, लोकसभा  निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी  करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत श्री. आयुष प्रसाद यांनी माहिती दिली आहे.

0000

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात – निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे

मुंबई, दि. ६  :- मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघामध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत संपल्यानंतर १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी दिली. या मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत एकाही उमेदवाराने माघार घेतली नसून या मतदारसंघात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह खालीलप्रमाणे :

१) अनिल यशवंत देसाई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- मशाल, २) राहुल रमेश शेवाळे – शिवसेना- धनुष्यबाण, ३) विद्यासागर भिमराव विद्यागर – बहुजन समाज पार्टी- हत्ती, ४) अबुल हसन अली हसन खान – वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलेंडर, ५) डॉ. अर्जुन महादेव मुरुडकर – भारतीय जवान किसान पार्टी – भेटवस्तू, ६) ईश्वर विलास ताथवडे – राष्ट्रीय महास्वराज भूमि पार्टी – चपला, ७) करम हुसैन किताबुल्लाह खान – पीस पार्टी – काचेचा पेला, ८) जाहीद अली नासिर अहमद शेख – आजाद समाज पार्टी (कांशी राम)- किटली, ९) दिपक एम. चौगुले – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी – नागरिक, १०) महेंद्र तुळशीराम भिंगारदिवे – राईट टु रिकॉल पार्टी- प्रेशर कुकर, ११) सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी – सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया – ऑटो रिक्षा, १२) अश्विनी कुमार पाठक – अपक्ष – बॅटरी टॉर्च, १३) आकाश लक्ष्मण खरटमल – अपक्ष – उस शेतकरी, १४) विवेक यशवंत पाटील – अपक्ष – संगणक, १५) संतोष पुंजीराम सांजकर – अपक्ष – शिट्टी

मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ९ लाख ५१ हजार ७३८ मतदार असून त्यापैकी ५ लाख १० हजार १६८ पुरुष, ४ लाख ४१ हजार ३८९ स्त्री तर १८१ तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघात एकूण १५ हजार ६७९ ज्येष्ठ नागरिक मतदार (८५ +) असून त्यात ७ हजार ४५५ पुरूष तर ८ हजार २२४ स्त्री मतदार आहेत. १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची संख्या १० हजार २३८ इतकी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या २७०१ असून त्यामध्ये १६७६ पुरुष तर १०२५ स्त्री मतदार आहेत.

मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघामध्ये एकूण १५३९ मतदान केंद्र असून ५ सहाय्यकारी मतदान केंद्र,

२ सखी महिला मतदान केंद्र, १ नवयुवकांसाठी मतदान केंद्र तर दिव्यांग मतदारांसाठी १ मतदान केंद्र असेल, अशी माहिती श्री. पानसरे यांनी दिली.

****

शैलजा पाटील/विसंअ/

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणूक रिंगणात – निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड

मुंबई, दि. ०६  : मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३१- मुंबई दक्षिण’ या लोकसभा मतदारसंघामध्ये आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत संपल्यानंतर १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी आज दिली. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी ३ उमेदवारांनी माघार घेतली. या मतदारसंघात २० मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अंतिम उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह खालीलप्रमाणे

१) अरविंद गणपत सावंत – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – मशाल, २) मोहम्मद शुऐब बशीर खतिब – बहुजन समाज पार्टी – हत्ती, ३) यामिनी यशवंत जाधव- शिवसेना – धनुष्यबाण, ४) अफजल शब्बीर अली दाऊदानी – वंचित बहुजन आघाडी – गॅस सिलिंडर, ५) मो. नईम शेख – एम पॉलिटिकल पार्टी – बॅटरी टॉर्च, ६) राहुल फणसवाडीकर – लोकशाही एकता पार्टी – शिवण यंत्र, ७) सुभाष रमेश चिपळूणकर – राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी – कॅमेरा, ८) अरविंद नारायण सावंत – अपक्ष – चिमणी, ९) प्रशांत प्रकाश घाडगे – अपक्ष – एयर कंडीशनर, १०) मतीन अहमद नियाज अहमद रंगरेज – अपक्ष – बादली, ११) मनीषा शिवराम गोहिल – अपक्ष  – शिट्टी, १२) मोहम्मद महताब अख्तर हुस्सेन शेख – अपक्ष – खाट, १३) शंकर सोनवणे – अपक्ष – गॅस शेगडी, १४) सबीहा खान – अपक्ष – हिरा

मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण १५ लाख ३२ हजार २२६ मतदार असून त्यापैकी ८ लाख ३० हजार ६२० पुरुष, ०७ लाख ०१ हजार ५६३ स्त्री तर ४३ तृतीयपंथी मतदार आहेत. या मतदारसंघात एकूण ४० हजार १२० ज्येष्ठ नागरिक मतदार (८५ +) असून त्यात १९ हजार ३५० पुरूष तर २० हजार ७७० स्त्री मतदार आहेत. १८ ते १९ या वयोगटातील नवमतदारांची संख्या १५ हजार २७४ इतकी आहे. दिव्यांग मतदारांची संख्या ५५१४ असून त्यामध्ये १६२८ पुरुष तर ११८५ स्त्री मतदार आहेत.

मुंबई दक्षिण मतदारसंघामध्ये एकूण १५२७ मतदान केंद्र असून ०४ सहाय्यकारी मतदान केंद्र,  ०१ सखी महिला मतदान केंद्र, ०१ नवयुवकांसाठी मतदान केंद्र तर ०१ दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र असेल, अशी माहिती श्री. कटकधोंड यांनी दिली.

****

शैलजा पाटील/विसंअ/

२४ कल्याण लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय निरीक्षकांना भेटण्याच्या वेळा जाहीर

 ठाणे, दि.06 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे यातीनही निरीक्षकांना भेटण्याची वेळ व स्थळ जाहीर करण्यात आले आहे.

24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून मनोज जैन (आयएएस), खर्च निरीक्षक म्हणून श्री. नकुल अग्रवाल (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक म्हणून कु. इलाक्किया करुणागरन (आयपीएस) यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली असून हे तीनही निरीक्षक कल्याण लोकसभा मतदारसंघात दाखल झाले असून .

निरीक्षकांना भेटण्याची वेळ

सर्वसाधारण निरीक्षक श्री. जैन (आयएएस) यांचा संपर्क क्रमांक 8779033945 व 0251-2990725 असा असून genobserver24kalyan@gmail.com  हा त्यांचा ई-मेल आहे. त्यांचा सध्याचा राहण्याचा पत्ता यांना रेमंड गेस्ट हाऊस, जे.के.ग्राम, पाचपाखाडी, ठाणे (प), असा आहे. श्री.जैन यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका जलतरण तलाव कार्यालय, वै.ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे  क्रीडा संकुल, पेंढारकर  कॉलेजजवळ, घारडा सर्कल डोंबिवली पूर्व ता. कल्याण येथे दुपारी 4.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत भेटता येईल.

केंद्रीय खर्च निरीक्षक श्री.नकुल अग्रवाल (आयआरएस) यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका जलतरण तलाव कार्यालय, वै.ह.भ.प सावळाराम महाराज म्हात्रे  क्रीडा संकुल, पेंढारकर  कॉलेजजवळ, घारडा सर्कल डोंबिवली पूर्व ता. कल्याण  येथे भेटण्याची वेळ दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. केंद्रीय खर्च निरीक्षक श्री. अग्रवाल यांचा मतदारसंघातील संपर्क क्रमांक 8369751654 असा असून expobs24kalyan@gmail.com हा त्यांचा ई-मेल आहे.

तर पोलीस निरीक्षक कु. इलाक्किया करुणागरन (आयपीएस) यांचा संपर्क क्रमांक 8591173368 हा असून ilakkiyaips12@gmail.com  हा त्यांचा ई-मेल आहे. कु.करुणागरन यांना रेमंड गेस्ट हाऊस, जे.के.ग्राम, पाचपाखाडी, ठाणे (प), येथे दुपारी 4.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत भेटता येईल.

00000000000

केंद्रीय संचार ब्युरोच्या तीन दिवसीय मतदार जनजागृती चित्रप्रदर्शनास प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका):- केंद्रीय संचार ब्युरोमार्फत आयोजित चित्रप्रदर्शन पाहून मतदारांच्या मनात मतदानाची प्रेरणा नक्कीच जागेल आणि ते मतदानासाठी प्रेरीत होतील,असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे व्यक्त केला.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर द्वारा जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर व दक्षिण मध्य रेल्वे यांच्या सहयोगाने मतदार जनजागृती साठी तीन दिवसीय चित्रप्रदर्शनाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, दिलीप स्वामी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, दक्षिण मध्य रेल्वेचे सहा. कमर्शिअल मॅनेजर धनंजय कुमार सिंह व भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, मतदान जनजागृती पर आम्ही जी माहिती प्रशासनाच्या, जिल्हा निवडणूक कार्यालय, स्वीप टीम आदी मार्फत देत आहोत आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न  करत आहोत त्या प्रयत्नांना हे चित्रप्रदर्शन मोठी मदत ठरेल असे त्यांनी सांगितले. केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा माहिती कार्यालय, रेल्वे प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन व पथनाटय कलाकार यांच्या मार्फत ही जनजागृती होत आहे. नागरिकांनी या चित्रप्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन ही त्यांनी याप्रसंगी केले.

प्रारंभी केंद्र शासनाच्या पंजीकृत आदर्श लोकसेवा सांस्कृतिक मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी मतदार जनजागृतीपर गीतांचे सादरीकरण केले व लोककलेच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली. हे प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक येथे दि.६ ते दि.८ असे तीन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आयोजनासाठी केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगरचे प्रदीप पवार, प्रिती पवार, शरद सादिगले यांनी परिश्रम घेतले.

०००००

‘सारथी’चे २० विद्यार्थी ‘युपीएससी’च्या अंतिम गुणवत्ता यादीत झळकले

अमरावती, दि. 04 : नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात सारथी, पुणे मार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. ज्यात ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातून ०६, नाशिक जिल्ह्यातून ०५, अहमदनगर जिल्ह्यातून २ तसेच कोल्हापूर बुलढाणा, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी यशस्वी झाला आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे संस्थेने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. युपीएससी परीक्षा मुलाखतीच्या तयारीकरिता ४५ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण नियोजित करून तज्ज्ञामार्फत झूम मिटिंगचे नियोजन करून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटातील उमेदवारांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळुन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सारथी संस्था प्रयत्नशील आहे. सारथी, पुणे मार्फत युपीएससी करिता लाभ घेऊन यश मिळविलेल्या २० विद्यार्थ्यांची रँक नंबर व नावे पुढीलप्रमाणे आहे.

विनय सुनील पाटील, नाशिक- एआयआर रँक १२२ ,आशिष अशोक पाटील, कोल्हापूर एआयआर रँक  147,   ठाकरे ऋषिकेश विजय, अकोला- एआयआर रँक  २२४ , शामल कल्याणराव भगत, पुणे- एआयआर रँक  २५८, उन्हाळे आशिष विद्याधर, बुलडाणा- एआयआर रँक  २६७, निरंजन महेंद्रसिंह जाधवराव, पुणे- एआयआर रँक  २८७,  घोगरे हर्षल भगवान, पुणे- एआयआर रँक  ३०८,   शुभम भगवान थिटे, पुणे- एआयआर रँक  ३५९, अंकित केशवराव जाधव, हिंगोली- एआयआर रँक  ३९५, खिलारी मंगेश पराजी, अहमदनगर- एआयआर रँक  414, पाटील लोकेश मनोहर, जळगाव- एआयआर रँक  ४९६, मानसी नानाभाऊ साकोरे, पुणे- एआयआर रँक  ५३१,   आविष्कार विजय डेले, नाशिक- एआयआर रँक  ६०४, केतन अशोक इंगोले, वाशिम- एआयआर रँक  ६१०, देशमुख राजश्री शांताराम, अहमदनगर- एआयआर रँक 610, निकम सूरज प्रभाकर, नाशिक -एआयआर रँक  ७०६, कुणाल संजय अहिरराव, नाशिक- एआयआर रँक  ७३२, गौरी शंकर देवरे,  पुणे – एआयआर रँक  ७५९ , शुभम उत्तमराव बारकाळे, नाशिक -एआयआर रँक  ८३७, श्रवण अमरसिंह देशमुख, सातारा- एआयआर रँक  ९७६ असे आहे.

मागील तीन वर्षात सारथी संस्थेमार्फत ५८ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी झाले आहेत. यावर्षी २० विद्यार्थी यशस्वी झाले असून आतापर्यंत सारथी संस्थेमार्फत एकूण ७८ विद्यार्थी युपीएससी परीक्षेत यशस्वी झाले आहेत.

सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर (भा.प्र.से.से.नि.) यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी उत्तम प्रशासन करून या देशाच्या विकासात महाराष्ट्राचा ठसा उमटावा अशा शुभेच्छा व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे (भा.प्र.से.) यांनी दिल्या आहेत.

00000

सर्वांच्या सहकार्यामुळेच चंद्रपूरची ‘स्वीप’ मोहीम प्रभावी – जिल्हाधिकारी विनय गौडा

चंद्रपूर, दि. 6 : नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स आणि मिम्स् स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला नागरिकांनी दिलेला उत्स्फुर्त प्रतिसाद, स्वीप टीमची विशेष मेहनत, ‘थिमॅटिक’ मतदान केंद्रासाठी जिल्ह्यातील उद्योजकांनी घेतलेला पुढाकार या सर्व बाबींमुळेच चंद्रपूर जिल्ह्याची मतदार जनजागृतीची ‘स्वीप’ मोहीम प्रभावी ठरली आणि मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत झाली, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी काढले.

नियोजन भवन येथे आज (दि.6) विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे आदी उपस्थित होते.

सन 2019 च्या तुलनेत यावर्षी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी जवळपास 3.5 ने वाढली, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, यासाठी जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांनी अतिशय चांगले नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. इतर ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट होत असतांनाच चंद्रपूरमध्ये मात्र मतदानाची टक्केवारी वाढली आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. यासाठी जिल्हा  प्रशासनाने बुथ स्तरावर जावून राबविलेली विशेष मोहीम, जनजागृतीपर संदेश देण्यासाठी साकारण्यात आलेली मानवी साखळी, मॅरेथॉन, सायकल रॅली, कलापथकांच्या माध्यमातून संदेश याशिवाय मतदानाचा सेल्फी, पोस्टर्स, मिम्स्, रिल्स स्पर्धा आदी उपक्रम राबविले.

पुढे जिल्हाधिकारी म्हणाले, विशेष म्हणजे गत निवडणुकीत चंद्रपूर शहरामध्ये केवळ 53 टक्के मतदान झाले होते. यावर्षी यात 5 टक्क्यांची वाढ होऊन चंद्रपूर शहरात 58 टक्के मतदान झाले. मतदानाच्या माध्यमातूनच लोकांचा आवाज संसदेत पोहचतो. त्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पुढाकार घेतला. उद्योजकांनी सीएसआर निधीमधून स्पर्धेतील विजेत्यांसाठी बाईक, रेसिंग सायकल, मोबाईल अशी आकर्षक बक्षीसे उपलब्ध करून दिली. तसेच जिल्हा प्रशासनाच्या आवाहनावरून मतदारांना आकर्षित करण्यासाठी जिल्हाभरात 85 थिमॅटीक पोलिंग स्टेशन उभारले. यासाठी सर्वजण अभिनंदनास पात्र आहे. येणा-या विधानसभा निवडणुकीतही मतदानाच्या टक्केवारीत नक्कीच वाढ होईल, अशी अपेक्षासुध्दा जिल्हाधिका-यांनी व्यक्त केली.

चंद्रपुरच्या मोहिमेचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून कौतुक : सीईओ विवेक जॉन्सन

2024 च्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी ठरले, याचा अभिमान आहे. लोकशाही यशस्वी करण्यासाठी लोकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध स्पर्धा तसेच थिमॅटिक मतदान केंद्र हे यावेळेसच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. विशेष म्हणजे चंद्रपुरच्या या उपक्रमाची राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दखल घेऊन कौतुक केले, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.

पुढील विधानसभेसाठी जबाबदारी वाढली : पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन

जिल्ह्यात स्वीप अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांसाठी मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. विदर्भात चंद्रपूरमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली असून पुढेही अशीच संकल्पना राबविण्यात येईल. त्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली असून यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वांचे सहकार्य हवे आहे, असे मत जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी तर संचालन सावंत चालखुरे यांनी केले.

मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक स्पर्धेतील विजेते : प्रथम पारितोषिक (अपाची मोटरसायकल) सुरेंद्र पोहाणे, द्वितीय पारितोषिक (रेसींग सायकल) प्रशांत गेडाम, तर तृतीय पारितोषिक (ॲन्ड्रॉईड मोबाईल) अशोक बारसागडे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

रिल्स स्पर्धा विजेते : प्रथम पारितोषिक (15 हजार रुपये) आशिष बोबडे, द्वितीय पारितोषिक (10 हजार रुपये) मंगेश साखरकर, तृतीय पारितोषिक (5 हजार रुपये) कोमल मडावी.

पोस्टर्स स्पर्धा विजेते : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) प्रथमेश निकोडे, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) आचल धोंगडे, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) वैष्णवी मिलमिले.

मिम्स स्पर्धा विजेते : प्रथम पारितोषिक (5 हजार रुपये) येवन येलमुले, द्वितीय पारितोषिक (3 हजार रुपये) संजय सोनुने, तृतीय पारितोषिक (2 हजार रुपये) अनुप शाहा.

थिमॅटिक मतदान केंद्राबाबत उद्योजकांचाही सन्मान : थिमॅटिक मतदान केंद्राबाबत प्रथम क्रमांक अल्ट्रा टेक सिमेंट, द्वितीय क्रमांक फेरो ॲलो प्लाँट आणि तृतीय क्रमांक पावरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांना देण्यात आला तसेच यावेळी धारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर, साई वर्धा पॉवर जनरेशन लिमिटेड, दालमिया सिमेंट कंपनी, बिल्ट बल्लारपूर इंडस्ट्रीज, अरबिंदो कोल माईन्स, सनफ्लॅग आयर्न ॲन्ड स्टील प्राय. लिमि., अंबुजा सिमेंट, माणिकगड सिमेंट आणि चमन मेटॅलिक या उद्योगांनासुध्दा प्रमाणपत्र देण्यात आले.  

००००००

 

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांची मुलाखत

मुंबई, दि. ६ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या तयारीविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची  मुलाखत घेण्यात आली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात सोमवार ६ मे रोजी  ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या फेसबुक आणि यू ट्युब या समाज माध्यमाद्वारे पाहता येणार आहे. धाराशिवचे जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

या मुलाखतीमध्ये जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली तयारी, निवडणूक पारदर्शक  वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात असलेली काळजी, मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी लोकसभा मतदारसंघात हाती घेतलेले उपक्रम, यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नव मतदारांना जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आवाहन केले आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

 

‘व्यवस्थापन लेखांकन दिना’निमित्त राज्यपालांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन

मुंबई, दि. ६ : देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात व्यवस्थापन लेखापालांचे योगदान लक्षणीय आहे. तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट गाठताना, व्यवसाय सुलभता वाढविण्याच्या कार्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वपूर्ण असेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन लेखांकन दिनाचे औचित्य साधून व्यवस्थापन लेखांकन व्यवसायाचे नियमन करणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) या राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 6) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

अर्थव्यवस्था वाढत असताना व्यवस्थापन लेखापालांची मागणी वाढणार असून खासगी तसेच सरकारी संस्थांमध्येही या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सेवेच्या संधी निर्माण होतील, असे राज्यपालांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे शिक्षण, आरोग्य सेवा, उत्पादन, बँकिंग, ग्राहक सेवा यांसह व्यवस्थापन लेखा क्षेत्रात परिवर्तनकारी बदल होत आहेत. मात्र, सायबर हल्ल्यांचे धोके वाढत आहेत. या दृष्टीने व्यवस्थापन लेखापालांनी सायबर सुरक्षेबाबत धोके कमी करण्यासाठी प्रभावी आणि परवडणारी प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे असे राज्यपालांनी सांगितले.

विविध क्षेत्रांमधील कौशल्यांमुळे अनेक शतके भारत जगातील आर्थिक महासत्ता होती. आज कौशल्य व पुनर्रकौशल्यावर भर देण्यात येत असून कौशल्य विकास कार्यात आयसीएमएआय संस्थेने शासनाला सहकार्य करावे तसेच आर्थिक साक्षरता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

उद्घाटन सत्राला भारतीय व्यवस्थापन संस्था आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज तिवारी, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष अश्विन दलवाडी, उपाध्यक्ष बी बी नायक, व्यवस्थापन लेखांकन समितीचे अध्यक्ष नीरज जोशी, डॉ. आशीष थत्ते, चैतन्य मोहरीर, संस्थेचे सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.  संस्थेतर्फे ‘व्यवस्थापन प्रबंधन क्षेत्रातील संधी व नवी आव्हाने : शाश्वत वृद्धी आणि सायबर सुरक्षा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

0000

Maharashtra Governor inaugurates Seminar on Management Accounting 

            Mumbai, May 6 : Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated a National Seminar organised by the Institute of Cost Accountants of India on the occasion of International Management Accounting Day at Y B Chavan Auditorium in Mumbai on Mon (6 May).

The theme of the Seminar was “Navigating the New Frontier: Management Accounting in the Era of Real-Time Insights, Sustainable Growth and Cybersecurity”.

The inaugural session was attended by Prof Manoj Tiwari, Director, IIM Mumbai, CMA Ashwin Dalwadi, President, Institute of Cost Accountants of India (ICMAI), CMA B B Nayak, Vice President, Chairman Management Accounting Committee CMA Neeraj Joshi, CMA Dr Ashish Thatte, CMA Chaitanya Mohrir, members and students.

 

0000

 

ताज्या बातम्या

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

0
रायगड जिमाका दि.२०: आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे अमरावती विभागातील गरजूंना ६ कोटी ८२ लाखांची मदत राज्यभरासह अमरावती विभागातील गरजू रुग्णांना अडचणींच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुख्यमंत्री वैद्यकीय...

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. २०: आगामी जानेवारीमध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६'च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत असून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने...

कामगार विमा योजनेतील रुग्णालयांबाबत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

0
मुंबई, दि.20 :  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत...

विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

0
नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे...