रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 776

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ६ जुलै  रोजी

मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा  शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

या परिक्षेसाठी दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी एकूण 274 रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार ही परीक्षा दिनांक 28 एप्रिल, 2024 रोजी घेण्याचे नियोजित होते.

दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम 2024, 26 फेब्रुवारी, 2024 नुसार   राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षणाची तरतूद विहित करण्यात  आली आहे.  या अधिनियमातील तरतुदी शासन निर्णय,27 फेब्रुवारी, 2024 नुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापित जाहिरातीसाठी लागू आहेत. प्रस्तुत प्रकरणी सामाजिक व शैक्षणिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनास कळविण्यात आले. यास्तव, आयोगाच्या दिनांक 21 मार्च, 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

ही परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच शनिवार, दिनांक 6 जुलै, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 या परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण 524 पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे आहे.

अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक 09 मे, 2024 रोजी 14.00 ते दिनांक  24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम   दिनांक 24 मे, 2024 रोजी 23:59 पर्यंत*

भारतीय स्टेट बॅंकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा    दिनांक 26 मे,  2024 रोजी 23:59 पर्यंत आहे.

चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक  27 मे, 2024 रोजी आहे.

पदे व संख्या

(एक) *राज्य सेवा परीक्षा :- एकुण पदे 431

(1)  उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 07 पदे),(2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण 116 पदे),(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे),(4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण 43 पदे),(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ (एकूण 03 पदे),(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ  (एकूण 07 पदे),(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ  (एकूण 07 पदे),(7) सहायक कामगार आयुक्त, गट – अ (एकूण 02 पदे),(8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ (एकूण 01 पद),(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब  (एकूण 19 पदे),(10) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण 25 पदे), (11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 1 पदे),(12)  उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 5 पदे),(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब (एकूण 07 पदे),(14)  सरकारी कामगार अधिकारी, गट – ब   (एकूण 04 पदे),(15) सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब (एकूण 04  पदे),(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (एकूण 7  पदे),(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (एकूण 52  पदे),(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (एकूण 76 पदे),(दोन )

(2) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)

(1) सहायक वनसंरक्षक, गट-अ, (एकूण 32 पदे) ,(2) वनक्षेत्रपाल, गट-ब, (एकूण 16 पदे)

(तीन ) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा  मृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)

(1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ, (एकूण 23 पदे),(2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब, (एकूण 22 पदे).

शासन निर्णय दिनांक 27 फेब्रुवारी, 2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने या मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास त्याबाबतचा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते.

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 परीक्षेकरीता अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयाधिक ठरल्याने अर्ज सादर करू शकले नाहीत, अशा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील उमेदवारांकरीता नव्याने अर्ज सादर करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे.

संबंधित उमेदवार आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईलमधील  “ माय अकाऊॅट” सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता (जा.क्र 414/2023) उपलब्घ करून देण्यात आलेल्या लिंक समोर दर्शविण्यात आलेल्या “क्वेशन ” या बटनावर क्लिळ करून विचारण्यात येणारी माहिती नमूद करून विकल्प सादर करू शकतील.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग दावा करण्याकरीता विकल्प सादर केल्यास संबंधित उमेदवाराचा मूळ अर्जातील दावा रद्द समजण्यात येईल.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करण्यासाठी विहित पद्‌धतीने तसेच विहित कालावधीत विकल्प सादर न करणाऱ्या उमेदवारांचा प्रस्तुत पूर्व परीक्षेकरीता यापूर्वी अर्ज सादर करताना केलेला दावा अंतिम समजण्यात येईल व सदर दावा बदलण्याची विनंती भरतीप्रकिये दरम्यान कोणत्याही टप्प्यावर मान्य करण्यात येणार नाही.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणामुळे मागासवर्गीयांकरीता अनुज्ञेय असलेल्या वयोमर्यादेतील सवलतीस अनुसरून नव्याने पात्र ठरणारे उमेदवार ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील माय आकऊँट सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरीता (जा.क्र 414/2023) उपलब्ध करून देण्यात आलेल्या लिंक च्या आधारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातून अर्ज सादर करू शकतील.

संबंधित परीक्षेकरीता अर्जाद्वारे अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवाराने सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याची कार्यवाही

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 मधील सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब संवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा गणण्याची तारीख सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक 25 जानेवारी, 2024  अशी राहील.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 करीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करण्यासाठी विकल्प सादर करणाऱ्या तसेच नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र सदर विकल्प सादर करण्या साठी विहित अंतिम दिनांकापूर्वीचे असणे आवश्यक आहे.

या परीक्षेकरीता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी सन 2023-2024 अथवा 2024-2025 या आर्थिक वर्षात वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे(NCL) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

प्रस्तुत परीक्षेच्या मूळ जाहिरातीमधील एकूण 16 संवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या पात्रतेनुसार विकल्प घेण्यात आले. आता सदर शुद्धीपत्रकामध्ये नवीन 6 संवर्गाचा समावेश होत असल्याने मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची व तसेच शुद्धीपत्रकानुसार नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची एकूण 22 संवर्गासाठी पात्रता (वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, दिव्यांग सुनिश्चिती इत्यादी बाबी )  मुख्य परीक्षेकरीता अर्ज स्वीकारण्याच्या टप्प्यावर पात्रतेनुसार विकल्प घेण्यात येईल.

उपरोक्त कार्यपद्धती सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने  उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल रिट याचिका क्रमांक 3468/2024 तसेच इतर याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहील.  महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024  च्या मूळ जाहिरातीस व सदर शुद्धिपत्रकास आयोगाच्या दिनांक 26 एप्रिल, 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकातील तरतुदी लागू राहतील .

दिनांक 29 डिसेंबर, 2023 रोजी प्रसिद्ध जाहिरात तसेच दिनांक 24 जानेवारी, 2024 रोजी प्रसिद्ध शुद्धिपत्रकामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नसल्याचे आयोगाने कळविले आहे.

0000

 

 

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडून मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा

मुंबई, दि. 8 :- मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक विषयक कामकाजाचा भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी नुकताच आढावा घेतला.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीला मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, राज्य निवडणूक महानिरीक्षक एम. के. मिश्रा, राज्य निवडणूक महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) धर्मेंद्र गंगवार, ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघाचे महानिरीक्षक राजीव रंजन, ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघाचे महानिरीक्षक गौरी शंकर प्रियदर्शी, ‘मुंबई दक्षिण मध्य’ व ‘मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मुकेश सिंह, ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक (खर्च) रविंदर सिंधू, ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक (खर्च) मुकेश जैन, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, मुंबई दक्षिण विभाग अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, मध्य मुंबई अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर, समन्वय अधिकारी (आदर्श आचारसंहिता) उन्मेष महाजन, समन्वय अधिकारी (कायदा व सुव्यवस्था) तेजूसिंग पवार, प्रमुख समन्वय अधिकारी (स्वीप) फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शामसुंदर सुरवसे, समन्वय अधिकारी (खर्च) राजू रामनानी, समन्वय अधिकारी (तक्रार व्यवस्थापन-निवारण व मतदार हेल्पलाईन ) राजू थोटे, समन्वय अधिकारी (राज्य उत्पादन शुल्क) प्रवीण तांबे आदींसह मुंबई शहर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

मतदान केंद्रांवर सुरळीत व वेळेत मतदान होण्यासाठी पूर्व नियोजन, मतदारांच्या नियोजनबद्ध रांगा तयार करणे, मतदारांना मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास प्रतिबंध, उष्णतेच्या लाटेत मतदानाच्या दिवशी उष्माघातापासून बचावासाठी मतदारांना मतदान केंद्र परिसरात इलेक्ट्रॉल पावडर व पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वैद्यकीय पथक सज्ज ठेवणे, भरारी पथके, स्थिर सनियंत्रण पथक दुरछायाचित्र  सनियंत्रण पथक सर्व्हेलन्स टीम, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीमने केलेल्या कामाबाबत माहिती देण्यात आली. मतदार यादीत नावनोंदणी मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे ६० हजार मतदारांची नव्याने नोंदणी केल्याबाबत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे तळ मजल्यावर असून मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात सखी महिला मतदान केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र तयार करण्यात आले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्ह्यात मतदान शांततेत व सुरळीत पार पडणार, असा विश्वास व्यक्त करीत पोलीस व निवडणूक यंत्रणेत योग्य समन्वय ठेवावा, मतदान केंद्रांवर कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या समजावून सांगाव्यात, मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांना तांत्रिक अडचण आली तर आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधायचा याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी, निष्पक्ष, शांततेत निवडणूका पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

0000

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघाताचा त्रास होऊन प्रकृती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी तीव्र उन्हात फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, थकवा, मळमळ व ताप आल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार सुरु करावे, असे विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज सांगितले. तसेच उष्माघाताच्या रुग्णांना त्वरीत उपचार सोयी-सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले.

शहरातील सामान्य रुग्णालय व वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला विभागीय आयुक्तांनी आज आकस्मिक भेट देऊन उष्माघाताच्या उपचारासंबंधी रुग्णालयातील सोई- सुविधांची पाहणी केली व त्याबाबत आढावा घेतला.  यावेळी उपायुक्त संजय पवार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सरीता हजारे, डॉ.अकुश मानकर, डॉ. प्रिया सिंग आदी उपस्थित होते.

सामान्य रुग्णालय येथे पाहणी दरम्यान रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी आस्थेने विचारपूस केली. रुग्णालयात मिळणाऱ्या सोई-सुविधेविषयी त्यांनी दाखल रुग्णांशी संवाद साधला. रुग्णालयातील औषधांचा साठा, वैद्यकीय उपचार यंत्र, संसाधन, बाह्य व आंतर रुग्ण कक्षातील रुग्ण संख्या, वैद्यकीय उपकरणांची सद्यस्थिती, डॉक्टर्स व परिचारिकांची संख्या, वार्डातील रुग्णांची सद्यस्थिती, अतिदक्षता व ओपीडी कक्षातील सोयीसुविधा तसेच उष्माघाताच्या रुग्णांसाठी केलेल्या उपाययोजना संदर्भात विभागीय आयुक्तांनी माहिती जाणून घेतली. उष्माघाताच्या रुग्णांना तात्काळ व वेळेत वैद्यकीय सेवा पुरवावे. तसेच रुग्णालयात 24 तास विज पुरवठा उपलब्ध राहिल याची दक्षता रुग्णालय प्रशासनानी घ्यावी, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी दिल्या.

उष्माघात टाळण्यासाठी करावयाचे उपाययोजना

तहान लागली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावे. बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट व चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत न्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर करावा.

अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावी व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा, तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. पहाटेच्या वेळी जास्त जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.

काय करू नये

लहान मुलांना बंद असलेले व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालू नये. बाहेरील तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी व उन्हात अतिकष्टाची कामे करू नये. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेट थंड पेय घेऊ नये.

0000

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची मुलाखत

मुंबई, दि.8 : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी  अहमदनगरचे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ  यांची मुलाखत घेण्यात आली आहे.

ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात सोमवार दि.१३ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात असलेले मतदारसंघ, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकांतील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याविषयी अहमदनगरचे जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांनी माहिती दिली आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

भारतीय निवडणूक प्रक्रियेचे परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक

मुंबई, दि. 8 : भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरीत मतदानासाठीचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हे आयोगामार्फत राबवण्यात आलेल्या मतदान जागृती कार्यक्रमाचे यश असून  मतदान प्रक्रियेसाठी  निवडणूक आयोगाने उत्कृष्ट नियोजन केल्याचे मत निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी आलेल्या परदेशी शिष्टमंडळांच्या  प्रतिनिधींनी व्यक्त केले.

भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी आइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या अंतर्गत परदेशी शिष्टमंडळ प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेच्या पाहणीसाठी महाराष्ट्रात आलेले आहेत. रायगड येथील मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेची पाहणी केल्यानंतर या शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची भेट घेऊन भारतातील निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या शिष्टमंडळात बांगलादेश, श्रीलंका, कझाकिस्तान आणि झिम्बाबाब्वे या देशातील प्रतिनिधींचा समावेश आहे. यात बांगलादेशमधील निवडणूक आयोगातील अधिकारी महम्मद मोनिरुइझमन टी, जी एम शाहताबुद्दीन, कझाकिस्तान केंद्रीय निवडणूक आयोगातील नुरलान आब्दीरोव, आयबक झिकन, श्रीलंकेच्या निवडणूक आयोगाच्या सिलया हिलक्का पासिलिना आणि झिम्बाब्वे निवडणूक आयोगाच्या सिम्बराशे तोंगाई आणि न्यायमूर्ती प्रशिला चिगुम्बा यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. यावेळी राज्याचे विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस. गंगवार, विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा, सहसचिव मनोहर पारकर, अवर सचिव भास्कर बनसोडे, योगेश गोसावी उपस्थित होते.

शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी यावेळी मतदान केंद्रावरील पाहणीबाबत आपला अनुभव व्यक्त करताना येथील मतदारांची मोठी संख्या लक्षात घेता त्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावरील सुव्यवस्था, सुरळित सुरु असलेली मतदान प्रक्रिया ही निश्चितच यंत्रणेच्या तयारीचे यश असल्याचे सांगितले. तसेच  भारतात तरुण मतदार मोठ्या प्रमाणात असून मतदान केंद्रावर  तरुण मतदार त्याच सोबत सर्व वयोगटातील मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. विशेषतः मतदारांच्या चेहऱ्यावर मतदान करण्याचा असलेला आनंद हा एखाद्या सणात सहभागी झाल्यासारखा होता असे या प्रतिनिधींनी आवर्जून सांगितले. या सगळ्यांतून मतदारांचा मतदान प्रक्रियेवर असलेला विश्वास ठळकपणे दिसून आला. मतदारांसोबतच येथील मतदान केंद्रावरील बुथ प्रतिनिधी देखील माहितीगार असल्याचे समाधान सुद्धा प्रतिनिधींनी यावेळी व्यक्त केले.

एस.चोक्कलिंगम यांनी भारतातील निवडणूक प्रकिया पारदर्शक, निर्भय वातावरणात पार पाडण्याला निवडणूक आयोगाचे प्रथम प्राधान्य आहे. त्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणा कार्यरत असून महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यात झालेली मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित, शांततापूर्ण पद्धतीने यशस्वीरित्या पार पडली असल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणूक प्रक्रियेत पैश्यांचा, बळाचा कुठल्याही प्रकारचा गैरवापर कुणाकडूनही केल्या जाऊ नये यासाठी कटाक्षाने लक्ष ठेवण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व आवश्यक यंत्रणांना नियुक्त करण्यात आलेले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे आणि कायदेशीर मार्गाने पार पाडण्यासाठी विविध संबंधित यंत्रणांना जबाबदारी निश्चित करण्यात आली असून ठिकठिकाणी तपासणी नाके, भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. उमेदवाराच्या प्रचारापासून ते मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन, स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवल्या जाईपर्यंत सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केल्या जाते. त्यामुळे सर्व प्रक्रिया ही नियंत्रणात असून यशस्वीरित्या शांततापूर्ण मतदान पार पडत आहेत, असे सांगून ईव्हीएम मशीनची सुरक्षा, तपासणी, मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था, बुथ प्रतिनिधींची नियुक्ती, स्ट्राँग रूम सील करने यासर्व बाबींची सविस्तर माहिती यावेळी श्री.चोकलिंगम यांनी दिली.

००००

वंदना थोरात/विसंअ/

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा अधिकारी–कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम

मुंबई, दि. 8 : शासकीय सेवेत काम करीत असताना नागरिककेंद्री काम करावे लागते. समाजाप्रती जबाबदार राहून शासनात आल्यानंतर मिळालेली भूमिका पार पाडावी लागते. अशावेळी संबंधित अधिकारी – कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कामासंदर्भातील प्रशिक्षण मिळाले पाहिजे. प्रशिक्षणामुळे पूर्ण कार्यक्षमतेचा उपयोग होऊन प्रभावी काम करण्यास मदत मिळते, असे मत भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी आज व्यक्‍त केले.

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र शाखेद्वारा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ परिषद सभागृह, मंत्रालय येथे करण्यात आला. या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अ. ह. भोसले, विभागाचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव सत्यबीर दोड, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, सेवानिवृत्त अवर सचिव आशिष लोपीस उपस्थित होते.

भारतीय लोकप्रशासन संस्था ही प्रशिक्षणाची गरज बघून प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करीत असल्याचे सांगत श्री. क्षत्रिय म्हणाले, ही संस्था अखिल भारतीय स्तरावरील आहे. संस्थेच्यावतीने नावीन्यपूर्ण संकल्पनांच्या उपयोगाने कामकाज गतिमान, प्रभावी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पारितोषिक देवून सन्मानित करण्यात येते. प्रशिक्षणाची गरज भागविण्यासाठी संस्थेमार्फत यशवंतराव चव्हाण व बी. जी. देशमुख स्मृती व्याख्यानमालांचे आयोजनही करण्यात येते. नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे पारितोषिकासाठी संस्थेकडे पाठविण्याचे व व्याख्यानमालांचा उपयोग करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महासंचालक ब्रिजेश सिंह यावेळी म्हणाले, कामकाजाच्या गतिमानतेसाठी आणि काळानुरूप कामकाजात सुधारणा होण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे ठरते. प्रशिक्षणामुळे संबंधित नियम, कायदे अथवा संबंधित कामकाजाबाबतच्या झालेल्या बदलांचे ज्ञान मिळाल्यामुळे काम करताना संबंधित अधिकारी- कर्मचारी आत्मविश्वासाने सामोरे जातो. निर्णय घेताना अशा प्रशिक्षणाची निश्चितच मदत होते.  शासनाचे काम हे नियम, कायदे यांना अनुसरून चालत असते. त्यामुळे प्रशिक्षणांचे आयोजन विशिष्ट कालावधीनंतर करण्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

माजी अतिरिक्त मुख्य सचिव श्री. दोड यांनी प्रशासकीय कामकाजातील नियम, कायदे याबाबत विचार व्यक्त केले. संचालक हेमराज बागूल यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची गरज स्पष्ट केली. अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे देण्यात आलेली जबाबदारी प्रशिक्षणामुळे अधिक सक्षमतेने पार पाडण्यास मदत होईल.  प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग करून आपले काम प्रभावीपणे करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रमात वर्तणूक, शिस्त व अपिल नियम, विभागीय चौकशी या विषयांबाबत वक्ते आशिष लोपीस यांनी सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण सत्राला सुरूवात केली. या प्रसंगी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

****

निलेश तायडे/विसंअ/

 

२७ – मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निरीक्षकांनी केली मतदान केंद्रांची पाहणी

मुंबई दि. 8 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी नियुक्त सामान्य निरीक्षक संजयकुमार खत्री यांनी मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.

श्री. खत्री सन 2010 च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. ते मतदारसंघात दाखल झाले आहेत. त्यांनी 165- अंधेरी पश्चिम, 166- अंधेरी पूर्व, 158- जोगेश्वरी पूर्व, 164- वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती मतदान केंद्रांना भेट दिली. या भेटीत त्यांनी निवडणूक पूर्वतयारीच्या उपाययोजनांसह गृह मतदानासाठी केलेली तयारी, मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, टपाली मतपत्रिका वाटप कामकाज, मतदार स्लीपचे वाटप, स्ट्राँग रुमसाठी तयार केलेली व्यवस्था व सुरक्षा उपाययोजना, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात पोलिस कर्मचारी, तात्पुरते मतदान केंद्र उभारणे, मतदार जनजागृती अभियान, खर्च तपासणी आदी बाबींचा आढावा घेतला. शांत व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या सूचना संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना निरीक्षक श्री. खत्री यांनी दिल्या.

 

0000

 

 

 

 

निवडणूक निरीक्षक संजयकुमार खत्री यांची निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट

मुंबई दि. 8 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 27- मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघासाठी नियुक्त सर्वसाधारण निरीक्षक संजयकुमार खत्री यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देत निवडणूक प्रक्रियेविषयी विविध सूचना केल्या.

निवडणूक निरीक्षक श्री. खत्री हे सन 2010 च्या भारतीय प्रशासकीय सेवेचे सनदी अधिकारी आहेत. ते मतदारसंघात दाखल झाले असून त्यांनी आज मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट दिली. निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी निरीक्षक श्री. खत्री यांनी मतदान प्रक्रिया, गृह मतदान, मतदान केंद्रांवरील सोयीसुविधा, मतदान यंत्रांची सरमिसळ, मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती घेत मार्गदर्शन केले. तसेच निरीक्षक श्री. खत्री यांनी स्ट्राँग रुमची सुरक्षा, मतमोजणी प्रक्रियेची तयारी याविषयीचा सुद्धा आढावा घेतला.

0000

 

 

‘दिलखुलास’ कार्यक्रमात बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांची मुलाखत

 मुंबई, दि. 8 : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 बीड जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी  बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ- मुंडे  यांची मुलाखत घेण्यात आली आहे.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’  कार्यक्रमात, शुक्रवार 10 मे 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

बीड जिल्ह्यात असलेले लोकसभा निवडणूक मतदार संघ, लोकसभा  निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबतचे नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी या मुलाखतीत माहिती दिली आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

 

 

‘दिलखुलास’ कार्यक्रमात बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची मुलाखत

मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात बीड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर  यांची ‘कायदा व सुव्यवस्था ‘ या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. शनिवार 11 मे 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत  ही मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत पत्रकार दत्ता देशमुख यांनी घेतली आहे.

बीड जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध केलेली कार्यवाही याविषयी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून श्री. ठाकूर यांनी माहिती दिली आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

ताज्या बातम्या

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

0
बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे,...