शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 772

मतदान ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि. ११ : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना  मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या वोटर स्लिप निवडणूक कार्यालयाकडून वितरित केल्या जात आहेत,असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र आहे असे मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करतील. छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे. पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड  हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ एनआरआय मतदार

मुंबई शहर जिल्ह्यात ३७३ अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदार आहेत. या मतदारांचे नाव मतदान यादीत असल्याने त्यांना मूळ पास पोर्ट असेल तर मतदान करता येईल. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे,अशी ही माहिती जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी दिली.

*****

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी ५३ हजार ९५९ बॅलेट युनिट

मुंबई, दि.11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे रोजी घेण्यात येणार आहे. या टप्प्यातील 11 लोकसभा मतदारसंघांमधील मतदानासाठी निवडणूक आयोगाने एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट उपलब्ध करून दिल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा एकूण 11 लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी 29 हजार 284 मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. या मतदान केंद्रांसाठी एकूण 53 हजार 959 बॅलेट युनिट, 23 हजार 284 कंट्रोल युनिट आणि 23 हजार 284 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

यात नंदुरबार मतदारसंघामधील 2115 मतदान केंद्रांसाठी 2115 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट, जळगावमधील 1982 मतदान केंद्रासाठी 1982 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट, रावेरमधील 1904 मतदान केंद्रांसाठी 3808 बॅलेट युनिट तर 1904 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, जालनामधील 2061 मतदान केंद्रांसाठी 4122 बॅलेट युनिट आणि 2061 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, औरंगाबादमधील 2040 मतदान केंद्रांसाठी 6120 बॅलेट युनिट आणि 2040 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, मावळमधील 2566 मतदान केंद्रांसाठी 7698 बॅलेट युनिट आणि 2566 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, पुणेमधील 2018 मतदान केंद्रांसाठी 6054 बॅलेट युनिट आणि 2018 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, शिरूरमधील 2509 मतदान केंद्रांसाठी 7527 बॅलेट युनिट आणि 2509 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, अहमदनगरमधील 2026 मतदान केंद्रांसाठी 4052 बॅलेट युनिट आणि 2026 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, शिर्डीमधील 1708 मतदान केंद्रांसाठी 3416 बॅलेट युनिट आणि 1708 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट, बीडमधील 2355 मतदान केंद्रांसाठी 7065 बॅलेट युनिट आणि 2355 कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

चौथ्या टप्प्यातील प्रत्यक्ष निवडणुकीसाठी लागणारे साहित्य साधनसामग्री मतदान केंद्रांवर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन करून त्यांच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन झाले आहे.

राज्यातील चौथ्या टप्यात 11 लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदानासाठी भारत निवडणूक आयोगासह जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच आचारसंहिता उल्लंघनाच्या घडामोडींवर कारवाई करण्यासाठी विविध भरारी पथके, स्थीर सनियंत्रण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजासह साहित्य, ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतदारांनी मतदान करावे यासंदर्भात जागृतीही करण्यात येत असून मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

०००

 

पवन राठोड/ससं

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

मुंबई, दि. 11 – राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, 2024 च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. निवडणूक काळामध्ये कुठल्याही प्रलोभनाच्या अवैध वस्तूची वाहतूक करण्यास आदर्श आचारसंहितेअंतर्गत निर्बंध आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

राज्यस्तरावरून मुख्य निवडणूक अधिकारी व जिल्हा स्तरावरून जिल्हा निवडणूक अधिकारी/ निवडणूक निर्णय अधिकारी/ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून यासंदर्भात राजकीय पक्षांच्या/ उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना निवडणूक काळात आदर्श आचार संहितेचे पालन करण्याची विनंती केलेली आहे. आदर्श आचार संहितेमध्ये काय करावे काय करू नये याबाबतची माहितीही सर्वांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आयोगाकडून जिल्हा व राज्यस्तरावरील समाज माध्यमांमधून वेळोवेळी आदर्श आचार संहितेची माहिती लोकांना देण्यात आलेली आहे.

लोक प्रतिनिधित्व कायदा व भारतीय दंड संहिता यांच्याअंतर्गत निवडणूक संदर्भात होणाऱ्या गुन्ह्यांवर आयोगाचे बारकाईने लक्ष आहे. अशा प्रकरणी आयोगाकडून गुन्हे दाखल होऊन त्यावर कार्यवाही होत आहे. राज्यामध्ये यासंदर्भात दाखल गुन्ह्यांचा तपशील खालीलप्रमाणे असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 निवडणुकीशी संबंधित दखलपात्र/अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये निवडणुकी संदर्भात लोक प्रतिनिधित्व कायदा व भारतीय दंड संहिता अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये 211 तर समाज माध्यमांवरील खोट्या बातम्यांशी संबंधित दाखल गुन्ह्यांमध्ये 22 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.

****

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत

मुंबई, दि.11 : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी  मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची मुलाखत घेण्यात आली आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ही मुलाखत प्रसारित होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात शुक्रवार दि. 17 मे, 2024 आणि शनिवार दि.18 मे, 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात असलेले मतदारसंघ, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जागृती, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकांतील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याविषयी श्री.यादव यांनी माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि.17 मे 2024 रोजी महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

000000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 11 : सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांनी केले आहे.

सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या योजनेकरिता, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणारे गाव/पाडे येथील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह या कार्यालयास दि.31 मे,2024 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठीचा अर्ज या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

0000000

युवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे -‍ जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, दि. 11 (जिमाका) : लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा व जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी ठाणे शहरात आयोजित केलेल्या रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवकांनी मोठ्या संख्येने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करावे, असा संदेश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या तरुणांना दिला.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रन फॉर व्होट या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथील मुख्य रस्त्यावर ही मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. सदर मॅरेथॉन स्पर्धेस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी या मॅरेथॉन स्पर्धेला झेंडा दाखवून सुरूवात केली.

प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. प्रत्येकाने येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे असे आवाहन ठामपा सौरव राव यांनी उपस्थित मतदारांना केले.

रन फॉर वोट’ या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक कर्मचा-यांनी धावपटू मतदारासोबत सहभागी होऊन मतदानाबाबत जनजागृती केली. तसेच स्वीपच्या पथकाने धावपटूंना मतदानाची शपथ दिली. मी मतदान करणारंच… आपण ही मतदानासाठी सज्ज रहा या आशयाचा मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक 20 मे 2024 असलेले माहितीपत्रकाचे वाटपही उपस्थित धावपटू मतदार व नागरीकांना करण्यात आले. या मिनी मॅरेथॉन स्पर्धेस धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटवर तरुणांनी सेल्फी काढून मतदार जनजागृतीच्या घोषणा दिल्या.

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन रन फॉर वोट’ मिनी मॅरेथॉन मध्ये सहभागी असलेल्या सर्व नागरिकांना १४८ विधानसभा मतदारसंघ स्वीप पथक मार्फत करण्यात आले.

00000

मतदान जनजागृतीसाठी हिरानंदानी  परीसरात मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे दि 10 (जिमाका ) – लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी  आज (10 मे) ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट परिसरात मतदार जोडो पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते.

२५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.

सदर हिरानंदानी इस्टेट परीसरात १४८ विधानसभा मतदारसंघ स्वीप पथक मधील कर्मचारी मोठ्या उत्साहात मॅस्कॉट या मनोरंजक कार्टून पात्राला सोबत घेऊन मतदान करा,मतदान करा लोकशाहीचा विजय करा आणि २० मे को सब काम छोडो मतदान करो या घोषणा मोठ्या आवाजात देऊन व हातात मतदान जनजागृतीचे संदेश यावेळी नागरिकांनी दिले.

संपूर्ण हिरानंदानी इस्टेट परीसरात मॅस्कॉटच्या माध्यमातून नागरिकांचे मनोरंजन करत उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देवून येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी नागरिकांना करण्यात आले.

रस्त्याच्या दुतर्फा बाजूकडील नागरिक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदार लोकांना या रॅलीतून मतदान करण्यासाठी जागृती करण्यात आली.. रॅलीमधील मॅस्कॉट सोबत स्वीप कर्मचारी जनजागृती करीत असल्याचे पाहून मतदारांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण झाला होता.

मी मतदान करणारंच….. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा.या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रकाचे ही वाटप मॅस्कॉटच्या हस्ते सर्व नागरिकांना करण्यात आले आणि लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी त्याचप्रमाणे मतदारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहान सर्व नागरिकांना करण्यात आले.

0000

 

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २६२ तर ३८ दिव्यांग मतदारांनी केले गृह मतदान

ठाणे, दि.10 (जिमाका) : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाने घरुनच मतदान करण्यासाठी सोय उपलब्ध करुन दिली आहे. आजपासून गृहमतदानाला सुरूवात झाली असून 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 85 वर्षावरील एकूण 262 नागरिकांनी तर 38 दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती 25-ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली.            

 40 टक्के अपंगत्व (Locomotive) 85 वर्षे वयावरील वृध्द यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना भरुन घरुनच मतदान करुन देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्या इच्छुक मतदारांनी लोकसभा निवडणूक 2024 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे 12 D फॉर्म भरुन दिले त्यापैकी पात्र मतदारांनी टपाली मतपत्रिकेद्वारे आज आपला मतदानाचा हक्क बजावला.

25-ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या गृह मतदानाची आकडेवारी – 145 मिरा-भाईंदर (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-34, दिव्यांग मतदार-3 ) 146 ओवळा माजिवडा (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-46, दिव्यांग मतदार-16 ), 147 कोपरी पाचपाखाडी (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-22, दिव्यांग मतदार-4 ) 148 ठाणे (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-103, दिव्यांग मतदार-2 ), 150 ऐरोली (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-18, दिव्यांग मतदार-4 ) 151 बेलापूर (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-39, दिव्यांग मतदार-9)

          ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ८५+ वर्षावरील 27 हजार 325 मतदार आहेत. जे मतदार त्यांच्या वृध्दत्व व अंपगत्त्व यामुळे मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाही, त्यांच्याकरिता ही सुविधा आहे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, हा यामागील भारत निवडणूक आयोगाचा उद्देश आहे.

            ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 07 विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या- 15 हजार 21, महिला मतदारांची संख्या- 12 हजार 304 इतकी आहे. ज्या मतदारांनी भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना अर्ज भरुन दिले आहेत, त्या मतदारांचे गृहमतदान करुन घेतले जाणार असल्याचे 25-ठाणे लोकसभा मतदार संघाच्यानिवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी नमूद केले.

00000

 

 

भिवंडीतील प्रभाग समिती परिसरात वासुदेवाच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती

ठाणे, दि.10 (जिमाका) : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी  स्वीप उपक्रमांतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती 3 परिसरात मतदानाचे प्रमाण कमी असून येथील नागरिकांनी मतदान करावे यासाठी याठिकाणी आज वासुदेवाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

स्वीप उपक्रमांतर्गत भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती 3 परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून वासुदेवाने नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. लोकशाही बळकटीकरणासाठी आपल्या प्रत्येकाचे मत आवश्यक असून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. आपले मत अमूल्य आहे, ते वाया घालवू नका असा संदेश नागरिकांना वासुदेवाने दिला.

यावेळी मतदानाबाबत जनजागृतीपर संदेश देणारे फलक घेवून जनजागृती करण्यात आली. वासुदेवाला पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांनी यावेळी आम्ही मतदान करणार.. अशा घोषणा दिल्या. 20 मे 2024 ही तारीख लक्षात ठेवा, आपणही मतदान करा आणि  आपल्या आजबाजूच्या परिसरातील नागरिकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करा, असे आवाहन करण्यात आले.

00000

 

कल्याण पूर्व मतदारसंघात पथनाट्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी केली जनजागृती

ठाणे, दि.10 (जिमाका) : येत्या 20 मे 2024 रोजी प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावा, मतदान करुन आपली लोकशाही बळकट करा असा संदेश देत विदयार्थ्यांनी नागरिकांना देत मतदानाबाबत जनजागृती केली.

 24- कल्याण लोकसभा मतदारसंघातील, 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ ठोंबरे आणि अतिरिक्त सहाय्यक. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वीप पथकातील (मतदार जनजागृतीपथक) महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे (स्वीप) यांच्या अधिपत्याखाली गणेश विदया मंदिरातील विदयार्थ्यांनी  नागरिकांमध्ये जनजागृती केली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत ड प्रभागक्षेत्र कार्यालय, विजयनगर, ओपन जिम, डी मार्ट रेडी, विजयनगर पोलीस चौकी, गौरी विनायक बिल्डर कार्यालयासमोर, विजयनगर नाका चौक, ओम नमो साई श्रद्वा अपार्टमेंट जवळ,पोटे अपार्टमेंट ,शशिकला एनक्लेव, स्वामी समर्थ मठाजवळ, दादासाहेब  मतदारांना मतदनाचे महत्व विषद केले. यावेळी उपस्थित नागरिकांना मतदानाविषयक पत्रके वितरित करीत येत्या 20 मे रोजी मतदान करणेबाबत आवाहनही करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृतीपर घोषणा देऊन नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याबाबत संदेश दिले.

यावेळी स्वीप टिमचे कर्मचारी समाधान मोरे, विलास नंदनवार, सर्जेश वेलेकर, अजय खंडाळे, भारती डगळे उपस्थित होते.

00000

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी

0
बारामती, दि.१९: शहरात भटकी जनावरे, कुत्र्यांचा वावर तसेच त्याबाबत नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेत नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, त्यासाठी शहरातील विविध भागात कोंडवाड्याकरिता जागा...

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

0
राज्यातील जनतेला सुखकर आयुष्य जगता यावे यासाठी जनतेचे पालकत्व म्हणून मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे विविध धोरण व कायदे, योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आवश्यक सर्व...

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

0
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य...

मच्छिमारांच्या अद्ययावत सोयीसुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध – बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १८ : मच्छिमार व्यावसायिकांचे हित तसेच त्यांना अद्ययावत  सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी  राज्य शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे मत्स्य विकास...

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

0
मुंबई, दि.१८ : महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (GST) विभागाने चितन कीर्तीभाई शाह (वय ३८ वर्षे) रा. भायखळा (पूर्व), मुंबई वास १९२.४५ कोटी इतक्या...