रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 680

नाशिक-पुणे रेल्वेमार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राने सहकार्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली, दि.27: महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समुह विकास यासारख्या महत्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबाबत मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

राष्ट्रपती भवनात झालेल्या नीति आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य शासनातर्फे सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून घेतलेल्या योजनांविषयी माहिती दिली. हे सांगताना राज्यातील महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांवरही प्रभावीपणे मुद्दे मांडले.

मुख्यमंत्री म्हणाले, क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबई महानगर परिसर क्षेत्रातील तसेच राज्यातील इतर भागांमध्ये जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास योजना सुरू केल्या आहेत. हा आशियातील सर्वात मोठा ब्राउनफील्ड प्रकल्प आहे. ही योजना आपल्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास राज्य सरकारच्या संस्थांमार्फत करण्यात येणार असून या संस्थांमार्फत दोन लाखांहून अधिक घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात मोठ्या रस्ते प्रकल्पांमध्ये झपाट्याने सुधारणा होत असून कोकण कोस्टल रोड आणि कोकण ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे कोकणासाठी गेम चेंजर्स ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये अखंड कनेक्टिव्हिटीसाठी पाच हजार किलोमीटरचे अॅक्सेस कंट्रोल ग्रिड तयार करण्याची योजना असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई महानगर परिसरात सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या सुमारे 390 किमी मेट्रो मार्गांचे बांधकाम सुरू असून पुणे आणि नागपूर येथे मेट्रो मार्गाचे कामही वेगाने सुरू आहे. नाशिक- पुणे रेल्वेमार्गाच्या कामाला तातडीने सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

बैठकीत मुंबईतील फनेल झोन संदर्भात तसेच उंचीची मर्यादा, रडार स्थलांतर करणे याबाबत चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बीपीटीच्या सहा एकर जागेचा चांगला वापर करून तेथे मरीन ड्राईव्ह सारखी चौपाटी विकसित करण्याबाबतही चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

000

दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे कोकणातले पाणी वळविण्यासाठी विनंती

नवी दिल्ली दिनांक 27: कोकणात जाणारे पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळविणे, नदीजोड प्रकल्पाला वेग देणे या महत्वाच्या विषयांसह दुध, कापूस, सोयाबीन, कांदा यासंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांना  न्याय मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील निती आयोगाच्या बैठकीत बोलतांना केली. राष्ट्रपती भवन येथे अशोक मंडपात नीति आयोगाच्या नवव्या नियामक परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली.

या परिषदेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांच्यासह नीति आयोगाचे पदसिद्ध सदस्य, केंद्रीय मंत्री आणि नीति आयोगाचे उपाध्यक्ष उपस्थित होते.

कांदा, कापूस, सोयाबीनचा मुद्दा उचलला

आपल्या भाषणात विशेषत: शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न आपण मांडले असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कांद्याच्या किमती स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी करण्यासंदर्भातील किंमत धोरणावर विचार करण्याची विनंती पंतप्रधानांना केली. सोयाबीन आणि कापसाचा हमी भाव वाढवून मिळावा. हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना पंतप्रधानच न्याय देऊ शकतात त्यामुळे लवकरच यावर तोडगा निघेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दुधाची भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यासंदर्भात देखील केंद्राने पाउले उचलावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा

यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा वॉटरग्रीडला वेग देण्याची मागणीही केली. कोकणात वाहून जाणारं पाणी वापरासाठी मिळावं , मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा यासाठी मदत सांगली आणि कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पुराचे आणि कोकणात दरवर्षी 167 टीएमसी पाणी वाहून समुद्राला मिळत आहे. त्यातले काही पाणी अडवून, काही पाणी उचलून मराठवाड्यातील गोदावरीच्या खोऱ्यात आणून इथल्या भागातील लोकांना ते उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे, याला केंद्राने देखील गती द्यावी असे ते म्हणाले.

बीपीटीच्या जागेचा वापर

 

मुंबईत बीपीटीच्या सहा एकर जागेचा योग्य वापर व्हावा तसेच याठिकाणी मरीन ड्राईवसारखी चौपाटी व्हावी यासाठी राज्य शासनाला केंद्राकडून मदत मिळावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून तिच्या सौंदर्यकरणाला त्यामुळे बळ मिळेल असेही ते म्हणाले.

पायाभूत सुविधांना अधिक वेग द्यावा

ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला कॅबिनेटची अंतिम मंजूरी मिळावी तसेच लाखो रहिवाशांना दिलासा देण्यासाठी तसेच दहिसर अंधेरीतल्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी फनेल रडार झोन शिफ्ट करावा अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. याशिवाय  पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प, कराड चिपळूण रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी करून पंतप्रधानांचे लक्ष वेधले.

000

शिळफाटा येथील महिलेवर सामूहिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २७ : शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलदगतीने तपास करण्यात येईल.  याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करुन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे, नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या.

ही अत्यंत गंभीर घटना असून याप्रकरणी ठाणे आणि नवी मुंबई पोलीसांकडे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटना शिळफाटा, ठाणे येथे घडली असून तेथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच महिलेच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलीसांकडे ४९८ ए कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

महिलेवर सामूहिक अत्याचार आणि तिची हत्या करणाऱ्या दोषींना कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने या प्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या आहेत.

या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल यादृष्टीने या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

००००

विकसित भारत @ 2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध – निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली राज्याची भूमिका

नवी दिल्ली, 27: विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून राज्य शासनाने गरीब, शेतकरी, महिला सक्षमीकरण, युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी धोरणे बनवलीआहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  राष्ट्रपती भवन येथे अशोक मंडपात नीति आयोगाच्या नवव्या नियामक परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली.

या परिषदेत विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांच्यासह नीति आयोगाचे पदसिद्ध सदस्य, केंद्रीय मंत्री आणि नीति आयोगाचे उपाध्यक्ष उपस्थित होते. शालेय शिक्षण, पिण्याचे पाणी, ऊर्जा, आरोग्य, पायाभूत सुविधा, जमीन आणि मालमत्तांची सुलभ नोंदणी यात राज्य अग्रेसर असल्याचे यावेळी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले.   राज्याने निती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र इंस्टीट्यूशन फॉर ट्रांसफॉर्मेशनची स्थापना झाल्याची माहिती देत, भारताची  5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याच्या वचनबद्धतेनुसार, महाराष्ट्राने राज्याचा वाटा म्हणून  1 ट्रिलियन डॉलर्स योगदान देण्यासाठी पाऊले उचलली आहेत.

महाराष्ट्राचा सध्याचा जीडीपी विकास दर 8.7 टक्के आहे. हा दर 15 टक्के करण्याचे नियोजन आहे असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य कृषी माल निर्यात धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे तसेच राज्याने 72 वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अंतिम केल्याची माहिती, त्यांनी यावेळी दिली.

कांदा खरेदीबाबत मागणी

शेतक-यासांठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेला पूरक म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये अतिरिक्त 6 हजार प्रति शेतकरी देण्यात येत असून  92 लाख शेतक-यांना 5305 कोटी रूपये वितरित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मोदींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट राज्याने देखील समोर ठेवले आहे. त्यासाठी राज्याने कृषी अन्न निर्यात धोरण तयार केल्याची माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच 10 लाख टन कांदा साठवण्यासाठी अणुऊर्जेवर आधारित ‘कांदा महाबँक’ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दलची माहिती दिली.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी कांदाच्या किमती स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी करण्यासंदर्भातील किंमत धोरणावर विचार करण्याची विनंती पंतप्रधानांना केली.

महाराष्ट्र नेहमीच फलोत्पादनाच्या क्षेत्रात आघाडीवर राहिले असून, राज्याचा निर्यातीचा वाटा 5 टक्के आहे. तथापि, आता प्रगत तंत्रज्ञान आणि धोरणात्मक उपायांचा वापर करून त्याचा हिस्सा 30-35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याने शेतकरी उत्पादक संस्थांसाठी मूल्यवर्धित पुरवठा साखळी तयार करणे, विकसित करणे आणि त्यांना संबंधित सरकारी योजनांशी जोडणे आणि प्रोत्साहनाद्वारे सेंद्रिय शेतीला समर्थन देण्याबाबतचा ठराव लागू केल्याचे यावेळी नमूद केले. पुढील पाच वर्षांत 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान राबवणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

महिला सक्षमीकरणासाठी निर्णय

शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक पावले उचलली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली. राज्यात नमो महिला सक्षमीकरण योजना लागू झाल्याचे सांगत, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’’ ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु केल्याचे सांगितले.  राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच वार्षिक 18 हजार रुपयांचा लाभ देणे, महिलांसाठी इतर कल्याणकारी योजनांमध्ये वर्षाला तीन सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, लेक लाडकी योजना यांचा समावेश तर मुलींना केजी ते पीजी मोफत शिक्षण देण्याचा निर्णयाबद्दलची माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली.

आरोग्य यंत्रणा मजबूत करणार

महाराष्ट्र आरोग्य विमा योजनेत अग्रगण्य राज्य आहे. महाराष्ट्राने सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत समाविष्ट करण्यासाठी व्याप्ती 5 लाख रुपये वाढविल्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली.  दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करणारे तसेच ट्रान्सजेंडर धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

ऑनलाईन सेवा

सर्व ग्रामीण आणि शहरी जमिनीच्या अधिकारांचे डिजिटलायझेशन झाले असून, ऑनलाईन पद्धतीने ग्रामीण भागातील 262 कोटी आणि 70 लाख शहरी भागांमध्ये भूमी अभिलेख नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली

उद्योगात घौडदौड

मागील दोन वर्षांत, दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचामध्ये महाराष्ट्राने 5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यातून सुमारे तीन लाख रोजगार निर्माण होणार असल्याबाबतही त्यांनी सांगितले.  36 जिल्हयांमध्ये 72 उत्पादनांची ओडीओपीअंतर्गत निवड केली असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक उत्पादनात 18 टक्के योगदान देणाऱ्या 46 लाख नोंदणीकृत युनिट्ससह, महाराष्ट्र एमएसएमई मध्ये आघाडीवर आहे असे सांगितले.  भारतात सर्वाधिक 30 टक्के एफडीआय आकर्षित करण्यात आणि 18 हजार स्टार्ट-अप्सची यशस्वीपणे नोंदणी झाली आहे असेही ते म्हणाले.

हाताला रोजगार

राज्यातील युवा वर्गाला रोजगारक्षम बनविण्यासाठी शासनाने 18 ते 35  वयोगटातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले असल्याची मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत, सरकारने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शिकाऊ प्रशिक्षणासोबत त्यांना दहा हजार रुपयांपर्यंतचे स्टायपेंड देणार असल्याचे त्यांनी सांगितले. “सक्षम युवा, समर्थ भारत” या संदेशाला वर्ष 2047 पर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्य शासन वचनबध्द असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.‍ ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील विशिष्ट खेळांमध्ये आपल्या देशाची कामगिरी वाढवण्यासाठी मिशन लक्ष्यवेध योजना सुरू करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले .

सर्वसामान्यांना घरे

महाराष्ट्र शासन ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माणासाठी नवीन धोरण सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याच्या विकास योजनांमध्ये पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी सर्व नगर विकास योजना पूर्णपणे जीआयएस आधारित बनविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे एमएमआर क्षेत्रातील तसेच महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींसाठी मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास योजना सुरू केल्या आहेत. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचे उद्दिष्ट असून, दोन लाखांहून अधिक घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई  महानगर क्षेत्रात सव्वा लाख कोटींहून अधिक खर्चाच्या सुमारे 390 किलोमीटर मेट्रो मार्गांचे बांधकाम, पुणे आणि नागपूर येथे मेट्रो मार्गाचे कामही वेगाने सुरू असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. राज्य शासन एक संतुलित आणि सर्वसमावेशक आर्थिक विकास मॉडेल तयार करण्यासाठी जिल्हा-स्तरीय धोरणांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे श्री शिंदे यांनी सांगितले.

पाणी पुरवठा आणि स्वच्छता

“हर घर जल”हे उद्यिष्ट साध्य करण्यासाठी, महाराष्ट्राने 2019 मधील 33 टक्के वरून 86.26 टक्के प्रगती केली असून, 1.26 कोटी कुटुंबांना नळ कनेक्शनसह समाविष्ट आहे. राज्यात 11 हजार 347 पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या असून 31 हजार 881 योजनांची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य आतापर्यंत बहुतेक  शाळा आणि अंगणवाडीतही नळ जोडणी दिली असल्याचे त्यांनी सांगतिले.

हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या धोरणांतर्गत अंदाजे 2 लाख 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, हे ९१० KTPA ग्रीन हायड्रोजन तयार करेल असे ते म्हणाले

पर्यटन राज्य बनविणार

अलीकडेच, शिवनेरी, रायगड, प्रतापगड यांसारख्या शिवकालीन 12 ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नामांकन मिळाले आहे. या यादीत पंढरपूर वारी यात्रा, दहीहंडी आणि गणपती उत्सव यांसारख्या सणांचा समावेश करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. यासोबतच, राज्यात मोठ्या रस्ते प्रकल्पांमध्ये झपाट्याने सुधारणा होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  पायाभूत सुविधांवर बोलताना, मुख्यमंत्र्यांनी  सांगितले की कोकण कोस्टल रोड आणि कोकण ग्रीन फील्ड एक्स्प्रेसवे प्रमाणे जे कोकणासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.

000

पूरपरिस्थिती बिकट झाली तरी घाबरून न जाता सर्व मिळून सामोरे जाऊ – पालकमंत्री हसन मुश्रीफ

पूर निवारणासाठी प्रशासनाकडून तयारीला सुरूवात

कोल्हापूर, दि.27 : कोल्हापूर जिल्ह्यात आलेली अभूतपूर्व पुरपरिस्थिती लक्षात घेऊन पूरग्रस्तांचे पुनर्वसन जलदगतीने व्हावे ह्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरात देण्यात येणाऱ्या विविध मदतकार्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध संघटना, व्यावसायिकांसोबत नियोजन बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. पूर निवारणासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारीला सुरूवात झाली असून घरांची पडझड, शेतीचे नुकसान तसेच इतर पुरग्रस्तांना पुरामुळे झालेला त्रास याबाबत प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे आणि नागरिकांना मदत देण्याचे कार्य गतीने सुरू आहे. ताराराणी सभागृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी सर्व  उपस्थित संघटना, व्यावसायिकांना पुरस्थितीतून सावरण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू असे आवाहन केले. ते म्हणाले, पुरस्थिती बिकट झाली तरी जिल्हावासियांनी घाबरून न जाता सर्व मिळून त्याला सामोरे जावू. अलीकडील काळात दर दोन वर्षाला आपणाला या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आपण यामध्ये आता अनुभवी झालो आहे. मात्र पुरग्रस्तांना चांगल्या प्रकारे मदत व्हावी, या उद्देशाने आपल्या मदतीने व प्रशासनामार्फत नियोजन केले जाईल. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

मागील पुरस्थितीत क्रिडाईच्या पुढाकाराने कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपची स्थापना झाली असून कोल्हापुरातील मेडिकल असोसिएशन, पत्रकार संघ, हॉटेल मालक संघ, आयटी, व्हाईट आर्मी, अर्थ मुव्हींग यासह बहुतेक असोसिएशन, सोशल ग्रुप्स, एनजीओ, समाजसेवी संस्था, समाजसेवक एकाच व्यासपीठावर आले होते. तसेच आताही मदत कार्य व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाच्या मदतीने पुरपश्चात मदतकार्याला सुरूवात केली आहे. शहरातील मदत कार्यात सुसूत्रता आणणे, पुरग्रस्तांसाठी जलदगतीने सहाय्य उपलब्ध करून देणे, जिल्हा प्रशासन-पोलीस व महानगरपालिका, जिल्हा परिषद आदी संस्थाना सहाय्य करणे, पूर ओसरल्यावर काय करावे व काय करू नये याचे प्रबोधन करणे, विविध स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था यांच्यामध्ये सुसूत्रता आणून त्यांची सेवा व माहिती गरजू पुरग्रस्त व नागरिकांपर्यंत पोहोचवणे व दानशूर व्यक्ती, ग्रुप्स, संस्थातर्फे येणारे धान्य,वस्तू, कपडे एकाच ठिकाणी गोळा करणे व वाटप करणे इत्यादी उद्देश या बैठकीत चर्चेला होते. यानुसार इच्छुक संघटनांची नियोजन बैठक रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्याचे यावेळी ठरले. महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी शहरातील मदतीबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, कालपासून मोठ्या प्रमाणात दानशूर व्यक्ती मदत करीत आहेत. आता पूर ओसरत जाईल तसे स्वछता कामी आम्हाला मदत लागेल. याबाबत ज्यांना सहकार्य करायचे आहे त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीचा उद्देश सांगून पुरस्थितीदरम्यान व पुरस्थिती पश्चात मोठ्या प्रमाणात प्रशासनाला सहकार्य लागते. तेच सहकार्य चांगल्या प्रकारे नियोजन करून सुत्रबद्ध केले तर चांगल्या प्रकारे नागरिकांना मदत देता येईल. चांगल्या समन्वयातून आवश्यक मदत योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी प्रशासन एक केंद्र किंवा यंत्रणा उभारेल. तिथून मदतकार्याचे नियोजन करु. कोल्हापूर शहरासह शिरोळ तसेच हातकणंगले येथील पुरग्रस्तही समोर ठेवून मदतकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. जेवण, आरोग्य सुविधा, जनावरांना चारा यासह पशुंचे आरोग्य व पुरपश्चात सेवा यात स्वच्छता, किटकनाशक फवारणी आदी कामांचा समावेश आहे. यातून निश्चितच कमी वेळेत आपण पुरग्रस्त नागरिकांचे जीवनमान पुर्वपदावर आणू.

***

कामगार कल्याण मंडळ आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. 27 : राज्य शासनाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राज्यातील कामगारांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी मंडळ वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. कामगारांनी आपल्यासाठी उपयुक्त अशा योजनेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आज शहादा येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज शहादा व सारंगखेडा येथे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित  अत्यावश्यक सुरक्षा संच व गृहपयोगी वस्तुंच्या वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, शेखर पाटील, शशिकांत पाटील, राजेंद्र गोसावी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतात तसेच ते कमी वेतनात काम करत असतात त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असते व आर्थिक स्थिती गरीब असल्याकारणामुळे त्यांना त्यांचा विवाह करण्यासाठी लागणार खर्च परवडण्यासारखा नसतो व त्यामुळे त्यांना स्वतःचा विवाह करण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो तसेच त्यांना विवाहासाठी आवश्यक पैशांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते तसेच त्यांना जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते त्यामुळे राज्यातील कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या कामगार विभागाने नोंदीत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. तसेच आर्थिक दृष्ट्या गरीब कामगाराला पत्नीच्या प्रसूतीदरम्यान हॉस्पिटल चा खर्च करणे शक्य नसते व त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कामगार मंडळामार्फत कामगाराच्या पत्नीस नैसर्गिक प्रसूतीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

यावेळी बोलताना ते म्हणाले, बहुतांश स्वतःचे उच्च शिक्षण परदेशात पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतात परंतु बांधकाम क्षेत्र तसेच इतर क्षेत्रात काम करणारे कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असल्याकारणामुळे त्यांची मिळकत कमी असते आणि त्यामुळे ते आपल्या पाल्याना शिक्षणासाठी परदेशात पाठविण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे विद्यार्थी परदेशात शिक्षण पूर्ण घेण्यापासून वंचित राहतात त्यामुळे कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या पाल्यांना परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

ते पुढे म्हणाले, आपत्कालीन मदत: अपघात, आजार, मृत्यू इत्यादींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण, रुग्णालये, औषधे आणि आरोग्य विमा यांसारख्या आरोग्य सुविधा, कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि शिक्षण सहाय्य,कामगारांसाठी स्वस्त निवास सुविधा, निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न,

कर्ज, प्रशिक्षण, सामाजिक सुरक्षा इत्यादींसारख्या इतर सुविधा या मंडळामार्फत दिल्या जात असल्याचेही यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले.

सारंगखेडा येथील कार्यक्रमास हे होते उपस्थित..

पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील, पंचायत समिती सदस्य विजय पाटील, उद्योजक शशिकांत पाटील, शेखर पाटील, दत्त मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजय महाले, विकास सोसायटीचे उपाध्यक्ष शांतीलाल पाटील, राजेंद्र पाटील, देविदास माळी व गणेश पाटील.

0000000000

पूरग्रस्त भागात आवश्यकता पडल्यास जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देणार – पालकमंत्री हसन मुश्रीफ

आवश्यक ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : पावसाचा जोर कमी झालेला आहे मात्र अजूनही पाणी पातळीत थोडी थोडी वाढ होत आहे. फक्त धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत असून पुराचा धोका टळलेला नाही. म्हणून प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार नागरिकांनी स्थलांतर करुन सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आंबेवाडी येथील पुरभागात भेट दिल्यानंतर शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, नृसिंहवाडी तसेच इचलकरंजी या पुरग्रस्त भागाची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान कुरुंदवाड, नृसिंहवाडी या भागातील सुमारे 50 कुटुंबियांचे स्थलांतर झालेल्या निवारागृहात जावून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पुरग्रस्त भागात आवश्यकता पडल्यास जिल्हा वार्षिक योजनेतील निधीमधूनही मदत करु असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले.

निवारागृहात स्थलांतरीत करण्यात आलेल्या कुटुंबियांची योग्य ती काळजी घेतली जात असून आवश्यक त्या सर्व सुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. सोबतच आरोग्य तपासणी तसेच त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी दुधाची व्यवस्था या निवारागृहात केली आहे. कुरुंदवाड येथे कालपासून सुरू झालेल्या निवारागृहात तातडीने जेवण तसेच इतर आवश्यक सुविधा देण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी स्थानिक माध्यमांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, हिप्परगी आणि अलमट्टी या धरणामधून ३ लाख क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कर्नाटक सरकारसोबत पाणी विसर्गाबाबत योग्य नियोजन सुरु आहे. याबाबत प्रशासन हे कर्नाटक सरकारशी संपर्कात आहे.

स्थानिक प्रशासनासोबत पुरस्थितीबाबत आढावा

शिरोळ तहसील कार्यालयात स्थानिक प्रशासनाबरोबर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुरस्थितीबाबत आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजारापेक्षा  जास्त कुटुबियांना स्थलांतरीत केले आहे. यावेळी सर्वांनी दक्ष राहून नागरिकांना आवश्यक मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, आमदार प्रकाशराव आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, उप विभागीय अधिकारी मौसमी चौगुले, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कुरुंदवाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.

***

‘तेजोमय स्वरनाद’ या कार्यक्रमाचे उद्या (२८ जुलै) आयोजन

मुंबई, दि.27: सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व हरिभाऊ विश्वनाथ म्युझिकल्स, प्रभादेवी आणि फोंडाघाट फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने “तेजोमय स्वरनाद” हा कार्यक्रम रविवार 28 जुलै, संध्याकाळी 6 वाजता करिश्मा हॉल, 5 वा मजला, रवींद्र नाट्यमंदिर आवार येथे आयोजित करण्यात आला आहे.

आषाढ महिना म्हटला, की सगळीकडे पडणारा पाऊस, हिरवी झालेली धरती, त्यामुळे प्रसन्न झालेले वातावरण असे चित्र असते. “आषाढस्य प्रथम दिवसे” असे म्हणत आपण त्याचे आनंदाने स्वागत करतो. विठ्ठलाच्या भेटीला निघालेले वारकरी आषाढी एकदशीला पांडुरंगाच्या पायाशी लीन होतात. याच महिन्यात येणारी गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करते. आषाढातला शेवटचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या. या दीप अमावस्येचे सांस्कृतिक महत्त्व “तेजोमय स्वरनाद” कार्यक्रमातून उलगडले जाणार आहे.

इतिहासकालीन दिवे, त्यांचे वेगवेगळे उपयोग इ. रंजक माहिती आणि काही दुर्मीळ दिवे यावेळी बघायला मिळणार आहेत. दिव्यांचे संग्राहक आणि वक्ते मकरंद करंदीकर ही माहिती देणार असून निवेदिका दीपाली केळकर त्यांची मुलाखत घेतील. गायिका पद्मजा फेणाणी- जोगळेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.

दिव्यांच्या अनुषंगाने येणारी विविध गाणी धनंजय म्हसकर, प्राची जोशी आणि श्रुती पोटे सादर करणार आहेत. वाद्य संगत हनुमंत रावडे, डॉ. हिमांशु गिंडे, वैभव कदम आणि तन्मय मेस्त्री यांची असेल. नृत्यांकुर डान्स अकादमीचे विद्यार्थी नृत्याविष्कार सादर करतील. कार्यक्रमाचे संयोजन प्रीती निनाद मांडके यांचे आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी खुला आहे.

000

बेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी मुंबई मनपा आयुक्तांना सूचना

मुंबई, दि. 27 : शहाबाज गाव, सेक्टर 19, बेलापूर येथे एक इमारत कोसळून आज  पहाटे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी नवी मुंबई महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करून माहिती घेतली. इमारत दुर्घटनेत सापडलेल्या आपत्तीग्रस्तांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी महापालिका आयुक्तांना दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे हे निती आयोगाच्या बैठकीसाठी सध्या दिल्ली येथे आहेत. बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी मनपा आयुक्त श्री. कैलास शिंदे यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून इमारत दुर्घटनेसंदर्भात माहिती घेतली.

इमारत दुर्घटनेनंतर प्रशासनामार्फत तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या सर्व आपत्तीग्रस्तांना तातडीचे उपचार, आरोग्य सुविधा, अन्नपाणी, कपडे, तात्पुरता निवारा आदी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात याव्यात. महापालिका आणि इतर सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी या आपत्तीग्रस्तांना आवश्यक ते सहाय्य तातडीने उपलब्ध करावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

000

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; प्रशासनाने ऑनफिल्ड सज्ज राहावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मुंबई, दि. 27 : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचावकार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री श्री. शिंदे हे निती आयोगाच्या बैठकीसाठी सध्या दिल्ली येथे आहेत. बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांच्याशी चर्चा करुन पूरपरिस्थिती, पावसाची सद्यस्थिती आणि मदत व बचावकार्यासंदर्भात माहिती घेतली.

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच काल धरणक्षेत्रात झालेला पाऊस लक्षात घेता पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने सतर्क आणि ऑन फील्ड राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  दिल्या. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये सर्व सुविधा पुरवणे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची दोन पथके तसेच भारतीय सेनेचे पथकही मदतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवावे. धरणांमधून होणारा विसर्ग लक्षात घेवून अलमट्टी धरण प्रशासनाशी संपर्कात राहून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

Oooo

ताज्या बातम्या

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

0
बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे,...