सोमवार, जुलै 21, 2025
Home Blog Page 640

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाचा शुभारंभ

सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

ठाणे,14(जिमाका)-  राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावावीत, असे निर्देश दिले असून त्याप्रमाणे सर्व महापालिका वृक्षारोपण करीत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे, ही भविष्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी केले.

‘एक पेड  माँ के नाम’  या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे एक झाड लावावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले.

ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुख्यमंत्री हरित ठाणे एक लक्ष वृक्ष लागवड’ या अभियानांतर्गत ‘एक पेड  माँ के नाम’  या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, लोकमान्य नगर येथे वृक्षारोपण करून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त शंकर पाटोळे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक उदय ढगे, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे, एकनाथ भोईर, दिगंबर ठाकूर, विहंग सरनाईक, माजी नगरसेविका राधाबाई जाधवर, आशा डोंगरे, वनिता घोगरे, प्राजक्ता खाडे, वृक्ष प्राधिकरण समितीच्या माजी सदस्य नम्रता भोसले तसेच ग्रीन यात्राचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्व महापालिकांनी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला असून आतापर्यंत ठाणे महापालिकेने सर्वाधिक म्हणजे ६१ हजार झाडे लावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरभ राव यांचे विशेष अभिनंदन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात जाहीर केलेल्या “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असून महिलांसाठी ही योजना सुरू केल्याबद्दल लोकमान्य नगरमधील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

कल्याणकारी योजनांद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्यावर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 मुंबई, दि.१४ : राज्य विविध क्षेत्रात अग्रेसर असून विविध कल्याणकारी योजनांद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लोकशाही या वृत्तवाहिनीच्या संवाद २०२४ या कार्यक्रमात मुलाखतीत दरम्यान ते बोलत होते. लोकशाही वृत्त वाहिनीचे गणेश नायडू यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांनमध्ये सुटसुटीतपणा आणून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी प्रक्रिया सुकर करण्यात आली आहे. राज्यातील पात्र महिलांना  स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्या महिलांना लाभ मिळणार आहे. उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. लवकरच दोन महिन्याचे पैसे बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – २०२४” शासनाने लागू केली आहे. त्यामुळे आता ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या सर्व योजनांची सविस्तर माहिती यावेळी त्यांनी सांगितली. माध्यमांनी शासनाच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी जेणेकरून जनतेला त्याचा लाभ घेता येईल.

गणेशोत्सव पर्यावरण पुरक पद्धतीने व शांततेत साजरा करावे. ग्लोबल वार्मिंगचा धोका निर्माण होवू नये म्हणून सर्वांनी वृक्षारोपण करावे. बांबू लागवडीसाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राज्यात मोठे उद्योग येत आहेत. त्यांच्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहेत. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. आरक्षणाबाबत शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

00000000

राजू धोत्रे/विसंअ

 

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध

मुंबई, दि.१४ :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील प्रवेशपात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे आयोगाने कळविले आहे.
प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व/अथवा ०२२६९१२३९१४ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल असे आयोगाने कळविले आहे.
0000

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई,दि.१४  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  योजनेचा  लाभ देण्यासाठी  बँकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक झाली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनूपकुमार यादव,आयुक्तडॉ.प्रशांत नारनवरे, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्यात  आतापर्यत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. अजूनही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पात्र महिलेचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे. असेही तटकरे यांनी  यावेळी सांगितले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

विविध योजना व उपक्रमांनी महसूल पंधरवडा साजरा

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि .१४:–नागरिकांमध्ये महसूल विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाबाबत जागरूकता वाढावी, महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचाव्या,  शासनाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी  महसूल दिन व १  ते १५ ऑगस्ट, २०२४ कालावधीत महसूल पंधरवडा करून विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना मुंबई शहर जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा आरंभ

महसूल पंधरवडा कालावधीत महाराष्ट्र विधानसभे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर  यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा आरंभ करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान पात्र लाभार्थी यांना उत्पन्न दाखला व विशेष कार्यकारी अधिकारी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी  संजय यादव,  अपर जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी व महसूल अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.

२ ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” उपक्रमाची माहिती जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्री. संदिप गायकवाड यांना दिली. उपस्थित विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी यांना योजनेची व्याप्ती व अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली. याबाबतची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया व प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणेबाबत सुचना देण्यात आल्या. “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” याबाबत  जेष्ठ नागरिकांना प्रसिद्ध तीर्थस्थळांना भेटी देण्यासाठी राज्यातील सर्व धर्मातील वयोवृद्धांसाठी योजना लागू असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनात ३ ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ४ ऑगस्ट रोजी कार्यालयात स्वच्छतेची विशेष मोहिम राबविण्यात आली.  कार्यालयातील अभिलेखांचे व्यवस्थापन कामे करण्यात आली.

तर “जमिन विषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन” कार्यक्रमाचे आयोजन ५ ऑगस्ट रोजी करण्यात आले. यावेळी नागरिकांना मुंबई शहरातील शासकीय भाडेपट्टा करिता भोगवटदार वर्ग १ च्या हस्तांतरण बाबत राबविण्यात येणाऱ्या प्रकियेची माहिती नगर भूमापन व भूमि अभिलेख शाखेमार्फत देण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबई शहरातील जमीन विषयक प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले.

6 ऑगस्ट रोजी “पाऊस आणि दाखले” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय हवामान विभाग कुलाबा येथील अतिरिक्त महासंचालक सुनिल कांबळे यांचे पर्जन्यमान व इतर हवामान घटकांविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले. पाऊस व इतर हवामानाचे अंदाज कशाप्रकारे व्यक्त केले जातात याबाबत माहिती दृक श्राव्य माध्यमातून देण्यात आली. तसेच मुंबईतील हवामान परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.

७ ऑगस्ट रोजी “युवा संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  महसूल अधिकारी यांनी प्रत्यक्ष जयहिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज, एसएनडीटी कॉलेज, केसी कॉलेज इत्यादी महाविद्यालयांना भेटी देऊन युवकांशी संवाद साधला. ८ ऑगस्ट रोजी “महसूल जन संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन, ९ ऑगस्ट रोजी “महसूल ई-प्रणाली” बाबत, ११ ऑगस्ट रोजी “आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन” करण्यात आले.

दिव्यांग मासिक अनुदान प्रमाणपत्रे वितरण

१२ ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा – दिव्यांगांच्या कल्याणाचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याबाबत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिव्यांग व्यक्तीकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमाबाबत माहिती दिली. ८ लाभार्थ्यांना मासिक अनुदान प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.१३ रोजी “कार्यरत व सेवानिवृत्त महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद”तर १४ ऑगस्ट रोजी ” महसूल पंधरवडा वार्तालाप” दिन झाला.तसेच १५ ऑगस्ट रोजी ” महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण” व महसूल पंधरवडा सांगता समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

००००००

किरण वाघ/विसंअ

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना संबंधित घटकांपर्यंत पोहोचवून महिलांना, वंचित-उपेक्षितांना आत्मसन्मान मिळवून देण्यात सहभागी व्हा! – उपमुख्यमंत्री अजित पवार

 मुंबई, दि. १४ :- भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना, क्रांतीकारकांना, हौतात्म्य पत्करलेल्या शहिद वीरांना, अभिवादन केले आहे. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी वचनबद्ध होऊया, सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्य-जबाबदारीच्या भावनेतून राष्ट्रविकासात योगदान देऊया, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केले आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणतात की, स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी सर्वात मोठा राष्ट्रीय उत्सव आहे. हा उत्सव तितक्याच उत्साहात, आनंदात, व्यापक स्वरुपात साजरा करायचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या ‘हर घर तिरंगा..’ अभियानाने याची सुरुवात झाली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आपण दृढसंकल्प करुया की, राष्ट्रविकासात सर्वांना सोबत घेऊन जाताना शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक यांना प्रगतीची योग्य संधी उपलब्ध करून द्यायची आहे. त्यांचे आर्थिक-सामाजिक सक्षमीकरण करायचे आहे. देशाला आत्मनिर्भर बनवताना महिलांना, वंचितांना, उपेक्षितांना, अल्पसंख्याकांना समाजात मान, सन्मान, आदर, प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे. पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपये अर्थसहाय्य देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वर्षाला तीन गॅस सिलिंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, पिंक ई-रिक्षा योजना, शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला मोफत वीज देणारी बळीराजा वीजसवलत योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, युवकांना विद्यावेतन देणारी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक पर्यटनासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा विविध महत्त्वाकांक्षी योजना संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

देशाचे स्वातंत्र्य, एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मूल्ये अबाधित राखणे, भारतीय राज्यघटनेवरचा विश्वास अधिक दृढ करणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी आजवर सर्वोच्च त्याग केला, अमूल्य योगदान दिले. त्या सर्वांबद्दल आपण कायम कृतज्ञ असले पाहिजे. देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन देशाला समृद्ध, बलशाली देश बनवण्याचा निर्धार करुया, असेही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त संदेशात केले आहे.

००००

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ‘इको बाप्पा मोबाईल ॲप’चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील विविध जनजागृती उपक्रमांचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाला.

पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची, सजावटीची व आभूषणांची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांनी  इको बाप्पा हे मोबाईल ॲप विकसित केले असून याचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणाऱ्या कारखानदारांची ठिकाणे उपलब्ध होणार असून यामुळे पर्यावरणपूरक मूर्ती नागरिकांना खरेदी करणे सहज शक्य होणार आहे. ‘इको बाप्पा’ हा ॲप मोबाईल प्लेस्टोर मधून विनामूल्य डाऊनलोड करता येणार असून यामध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची खरेदी, आभूषणे, सजावटीचे साहित्य व विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची माहिती उपलब्ध होणार आहे.

मंडळाने या वर्षीच्या पर्यावरणपूरक उत्सवाला चालना देण्यासाठी शहाणपण देगा देवा या संकल्पनेतून रेडिओ जिंगल्स्, व्हिडिओज् तयार केले असून एक लहान बालक पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा अभिनव संदेश यात देत आहे. याचा देखील आरंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, म.प्र.नि.मंडळाचे सदस्य सचिव डॉ.अविनाश ढाकणे हे उपस्थित होते तर विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त  जिल्हाधिकारी  दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका यांच्या आयुक्त व मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी व्यापक जनाजगृती व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

सह‌्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

हेंमतकुमार चव्हाण/विसंअ

 

पारशी नववर्षानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई, दि. 14 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पारशी नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

नवरोज हा नूतन वर्षाचा पहिला दिवस उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती या त्रिसूत्रीचे स्मरण देतो. मी राज्यातील जनतेला आणि विशेषतः पारशी बंधू – भगिनींना नवरोझ तसेच पारशी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

००००

Governor greets people on Parsi New Year

Mumbai Dated 14 : Governor C P Radhakrishnan   has greeted the people of Maharashtra on the occasion of Parsi New Year.

In his message, the Governor has said:

“Navroz which marks the first day of the Parsi New Year, reminds us of the immortal message of Good thoughts, good words and good deeds. I extend my heartiest greetings to the people of the State, especially to our Parsi sisters and brothers, on the occasion of Navroz and the Parsi New Year. May the New Year bring happiness, contentment, good health and prosperity to all.

0000

 

एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित सामाजिक नेतृत्व विकास कार्यशाळेचा राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत समारोप

जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय ठरवून प्रयत्न करा- राज्यपाल

पुणे, दि. १४: जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करुन ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. अपयशाच्या वेळी  निराश न होता कसोशीने प्रयत्न केल्यास यश नक्की तुमचेच आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे येथे आयोजित सामाजिक नेतृत्व विकास कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात राज्यपाल  बोलत होते. यावेळी आयर्नमॅन मेजर जनरल विक्रम देव डोगरा, विद्यापीठाचे संस्थापक तथा अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, कुलगुरू डॉ. रवी चिटणीस आदी उपस्थित होते.

सामाजिक नेतृत्व विकास कार्यशाळा विद्यार्थ्यांमध्ये अनुकूल परिवर्तन घडवून आणण्याचे उत्तम माध्यम असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, युवकांनी आयुष्यात ध्येय निश्चित करावे आणि त्याकडे सुसंगत वेगाने जावे. कधीही हार मानू नका, जे प्रयत्न सोडतात त्यांना यश मिळत नाही.  जीवनात यशस्वी व्यक्तीमत्त्वाचा आदर्श पुढे ठेऊन वाटचाल केल्यास यश नक्कीच मिळेल.

ते म्हणाले, विद्यापीठातील शैक्षणिक सोयीसुविधांचा वापर करून, खूप शिक्षण घ्या. विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर आपल्याला लोकांची मदत करायची आहे, या भावनेने वाटचाल करा. भ्रष्टाचार हा कर्करोगासारखा असून आपल्या विकासात खूप मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला मुळापासून काढून फेकण्यासाठी कार्य करायचे आहे असे ध्येय मनाशी बाळगून वाटचाल करा. आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ठेवा, प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची जिज्ञासा ठेवा, इतरांचे ऐकून घेण्यासाठी कायम संयम ठेवावा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्याला भविष्यात देशाचे नेतृत्व करायचे आहे हे लक्षात ठेऊन विद्यापीठीय अभ्यासक्रमासोबतच आजूबाजूच्या चांगल्या गोष्टींचे शिक्षण घेऊन वाटचाल करावी. स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वाचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल केल्यास, आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि यशस्वी व्हाल, असेही ते म्हणाले.

विक्रम देव डोगरा म्हणाले, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात कुठेतरी अपयश येऊन गेलेले असते. त्यामुळे अपयशाला घाबरू नये. आपल्याला यशस्वी व्हायचे आहे, याचे उद्दिष्ट समोर ठेऊन प्रयत्न करा. त्यानंतर तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.

राहुल कराड यांनी सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रमाची माहिती देऊन विद्यापीठाच्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती दिली. कुलगुरू डॉ. चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यापीठात नव्यानेच प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.
0000

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही टोलमाफी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
  • राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा; कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी
  • गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत

मुंबई, दि.१४ : राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश देऊन गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, उर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे आदी यावेळी उपस्थित होते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती ती यावर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी य़ोजना राबवावी. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञनाच्या वापराने बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत.

महापालिकांनी गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्निशमन वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सर्वंत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांनी देखील सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मुर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन मुख्यमंत्री. श्री. शिंदे यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस प्रमुख तसेच विविध गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना ‘हर घर तिरंगा’ मोहिम यशस्वी करण्याचे आवाहनही केले. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, सार्वजनिक गणेशोत्सव एकत्रित, मूर्तीकारांचे प्रतिनिधी, पर्यावरणपूरक सजावट उत्सवी संस्थेचे शाम शेंडकर आदी उपस्थित होते.

००००

ताज्या बातम्या

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

0
रायगड जिमाका दि.२०: आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे अमरावती विभागातील गरजूंना ६ कोटी ८२ लाखांची मदत राज्यभरासह अमरावती विभागातील गरजू रुग्णांना अडचणींच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुख्यमंत्री वैद्यकीय...

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. २०: आगामी जानेवारीमध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६'च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत असून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने...

कामगार विमा योजनेतील रुग्णालयांबाबत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

0
मुंबई, दि.20 :  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत...

विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

0
नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे...