रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 678

राज्यातील ७.५ अश्र्वशक्ती पर्यंतच्या सर्व शेतीपंप ग्राहकांना शासनाकडून मोफत वीज

मुंबईत दि. २८ : राज्यातील शेतकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – २०२४” शासनाने लागू केली आहे. त्यामुळे आता ७.५ अश्र्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे.

जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने धोरण ठरविले. त्यानुसार आता “एप्रिल २०२४ पासून मार्च २०२९ पर्यंत राज्यात “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – २०२४” राबविण्यात येत आहे. तथापि, या योजनेचा ३ वर्षांत आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

या योजनेमुळे, सध्या देण्यात येणारे वीज दर सवलतीचे ६,९८५ कोटी रुपये तसेच वीज दर माफीनुसार ७,७७५ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे एकूण १४,७६० कोटी रुपयांची वीज दर माफी राज्यातील शेतकऱ्यांसाठी केली जात आहे.

याबाबतचा शासन निर्णय शासनाने जारी केला असून तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे.

000

संजय ओरके/वि.सं.अ.(ऊर्जा)

नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान..! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

मुंबई ,दि. २८ : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनु भाकरचे अभिनंदन केले आहे.

महिला नेमबाज मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावून या स्पर्धेतील भारतासाठी पहिले पदक मिळवले आहे. नेमबाज मनु भाकरची ही कामगिरी तमाम देशवासियांसाठी सार्थ अभिमानाची असल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तिला स्पर्धेसाठी तसेच नेमबाजीतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाकरिता राज्यात सर्वात प्रथम मुंबई उपनगर जिल्ह्यात दहा उमेदवारांची निवड

मुंबई दि.२८ :  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण  योजनेअंतर्गत खाजगी उद्योजकांकडून राज्यात प्रथमच  मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी दहा उमेदवाराची निवड करण्यात आली आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील ईबिक्सकॅश ग्लोबल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड (EBIXCASH GLOBAL SERVICES PVT. LTD) या खाजगी आस्थापनेने कस्टमर सर्व्हिस असोसिएट  (Customer Service Associate)  हिंदी आणि इंग्रजी या पदाकरीता  खाजगी आस्थापनेतून महाराष्ट्रातून प्रथमच   दहा प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड करून नियुक्ती दिली आहे.

स्नेहा बिडलांग, प्रविण शिंदे, तेजस्वी बनकर, फहाद खान, जितेंद्र यादव, रचना कांबळे, अक्षदा कांबळे, सुभाष अवघडे, शिवम पांडे, श्याम शिंदे या उमेदवाराची निवड झालेली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षणार्थीची निवड करणारी ही महाराष्ट्रातील पहिली खाजगी आस्थापना ठरली आहे.

या  योजनेत मुंबई उपनगर जिल्ह्यात वीस हजार उमेदवारांचे नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. प्रशिक्षणार्थी उमेदवारास त्यांच्या शैक्षणिक अर्हता प्रमाणे म्हणजे बारावी पास रू.६०००/-  आयटीआय, डिप्लोमा रू,८०००/- आणि पदवीधर इंजीनियरिंग साठी रू.१०,०००/- इतके विद्यावेतन ६ महिन्यांसाठी शासनाकडून मिळणार आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका तसेच खाजगी आस्थापना, उद्योजक, सेवा क्षेत्रातील उद्योजक या योजनेमध्ये सहभागी होणार आहेत. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपली नोंदणी www. mahaswayam.gov.in या विभागाच्या वेबसाईटवर करून मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त श्री रविंद्र सुरवसे यांनी केले आहे.

000

नेमबाज मनू भाकर हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. 28 :- “फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात भारताला स्पर्धेतील पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले आहे. मनू भाकर हिने जिंकलेले कांस्यपदक ही देशासाठी चांगली सुरुवात असून या यशाने देशवासीयांच्या आशा अधिक उंचावल्या आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या आणि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने मनू भाकर हीचे  मनःपूर्वक अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात भारतीय खेळाडू अधिकाधिक पदके जिंकतील आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, असा मला विश्वास आहे.  ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी मनु भाकर ही पहिली महिला नेमबाज ठरली आहे, हे सुद्धा या पदकाचे वैशिष्ट्य.. मनू भाकर हिचे पुन:श्च अभिनंदन. भारतीय ऑलिम्पिक पदकाला अधिकाधिक पदके जिंकण्यासाठी  मनापासून शुभेच्छा…,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला स्पर्धेतील पहिले पदक जिंकून देणाऱ्या कांस्यपदक विजेत्या नेमबाज मनू भाकर हिचे अभिनंदन केले आहे.

000

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले कांस्यपदक मिळवून देणाऱ्या नेमबाज मनू भाकर हिचे अभिनंदन – क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. २८ :- फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात भारताला स्पर्धेतील पहिले कांस्यपदक जिंकून दिल्याबद्दल तिचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी  अभिनंदन केले.

भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक पदके जिंकतील आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, असा मला विश्वास आहे. मनू भाकर ही गेल्या २० वर्षांमध्ये व्यक्तिगत स्पर्धेत ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोहचलेली पहिली भारतीय महिला नेमबाज आहे. यापूर्वी सूमा शिरुरनं २००४ साली अथेन्समध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता.

या पदकांमुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत यावेळी भारतीय तसेच महाराष्ट्रातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारात  जास्तीत जास्त पदके मिळविण्यासाठी खेळाडूंचे मनोबल उंचावेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

000

गिरीश महाजन, संजय बनसोडे यांच्या हस्ते सुसज्ज अग्निशमन दुचाकींचे लोकार्पण

लातूर, दि. 28 : राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडून लातूर जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी सुसज्ज अग्निशमन दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या दुचाकींचे लोकार्पण राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाले.

आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. साकेब उस्मानी, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, अग्निशमन अधिकारी विशाल आलटे, कैलास सोनकांबळे यावेळी उपस्थित होते.

वॉटर मिस्ट फायर एक्सटिंग्युशर मोटर बाईक आणि कॉम्प्रेस्ड एअर फोम बाईक अशा दोन प्रकारच्या अग्निशमन दुचाकी प्राप्त झाल्या आहेत. अरुंद रस्ते, गल्ली-गोलातील जागी, तसेच झोपडपट्टीच्या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने पोहचू शकत नाहीत. अशा ठिकाणी या अग्निशमन दुचाकी सहज पोहचू शकतात व भडकणाऱ्या आगीवर 3 मीटर ते 12 मीटर अंतरावरून तसेच 30 फूट उंचीपर्यंत फवारा मारू शकतात. यामध्ये पाण्यासोबत रासायनिक फोमचा देखील वापर केल्यामुळे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविणे सहज होणार आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपरिषदेस 4, अहमदपूर नगरपरिषदेस 2, औसा आणि निलंगा नगरपरिषदेस प्रत्येकी एक आणि रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, जळकोट, चाकूर नगरपंचायतीस प्रत्येकी एक अशा एकूण 13 वॉटर मिस्ट बाईक्स राज्य शासनाकडून पुरविण्यात  आल्या आहेत. यापैकी सहा दुचाकींचे लोकार्पण पालकमंत्री ना. महाजन आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वर्किंग वुमन्स हॉस्टेलचे उद्घाटन

  • पहिल्या टप्प्यात 50 महिलांना मिळणार प्रवेश

लातूर, दि. 28 : खंडापूर रोडवरील उच्चस्तर आयटीआय इमारत परिसरात सुरु होत असलेल्या वर्किंग वुमन्स हॉस्टेलचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख, माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे आदी उपस्थित होते. तसेच खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार अभिमन्यू पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

राज्याच्या ग्रामीण व शहरी भागातून येवून लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रात शासकीय, निमशासकीय, सेवा क्षेत्रा कार्यरत असलेल्या महिलांच्या निवासाचा प्रश्न सोडवून त्यांना सुरक्षित निवासस्थान मिळावे, त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी लातूर जिल्हा नियोजन समितीने वर्किंग वुमन्स हॉस्टेल सुरु केले आहे. पालकमंत्री ना. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या या हॉस्टेलची प्रवेश क्षमता पहिल्या टप्प्यात 50 इतकी आहे. याठिकाणी प्रवेश घेणाऱ्या महिलांना मोफत निवास, कॉट, बेडिंग साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. तसेच इमारत परिसरात पार्किंग व्यवस्था, ग्रंथालय, इनडोअर क्रीडा साहित्य पुरविण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयामार्फत राबविली जाणार आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कृष्णाघाट – मिरज व ढवळी येथील पूरस्थितीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी

सांगली, दि. 28 (जिमाका) : संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. पूरस्थितीच्या अनुषंगाने शासन, प्रशासन ज्या सूचना देते त्याचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे. राज्य शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये तथापी दक्ष रहावे , असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज कृष्णाघाट मिरज व ढवळी येथील पूर परिस्थितीची पाहणी करून जनावरांसाठी चारा वाटप केले.

ते पुढे म्हणाले, पूरबाधित नागरिकांच्यासाठी निवारा केंद्र, भोजन, आरोग्य सुविधा, जनावरांसाठी चारा, पाणी आदीची आवश्यकतेप्रमाणे सोय करण्यात येईल. नागरिकांनी काळजी करू नये, येणाऱ्या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करावा. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जावू नये तसेच स्वत:सह कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी उत्तम दिंघे, मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, माजी आमदार उल्हास पाटील, संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

जिल्ह्यातील विकासकामे गतीने पूर्ण करण्यासह योजना प्रभावीपणे राबवा – पालकमंत्री गिरीष महाजन

धुळे, दिनांक 28 जुलै, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील रस्ते, सिंचन, विद्युत तसेच इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत कामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन जिल्ह्यातील विकासकामे प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिलेत.

आज धुळे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. यावेळी पालकमंत्री श्री. महाजन बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. धरती देवरे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार ॲड. गोवाल पाडवी, आमदार जयकुमार रावल, आमदार कुणाल पाटील, आमदार काशिराम पावरा, आमदार मंजुळा गावित, आमदार फारुख शाह, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री गिरीष महाजन म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनांतर्गत सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, अनुसूचित जाती विशेष घटक कार्यक्रमातंर्गत यावर्षी 469 कोटी 56 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गत वर्षांपेक्षा जवळपास 47 कोटी रुपयांचा अधिकचा निधी जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी यावर्षी प्राप्त झाला असल्याने  या निधीतून जिल्ह्यातील रस्ते, सिंचन, विद्युत तसेच अन्य विभागाच्या योजनेसाठी  तांत्रिक मान्यता घेवून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करुन 15 ते 20 दिवसात कामे सुरु करावीत. विद्युत वितरण कंपनीने प्रत्येक तालुक्यात नविन ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. राज्य शासनाने कृषी पंपधारकाना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा तसेच प्रधानमंत्री कुसूम योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सौरकृषी पंपाचे वाटप करावे. ज्या ठिकाणी नविन विहीरीचे कामे पुर्ण झाली आहेत अशा ठिकाणी जलदगतीने नवीन जोडणी द्यावी. वलवाडी शिवारात नकाणे तलावातून वाहून येणारे पाणी निचरा करण्यासाठीचा प्रस्ताव त्वरीत सादर करावा. महानगरपालिकेत समावेश झालेली 11 हद्दवाढ गावातील नागरीकांना रस्ते, गटारी, पथदिवे या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. धुळे शहरास दररोज पाणीपुरवठा तसेच सिंचनासाठी अक्कलपाडा धरणाची पाणी क्षमता वाढविण्यासाठी  प्रयत्न करावेत. शिंदखेडा व दोंडाईचा नगर पालिकांच्या प्रलंबित विविध विकासकामांना त्वरीत प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगल्या प्रकारची दर्जेदार रस्ते तयार करावेत. पोलीस विभागाने धुळे जिल्ह्यातील अंमलीपदार्थ विक्रेत्यांवर कोंबीग ऑपरेशन करावेत. तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गुन्हेगारांवर  एमपीडीएअंतर्गत कार्यवाही करावी. असे निर्देशही पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

पालकमंत्री श्री.महाजन म्हणाले की, राज्य शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना ,मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अशा अनेक महत्वाच्या योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या विविध योजनांचा धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ  घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी जिल्हा वार्षिक योजनेत सन 2023-2024 या वर्षांत प्राप्त झालेला निधी व खर्च याची माहिती दिली. तसेच सन 2024-2025 या वर्षांत जिल्हा वार्षिक योजनेमधील मंजुर नियतव्ययापैकी किमान 25 टक्के निधी जिल्हा विकास आराखडय़ासाठी निश्चित केला असून याअंतर्गत जिल्हा वार्षिक कृती आराखडा निश्चित केल्यानुसार विविध विभागामार्फत नाविण्यपूर्ण कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी  जिल्हा वार्षिक योजनेची माहिती दिली. या बैठकीत खासदार, आमदार तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांनी चर्चेत सहभाग घेवून येणाऱ्या अडचणी अध्यक्षांसमोर मांडल्या. बैठकीस जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते रोव्हर मशिनचे वितरण

जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आलेले रोव्हर मशिनचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते  आज करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा आप्पती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी  दत्तात्रय वाघ महापालिकेचे अग्निशमन अधिकारी दुष्शत महाजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यात एकुण चार तालुक्यांमध्ये सन २०२३-२४ मध्ये एकुण १५ रोव्हर मिशन खरेदीस १ कोटी ६७ लाख ८५ हजार रुपये मंजूर केले होते. त्या मंजूर निधीतून धुळे जिल्ह्यात ऑनलाईन ई-मोजणी व्हर्जन 2.0 प्रक्रिया करण्यासाठी घेण्यात आले आहे. या रोव्हरच्या माध्यमातून जीआयएस बेस मोजणी काम रियल कॉर्डीनेटच्या आधारे केले जाणार आहे. धुळे जिल्ह्यात रोव्हरच्या माध्यमातून आजपावेतो १ हजार ८६८ प्रकरणे मोजणी करण्यात आली असून या यंत्रामुळे जमिनीची अचूक मोजणी होत असून प्रशासकीय गतीमानतेत वाढ होणार आहे. यापूर्वी देखील 10 रोव्हर मशिन जिल्हा नियोजन समितीमार्फत घेण्यात आले आहे.

पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते 6 आपत्कालीन फायर बाईकचे वितरण

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वनविभाग यांच्यामार्फत दाट वस्तीच्या ठिकाणी अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 6 फायर बाईकचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापनाची तात्काळ प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टिने या फायर बाईक अत्यंत परिणामकारक ठरणार असून या बाईकवर २०० लिटर पाण्याचे २ टॅंक अथवा केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लागणारे २०० लिटर लिक्विड फोमचे टॅंक असणार आहे. आज येथे वितरित करण्यात येत असलेल्या फायर बाईकपैकी शिरपूर नगरपरिषदेला 2, दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेला 2 तसेच धुळे महापालिकेस 2 फायर बाईक वितरीत करण्यात आल्या.

000

राज्य अधिस्वीकृती समितीने घेतले श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन

अमरावती, दि. 28 :  राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी विदर्भाची कुलदेवता असलेल्या श्री अंबादेवी व श्री एकविरा देवीचे दर्शन घेतले.

श्री अंबादेवी संस्थानच्यावतीने समितीचे अध्यक्ष यदुनाथ जोशी आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक (माहिती/प्रशासन) तथा समितीचे सदस्य सचिव हेमराज बागुल तसेच समितीच्या सर्व सदस्यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.

अंबादेवी संस्थानच्या विश्वस्त श्रीमती दिपा खांडेकर, दैनिक हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे व श्रीमती विद्या देशपांडे यांच्यासह अन्य विश्वस्त यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.

अमरावतीचे माहिती उपसंचालक अनिल आलुरकर व अन्य विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे, राजू पाटोदकर सुनील सोनटक्के, संप्रदा बिडकर आदी अधिकारी, अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे, सदस्य गोपाल हरणे तसेच गिरीश शेरेकर जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, सहाय्यक संचालक विजय राऊत आणि सहकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

000

ताज्या बातम्या

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

0
बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे,...