रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 775

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि.९ :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-२०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही शारिरिक चाचणी २४ मे ते ६ जून २०२४ या कालावधीत पोलीस मुख्यालय, रोडपाली, सेक्टर-१७, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.

या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीतील  नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता मैदान, अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करुन देण्याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने सहमती दर्शविल्याने शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम २४ मे, ते  ६ जून, २०२४ या कालावधीत  घेण्यात येणार आहे.

शारीरिक चाचणीचा कार्यक्रम तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेण्यात येईल. तरी शारीरिक चाचणीसाठी अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या सरावाच्या दृष्टीने यांची नोंद घ्यावी व आवश्यकतेनुसार शारीरिक चाचणीचा सराव करावा. शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/वि.सं.अ

महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

मुंबई, दि.९ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तुषार विठ्ठल वाघ हे खुल्या  व मागासवर्गवारीतू राज्यातून प्रथम आले आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सायली सातप्पा फासके ह्या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांच्या माहितीसाठी निकाल व प्रत्येक प्रवर्गासाठी शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

अंतिम निकालात अर्हताप्राप्त, शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

0000

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकासाठी १० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि.९ : यंदाच्या शैक्षणिक सत्रात इंडियन इन्स्टीट्युट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलीजी, बरगढ, ओडिशा येथील तीन वर्षीय हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेच्या प्रथम व व्दितीय वर्षासाठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले असून इच्छूक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज १० जूनपर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) साठी १३ जागा व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी १ जागा राखीव आहेत. तसेच वेंकटगिरीसाठी २ जागा तसेच द्वितीय वर्षासाठी ३ जागांपैकी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी १ जागा राखीव असून प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यात प्रवेश अर्ज १० जूनपर्यंत मागविण्यात आले आहेत.

त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी आपले परिपूर्ण अर्ज १० जूनपर्यंत संबंधित प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे, असे वस्त्रोद्योग आयुक्त अविष्यांत पंडा यांनी कळविले आहे.

0000

पवन राठोड/ससं/

‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळे जिल्ह्याच्या स्वीपच्या नोडल अधिकारी डॉ. संगीता नांदुरकर यांची १६ मे रोजी मुलाखत

मुंबई: दि, ९ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळे महानगरपालिकेच्या स्वीपच्या नोडल अधिकारी तथा धुळे महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही  मुलाखत गुरुवार १६ मे, २०२४ रोजी, आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक रोशन जाधव यांनी घेतली आहे.

धुळे जिल्ह्यात पाचव्या टप्पात लोकसभेसाठी मतदान होत आहे. या मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी राबविण्यात आलेले विविध जनजागृतीपर उपक्रम, बैठका, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार, ग्रामीण व शहरी भागात राबवलेले विशेष उपक्रम, युवा मतदार यांना केलेले आवाहन अशा विविध उपक्रमांविषयीची माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून डॉ. नांदुरकर यांनी दिली आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची बुधवारी मुलाखत

मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. बुधवार 15 मे 2024 रोजी  आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक कविता आत्राम यांनी घेतली आहे.

धुळे जिल्ह्यातील जिल्हा पोलिस प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध केलेली कार्यवाही आदिविषयी पोलीस अधीक्षक श्री. धिवरे यांनी या मुलाखतीत माहिती दिली आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

‘दिलखुलास’ कार्यक्रमात धुळ्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची मंगळवारी मुलाखत

मुंबई, दि. ९ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीविषयी धुळ्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांची मुलाखत घेण्यात आली आहे.

ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंगळवार  १४ मे, २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक रोशन जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

धुळे जिल्ह्यातील मतदारसंघ, निवडणुकीचे कामकाज निर्भय व निरपेक्ष पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृतीबाबत राबविलेले उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकांतील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याविषयी धुळ्याचे जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी या मुलाखतीत माहिती दिली आहे.

 

००००

संध्या गरवारे/विसंअ

मुंबई शहर जिल्ह्यात निवडणूक काळात जप्त रकमेबाबत दाद मागण्याकरिता संपर्क क्रमांक जाहीर

मुंबई, दि. ९  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यात जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेबाबत सामान्य जनतेला दाद मागण्याकरिता ०२२-२०८२२६९३ हा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती, मुंबई शहराचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात २० मे, २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत मुंबई शहर हद्दीत पोलीस / भरारी पथक/ स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे जप्त केलेल्या रोख रकमेबाबत (निवडणूक प्रचारासंदर्भात नसेल / तक्रार दाखल नसेल तर) सर्वसामान्य जनतेला दाद मागण्याकरिता या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन श्री. सुरवसे यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कालावधीत जप्त केलेली रक्कम निवडणुकीसंदर्भात नसल्याचे दिसून आल्यास मुक्त करणेबाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ३० – मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ व ३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी जप्तीबाबत तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जप्त वस्तू / रकमेबाबत निर्णय घेणार आहे. समिती मतदानानंतर ७ दिवसापर्यंत कार्यरत राहील.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

मुंबई शहर जिल्ह्यातील सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त सर्व तक्रारीचे निवारण

मुंबई, दि. ९ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सी –व्हिजिल (cVIGIL) हे ॲप सुरू केले आहे. तर नागरिकांना हवी असलेली माहिती मिळविणे आणि तक्रारी नोंदविण्यासाठी नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) कार्यान्वित केले आहे.  सी –व्हिजिल या ॲपच्या माध्यमातून मुंबई शहर जिल्ह्यांअंतर्गत असलेल्या लोकसभा मतदारसंघात १६ मार्च ते ५ मे पर्यंत १२३ तक्रारी प्राप्त झाल्या.या सर्व तक्रारीचे जिल्हा निवडणूक विभागाकडून निवारण करण्यात आले आहे. तसेच एनजीएसपी पोर्टलवर  नागरिकांच्या कॉल्सची तत्काळ दखल घेतली जात आहे.

नागरिकांना निवडणुकीदरम्यान होणाऱ्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करता येते. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील ॲपवर अपलोड करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही करण्यात येते. १६ मार्च ते ५ मेपर्यंत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ७२ तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ५१ तक्रारी सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारीचे  निवारण करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल  हे नागरिकांकडून मतदार नोंदणीशी संबंधित प्राप्त तक्रारींवर देखरेख व त्यांचे निराकरण करण्याकरिता कायमस्वरूपी एक खिडकी योजनेप्रमाणे तयार केलेले पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिक मतदार नोंदणीशी संबंधित तक्रार केव्हाही करू शकतात.https://ngsp.eci.gov.in/ या पोर्टलवर  १६ मार्च ते दि. ५ मे २०२४ या कालावधीत मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ८९३ तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ८४८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यापैकी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ८३१ तर मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ८३७  तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित २८ तक्रारींबाबत कार्यवाही सुरू आहे, वरील ॲप/पोर्टलवर केलेल्या तक्रारीबाबत काय कार्यवाही झाली याची माहिती तक्रारदारास त्याचे लॉगीनमध्यॆ पाहता येते अशी माहिती जिल्हा निवडणूक विभागाकडून दिली आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

प्रामाणिकतेने कार्य केल्यास यश नक्कीच लाभेल : पद्मश्री डॉ. शंकरबाबा पापळकर

नवी दिल्ली, 8 : “प्रामाणिकतेने तसेच कठोर परिश्रमपूर्वक काम केल्यास त्या कामाला  नक्कीच यश मिळेल”, असे प्रेरणादायी मार्गदर्शन पद्मश्री पुरस्कार घोषित, अनाथ मुलांचे नाथ आणि थोर समाजसेवक डॉ. शंकरबाबा पापळकर यांनी काल महाराष्ट्र परिचय केंद्राला भेटी दरम्यान केले.

आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ.पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी डॉ. पापळकर यांच्यासोबत त्यांच्या मानसकन्या गांधारी आणि मानसपुत्र योगश दिल्लीत आले असून या सोहळ्यात उपस्थित राहतील.

पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, डॉ. पापळकर यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. यावेळी डॉ.पापळकर यांचे  स्वागत उपसंचालक (माहिती) श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांनी  शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले.  यावेळी त्यांचे सोबत सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, श्री नितीन पाटील, संपादक- रोजगार नोकरी संदर्भ संजय नाथे, अनाम प्रेम संस्थेचे सदस्य प्रशांत भाट, मानसकन्या गांधारी आणि मानसपुत्र योगश यांचेही स्वागत श्रीमती अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

डॉ. पापळकर यांनी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अत्यंत आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. “हा पुरस्कार मला नाही तर अनाथ मुलांना मिळाला आहे,” तसेच “या मुलांसाठी काम करणे हे माझे जीवन आहे आणि मी माझ्या आयुष्याचा शेवटपर्यंत हे कार्य करत राहीन,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

डॉ. पापळकर यांनी समाजसेवेतील त्यांच्या कार्याबद्दल आणि अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल माहिती देतांना सांगितले की, अमरावती जिल्ह्यातील परतवड्यात 14 फेब्रुवारी 1942 रोजी त्यांचा जन्म झाला. धोब्याचा व्यवसाय पासून ते पत्रकारिता केल्यापासून ते रस्त्यावरच्या अनाथ, अपंग, गतिमंद आणि दिव्यांग मुलांच्या वेदनांनी त्रस्त झाल्याचे त्यांनी त्यांचा जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. वंचित घटकांसाठी संगोपन आणि पुनरुत्थानासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, 1990 च्या दशकात त्यांनी वझ्झर या गावात “स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृह” नावाचा आश्रम स्थापन केला. या आश्रमात अपंग, बेवारस, गतिमंद आणि अपंग मुलांचा सांभाळ करून ते भारतात एक रोल मॉडेल बनले आहे.

शासकीय कुठलेही अनुदान न घेता हा आश्रम सुरू आहे. समाजाकडून मिळणाऱ्या दानावर आणि शेगाव संस्थान आणि अंबादास पंथ बालगृहाचे संचालक प्रभाकर वैद्य यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीवर हा आश्रम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या मुलांना स्वावलंबी बनवणे हे त्यांचे ध्येय असल्याचे सांगत, या मुलांना त्यांचे नाव दिल्याचे त्यांनी सांगितले.

आश्रम सुरू झाल्यानंतर 200 मूले आश्रमात होती, असे सांगत,  आश्रमातल्या 30 मूकबधिर-गतिमंद मुलामुलींचे लग्न लावल्याचे त्यांनी माहिती दिली. आतापर्यंत आश्रमातील 12 जण शासकीय सेवेत रुजू झाले आहेत आणि यासोबत त्यांना जगण्याचा अधिकार मिळाल्याचे सांगत, त्यांनी आनंद व्यक्त केला. सद्या त्यांच्या आश्रमात 98 मुली व 25 मुले अशी एकूण 123 मुले वास्तव्यास असून, डॉ. पापळकर त्यांचे संगोपन व शिक्षणापासून ते पुनर्वसन करीत असल्याचेही त्यांनी सांगतिले. तसेच आश्रमात डॉ पापळकर यांनी मुलांच्या सहायाने 15000 वृक्ष लावून वनराई फुलविली आहे.

बेवारस आणि दिव्यांगांच्या पुनर्वसनावर त्यांनी लक्ष केंद्रित करत, दिव्यांगांच्या पुनर्वसनाबाबत यावेळी चिंताही व्यक्ती केली.  शासकीय कायद्यानुसार 18 वर्षावरील मुलांना रिमांड मधून काढून टाकले जाते, याची खंत व्यक्त करत, 18 वर्षांपर्यंत ठेवणा-या रिमांड होम च्या कायद्यात आवश्यक बदल घडवून अशा मुलांसाठी संगोपन तसेच पुनर्वसनासाठी पाऊले उचलण्याची त्यांनी यावेळी इच्छा व्यक्त केली.

गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग, मतिमंद, मुकबधीर, दृष्टीहीन आणि निराश्रित मुलांना आश्रय देऊन त्यांच्या संगोपनाची अतिशय कठीण जबाबदारी डॉ.पापळकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. या अतुलनीय कार्याची भारत सरकारने दखल घेऊन आज दि. 09 मे रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

00000

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे रोजी अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई केली. या संपूर्ण कारवाईमध्ये 59 हजार 980 लीटर दारू व इतर भट्टी साहित्यासह एकूण 23 लाख 55 हजार 210 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील दिवा गाव, घेसर, खर्डी, अलीमघर, छोटी देसाई, मोठी देसाई, आगासन, सरळांबे, अंजुर, वाशाळा, वासरगाव, हाजी मलंग, कुशिवली, माणेरागाव, द्वारलीपाडा, कुंभार्ली, केवणी, कालवार, वडुनघर, मामेखर्डी, कारीवली, मामणोली, जांभुळगांव, नांदपगाव, केशव सृष्टी, उत्तन, मुरदागाव, कोपराखाडी, गोराई खाडी आदी ठिकाणी करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये 31 दारूबंदी गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, ठाणे अधीक्षक एन. व्ही सांगडे, उपअधीक्षक एस. टी माळवे, मुंबई शहरचे उपअधीक्षक सुधीर पोकळे, मुंबई उपनगर उपअधीक्षक मनोज चव्हाण, सुनील जाधव, जे. एस गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसभा निवडणूक आचार संहितेचे गांभीर्य लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. ही कारवाई संबंधित विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, जवान  यांनी केली आहे, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ/

 

ताज्या बातम्या

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

0
बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे,...