रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 677

सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई,दि. २९ : सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे.

सन २०२३ मध्ये बहुतांश भागात पावसाचे कमी प्रमाण त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. महायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याचे लोकसभा निवडणुकीच्या आधीच घोषित केले होते. त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा मांडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती.

कृषी विभागाने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली असून राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान १००० रुपये तर २ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण १५४८ कोटी ३४ लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी २६४६ कोटी ३४ लाख रुपये असा एकूण ४१९४ कोटी ६८ लाख रुपये इतक्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

या अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानास पात्र ठरणार असून, डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यात मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, महायुती सरकारने आपला शब्द पाळला असल्याचे श्री.मुंडे यांनी सांगितले आहे. या निर्णयासह तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/07/202407291753274401.pdf”]

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध गावांमधील प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित स्थानिक नागरिक व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करुन आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते. यावेळी दूधगंगा नदी डावा कालवा, कागल शहर हद्दीपासून हातकणंगले हद्दीपर्यंत जाणाऱ्या कालव्याच्या कामास गती देणेसंदर्भात आढावा बैठक झाली. कालव्याचे कामकाज तातडीने सुरु करण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांनी पाटबंधारे विभागाला सूचना दिल्या. कागल शहरापासून पुढे कसबा सांगाव आणि तिथून पुढच्या गावांच्या शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळण्याची अडचण झाल्याचे त्यांनी सांगितले. धामणी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत, हासूर बु. ता. कागल येथील जमीन भोगवटादार वर्ग -१ दोन करणे व कागल येथील सुंदराबाई कुरणे वसाहत ही भोगवटादार २ असून भोगवटादार वर्ग-१ होणेबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबत महसूल विभागाला सूचना केल्या. कागलच्या सुंदराबाई कुरणे या झोपडपट्टीतील ५० घरांचे दोन वर्षांपूर्वी नियमितीकरण झालेले आहे. परंतु घरमालकांच्या प्रॉपर्टी कार्डवर वर्ग -दोन चा शेरा आहे. घर बांधकामासाठी कर्ज काढताना, बँकेला तारण देताना अडचणी उद्भवतात. तो जाऊन वर्ग -एक व्हावा अशी प्रॉपर्टी धारकांची मागणी आहे. याविषयी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठवा. मुंबईत नगर विकास मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक लावू, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.

तसेच काळभैरी मंदिर, गडहिंग्लज येथील फॉरेस्ट खाते जमिनबाबत व धर्मदाय देवस्थान असलेले पश्चिम महाराष्ट्र देवस्थान हस्तक्षेप बंद करणेबाबत झालेल्या बैठकीत अतिरिक्त जागेच्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. गडहिंग्लजच्या काळभैरी देवालयाची नोंद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे झालेली आहे. त्याला गडहिंग्लजकरांची संमती नाही. त्यामुळे याबाबत लवकरच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुनावणी व बैठक घ्यावी, अशा सूचना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिल्या. याचबरोबर सिध्दी हौसिंग सोसायटी, लिंगनूर अ वर्ग मधून ब वर्ग करण्याकरीता रक्कम भरण्यास माफ करुन मिळणेबाबत, गांधीनगर को.ऑ. हौसिंग सोसायटी लि. गडहिंग्लज जि. कोल्हापूर रजिस्टर नं. ६८० स्थापना १९४९ मिळकतीचे वैयक्तिक मिळकत पत्रिका मिळणेबाबत झालेल्या बैठकीत गडहिंग्लज शहरातील गांधीनगर येथील मोजणी होऊन बाह्य हद्दी निश्चित झालेल्या आहेत. येथे आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण करून प्लॉटधारकांना स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. गडहिंग्लज येथील मेटाचा मार्ग आणि दुंडगा मार्ग येथे पाच झोपडपट्टी आहेत, त्यापैकी एक झोपडपट्टी चे नियमितिकरण झाले आहे. तसेच;  १९१ झोपडपट्ट्यांची मोजणी पूर्ण होऊन त्याची माहिती घेतलेली आहे. येत्या सोमवारपर्यंत तातडीने बैठक घेऊन या सर्व झोपडपट्ट्या नियमित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

संकेश्वर ते बांदा हायवे वरील स्ट्रिट लाईटचे बिल कोणाकडून भरणेबाबत बैठक झाली. गिजवणे ता. गडहिंग्लज हे गाव आंबोली -संकेश्वर महामार्गावर येते. या महामार्गावर लागणाऱ्या पथदिव्यांचा वीजबिलाचा खर्च ग्रामपंचायतींवर पडणार आहे. गिजवणे ग्रामपंचायतीचा या गोष्टीला विरोध आहे. तुम्ही या महामार्गावर महामार्गासाठी दिवे लावत आहात. तसेच या ग्रामस्थांनी जोड रस्ते केले नसल्याकडेही लक्ष वेधले. संबंधित विभाग प्रमुखांना नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, तहसिलदार कागल अमर वाकडे, मुख्याधिकारी उपस्थित होते.

००००

पुणे शहरातील पूरग्रस्त भागाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली भेट

पुणे, दि. २९ : पुणे शहरात २५ जुलै रोजी  झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील नदीकाठची कुटुंबे पुराच्या पाण्यामुळे बाधित झाली आहेत. प्रशासनाने पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकर करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी पुणे महानगरपालिकेत आपत्ती निवारण उपाय योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, उपायुक्त महेश पाटील, गणेश सोनुने, माधव जगताप, अनिरुद्ध पावसकर, नंदकिशोर जगताप आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठी राहणाऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरबाधित क्षेत्रातील नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. या भागात स्वच्छता करण्यासोबतच नागरिकांना अन्न, स्वच्छ पाणी देण्याची सोय करावी. या परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करावा. अन्नधान्य खराब झाले असल्यास  धान्य वितरणाची सोय करावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरीता पुराच्या पाण्यात खराब झालेले किंवा वाहून गेलेले दाखले, पुस्तके, वह्या उपलब्ध करून द्यावेत. तसेच विद्यार्थ्यांच्या शाळेत तसे कळवावे.

महापालिकेने बाधित क्षेत्रात पूर्ण वेळ मदत कक्ष सुरू ठेवावा. आपत्ती व्यवस्थापनानुसार मदतीची कार्यवाही तत्काळ होणे गरजेचे आहे. बाधित ठिकाणचा चिखल तात्काळ हटवावा त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करावे. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळण्याची अडचण येत असेल तर टँकरची व्यवस्था करावी. स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गम बुटांचा पुरवठा करावा. ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांना आवश्यक सहकार्य करावे. पुराच्या पाण्यामुळे काही दुकानांचेही नुकसान झाले आहे. त्यांचेही पंचनामे करून नुकसान भरपाईची प्रक्रिया करावी.

लवासामध्येही काही ठिकाणी दरड कोसळून नुकसान झाले आहे. त्याचा अहवाल पीएमआरडीएने सादर करावा. धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता विसर्ग करण्यापूर्वी नागरिकांना पूर्वसूचना देणे गरजेचे आहे. जलसंपदा विभाग, महसूल, महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी समन्वयाने कामे करावीत. नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. रोगराई नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी आयुक्त श्री. भोसले आणि श्री. सोनुने यांनी बाधित क्षेत्रात पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी साधला पाटील इस्टेट येथील बाधित नागरिकांशी संवाद

तत्पूर्वी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाटील इस्टेट मधील बाधित नागरिकांशी संवाद साधून नुकसाणीची माहिती घेतली. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, या ठिकाणी नदीकाठच्या घरांचे नुकसान खूप झाले आहे. येथील बाधित नागरिकांचे पंचनामे लवकर पूर्ण करावेत. नागरिकांचे दाखले, कागदपत्रे लवकर देण्याची कार्यवाही करावी. तसेच महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळण्याकरता प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा उपायुक्त गणेश सोनुने यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

0000

ई-पॉस मशिनबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या सूचना

मुंबई, दि. २९ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संकणकीकरण प्रकल्पाची अंमलबजाणी सुरू आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमॅट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरणासाठी रास्तभाव दुकानांमध्ये ४-जी तंत्रज्ञान असलेल्या ई पॉस मशीन बसवण्यात आल्या आहेत. या ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य वितरणामध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने ई-पॉस प्रणालीमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत.

या तांत्रिक अडचणी एनआयसीकडील धान्य वितरण प्रणाली, क्लाऊड सर्व्हरशी संबंधित असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. या तांत्रिक अडचणी दूर करण्यासोबतच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील एकही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. याबाबत युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत असून अडचणी लवकरच दूर होतील अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिली आहे.

000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

राज्यपाल बैस यांना कॉफी टेबल पुस्तक भेट            

मुंबई, दि. २९ : राज्यपालांचे प्रधान सचिव प्रविण दराडे व विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना यांनी राज्यपाल रमेश बैस यांना त्यांच्या महाराष्ट्रातील कार्यकाळातील निवडक कार्यक्रमांची सचित्र माहिती असलेले कॉफी टेबल पुस्तक भेट दिले. पुस्तकाची लिंक https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3c8758b517083196f05ac29810b924aca/uploads/2024/07/202407291715434860.pdf  ही जोडली आहे.

००००

Coffee Table Book presented to the Governor

Mumbai 29 : Principal Secretary to the Governor Pravin Darade accompanied by Special Secretary Vipin Kumar Saxena presented a copy of the Coffee Table book ‘Raj Bhavan Patrika’ to Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai.

 The e-book contains brief reports and photographs of some of the important programmes and functions attended by the Governor in 2023 and 2024. The book can be seen by clicking on the enclosed link.

https://cdnbbsr.s3waas.gov.in/s3c8758b517083196f05ac29810b924aca/uploads/2024/07/202407291715434860.pdf

 

000

जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान; पालकमंत्री रमले शालेय आठवणीत

छत्रपती संभाजीनगर दि.२९ (जिमाका)- मी जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, हे उद्गार आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे. निमित्त होते जिल्हा परिषद शाळेतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन कार्यक्रमाचे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, कुलसचिव डॉ भगवान साखळे, प्रशांत गावंडे, निवृत्त उपजिल्हाधिकारी नामदेव जाधव,श्री भालेराव, प्रगतिशील शेतकरी यज्ञजीत कातबने, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांच्या मातोश्री सुभद्राबाई साबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लता पगारे, निवृत्त शिक्षणाधिकारी भगवानराव तुपे,महापारेषणचे संचालक उत्तमराव झाल्टे, डॉ. पळशीकर,माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर मोठे, भरत राजपूत, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाडे, कृष्णा पाटील डोणगावकर, डॉ. काळे यांच्यासह जिल्हा परिषद शाळेतील माजी मान्यवर विद्यार्थी उपस्थित होते.

प्रास्ताविक जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी केले. तसेच माजी विद्यार्थ्यांच्या ध्वनिचित्रफितीद्वारे मुलाखती दाखवण्यात आल्या.

पालकमंत्री श्री. सत्तार यांनी आपल्या शालेय जीवनातील प्रसंग सांगून आठवणीत रमले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुद्धा आपल्या आठवणी सांगत जिल्हा परिषद शाळांच्या विकासासाठी राबविलेल्या उपक्रमांबाबत उपस्थितांना माहिती दिली. विकास मीना यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

०००००

ज्येष्ठांच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता कर्तव्य अभियान राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार

ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. 29 : – ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या भूमिकेतून आमचे काम सुरु असून येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापन करण्याची घोषणा करून ज्येष्ठांसाठीच्या सर्व योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात याव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित ज्येष्ठ नागरिक धोरणाबाबत बैठकीच्या प्रसंगी ते बोलत होते. बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री( सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, युएनएफपीए संस्थेच्या अनुजा गुलाटी, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्यासह विविध विभागांचे सचिव आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की नुकत्याच झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत विकसित भारत 2047 च्या दृष्टीने नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. सन 2047 पर्यंत भारतात ज्येष्ठांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सोई-सुविधांची वाढणारी गरज लक्षात घेऊन आतापासून तयारी करणे आवश्यक आहे. सध्या शासनाने ज्येष्ठांसाठी वयोश्री योजना सुरु केली या माध्यमातून थेट डीबीटीद्वारे लाभाचे वितरण करण्यात येत आहे. सोबतच एसटी प्रवास सवलत देण्यात आली आहे. येत्या काळात प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्राची निर्मिती करण्यात येईल. या केंद्राद्वारे ज्येष्ठ नागरिकांसाठी डिमेंशिया, अल्जायमर या आजाराबाबत सहायता उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच ज्येष्ठांचे सेल्फ हेल्प ग्रुप तयार करुन ज्येष्ठांसाठी ज्येष्ठ अशा संकल्पनेतून मदत द्यावी, यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

पुढे मुख्यमंत्री यांनी सांगितले, ज्येष्ठांसाठी आवश्यक असणारे इन्फ्लुएन्जा, न्युमोनिया या लसींच्या लसीकरणासाठी सुरुवातीला मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पायलट प्रोजेक्ट राबवावा. त्यानंतर राज्यभरात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून या लसी उपलब्ध करुन देण्यात याव्यात. ज्येष्ठांच्या दारापर्यंत आरोग्य सुविधा नेण्यासाठी लवकरच हॉस्पिटल ऑन व्हील्स संकल्पना राबविण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. रेल्वे प्रवासात ज्येष्ठांना देण्यात येणारी सवलत पुन्हा सुरु करण्यासाठी आणि व्हीलचेअरसह इतर आवश्यक साहित्यांवरील आणि उपचारांच्या बिलावरील जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र शासनाला पत्राद्वारे विनंती करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपले विचार व्यक्त केले.

0000

विटा शहर पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि.२९ :- सांगली जिल्ह्यातील विटा शहर नळ पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

या योजने संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह बैठक झाली. बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, सांगली जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर तसेच अमोल बाबर, तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ के. एच. गोविंदराज आणि विविध विभागांचे सचिव, वरिष्ठाधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या योजनेला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. तसेच पाणी उपलब्धतेसह अनुषांगिक तांत्रिक बाबी आदी प्राधान्याने पूर्ण करून घेण्यात याव्यात आणि योजना मार्गी लागेल यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश दिले.

राज्यस्तरीय नगरोत्थान महाअभियानांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार आहे. सुमारे ८७ कोटी १८ लाख रुपये खर्चाच्या या योजनेत कृष्णा नदीवरून आणि टेंभू उपसा जलसिंचन योजनेतील ओझर तलाव येथून असे दोन स्त्रोत असणार आहेत. योजनेत पहिल्या टप्प्यात २०२५ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून ४. ६९ दलघमी पाणी उपलब्ध करून घेतले जाणार आहे. यातून विटा शहराची दैनंदिन १२. ८६ द.ल.लीटर पाण्याची गरज भागविता येणार आहे.
विटा शहराची २०५५ पर्यंतची १ लाख चार हजार ३३५ ही लोकसंख्या गृहीत धरून या योजनेचा आराखडा तयार केला गेला आहे.

00

मुख्यमंत्र्यांनी घेतले दिव्यांग कल्याणाचे निर्णय

  • दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षांचे वाटप

  • कर्ज मर्यादा ५० हजारांवरून अडीच लाख करणार

मुंबई, दि.२९ : राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता यासर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज येथे दिले. दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम अडीच लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग कल्याण महामंडळाची बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर आदी उपस्थित होते.

दिव्यांग महामंडळाला ५०० कोटी रुपयांचे भागभांडवल असून दिव्यांग बांधवांसाठी कर्ज देण्याची मर्यादा ५० हजार रुपये आहे ती वाढवून अडीच लाख रुपये करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. त्यांना रोजगार स्वयंरोजगासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने करावी जेणे करून दिव्यांग बांधवांना रोजगाराची संधी मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली वसतीगृहाची सोय, प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता मिळावी यासाठी पुनर्वसन केंद्र तयार करण्यात यावे. प्रत्येक महापालिकेमध्ये असे केंद्र तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

केंद्र सरकारच्या योजनांचा राज्यातील दिव्यांगांना जास्तीतजास्त लाभ मिळेल यासाठी विभागाने आणि महामंडळाने प्रयत्न करावे. कर्ज वाटप प्रक्रीया फास्ट ट्रॅकवर आणावी त्यासठी मोबाईल ॲप, हेल्पलाईन यासारख्या तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. दिव्यांगांना उच्च शिक्षणासाठीची कर्ज योजना आहे त्याबाबत जाणीवजागृती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

गेल्या वर्षी महामंडळामार्फत बॅटरीवर चालणाऱ्या ७९७ रिक्षा दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी ६०० रिक्षांचे वाटप करण्यात आले असून यावर्षी देखील ६६७ रिक्षा खरेदी करण्यासाठी आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. १०० टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना रिक्षा वाटपासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे श्री. भांगे यांनी सांगितले.

००००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेत सहभागासाठी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

मुंबई दि. २९ : राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे प्रारंभीक टप्प्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना आयोजित करण्यात आली आहे. या योजनेसाठी रु.१०० कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून, सुमारे ५०० स्टार्टअप्सना रू १ लाख ते रू २५ लाखपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येईल तरी या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील इच्छुक महिला स्टार्टअप्सनी ५ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील होतकरू महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे, राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करणेसाठी एक वेळेस अर्थ सहाय्य करणे, राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे व देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) मान्यताप्राप्त महाराष्ट्रातील स्टार्टअप असावेत , महिला संस्थापक यांचा किमान ५१ % वाटा असावा,कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयांतर्गत ३० जून २०२३ पूर्वीची नोंदणी आवश्यक,वार्षिक उलाढाल १० लाख ते १ कोटी पर्यंत असावी ,आश्वासक, नाविन्यपूर्ण,प्रभावी व रोजगार निर्मिती करणाऱ्या स्टार्टअप्सना प्राधान्य,राज्य शासनाच्या इतर योजनेतील अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा हे या योजनेचे पात्रता निकष आहेत. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. सहभागासाठी अर्ज करण्याची मुदत ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत आहे.

महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक औद्योगिकता असलेले राज्य आहे . औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी, नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी अंतर्गत इनक्यूबेटर्सची स्थापना, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर यांसारख्या अनेक कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेतही महिलांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

0
नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे...

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....