रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 777

‘दिलखुलास’ कार्यक्रमात बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची मुलाखत

मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात बीड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर  यांची ‘कायदा व सुव्यवस्था ‘ या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. शनिवार 11 मे 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत  ही मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत पत्रकार दत्ता देशमुख यांनी घेतली आहे.

बीड जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध केलेली कार्यवाही याविषयी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून श्री. ठाकूर यांनी माहिती दिली आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाकरिता खर्चविषयक निवडणूक निरीक्षकांकडून गुरुवारी उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी

मुंबई, दि. 8 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 करिता 27 – मुंबई उत्तर-पश्चिम  मतदारसंघातील भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरीक्षक हे उमेदवारांच्या प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवहीची तपासणी करणार आहेत. यातील पहिली तपासणी उद्या, गुरुवार 09 मे 2024 रोजी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च हा त्यांच्या खर्च नोंदवहीमध्ये नोंदविणे अपेक्षित आहे. निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशाचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 मधील सुचनेनुसार खर्च निरीक्षक हे प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवाराच्या खर्च नोंदवहीची तपासणी करणार आहेत.

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवही तपासणीचे वेळापत्रक असे (अनुक्रमे तपासणी क्रमांक, दिनांक, वार आणि वेळ या क्रमाने) : प्रथम तपासणी, 9 मे 2024, गुरुवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वा. द्वितीय तपासणी, 13 मे 2024, सोमवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वा. तृतीय तपासणी, 17 मे 2024, शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वा. तपासणीचे ठिकाणनिवडणूक निर्णय अधिकारी, 27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ, अर्थ व सांख्यिकी सभागृह,  प्रशासकीय इमारत, आठवा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई– 400051.

तपासणीसाठी उमेदवारांनी परिशिष्ट ई-1, भाग ‘अ’, ‘ब’, ‘क’, खर्चाची मूळ प्रमाणक (इनव्हाईस, जीएसटी क्रमांक आदींसह परिपूर्ण), तपासणी दिनांकापूर्वी अद्ययावत बँक पासबुक/बॅंक विवरणपत्र, सर्व परवाने (वाहन, रॅली आदी). वरील नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खर्च लेखाच्या तपासणीसाठी उमेदवार/उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहीत वेळेत अभिलेख्यांसह निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

0000

 

 

मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता नियुक्त सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षकांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

मुंबई, दि. 8 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024  करिता मुंबई उपनगर जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांची  सर्वसाधारण केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त केली आहे. हे निवडणूक निरीक्षक जिल्ह्यातील चारही मतदारसंघात दाखल झाले असून त्यांनी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेत विविध ठिकाणी भेटी देण्यास सुरुवात केली .

मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी धनंजय सिंग भदोरिया सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक

26 – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी धनंजय सिंग भदोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 9321887963 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-26435480 असा आहे. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, कक्ष क्रमांक 304, तिसरा मजला, इंडियन ऑईल विश्रामगृह, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई -400051 असा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.  वेळ – दुपारी 1 ते 2 वा. ठिकाण – निवडणूक निर्णय अधिकारी, 26- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ, अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन) पश्चिम उपनगरे यांचे कार्यालय, 7 वा मजला, प्रशासकीय इमारत, शासकीय इमारत, वांद्रे पूर्व, मुंबई-400051.

मुंबई उत्तरपश्चिम मतदारसंघासाठी संजय कुमार खत्री सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक

27– मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी संजय कुमार खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 9372753013 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-25720610 असा आहे. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, कक्ष क्रमांक 1002, दहावा मजला, पद्मविहार विश्रामगृह, आयआयटी, पवई, मुंबई -400076 असा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.  वेळ– सायंकाळी 4 ते 5 वा. ठिकाण – कक्ष क्रमांक 1002, दहावा मजला, पद्मविहार विश्रामगृह, आयआयटी, पवई, मुंबई -400076.

मुंबई उत्तरपश्चिम मतदारसंघासाठी स्तुती चारण सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक

28– मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी स्तुती चारण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 8591366725 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-20851459 असा आहे. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, कक्ष क्रमांक 03, पहिला मजला, आर्क विश्रामगृह, आर.सी. एफ., चेंबूर, मुंबई -400074 असा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.  वेळ– दुपारी 12 ते 1 वा. ठिकाण – निवडणूक निर्णय अधिकारी, 28 – मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ, पिरोजशा नगर, सांस्कृतिक सभागृह, स्टेशन साईड कॉलनी, गोदरेज कॉलनी, विक्रोळी स्टेशन जवळ, विक्रोळी (पूर्व), मुंबई – 400079.

मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी परवीन कुमार थिंड सर्वसाधारण केंद्रीय निरीक्षक

29– मुंबई उत्तर मध्य मतदारसंघासाठी परवीन कुमार थिंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा स्थानिक भ्रमणध्वनी क्रमांक 8928571253 असा असून दूरध्वनी क्रमांक 022-45006422 असा आहे. त्यांचे वास्तव्याचे ठिकाण, कक्ष क्रमांक 305, तिसरा मजला, इंडियन ऑईल विश्रामगृह, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई -400051 असा आहे. त्यांची नागरिकांना भेटण्याची वेळ आणि ठिकाण पुढीलप्रमाणे आहे.  वेळ– दुपारी 1 ते 3 वा. ठिकाण – निवडणूक निर्णय अधिकारी, 29 – मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ, जिल्हाधिकारी आणि सक्षम प्राधिकारी (ना. क्षे. क.) यांचे कार्यालय, पाचवा मजला, प्रशासकीय इमारत, शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व, मुंबई – 400051.

000

 

 

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक जाहीर

मुंबई, दि. ८ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी  सोमवार, १० जून २०२४ रोजी मतदान होणार आहे.

विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ) किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ) हे दिनांक  ७ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत.  त्यामुळे आयोगाने २ शिक्षक मतदारसंघ आणि २ पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

या निवडणुकीसाठी बुधवार, १५ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार, २२ मे २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, २४ मे २०२४ रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, २७ मे २०२४ अशी आहे. सोमवार, १० जून २०२४ रोजी सकाळी ८  ते दुपारी ४ या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. गुरूवार, १३ जून २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक १८ जून २०२४ रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

 

राज्यात तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

मुंबई, दि. ७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
रायगड – ५८.१० टक्के
बारामती – ५६.०७ टक्के
उस्मानाबाद –  ६०.९१ टक्के
लातूर – ६०.१८ टक्के
सोलापूर – ५७.६१  टक्के
माढा – ६२.१७ टक्के
सांगली – ६०.९५ टक्के
सातारा –  ६३.०५ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग-  ५९.२३ टक्के
कोल्हापूर –  ७०.३५ टक्के
हातकणंगले – ६८.०७ टक्के
000000

‘ईव्हीएम’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका)-ईव्हीएम मशीनला विशिष्ट प्रकारची चिप बसवुन उमेदवारास जास्त मतदान करून देण्याच्या बहाण्याने अडीच कोटी रूपयांची मागणी करून फसवणूक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

यासंदर्भात आज दि.७ रोजी अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेता, विधानपरिषद यांनी पोलीस आयुक्त यांना दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, त्यांचे मोबाईलवर मारोती ढाकणे असे नांव सांगणाऱ्या इसमाने मतदान केंद्रात निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ई व्ही एम मशीनला माझ्याकडील विशिष्ट प्रकारची चीप बसवुन तुमच्या उमेदवारास जास्तीत जास्त मतदान करून देतो असा बहाणा करून त्या मोबदल्यात मला अडीच कोटी रूपये द्यावे लागतील, असे सांगितले. या प्रकरणाचे गांभीय लक्षात घेवुन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक संभाजी पवार, आर्थिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वात विशेष पथक नेमून हे पथक राजेंद्र दानवे यांचे सोबत रवाना केले.

आज दुपारी चार वाजेच्या सुमारास सदर इसम मारोती ढाकणे यांने राजेंद्र दानवे यांना मध्यवर्ती बस स्थानक समोरील हॉटेल न्यू मॉडर्न टि हाऊस स्विट अॅण्ड स्नॅक्स, छत्रपती संभाजीनगर येथे बोलविले होते. या ठिकाणी राजेंद्र दानवे, साध्या गणवेषातील पोलीस पथक व पंच असे सापळा लावुन थांबलेले असतांना मारूती ढाकणे हा त्या ठिकाणी आला. त्याने राजेंद्र दानवे यांना सांगितले कि, माझ्याकडे एक विशिष्ट प्रकारची चीप असुन दिनांक 13/05/2024 रोजी मतदानाच्या दिवशी विशिष्ट प्रकारची चिप मतदान केंद्रामध्ये जावुन EVM मशीनला बसविण्याची व्यवस्था करतो. त्यामुळे फक्त तुमच्याच उमेदवारास जास्तीत जास्त मतदान मिळेल,असे सांगुन मोबाईलवर संभाषणात ठरल्याप्रमाणे अडीच कोटी रूपयांपैकी तडजोडीअंती दीड कोटी रुपयांची मागणी करून आज  टोकन रक्कम म्हणुन एक लाख रूपयांची मागणी केली. त्याप्रमाणे राजेंद्र दानवे यांच्याकडुन त्याने एक लाख रुपये स्वीकारतांना पंचासमक्ष सापळा लावुन बसलेल्या साध्या वेशातील पोलीस पथकाने रंगेहाथ पकडले. या इसमाचे त्याचे पुर्ण नाव मारोती नाथा ढाकणे, वय-42 वर्षे, व्यवसाय- आर्मी हवालदार, उदमपुर, जम्मु, रा. काटेवाडी, पो. खरवंडी कासार, ता. पाथर्डी जि. अहमदनगर असे त्याने सांगितले. या इसमास ताब्यात घेवुन पुढील कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरु आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त  मनोज लोहिया, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त गुन्हे धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक संभाजी पवार, सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर अवघड, सय्यद मोसिन, पोलीस उपनिरीक्षक अशोक अवचार, पोह विजयानंद गवळी, सचिन शिंदे, भगीनाथ बोडखे, विठ्ठल मानकापे, गणेश शिंदे, परमेश्वर भोकरे, संदीप जाधव, नितीश घोडके आर्थिक गुन्हे शाखा यांनी केली.

००००

विदेशी प्रतिनिधी सहभागी झाले लोकशाहीच्या उत्सवात

रायगड, दि ०७:–लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाहणीसाठी जिल्ह्यात आगमन झालेल्या विदेशी प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी आज पेण व अलिबाग तालुक्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत निवडणूक मतदान प्रक्रिया जवळून अनुभवली.  विदेशी प्रतिनिधी मंडळातील बांग्लादेशचे 2 प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी , जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग अधिकारी) कझाकिस्तान देशाचे 2 प्रतिनिधी नुरलान अब्दिरोव, आयबक झीकन(केंद्रीय निवडणूक आयोग कझाकीस्तान), श्रीलंका देशाच्या सिलया हिलक्का पासिलीना(संचालक श्रीलंका) झिम्बाबे देशाचे न्यायमूर्ती प्रिशीला चिगूम्बा आणि सिम्बराशे तोंगाई (केंद्रीय निवडणूक आयोग झिम्बाबे) हे सातही सदस्य आजच्या मतदान पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.

मतदान प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी मतदान यंत्राची अंतिम पडताळणी करण्यासाठी होणारे ‘मॉक पोल’ पाहण्यासाठी सकाळी ५ वाजल्यापासून सर्व विदेशी प्रतिनिधींचा ताफा वेगवेगळ्या मतदान केंद्रावर पोहचला होता. या मतदान प्रक्रियेच्या शुभारंभाची माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने भेट देऊन प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. यावेळी ‘मॉक पोल’ ही प्रक्रिया ईव्हीएम मशिनची विश्वासर्यता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया या प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केली.

मतदान केंद्रात मतदानासाठी येणाऱ्या मतदारांनी विदेशी पाहुण्यांनी भारतीय पद्धतीने नमस्कार करून दुभाषक यांच्या माध्यमातून संवाद साधला. पारंपारीक पध्दतीने केलेल्या स्वागताचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. जिल्ह्यातील विविध मतदान केंद्राना भेटी देऊन  निवडणूक प्रक्रिया व बाहेरील वातावरण याची बारकाईने माहिती घेतली.

प्रत्येक मतदान केंद्रावर केलेली जय्यत तयारी, दिव्यांगांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी केलीली विशेष व्यवस्था, महिला किंवा तरुणांचे विशेष केंद्र, सेल्फी पॉईंट, फर्स्ट एड किट सारख्या अनेक बाबी प्रतिनिधींना भारावून टाकणाऱ्या होत्या. मतदानासाठी उत्साहाने आलेल्या मतदारांचा उत्साह त्यांनी यावेळी पाहिला. तसेच काही ठिकाणी तयार करण्यात आलेल्या सखी मतदान केंद्र, युवा मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, दिव्यांग स्वयंचलीत मतदान केंद्रावर भेट देऊन मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. या सर्व प्रतिनिधीनी आकर्षक पद्धतीने बनविलेल्या सेल्फी पाॅईन्टवर फोटो काढला. सामान्य मतदाराप्रमाणे ते सर्वजण लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी झाले होते.

मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदारांसाठी स्वीप उपक्रम, मतदान केंद्रावर प्राथमिक उपचार, यांची माहिती याबाबत त्यांनी मतदान अधिकारी कर्मचारी, आरोग्य सेविका व आरोग्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.


गेली दोन दिवस भारतीय लोकशाही मधील निवडणूक  कशा पद्धतीने पार पाडली जाते याचे प्रात्यक्षिक त्यांनी पाहिले. निवडणूक यंत्रणाचे कामाप्रती असलेल्या निष्ठा आणि प्रामाणिक पणा याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
०००००

२६- मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक धनंजय सिंग भदोरिया यांची दहिसर विधानसभा निवडणूक कार्यालयाला भेट

मुंबई उपनगर, दि. 7 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024  करीता मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक नियुक्त केले आहेत. 26 – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक धनंजय सिंग भदोरिया यांनी आज 153- दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयास भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाची माहिती घेतली.

श्री. भदोरिया यांनी उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांना लोकसभा निवडणूक  नि:पक्षपातीपणे व शांततेत पार पाडण्याबाबत मार्गदर्शन केले. निवडणूक निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात पार पाडण्यासाठी या कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वय आणि सांघिक प्रयत्नाने काम करावे. मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी, मतदानासाठी मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. दिव्यांग मतदारांना भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेल्या सुविधा पुरविल्या जातील, याबाबतची दक्षता घ्यावी, अशा सूचना यावेळी श्री. भदोरिया यांनी दिल्या. या भेटीदरम्यान श्री. भदोरिया यांनी 153-दहिसर विधानसभा मतदार संघातील स्ट्रॉंग रूम तसेच रुस्तमजी इंटरनॅशनल शाळेतील मतदान केंद्राची पाहणी केली.

000

मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई उपनगर, दि. 7 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26- मुंबई उत्तर, 27- मुंबई उत्तर पश्चिम, 28- मुंबई उत्तर पूर्व, 29- मुंबई उत्तर मध्य या चारही मतदारसंघातून एकूण 87 उमेदवार रिंगणात आहेत. त्यासाठी 20 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान होणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, उपजिल्हाधिकारी तेजस समेळ (निवडणूक) उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 74 लाख मतदार

जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर म्हणाले की, लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर मुंबई उत्तर मतदारसंघात 19, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात 21, मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात 20, तर मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात जिल्हा प्रशासनाने मतदानाची तयारी सुरू केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण 74 लाख 48 हजार 383 मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या 40 लाख 2 हजार 749, तर महिला मतदारांची संख्या 34 लाख 44 हजार 819 एवढी आहे. मतदानासाठी सात हजार 384 मतदान केंद्र असणार आहेत. त्यापैकी दोन हजार 32 मतदान केंद्रांची संख्या तात्पुरत्या स्वरूपातील आहेत. अशा मतदान केंद्रांवर उन्हाळा, अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन परिपूर्ण नियोजन केले आहे. तेथे वॉटरप्रुफ मंडप टाकण्यात येतील. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, रॅम्पची व्यवस्था असेल. मतदान केंद्रे उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. या मतदान केंद्रांवर आवश्यक 40 हजार 615 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

दोन हजार 728 मतदार करणार गृह मतदान

या चारही मतदारसंघात 16 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने अतिरिक्त बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. त्याचेही नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांत ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले तसेच 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यास अनुसरून दोन हजार 728 मतदारांनी गृह मतदानाचा पर्याय निवडला आहे. त्यासाठी 200 पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके 10 व 11 मे 2024 या कालावधीत ही प्रक्रिया पार पाडतील. तसेच दिव्यांग व 85 वर्षांवरील मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र ते मुख्य मार्गावर बेस्टच्या बसची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय आवश्यक तेथे ऑटो रिक्षांची मदत घेण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी बूथ लेव्हल मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात आला आहे. मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास वैद्यकीय उपचार तातडीने मिळतील, असे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मदतीने मतदान केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेनंतर मुंबई उपनगर जिल्ह्यास अधिकची पोलीस कुमक मिळणार आहे.  निवडणूक कामासाठी नियुक्त आणि अत्यावश्यक कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी निवडणूक कर्तव्यावरील 16 हजार 596, तर अत्यावश्यक सेवेच्या कर्तव्यावरील सहा हजार 917 जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्यासाठी मतदार सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात येतील.

 मुंबई उपनगर जिल्ह्यात 12 निवडणूक निरीक्षक दाखल

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सर्वसाधारण चार, खर्च तपासणीसाठी सहा, तर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दोन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून ते जिल्ह्यात दाखल झाले आहेत. केंद्रीय यंत्रणा व राज्य यंत्रणेकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी 148 बैठी पथके तर 134 फिरती पथके अशी एकूण 282 पथके तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत विना परवाना, अवैध वाहतूक या प्रकारात 99 लाख 65 हजार रुपये किमतीची 56 हजार 386 लिटर दारू ताब्यात घेतली आहे, तर 17 कोटी 93 लाख रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.

मतमोजणीची तयारी सुरू

मतमोजणी 4 जून 2024 रोजी होणार आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघासाठी मतमोजणी नेस्को, गोरेगाव येथे तर मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघासाठीची मतमोजणी उदयांचल शाळा, विक्रोळी येथे होणार आहे. त्याचीही तयारी सुरू असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

00000

 

निवडणूक पोलीस निरीक्षक गौरव शर्मा यांची अंधेरी पश्चिम मतदारसंघात भेट

मुंबई उपनगर दि. 7 :  26 मुंबई उत्तर आणि 27 मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठीचे पोलीस निरीक्षक गौरव शर्मा यांनी 165 मतदारसंघ अंधेरी पश्चिम येथील मोरगाव चाळीला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या चाळीतील मतदारांना 20 मे 2024 रोजी आपला मतदानाचा हक्क बजावत मतदान करण्याचे आवाहन केले.

लोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक पोलीस निरीक्षक श्री. शर्मा यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघ अंधेरी (पश्चिम) येथील मोरगाव चाळीला भेट दिली. यावेळी त्या मतदारसंघातील आणि चाळीतील सुमारे शंभर मतदार तसेच यावेळी तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहलता स्वामी, आणि वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार ‘एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये’, हा उद्देश समोर ठेवून श्री. शर्मा यांनी मतदानाबाबत जनजागृती केली. यावेळी उपस्थितांना आचारसंहितेचे उल्लघंन झाल्यास तक्रार करण्यासाठी सुरू आलेल्या सी व्हिजील (C-Vigil) ॲपबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष निवडणूक पोलिस निरीक्षक आपल्या भेटीला आल्याचे पाहून पोलिसांच्या भेटीचे जनतेने कौतुक केले. या भेटीमुळे मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. यावेळी मतदारांना प्रवृत्त करण्यासाठी श्री. शर्मा यांनी ‘चमकिला’ चित्रपटातील त्यांनी लिहिलेले गाणे म्हणत मतदान करण्यासाठी आवाहन केले.

चलो वोट करो, चलो वोट करो जी, चलो वोट करो मेरे यारो, चलो वोट करो जी, चलो वोट करो जी, अपनी जिमेदारी निभाओ मेरे यारो,

तुम सभी समझदार हो, वोट जरुरी हैं, तुम सभी इमानदार हो, वोट जरुरी हैं,

चलो वोट करो जी, चलो वोट करो जी, चलो वोट करो मेरे यारो, चलो वोट करो जी, चलो वोट करो जी, अपनी जिमेदारी निभाओ मेरे यारो

०००

 

ताज्या बातम्या

विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

0
नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे...

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....