रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 636

कोराडी येथील क्रिडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तिरंगा रॅलीद्वारे कोराडी येथे देशभक्तीचा जागर

नागपूर,दि. 15 :  क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी, त्यांना सरावासाठी चांगले क्रिडांगण मिळावेत, कुशल मार्गदर्शक मिळावेत यादृष्टीने आपण क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले आहे. यातूनच आपण अखिल भारतीय पातळीवर नावाजला जाईल व जागतिक पातळीवरची गुणवत्ता असेल अशा स्वरुपातील एक भक्कम क्रीडा संकुल मानकापूर येथे साकारले आहे. त्याच्या खालोखाल जिल्हा पातळीवरील क्रिडांगणाची गुणवत्ता व सेवासुविधा असलेले क्रिडांगण आपण कोराडीला साकारुन दाखविले आहे. येथील परिपूर्ण सुविधा खेळाडूंना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

कोराडी येथील तालुका क्रीडा संकुल सुविधांचे लोकार्पण व ‘घरोघरी तिरंगा’ अंतर्गत आयोजित भव्य तिरंगा रॅलीच्या सोहळयात ते बोलत होते. कोराडी येथील या तालुका क्रीडा संकुलाला वीरांगना राणी अवंतीबाई असे नामकरण या समारंभात करण्यात आले.

यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, बबनराव तायवाडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अमृत काळातील आपण तिसरा स्वातंत्र्य उत्सव साजरा करीत आहोत. या देशातील गोरगरीब, प्रत्येक जाती धर्मातील व्यक्तींच्या विकासाची संकल्पना आपण स्वीकारली आहे. हा अमृत महोत्सव आपण अधिक भक्कमपणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेच्या भक्कम पायावर साजरा करीत आहोत. आपल्या शेजारचे देश लडखडत असताना  आपली संयमी प्रगती आणि वाटचाल आपल्या राज्यघटनेने दिलेल्या मौलिक मूल्यांमुळेच सुरु असल्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कोराडी येथील वीरांगना राणी अवंतीबाई तालुका क्रीडा संकुलात बॉक्सिंग, टेबल टेनिस, फेन्सिंग, कुस्ती, जिम्नॅस्टिक, बॅलन्सिंग बिम, ट्रायो ॲक्रोबॅटिक्स, रोमन रिंग, योगा आदी विविध प्रकारच्या खेळांच्या सुविधा उपलब्ध आहेत.

जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री अतुल सावे

स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जालना, दि. १५ (जिमाका):  जालना जिल्हा विविध क्षेत्रात प्रगती करीत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही गृहनिर्माण व इतर मागास बहुजण कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली.

स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्यास खासदार कल्याण काळे, आमदार राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायळ  तसेच स्वातंत्र्य सैनिक, प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, नागरिक आदी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. पोलीस वाद्यवृंदाच्या सुरावटीवर राष्ट्रगीत व त्यानंतर राज्यगीत सादर झाले.  त्यानंतर पालकमंत्र्यांनी शुभेच्छा संदेश दिला. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना, हुतात्म्यांना आणि आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांना अभिवादन केले.

पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, जनतेच्या हितासाठी राज्य शासन अनेक लोकोपयोगी योजना प्रभावीपणे राबवित आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी शासनाने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. मुलींना मोफत शिक्षण देण्यासाठी शासनाने यावर्षीपासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषिविषयक, सर्व व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित ८ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100 टक्के सवलत दिली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत राज्यातील 44 लाख 6 हजार शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज पुरवली जाणार आहे. त्यासाठी 14 हजार 761 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे. युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’  सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे  उमेदवारांना शासकीय, निमशासकीय, महामंडळे, खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योग या ठिकाणी प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा. सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा पुरेशी माहिती नसल्याने तीर्थ यात्रा करण्याचे राहून जाते. ही बाब लक्षात घेऊन  राज्यातील 60 वर्ष व त्यावरील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील मोठ्या तीर्थ स्थळांचे दर्शन घेता येणार आहे. तसेच वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी शासनाकडून ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. वयोमानामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तसेच आवश्यक साधने खरेदी करण्याकरिता ज्येष्ठ नागरिकांना मदत व्हावी हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमार्फत शासनाकडून ३ हजार  रुपये ज्येष्ठ नागरिकांना दिले जाणार आहेत. राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’ योजनेतंर्गत जिल्ह्यातील उज्वला योजनेचे लाभार्थी तसेच मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या सर्व योजनांचा जनतेने आवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी  केले.

पालकमंत्री श्री. सावे म्हणाले की, महसूल विभागाच्यावतीने महसूल पंधरवाड्याचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले आहे. या काळात जिल्ह्यात अनेक लोकोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन या सर्व योजनांची जनजागृती तसेच स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, सैनिक हो तुमच्यासाठी, एक हात मदतीचा-दिव्यांग कल्याणाचा, महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी संवाद असे उपक्रम आणि महसूल विभागाशी संबंधित लोकाभिमुख घटक गाव पातळीपर्यंत प्रभावीपणे राबविण्याकरीता तालुकास्तरावर विशेष मोहिम राबविण्यात आली. याशिवाय जिल्हा प्रशासनाने महसुली वर्षात 4 लाख 16 हजार विविध प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. यात वय, अधिवास, शेती प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी, उत्पन्न, नॉन क्रिमिलेअरसह इतर प्रमाणपत्रांचा समावेश आहे. आनंदाची बाब म्हणजे प्रशासनाने जिल्ह्यात 122  तलाठी आणि 71 कोतवाल पदांची पदभरतीही केली आहे.

सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरु केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल योजना सुरु करुन या योजनेतंर्गत जिल्हयातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या सुमारे 7 हजार 286 लाभार्थींसाठी घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैयक्तिक घरकुल योजनेतंर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या सुमारे 6 हजार 943 लाभार्थींसाठी घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.  तर रमाई आवास योजनेतंर्गत ग्रामीण क्षेत्रासाठी  6 हजार 842 तर शहरी क्षेत्रासाठी 541 घरकुलांच्या उद्दिष्ट मंजुरीसाठी शासनास शिफारस करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या जिल्ह्यात नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी व स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हा गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून सुमारे 39 उद्योगांसमवेत तब्बल एक हजार 316 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असे सांगून  ते म्हणाले की, उद्योग विभागातंर्गत ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने’च्या माध्यमातून मागील वर्षी 358 नवीन उद्योग उभे राहिले असून याद्वारे अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे. पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात नोंदणी करण्यात आलेल्या कारागिरांपैकी 3 हजार 589 कारागिरांना मान्यता देण्यात आली आहे. तर 1 हजार 284 जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पालकमंत्री श्री. सावे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य जनतेने सण उत्साहात साजरे करावेत यासाठी ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात येतो. यावेळी देखील गौरी गणपती सणानिमित्त आपल्या जिल्ह्यातील तीन लाख 73 हजार लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रातून या वर्षी जुलै अखेरपर्यंत गरीब व गरजू व्यक्तींना 10 लाख 56 हजार एवढया थाळींचे वितरण करण्यात आले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे चार हजार 481 लाभार्थ्यांना बँक कर्ज मंजूर झाले आहे. सुमारे 518 कोटी रुपये इतके कर्ज वितरीत करण्यात आले असून महामंडळाकडून आजपर्यंत रुपये 37 कोटी इतका व्याज परतावा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा अधिक चांगल्या व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यावर सातत्याने भर देण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी  जिल्हा नियोजन समितीमधून 48 चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. तसेच निर्भया पथकास महिलांच्या सुरक्षेच्या हेतूने 10 स्कुटर तर 5 मोटरसायकल खरेदी करण्यात आल्या आहेत. क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल अद्यावतपणे विकसीत करण्यात येत आहे.   जिल्हा क्रीडा संकुलात सध्या सुरु असलेली कामे पूर्णत्वाकडे आहे.  लवकरच या कामांचा लोकार्पण सोहळा करण्यात येऊन सर्व क्रीडा सुविधा खेळाडुंना उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

जालना जिल्ह्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत पावसाच प्रमाण चांगले आहे, असे सांगून ते म्हणाले की, चालू खरीप हंगामामध्ये 100 टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.  पिकांची स्थितीही उत्तम आहे. पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी शासन व प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना अंतर्गत नळ योजना दुरुस्तीच्या मंजूर करण्यात आलेल्या 102 उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. तसेच तात्पुरती पुरक नळ योजनेच्या मंजूर करण्यात आलेल्या 16 पैकी 15 उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांकडून फक्त एक रुपया विमा हप्ता भरुन विमा काढला जातो. या योजने अंतर्गत चालू खरीप हंगामात 9 लक्ष शेतकऱ्यांनी 5 लक्ष हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. मागील वर्षी पिक विमा अंतर्गत 5 लाख 88 हजार  शेतकऱ्यांना 247 कोटी रक्कम वितरीत करण्यात आली होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारी शेती म्हणून रेशीम शेतीकडे पाहिल्या जाते. जालना जिल्हयात सद्यस्थितीत एक हजार शेतकऱ्यांनी सुमारे एक हजार 88 एकर क्षेत्रामध्ये तुतीची लागवड केली आहे. चालू वर्षात जिल्ह्यात 56 हजार अंडीपुंजांचे वाटप करण्यात आले असून 33 मेट्रीक टन रेशीम कोषांचे उत्पादन झाले आहे. जालना येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲटोमॅटीक रिलींग मशीनची उभारणी करण्यात आली असून याद्वारे जागतिक स्तरावरील उत्कृष्ट दर्जाच्या रेशमाची निर्मिती जिल्ह्यात करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे रेशीम अंडीपुंज ते रेशीम धागा निर्मितीपर्यंतची प्रक्रिया असलेला आपला जालना हा राज्यात एकमेव जिल्हा ठरला आहे.

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध व्यक्तींना व विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, शहीदाच्या वीरपत्नी, आई-वडिलांचा सन्मान, उत्कृष्ट कार्याबद्दल पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

०००

पालकमंत्री अतुल सावे यांनी केली  जिल्हा क्रीडा संकुलातील कामांची पाहणी

जालना, दि. १५ (जिमाका) : राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलातील लॉन टेनिस मैदानासह इतर कामांची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. तसेच जिल्हा क्रीडा संकुलावर करण्यात येणाऱ्या मैदानाची कामे गुणवत्तापूर्ण तसेच लवकरात लवकर पूर्ण करावेत, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पालकमंत्री श्री. सावे यांना कामांच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता स्मिता पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

०००

पोलिस मुख्यालयातील कामांचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते लोकार्पण

जालना, दि. १५ (जिमाका) : जालना पोलिस मुख्यालयाच्या आतील व कवायत  मैदान नुतनीकरण तसेच विद्युत पथदिवे या कामाचे लोकार्पण राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज पोलिस कवायत मैदानावर पार पडले.

यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

०००

 

 

 

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाधिक वेळ द्या – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

महसूल पंधरवड्याची सांगता; उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान

नागपूर, दि. १५ –  सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि शेतमजूर यांचा त्यांच्या दैनंदिन कामकाज व विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल कार्यालयाशी नियमित संबंध येतो. शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांसाठी ॲक्सेसिबल अर्थात अधिकाधिक उपलब्ध राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे केल्या.

दि. 1 ऑगस्टपासून सुरू झालेल्या महसूल पंधरवडा सांगता समारोप कार्यक्रमाचे आयोजन नवीन नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती बिदरी बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह जिल्ह्यातील महसूल यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी, महसूल संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी गेल्या वर्षभरात महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला.

समारोपप्रसंगी श्रीमती बिदरी पुढे म्हणाल्या की, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. त्यामुळे या विभागाचे प्रशासनात अनन्यसाधारण महत्व आहे. नागरिक मोठ्या अपेक्षेने आपल्या समस्या सोडविण्यासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे येतात. ही जबाबदारी ओळखून अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक कामकाज करीत सर्वसामान्य नागरिकांसाठी अधिकाधिक उपलब्ध राहण्याची व गरजेनुसार तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. ई-पंचनामा हा प्रयोग विभाग स्तरावर यशस्वी ठरला असून राज्य स्तरावर या प्रयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. परिणामकारक तंत्रज्ञानाचा वापर महसूल यंत्रणेत होण्याची गरज असल्याचे श्रीमती बिदरी म्हणाल्या.

जिल्हाधिकारी म्हणाले की, महसूल पंधरवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री, मुख्यमंत्री तीर्थदर्शन तसेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अधिकाधिक लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. येत्या काळातही नागरिकांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

तत्पूर्वी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हा खनिकर्म विभागाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

जिल्हा नियोजन विभागाच्या आयपास तंत्रज्ञानाच्या धर्तीवर खनिकर्म विभागासाठी महाराष्ट्रात प्रथमच नागपूर जिल्ह्यात I-DMFMS  प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीसोबतच जिल्हा खनिकर्म विभागाच्या स्वतंत्र वेबसाईटचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.  जिल्हा खनिज विभागाविषयीची अधिक माहिती WWW.DMFNAGPUR.IN या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

ई समाधान प्रणालीचे उद्घाटन

            विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि जिल्हाधिकारी डॅा. विपीन इनटकर यांच्या हस्ते ई समाधान प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. व्हीएनआयटीसोबत मिळून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. प्रत्येक कार्यालयामध्ये ही प्रणाली बसविण्यात येणार येणार आहे. या माध्यमातून कार्यालयीन समन्वय साधत कामकाज सुकर होण्यास मदत होणार आहे

                                                                        *****

सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला शासनाची गती – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात

अमरावती, दि. 15 (जिमाका) : स्वातंत्र्य व लोकशाहीच्या मूल्यांची जोपासना करतानाच समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी विविध योजना व उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे शासन, प्रशासनाचे कर्तव्य असते. त्यानुसार लोकाभिमुख योजना निर्माण करुन त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध विभाग कार्यरत आहेत. शासन-प्रशासन, संस्था व नागरिकांच्या सर्वंकष प्रयत्नांनी आपण सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहोत. समाजातील वंचित, गरीब, अनाथ, दिव्यांग, जेष्ठ नागरिक, महिला या सर्वांच्या विकासासाठी सर्वसमावेशक विकास प्रक्रियेला शासनाने गती दिली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडेय, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार, उपायुक्त गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त भूसुधार श्यामकांत मस्के, सहायक आयुक्त वैशाली पाथरे आधी मान्यवर उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर 77 वर्षाचा मोठा प्रवास देशाने केला आहे. स्वातंत्र्याबरोबरच या देशात राज्यघटनेव्दारा न्याय, समता, बंधुता, एकता व एकात्मता ही मुल्ये रुजून लोकशाही प्रस्थापित झाली आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ तसेच देशभक्तीचे जाज्वल्य तेवत ठेवण्यासाठी यंदाही देशभर ‘हर घर तिरंगा’ अभियान दि. 9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात आले. यामुळे देशभक्तीपर आणि चैतन्यमय वातावरण सर्वत्र निर्माण झाले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आणि सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेला देण्यासाठी राज्यात विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

नुकतीच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली असून, या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य लाभणार आहे. राज्य शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने नाव नोंदणी केली जात आहे. तसेच जिल्ह्यातील महिलांना योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी 24/7 तास मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये जवळपास 2 हजार महिलांच्या फोनव्दारे समस्या सोडविल्या. असा मदत कक्ष स्थापन करणारा अमरावती हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यात आजपावेतो 4 लक्ष 150 महिलांची नोंदणी झाली आहे. आतापर्यंत सुमारे 3 लक्ष 80 हजार अर्जांना मंजूरी देण्यात आली आहे. या भगिनींना रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पहिला आणि दुसऱ्या हप्त्याचा लाभ एकत्रितरित्या देण्यात येणार आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ‘लेक लाडकी’ या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत महिला बाल विकास विभागामार्फत सुमारे 1 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. उर्वरित लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कार्य सुरु आहे.

युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. या क्रांतीकारी निर्णयाची अंमलबजावणी चालू वर्ष सन 2024-25 पासून करण्यात येणार आहे.

तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जेष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ व ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची आणि दर्शनाची संधी देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरु आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साधने खरेदी करण्यासाठी सहाय्य करण्यात येत आहे. श्रवणयंत्र, चष्मा, ट्रायपॉट, स्टीक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची आदी उपकरणे खरेदी करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यात तीन हजार रुपयापर्यंतचे डीबीटी प्रणालीव्दारे रक्कम जमा करण्यात येत आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 408 अर्ज प्राप्त झाले असून लाभार्थ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या हाताला काम मिळावे यासाठी 24 तृतीयपंथीयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झेरॉक्स मशीन व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे.

राज्य शासन एका क्रांतिकारी निर्णयाद्वारे ‘मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना’ या वर्षीपासून राबवित आहे. या योजनेंतर्गत मेडीकल, इंजिनिअरींगसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क रक्कमेच्या 50 टक्के ऐवजी 100 टक्के शुल्क माफिचा लाभ मंजूर करण्यात येत आहे.

अमरावती येथून विमानसेवा सुरु होण्याच्या दृष्टीने बेलोरा विमानतळाचे काम गतीने सुरु असून विमानतळ इमारत, रनवेचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच रात्रीच्यावेळी विमाने उतरविण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येत आहे. लवकरच अमरावतीकरांच्या सेवेमध्ये बेलोरा हे अत्याधुनिक विमानतळ सुरु होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल पुन्हा सुरु करण्यासाठी राज्य शासन आर्थिक सहकार्य करणार असून यामुळे मिलमधील कामगारांना लवकरच दिलासा मिळणार आहे. रिध्दपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे काम गतीने सुरु आहे. अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधील मंजूर नियतव्ययापैकी किमान 25 टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यातील प्राधान्य क्षेत्रासाठी वापरावे यावर भर देण्यात येत आहे.

याशिवाय मेळघाट परिसरात निसर्ग पर्यटन, आयुर्वेदिक औषधनिर्माण व आरोग्य सुविधांचा विकास करणे आणि शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचा टक्का वाढवणे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विकास कामांवर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वन पर्यटनासाठी चिखलदरा, भीमकुंड जायंट स्वींग तसेच आमझरी येथे साहसी खेळांतर्गत स्काय सायकल, क्लायमिंग वॉल आदी सुरु करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये 79 कोटींची म्हणजेच 20 टक्क्यांची ज्यादा वाढ करण्यात आलेली आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिध्दी करुन त्यांचा लाभ जास्तीत-जास्त नागरिकांना मिळण्याच्या दृष्टीने ‘मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यात 50 हजार योजनादूत निवडण्याचे शासन धोरण आहे. तसेच जिल्ह्यात क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुलभ व्हावे व क्रीडापटुंना आवश्यक क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी नवीन क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. येथे सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक योजनेतील नाविण्यपूर्ण योजनेतून धर्नुविद्या, अत्याधुनिक जीम, कुस्ती, ज्युडो यासह ऑल ग्लास स्क्वॅश कोर्ट उभारण्यात आले आहे. नांदगाव पेठ येथे अतिरिक्त अमरावती एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यात आले असून तेथे भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सन 2023-24 मध्ये विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून मेंदूविकार शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक मशिनरी खरेदी करुन या शस्त्रक्रिया चालू करण्यात आल्या आहेत. 41 पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिली.

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने प्रकाशित ‘जिल्हा विकास आराखडा पुस्तिके’चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी दुचाकी अग्नीशामक वाहनांना मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अंजनगाव आणि अचलपूर या तालुक्यांना प्रातिनिधीक स्वरुपात हस्तांतरीत करण्यात आले. प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गजानन देशमुख व शिप्रा मानकर यांनी केले.

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार

उपायुक्त संजय पवार, अपर जिल्हाधिकारी सुरज रोहीदास वाघमारे, सहायक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत नामदेवराव म्हस्के, उपजिल्हाधिकारी अनिल ज्योतिराम भटकर, तहसीलदार योगेश देशमुख, नायब तहसीलदार प्रशांत दत्तात्रय अडसुळे, मंडळ अधिकारी पी.एस. पांडे, तलाठी संजय डुकरे, नायब तहसीलदार रविंद्र गणपतराव राठोड, निम्न श्रेणी लघुलेखक अतुल वासुदेवराव लवणकर, निम्न श्रेणी लघुलेखक शंकर मरसकोल्हे, अव्वल कारकून भाग्यश्री महादेवराव थेर, अव्वल कारकून दिवाकर सत्यवान कठाणे, कु. उषा भाऊराव गवई, कु. बबीता श्रीकृष्णराव मेहत्रे, उध्दव प्रल्हादराव काळे, सतीश हिरामणजी पेशने, महसूल सहायक अश्विन ढाकरे, महसुल सहायक पंकज मारोतराव दरोळी, रोहीदास आप्पा पाटील, वाहन चालक विजय अमृतराव भाकरे, वाहन चालक प्रेमकिशोर सुरजबली यादव, शिपाई कामेश विनोद महाजन, शिपाई नरेंद्र विनायकराव इंगळे, शिपाई चंद्रगुप्त उकर्डा शिरसाट, पोलीस पाटील कु. संगिता पोहकार, कोतवाल सुदाम प्रभाकर जाधव

विशेष पुरस्काराने सन्मानित

उपायुक्त (विकास आस्था) संतोष विठ्ठलराव कवडे, उपायुक्त (पुरवठा) रमेश शेषराव आडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू पुरुषोत्तम भगत, सहायक संचालक (माहिती) विजय वसंतराव राऊत, विधी अधिकारी ॲङ नरेंद्र बोहरा तसेच महापारेषणचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता मंगेश अविनाश पाटील, पोलीस जमादार जावेद अहमद, अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई रामेश्वर खुशालराव मुदगले यांना सन्मानित करण्यात आले.

जिल्हा क्रीडा पुरस्कार-सन 2020-21 चे मानकरी

        जिल्हा गुणवंत खेळाडू गिरिष रत्नाकर कुकडे (धर्नुविद्या), जिल्हा गुणवंत खेळाडू साक्षी विनोदराव तोटे (धर्नुविद्या), जिल्हा गुणवंत खेळाडू (दिव्यांग) धम्मपाल दादाआप्पा गावंडे (हॉलीबॉल), जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक डॉ. अभिजीत हेमंत इंगोले (सॉफ्टबॉल)

जिल्हा क्रीडा पुरस्कार-सन 2021-22 चे मानकरी

जिल्हा गुणवंत खेळाडू सर्वेश रवींद्र मेन (आट्यापाट्या), जिल्हा गुणवंत खेळाडू सानिका धर्मेंद्र चांदूरकर (धर्नुविद्या), जिल्हा गुणवंत खेळाडू (दिव्यांग) शेख अब्दुल शेख अवरार (पॉवरलिफ्टींग), जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गर्शक सतीश किसनराव टपके (खो-खो)

जिल्हा क्रीडा पुरस्कार-सन 2022-23 चे मानकरी

जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक अमर सदानंद जाधव (धर्नुविद्या)

*****

महसूल कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देणार- पालकमंत्री अब्दुल सत्तार

महसूल पंधरवाडा सांगता समारंभ

छत्रपती संभाजीनगर दि.१५ (जिमाका):  महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून शासनाच्या महत्त्वाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यात हा विभाग महत्त्वाची भूमिका बजावतो. जिल्ह्यात तहसिल, उपविभागीय कार्यालये, तलाठी कार्यालये येथे महसूल कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करणे सुकर व्हावे, यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिले.

महसूल पंधरवाड्याच्या समारोप आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात करण्यात आला. या सोहळ्यास विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपायुक्त जगदीश मिणियार, मंदार वैद्य, गव्हाणे, श्रीमती बोंदरकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व कर्मचारी तसेच कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, महसूल कर्मचारी हे गाव ते जिल्हा विभाग पातळीपर्यंत काम करीत असतात. महसूल पंधरवाड्यात केलेल्या आरोग्य तपासणीत ज्या कर्मचाऱ्यांना पुढील उपचारांची गरज असेल त्यांच्यावर उपचार करण्यात येतील. कर्मचारी शारिरीक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असायला हवे,असे ही त्यांनी सांगितले.

डॉ. अरविंद लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनीही उपस्थित कर्मचाऱ्यांना संबोधित केले व त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. श्रीमती प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

०००

सर्व घटकांच्या उन्नतीसाठी शासन कटिबद्ध- पालकमंत्री अब्दुल सत्तार

स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर दि.१५(विमाका):  विविध लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून शासन समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी साऱ्यांची साथ आवश्यक असून समाजातील एकोपा व शांतता कायम ठेवून आपण आपल्या प्रगतीचा वेग कायम राखू या, असे आवाहन पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केले.

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय सोहळा आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला, पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार संदिपान भुमरे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी खासदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, म.न.पा. आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र विरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रदीप पवार, उपायुक्त जगदिश मिनियार, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे  तसेच प्रशासनातील सर्व अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांचे कुटुंबिय, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

पालकमंत्र्यांनी उपस्थितांना शुभेच्छा संदेश दिला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना, हुतात्म्यांना आणि देशाच्या सीमेचे रक्षण करतांना प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांना अभिवादन केले.

रोजगार निर्मितीला चालना

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, शासनाने जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला, रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे, बिडकीन येथे लुब्रिझोल या कंपनीचा मोठा प्रकल्प येत आहे. १२० एकर जागेत हा प्रकल्प येत असून या जागेचे वाटपपत्रही त्या कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे ९०० जणांना थेट रोजगार मिळेल. शिवाय अन्य लहान उद्योगही त्यामुळे कार्यान्वित होतील. त्याचप्रमाणे टोयोटा-किर्लोस्कर प्रकल्पाची २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होते आहे. मोटार वाहन निर्मिती या ठिकाणी होणार आहे. या प्रकल्पामुळेही ८ हजार जणांना प्रत्यक्ष व ८ हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. एथर एनर्जी हा प्रकल्प दुचाकी निर्मितीचा प्रकल्प असून त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

उपेक्षित घटकांच्या विकासासाठी योजना

समाजातील सर्वच उपेक्षित घटकांच्या विकासासाठी शासनाने अनेक पावले उचलली आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरु करण्यात आली. जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गोरगरीब माता भगिनींना या योजनेमुळे दरमहा १५००/- रुपये म्हणजेच वर्षाला १८ हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या संसाराला हातभार लागेल. जिल्ह्यात ५ लाख ३२ हजार ७६९ इतक्या बहिणींचे नावे या योजनेच्या लाभासाठी मंजूर झाली असून राज्यात आपला जिल्हा अग्रेसर आहे. बहिणींना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणाऱ्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गतही जिल्ह्यातील १ लाख ६८ हजार ८५८ महिलांना लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्ह्यात २३१८ रिक्तपदे विविध आस्थापनांनी नोंदविली असून २२२७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामुळे सहा महिने प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण युवकांना मिळेल शिवाय त्यांना सहा महिन्याचे विद्यावेतनही मिळेल, असेही पालकमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

अल्पसंख्याकांच्या विकासाला मिळेल चालना

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, शासनाने अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करुन कार्यान्वित केले आहे. शासनाच्या या निर्णयांमुळे अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही शासनाने मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. मराठवाड्यातील दुग्धविकासाला चालना देण्यासाठी शासनाने ३२८ कोटी ४२ लाख रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार असून ३ वर्षाच्या कालावधीत विदर्भ आणि मराठवाड्याच्या १९ जिल्ह्यात १३ हजार ४०० दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकोपयोगी निर्णय

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानाच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा लाभदेखील लाखो नागरिकांना होणार असल्याचे सांगून पालकमंत्री सत्तार म्हणाले, जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई व शबरी या तिन्ही योजनेचे मिळून ७ हजार ७५८ घरकुले पूर्ण करण्यात आली. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत आर्थिक २५५.०८ टक्के साध्य करण्यात आले. घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या जल जीवन मिशन अंतर्गत ११६१ योजनांची कामे हाती घेण्यात आली असून ती प्रगती पथावर आहेत.

पाणीपुरवठा, क्रीडांगण विकास, स्वच्छतेस प्राधान्य

छत्रपती संभाजीनगर शहरवासियांसाठी नळाला २४ तास पाणी आता स्वप्न नव्हे तर वास्तव होणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून महापालिकेच्या हिश्श्याचा ८२२ कोटीचा निधी शासनाने दिला आहे. तसेच आमखास मैदान येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम, गरवारे क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम साकारणार आहे. शहरातून जाणाऱ्या खाम नदीच्या पुनरूज्जीवन प्रकल्पाची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली असून अमेरिकेतील वर्ल्ड रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी या प्रकल्पासाठी बक्षीस घोषित केले आहे. शहराला स्वच्छ आणि सर्वोत्कृष्ट करण्याचे दिशेने महानगरपालिकेतर्फे एक तास स्वच्छतेसाठी या अंतर्गत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. त्यात नागरिक सहभागही देत आहेत, याबाबत पालकमंत्री श्री. सत्तार यांनी समाधान व्यक्त केले.

देशाच्या एकतेचे प्रतिक तिरंगा

आपण सर्व हर घर तिरंगा/घरोघरी तिरंगा या अभियानात सहभागी झालात त्याबद्दल आपले अभिनंदन. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि देशप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात संपूर्ण देश एकसंघ भावनेने जात, धर्म, पंथ, प्रादेशिकता विसरुन सहभागी होतो. विविधतेतून दिसणारी एकता हे जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाचे एकमेव उदाहरण असल्याचेही पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले.

प्रशासनाच्या विविध उपक्रमांचे कौतुक

पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनानेही जलसमृद्ध गाव अभियान सुरु केले असून त्याअंतर्गत विहीर पुनर्भरणाची ५७० कामे तर रेनवॉटर हार्वेस्टिंगची १६७ कामे सुरु आहेत. वटवृक्ष लागवड अभियानाअंतर्गत जिल्ह्यात ६ हजार ६०५ वटवृक्ष लागवड करण्यात आली आहे. या  अभियानांची सुरुवात करुन पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाकांक्षी काम सुरु केले आहे. पाणी टंचाईवर मात करण्याचा विचार यामागे आहे. प्रशासनाने स्वयंस्फूर्तीने सुरु केलेल्या या उपक्रमांला त्यांनी शुभेच्छा दिल्या.  लोकोपयोगी योजनांच्या माध्यमातून शासन समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये आपल्या सगळ्यांची साथ असतेच. आपल्या समाजात एकोपा आणि शांतता कायम ठेवून आपल्या प्रगतीचा वेग राखता येईल. देशाची एकात्मता आणि शांतता कायम राखण्यासाठी आपण सारे मिळून कटीबद्ध होऊ या, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्य समारंभानंतर पालकमंत्र्यांनी सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

विशेष कामगिरी बजावणाऱ्यांना केले सन्मानित

याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध व्यक्तिंना सन्मानित करण्यात आले. त्यात प्रामुख्याने, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण विभागाचे पोलीस अधीक्षक संजय खांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक द्वारकादास भांगे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल तर नक्षलवाद्यांच्या कारवायांना परिणामकारित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विहित कालावधी पूर्ण केल्यामुळे विशेष सेवा पदक देवून गौरविण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, पोलीस निरीक्षक परविन यादव, पोलीस उपनिरिक्षक अशोक माने, दिपक पारधे, राधा लाटे, उत्तम नागरगोजे, दिलीप जाधव, अनिल नाणेकर, नारायण राठोड, भारत निकाळजे यांना गौरविण्यात आले.

शिक्षण विभागाअंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल स्वराज्य अरुण मानधने, सारंग संतोष पवार, श्रेयस अजय निकम, यांना तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी राज्यस्तरीय यशाबद्दल अर्चित संतोष दखर, अर्यान सखाहरी नवले, अनुराग राजेंद्रकुमार पवार यांना गौरविण्यात आले.

जिल्ह्यातील लघुउद्योग क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीसाठी शासनाकडून सन २०२१ मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी निवड झालेल्या ॲटोमॅट इंडस्ट्रीज वाळूज व ओमकार इंडस्ट्रीज शेंद्रा या लघु उद्योजकांनाही गौरविण्यात आले. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा आस्थापनेवर एकूण १५३ पदांची तलाठी पदभरती प्रक्रिया घेण्यात आली त्यापैकी ५९ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित ९४नियुक्ती आदेशांपैकी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात ५ नियुक्ती आदेश संबंधित उमेदवारांना देण्यात आले.

श्रीमती प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचलन केले.

०००

सामान्य माणसांच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण

नागपूर,दि. 15 :  अनेकांच्या बलिदानातून, संघर्षातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी अनेकांनी यातना सहन केल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या आजवरच्या वाटचालीत आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून एक मैलाचा टप्पा गाठला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत हे ब्रीद घेऊन सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्धता ठेवली आहे. प्रगतीचे विविध टप्पे गाठताना सामान्य माणसाच्या जीवनात परिर्वतन व्हावे यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अतिरिक्त आयुक्त माधवी चवरे-खोडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस सहआयुक्त आश्वती दोरजे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाने केंद्र शासनासमवेत विविध उपक्रम, योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला. या प्रयत्नातून महाराष्ट्राची वाटचाल आता ट्रिलियन डॉलरकडे झेपावली असून सबंध भारतात महाराष्ट्राने यात पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्याने साध्य केलेल्या प्रगतीची अनुभूती आपण सर्व घेत आहोत. हे विकासाचे पर्व आपण पाहत आहोत. येथील समृद्धी महामार्ग असेल, मेगा टेक्टाईल प्रोजेक्ट, मेट्रो आदींसह विविध सिंचन प्रकल्प महत्त्वाचे आहेत. सुमारे 88 हजार कोटीतून आपण वैनगंगा-नळगंगा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पातून विदर्भातील दुष्काळ दूर होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गत तीन वर्षात 5 हजार कोटींपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक आणू शकलो याचे समाधान असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्य शासनाने लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून चांगले निर्णय व उपक्रम हाती घेतले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमहा दीड हजार रुपये आपण देत आहोत. कालपासून याची प्रतिनिधीक सुरुवात केली आहे. येत्या 17 तारखेला एक कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळेल. या एक कोटीमध्ये नागपूर जिल्ह्यातील 5 लाख महिलांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही आपण सुरु केली आहे. सुमारे 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपये असे विद्यावेतन आपण नोंदणीकृत युवकांना देत आहोत.  शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. मुलींसाठी 500 कोर्सेसच्या फिसची रक्कम शासन देत आहे. पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या घरावर सौर पॅनल बसविले त्यांना 300 युनिट मोफत वीज आपण देत आहोत. ज्यांची वीज 300 युनीटपेक्षा अधिक होत आहे. ती वीज आपले वीज महामंडळ विकत घेईल, असे त्यांनी सांगितले.

सुमारे 3 लाख शेतकऱ्यांना एक रुपया विमाअंतर्गत 278 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने मेयो, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज येथील विविध विकास कामांसाठी सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या निधीतून विविध वैद्यकीय सुविधा आपण निर्माण करीत आहोत. केंद्र सरकारकडून मेट्रोसाठी 683 कोटी, नाग नदीसाठी 550 कोटी रुपयांचा निधी आपल्याला मिळाला आहे. जिल्ह्यातील 35 हजार 750 लोकांना आपण प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत मान्यता दिली आहे.  ओबीसींसाठी मोदी आवास योजनेत 6  हजार 747 घरांना मंजूरी देऊन यातील 1 हजार 54 घरे पूर्ण केली आहेत. अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी घटक योजनांसाठी आपण 1 हजार 219 कोटी रुपयांच्या निधीची नागपूर जिल्ह्यासाठी तरतूद केली आहे. देशातील अद्ययावत असे क्रिडा संकुल आपण साकारले आहे. जिल्हाधिकारी  कार्यालयाच्या माध्यमातून प्रशासनाला भक्कम करण्यासाठी 272 कोटी रुपये खर्चून नवीन इमारत आपण उभी करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

एक वृक्ष मातेच्या नावाने ही चळवळ आता अधिक प्रभावीपणे लोकसहभागातून राबविली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. राष्ट्रपती पदक प्राप्त , विशेष सेवा पदक प्राप्त अधिकारी, अंमलदार, आपले सरकार पोर्टलद्वारे देण्यात येणाऱ्या दाखल्याचा त्वरीत निपटारा करणारे अधिकारी, अग्निवीर सैन्य भरती मेळाव्यात उत्कृष्ट कार्य करणार व महाआवास योजना अभियान 2023-24 मध्ये योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

  • जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

हिंगोली, दि.१५(जिमाका): भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड यांच्यासह अधिकारी -कर्मचारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी देशसेवेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करुन स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी व सर्व उपस्थित मान्यवरांची भेट घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हर घर तिरंगा अभियानाची आणि तंबाखू विरोधी जनजागृती व तंबाखू विरोधी शपथ जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी उपस्थित पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिंनींना दिली.

  जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये स्वराज संदीप तिवडे या विद्यार्थ्याचा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात ग्रामीण भागातून 14 वा आल्याबद्दल तर बालाजी नरहरी काळे या सहशिक्षकाने ‘हिट अँड रन’ अपघात आई व बाळाचे प्राण वाचविल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाकडून बालरोग विभाग हिंगोलीला राज्यातील पहिला ‘मुस्कान’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, आणि डॉ. गोपाल कदम यांच्यासह चमूचा सन्मान करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे यांच्या समुहाने ई-संजिवनी अंतर्गंत 1 लाख 26 हजार रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा दिल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

त्याशिवाय मृदा आरोग्य पत्रिका वाटप केल्याबद्दल कृषी विभागाचे गजानन लोडे आणि त्यांचा चमू, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये औंढा तालुक्यातील चौंडी शहापूर, वसमत तालुक्यातील चिखली आणि विरेगाव या गावाचा धनादेश व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेतर्फे राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्प अंतर्गत भूजल जनजागृतीसाठी चित्ररथाला जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी हिरवी झेंडी दाखवली.

देशसेवेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांच्या वीर पिता, वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे जोडीदार यांनाही गौरविण्यात आले. यावेळी विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानींना वंदन करण्याचा दिवस – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे  

परभणी, दि. 15 (जिमाका) : पारतंत्र्यात असणाऱ्या आपल्या मातृभूमीस स्वतंत्र होण्याच्या घटनेस आज 77 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी असंख्य महामानवांनी आपले सर्वस्व पणास लावले. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचे अन्याय, अत्याचार सहन केले. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. महान स्वातंत्र्य सेनानीसह अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले सर्वस्व पणाला लावले. त्या सर्वांना वंदन करण्याचा, त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा हा दिवस असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात श्री. गावडे यांच्या हस्ते पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

पुढे श्री. गावडे म्हणाले की, हजारो वर्षाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या आपल्या देशाने स्वातंत्र्योत्तर काळात नेत्रदिपक प्रगती साधली, याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे. भारतातील लोकशाही मूल्यांचे जतन झाल्याने आपल्या देशाने जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था निर्माण करुन जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. आपल्या देशाने मिश्र पद्धतीची अर्थव्यवस्था स्वीकारल्याने विकास प्रक्रिया सर्वसामान्यांपर्यंत पोहचत असल्याचे आपण पाहत असल्याचे सांगितले.

आपल्या जिल्ह्यासमोर विविध समस्या आहेत, परंतू या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याकरीता शासन आणि प्रशासनामार्फत देखील सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आपण सर्वांनी मिळून सांघिक भावनेने या समस्यांचे निराकरण करू, नवभारताचे स्वप्न साकारण्यासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करु असे सांगत जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्य ध्वजवंदन कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, आणि पत्रकार उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमानंतर श्री. गावडे यांनी उपस्थितांना अभिवादन करत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्य सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचा सत्कार केला.

यावेळी जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षातील राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्या चित्ररथाचे आणि सामाजिक न्याय विभाग आणि दिव्यांग संघटना द्वारा नशामुक्त भारत अभियानास हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.

विभागीय आयुक्त पी.वेलरासू यांच्या हस्ते कोंकण भवन येथे ध्वजारोहण संपन्न

नवी मुंबई, दि.15 :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन आज कोंकण भवन येथे जल्लोषात साजरा झाला. यावेळी कोंकण विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू  यांच्या हस्ते कोंकण भवन प्रांगणात सकाळी 09.05 वाजता ध्वजारोहण संपन्न झाले.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार मंदाताई म्हात्रे, अपर आयुक्त कोकण विभाग विकास पानसरे, उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजीव पालांडे,  उपायुक्त (पुनर्वसन) अमोल यादव,  उपायुक्त (रोहयो) श्रीमती रेवती गायकर, उपायुक्त (विकास) गिरीश भालेराव, उपायुक्त (आस्थापना) मिनल कुटे,उपायुक्त (नियोजन) प्रमोद केंभवी, उपायुक्त (पुरवठा) अनिल टाकसाळे,  कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, माजी सैनिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात “हर घर तिरंगा” या उपक्रमांतर्गत कोकण भवन इमारतीच्या आवारात भव्य दिव्य असा मंच उभारून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी  कोकण भवन इमारत तिरंगी रंगाच्या रोषणाईने सजवण्यात आली होती. “हर घर तिरंगा” या संकल्पनेवर आधारित  आकर्षक असे शुभेच्छा संदेश देणारी रांगोळी आणि  सेल्फी पॉईंट इमारतीच्या आवारात उभारण्यात आले होते.

यावेळी महसूल पंधरवड्यानिमित्त  महसूल संवर्गातील पुनर्वसन  शाखेचे उपायुक्त अमोल यादव, मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या  नायब तहसिलदार  दिपाली पुरारकर, नायब तहसिलदार  सुहास सावंत यांच्यासह लघुलेखक संवर्ग, वरिष्ठ लेखापाल संवर्ग, अव्वल कारकून संवर्ग, महसूल सहाय्यक संवर्ग, आणि महसूल मित्र अशा उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य करणारे नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आकाश धनसिंग ठाकरे, तुर्भे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण भगवान वाघ आणि तुकाराम सुरेश नांगरे, वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश आनंदा पाटील, सानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल रामराव मुंडे, कळवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश शाहूराव नवले, नाव्हाशेवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भरत पोफळे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

नवी मुंबई पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.   यावेळी विभागीय महसूल आयुक्त पी.वेलरासू  यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी आणि नागरिकांना भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले.

ताज्या बातम्या

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

0
बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे,...