रविवार, जुलै 20, 2025
Home Blog Page 503

मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांकरिता मतदानासाठी मोफत वाहन व्यवस्था

  • विधानसभा मतदारसंघनिहाय दिव्यांग समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
  • समन्वय अधिकारी व रूट प्लानची माहिती मिळण्यासाठी क्युआर कोडची निर्मिती

मुंबई, दि. १८ :  विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०६.०० या वेळेत मतदान होणार आहे. ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ (No voters to be left behind) या निवडणूक आयोगाच्या घोषणेप्रमाणे मतदानाच्या दिवशी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय मोफत बस प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी नेमले आहेत. मोफत बस सुविधेकरिता बेस्टकडून मतदान केंद्राच्या निश्चित ठिकाणानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी रूट प्लान तयार करण्यात आला आहे. समन्वय अधिकारी व मार्ग नियोजन (रूट प्लान) एका क्लिकवर मतदारांना मिळण्यासाठी क्युआर कोड तयार करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सेवेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सोयी सुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. यामध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयी-सुविधा पुरविण्याचे निर्देश आहेत. या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदानाच्या दिवशीचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांसाठी विशेष सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी मतदार संघनिहाय समन्वय अधिकारी, दिव्यांग मित्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांनी सदर विशेष सुविधेचा लाभ घेण्यासाठी १९५० या टोल फ्री क्रमांकावर किंवा समन्वयक दिलीप यादव यांच्याशी  ७३८५९१९४०३ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती सुनिता मते जिल्हा दिव्यांग नोडल अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे. क्युआर कोडवर क्लिक केल्यानंतर मतदारांना मतदार संघ निहाय नेमलेले  समन्वय अधिकारी, बसचा रूट प्लान यांची माहिती मिळणार आहे.

सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये दिव्यांग मतदारांकरिता दिव्यांग समन्वय अधिकारी याप्रमाणे ३७ दिव्यांग समन्वय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. बेस्ट बससेवा यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक मतदार व दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर ने-आण करणे करिता व्हीलचेअर, व्हीलचेअर व्हॅन, दिव्यांग सुलभ बसेस,  ईको व्हॅन,  टॅक्सी,  मतदानाच्या ठिकाणी जिन्यावर सरकत्या ‘व्हीलचेअर’ची (स्टेअर क्लायबिंग व्हीलचेअर) अशी वाहन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मतदारसंघनिहाय नेमलेल्या दिव्यांग समन्वय अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संपर्कासाठी देण्यात आले आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांनुसार बेस्ट बस सेवेच्या अधिकाऱ्यांनी रूट मॅप करून दिलेला आहे व त्यानुसार बस थांबे ठरवण्यात आलेले आहेत. या बस थांब्यावरून दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक मतदारांना या बस सेवेचा लाभ घेता येईल. तसेच लोको मोटर दिव्यांगांकरिता १० व्हीलचेअरयुक्त लो फ्लोर बसेस व त्यासोबत एक सहाय्यक उपलब्ध करून देण्यात येत आहे.

दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मदत करण्याकरिता एकूण ६७१ दिव्यांग मित्र राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी अरुंद रस्त्यामध्ये बस जाणार नाही, अशा ठिकाणी प्रत्येक मतदारसंघनिहाय दिव्यांगांच्या संख्येनुसार  टॅक्सी व इको व्हॅन प्रत्येकी २५ टॅक्सी २५ इको व्हॅन उपलब्ध करून देण्यात येत आहे. याप्रमाणे दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याकरिता नियोजन करण्यात आलेले आहे.

दिव्यांग मतदारांना मोफत बस सुविधेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे.

▶️ धारावी – श्री. अयाज शेख (९८९२२७०८२२)

▶️ सायन कोळीवाडा – विजय साळुंखे (८३६९५३२१३८)

▶️ वडाळा – शैलेन्द्र पवार (७३०३२२०९०५)

▶️ माहीम – रोशन पिंपळे (८९८३०४१२३६)

▶️ वरळी – ज्ञानेश्वर पाटील (९४२२२००१७६)

▶️ शिवडी – हेमलता भांगे (९९६७५२०१६५)

▶️ भायखळा – वर्षा डोकरे (९९३०३२१००१)

▶️ मलबार हिल – स्वाती जिरंगे (९८६९०२४२५४)

▶️ मुंबादेवी – सूचित पांचाळ (९९८७०४८२५३)

▶️ कुलाबा – दत्तात्रय कांबळे (९१३७५१३८३२)

**

शैलजा पाटील/विसंअ/

विधानसभेकरीता मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदानासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना

मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मुक्त वातावरणात, निष्पक्ष आणि शांततेत मतदान पार पडावे, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून महाराष्ट्र पोलिसांनी विविध उपाययोजना केल्या असल्याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्राची तीन हजार किमीपेक्षा जास्त सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा अशा सहा राज्यांसह दादरा, नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशाशी जोडलेली आहे. ही राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांसोबत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी ते पोलीस महासंचालक स्तरावर आंतरराज्यीय समन्वय, गुन्हे आणि गुन्हेगारांशी संबंधित माहितीची देवाणघेवाण बाबत आंतरराज्य समन्वय बैठका घेण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी आंतरराज्यीय तपासणी नाक्यांवर मनुष्यबळ तैनात करून अवैध रोख रक्कम, दारू, अवैध अग्निशस्त्रे, अंमली पदार्थ, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, बोगस मतदार यांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याकरीता उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.

निवडणूक कालावधीत बंदोबस्ताकरीता सीएपीएफ/ एसएपी/ एसआरपीएफ कंपन्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन घेण्यात आलेल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी पोलीस अंमलदार आणि होमगार्ड सुद्धा पुरेशा प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत. गुन्हेगार, असामाजिक घटक आणि निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित समस्या निर्माण करणाऱ्यांविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

बीएनएसएस अंतर्गत 96,448 प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायदा, कलम 93 अंतर्गत 5727, पीआयटीएनडीपीएस अंतर्गत 1, एमपीडीए 1981 अंतर्गत प्रतिबंधात्मक अटकेचे आदेश 104 तर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत तडीपारीच्या 1343 कारवाया करण्यात आल्या आहेत.

अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी, फरारी व पाहिजे आरोपी यांना अटक, बेकायदेशीर अग्निशस्त्रे, अवैध दारू, रोख रक्कम, अंमली पदार्थ, फ्रिबीज जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये जमा करण्यात आलेल्या परवानाकृत अग्निशस्त्रांची संख्या 56,631 असून 28,566 अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 396 अवैध अग्निशस्त्र तर 1856 धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

जप्तीच्या कारवाईमध्ये 74.89 कोटी रुपये, 36.07 कोटी रुपयांची 42.31 लाख लिटर दारू, 29.36 कोटी रुपये किमतीचे 14,224 किलो अंमली पदार्थ, 202.62 कोटी किमतीचे 16,254 किलो मौल्यवान धातू, 65.97 कोटी किमतीचे मोफत आणि इतर वस्तू असे 17 नोव्हेंबर 2024 पर्यंत एकूण 408.91 कोटी रुपये किमतीची जप्ती करण्यात आली आहे.

व्हीआयपी बंदोबस्त आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित कामासाठी सर्व घटकां‌द्वारे ड्रोनचा व्यापक वापर केला जात असून विधानसभा निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्याकरीता महाराष्ट्र पोलीस सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

00000

१२४- नाशिक (मध्य) विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणात बदलासह ८ नवीन मतदान केंद्राचा समावेश

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४

नाशिकदि.18 नोव्हेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 करीता 124- नाशिक (मध्य) विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 3 मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करण्यात आले आहेत. तसेच 1 हजार 400 पेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणी 8 नवीन मतदान केंद्रे नव्याने तयार करण्यात आली असून भारत निवडणूक आयोगाने त्यास मान्यता दिली असल्याची माहिती 124 नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे मतदान नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चौहान यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

1 जुलै 2024 या आर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार 124 – नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्र ठिकाणात बदल व 1 हजार 400 पेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणी  8 नवीन मतदार केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे.

असे आहेत मतदान केंद्राच्या ठिकाणात झालेले बदल

अ.क्र. मतदान केंद्र क्र. जुने ठिकाण नविन ठिकाण ठिकाणात बदल करण्याचे कारण
1 4 मनपा अंगणवाडी, मखमलाबाद, जुन्या पंपिंग. स्टेशन जवळ नाशिक अभिनव बाल विकास मंदीर, मखमलाबाद ,नाशिक वादांकित जमिनीचा निर्णय खासगी मालकाच्या बाजूने झाल्याने स्थलांतर
2 88, 89, 90,91 मनपा, मौलाना अबुल कलाम आझाद, उर्दू प्राथमिक शाळा क्र.40, घास बाजार, भद्रकाली, नाशिक मनपा शाळा क्र.42 मुलतानपुरा, जुने नाशिक,  नाशिक मतदान केंद्रावर जागा अपुरी असल्याने मतदानाचे दिवशी गर्दीचे प्रमाण विचारात घेवून तसेच शाळेतील 4 केंद्रासाठी पत्रा पार्टीशन करावे लागत होते. त्यामुळे नवीन इमारतीत स्थलांतर
3 278 स्वामी विवेकानंद विद्यालय, इंदिरानगर, नाशिक श्री राजसारथी सहकारी गृह निर्माण संस्था मर्या. इंदिरानगर नाशिक येथील सभागृह मा. मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडील दि. 1 जुलै, 2024 चे पत्राचे निर्देशान्वये मतदारांना मतदान करणे अधिक सुलभ व्हावे म्हणून सहकारी गृह निर्माण सोसायटीमध्ये मतदान केंद्र स्थापन केले आहे

1400 पेक्षा जास्त मतदार संख्या झाल्याने नवीन तयार करण्यात आलेली 8 मतदान केंद्रे

अ.क्र. जुने मतदान केंद्र क्र. नवीन तयार केलेले मतदान केंद्र क्र. ठिकाण नविन ठिकाण ठिकाणात बदल करण्याचे कारण
1 167 168 167-मातोश्री सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय. पखाल रोड 168 – त्याच शाळेत   दुस-या खोलीत मतदान केंद्र स्थापन केले आहे सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.729 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
2 223 224 व 225 224-नाशिक मनपा प्राथमिक शाळा क्र. 65, बजरंग वाडी, हॅपी होम कॉलनी 225-अशोका युनिवर्सल स्कूल, नाशिक सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.785 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
3 226 228 व 229 228-नाशिक

मनपा प्राथमिक शाळा क्र. 65, बजरंग वाडी, हॅपी होम कॉलनी

229-अशोका युनिवर्सल स्कुल, नाशिक सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.737 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
4 248 251 व 252 251-गांधी नगर, विद्यामंदिर, (पूर्वीची नाशिक मनपा शाळा क्र. 38 व 50) गांधी नगर 252-वेलफेअर क्लब हॉल नाशिक मनपा गांधी नगर सभागृह सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.911 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
5 256 260 व 261 260-रायन इंटरनॅशनल स्कूल, उजवीकडील इमारत, डी.जी.पी. नगर नाशिक 261- त्याच शाळेत दुस-या खोलीत मतदान केंद्र स्थापन केले आहे सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.779 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
6 257 262 व 263 262-रायन इंटरनॅशनल स्कूल, उजवीकडील इमारत, डी.जी.पी. नगर-1, नाशिक 263- त्याच शाळेत दुस-या खोलीत मतदान केंद्र स्थापन केले आहे सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.779 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
7 290 296 व 297 296-नाशिक मनपा शाळा क्र. 83, वडाळा गांव, नाशिक 297-नाशिक मनपा शाळा क्र. 84 व 85, वडाळा गांव, नाशिक सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.769 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती
8 293 300 व 301 300-नाशिक मनपा शाळा क्र. 82, वडाळा गांव, नाशिक 301-नाशिक मनपा शाळा क्र. 84 व 85, वडाळा गांव, नाशिक सदरचे मतदान केंद्रात 1400 पेक्षा जास्त मतदार असल्याने अ.क्र.840 पासुन पुढे नवीन मतदान केंद्राची निर्मिती

मा.भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त सूचनांनुसार मतदारांना मतदान केंद्रामध्ये मोबाइल किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट घेवून जाता येणार नाही. त्यामुळे मतदारांनी ओळखपत्र प्रत्यक्ष सोबत आणणे आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र व्यतिरिक्त खालील पुरावे मा. निवडणूक आयोगाने ग्राह्य धरलेले आहे.

  1. आधार कार्ड
  2.  मनरेगा जॉब कार्ड
  3. बँक / पोष्टा व्दारे जारी केलेले फोटोसह असलेले पासबुक
  4. श्रम मंत्रालय योजने अंतर्गत जारी केलेले विमा स्मार्ट कार्ड
  5. ड्रायव्हींग लायसन्स
  6. पॅनकार्ड
  7. एनपीआर अंतर्गत आरजीआई व्दारा जारी केलेले स्मार्ट कार्ड
  8. भारतीय पासपोर्ट
  9. फोटोसह पेंशन दस्तावेज
  10. केंद्र/राज्य सरकार/लोक उपक्रम/पब्लिक लि. कंपनीव्दारे कर्मचारी यांना जारीकेलेले फोटोसह ओळखपत्र
  11. सांसद/विधायक / विधान परिषद सदस्य यांच्या करिता जारी केलेले ओळखपत्र
  12. भारत सरकारच्या सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे अपंगत्वाचे कार्ड (यूनिक  डिसएबिलिटी आय डी)

मतदारांनी आपले मतदार यादीतील नांव शोधण्यासाठी http://electoralsearch.eci.gov.in या वेबसाईटचा वापर करावा. तसेच 124 नाशिक मध्य विधानसभा मतदार संघ येथे मतदारांसाठी मतदार मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे. या मतदार मदत कक्ष दुरध्वनी क्रमांक 0253-2972124 असा आहे.

ज्या मतदारांची नावे यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला आहे ते लोक मतदान केंद्रावर form no 17 भरून आणि आपले voting कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत’ असा चुकीचा संदेश social media वर प्रसारित होत आहे. तथापि अशा प्रकारे कोणत्याही मतदाराला मतदान करता येणार नाही याची मतदारांनी नोंद घ्यावी.

मतदारांनी वरीलप्रमाणे मतदान केंद्रांच्या ठिकाणात झालेल्या बदलांची नोंद घ्यावी, 124 नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत मतदान करावे असे 124 नाशिक मध्य विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चौहान यांनी केले आहे.

0000000

आचारसंहिता भंगाच्या ८,६६८ तक्रारी निकाली; ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, दि. १८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ८ हजार ६७८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ८ हजार ६६८ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ६६० कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

जिल्हानिहाय तक्ता

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/11/seizure-all-distwise-report-2024-11-18-1731906717.pdf”]

 

शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी

मुंबई, दि. १७ : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू होणार आहे. मतदान संपेपर्यंतच्या 48 तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास, उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत मुद्रित माध्यमांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या बाजूने किंवा विरोधात कोणतीही जाहिरात/ निवडणूकविषयक आशय- मजकूर दिला गेला असल्यास त्याबाबत संबंधित प्रकाशकाचे नाव आणि पत्ता, तसेच संबंधित आशय – मजकूर / जाहिरातीवर नमूद करावा. या निर्देशांसोबतच आयोगाने भारतीय दंड संहितेच्या कलम 171 एच विचारात घेण्याबाबतही निर्देशित केले आहे. या कलमाअंतर्गत उमेदवाराच्या अधिकृत परवानगीशिवाय संबंधित उमेदवाराच्या निवडणुकीचा प्रचार किंवा निवडणुकीसाठी खर्च करण्याच्या हेतूने इतर सर्व गोष्टींसह जाहिराती, प्रचार किंवा प्रकाशनासाठी खर्च करण्यास मनाई केली गेली आहे.

निवडणूक प्रचाराच्या शांतता काळामध्ये मुद्रीत माध्यमांमध्ये छापण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीस जाहिरात पूर्व प्रमाणिकरण समितीची मान्यता असल्याशिवाय या जाहिराती वृत्तपत्रामध्ये छापू नये, अशा आयोगाच्या सूचना आहेत. दृकश्राव्ये माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया)  यावर प्रचाराच्या शांतता कालावधीत राजकीय जाहीरातींना मनाई आहे.

राजकीय जाहिरातीसाठी पूर्व-प्रमाणीकरणाबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाच्या दि.24 ऑगस्ट, 2023 च्या आदेशान्वये देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रचाराच्या शांतता कालावधीतील मुद्रित माध्यमे आणि त्यापूर्वीच्या कालावधीसाठी दृकश्राव्य माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मिडिया) ह्यावरील राजकीय जाहिरातींचा समावेश आहे.

पूर्व प्रमाणीकरणासाठीच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत स्पष्ट तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाने किंवा केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायदा, 1995 मधील कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन झाल्यास, असे उल्लंघन करणाऱ्याने आपली उल्लंघन करणारी कृती तात्काळ थांबवावी. निवडणूक आयोगामार्फत असे उल्लंघन करणाऱ्याच्या उपकरणांची थेट जप्तीही केली जाऊ शकते. यासंदर्भात दिल्या गेलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन न केल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरतो व  तसे न्यायालयीन प्रकरण दाखल होऊ शकते.

सर्व केबल नेटवर्क, टी.व्ही. चॅनल, रेडिओ, सोशल मीडिया याद्वारे राजकीय जाहिरातीचे प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातीचे प्रमाणीकरण असल्याचे खातरजमा करणे आवश्यक आहे. जाहिरातीचे प्रमाणकिरण असल्याशिवाय राजकीय जाहिराती प्रसारीत करण्यात येवू नये. तसेच कोणत्याही केबल नेटवर्क, टी.व्ही. चॅनल यांनी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष किंवा छुप्या पध्दतीने राजकीय पक्षांच्या जाहिरातीचे प्रमाणिकरण नसल्यास या जाहिराती प्रसारित न करण्याची दक्षता घेण्यात यावी या निर्देशांचे उल्लंघन केल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ग्राह्य धरून कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

०००

 

मुंबई शहरातील १० हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रावर विविध रंग संकेतन

मुंबई, दि. १७ : मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दहा हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांवर मतदान केंद्र शोधताना गोंधळ होऊ नये यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारांकरिता विविध रंग संकेतन (Colour Coding) असलेले मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहेत. मतदार माहिती चिठ्ठ्यांसह (Voter Information Slip) रंग संकेतन मतदान केंद्रांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, मुंबई शहर जिल्ह्यात दहा हजारांपेक्षा अधिक मतदार असलेली सुमारे ३१ मतदान केंद्र ठिकाणे असून या मतदान केंद्र स्थानांवर सुमारे ३६१ मतदान केंद्रे आहेत. यातील काही मतदान केंद्र स्थानांवर एकाच ठिकाणी १८ मतदान केंद्रे असून एका मतदान केंद्रावर सुमारे १००० ते  १४०० मतदार आहेत. मतदान केंद्रावर आल्यानंतर मतदान केंद्र शोधताना मतदारांचा गोंधळ होऊ नये, मतदान केंद्र शोधणे सुलभ व्हावे, गर्दी टाळावी यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबई शहर जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे मतदारांसाठी रंग संकेतन मतदान केंद्र तयार केली जात आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मंतदारसंघांमधील विविध मतदान केंद्रात दिव्यांग, ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व मतदारांकरिता सहाय्यता कक्ष, महिलांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहे. मतदारांचे मतदान असलेले मतदान केंद्र, गुगल मॅपनुसार मतदान केंद्राचा नकाशा, मतदान केंद्राचा रंग संकेतन, मतदान केंद्र असलेल्या विभागाचा रंग, याबाबतची माहिती मतदार माहिती चिठ्ठयांसह मतदारांपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पोहोचविण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांना रंग संकेतन व अनुक्रमांकाचे टोकनही दिले जाणार आहे. त्यानुसार हे टोकन घेतल्यानंतर मतदारांना रांगेत प्रतीक्षा कक्षात बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. रांगेतील क्रमांकानुसार मतदारांना मतदानासाठी त्या त्या रंग संकेतन मतदान केंद्रात सोडले जाणार असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

०००

मुंबई शहर जिल्ह्यात १९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई, दि. १७: मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व ‘प्रपत्र १२ ड’ भरून दिलेल्या ८५ वर्षावरील १९५६ ज्येष्ठ नागरिक व १९८ दिव्यांग मतदार अशा एकूण २१५४ मतदारांनी गृह टपाली मतदान करीत राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रत्येकाचे मत मोलाचे असून कोणत्याही क्षेत्रातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेतर्फे कार्यवाही करण्यात येत आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात १० ते १६ नोव्हेंबर दरम्यान ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले. या मतदानासाठी टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

या सुविधेअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २० मतदार तर ०९ दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २७ मतदार व २४ दिव्यांग मतदार, वडाळा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २३४ मतदार व २२ दिव्यांग मतदार, माहीम विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ५७० मतदार व २३ दिव्यांग मतदार, वरळी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील ११३ मतदार व १९ दिव्यांग मतदार, शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २०९ मतदार व ३२ दिव्यांग मतदार, भायखळा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील १६७ मतदार व ३९ दिव्यांग मतदार, मलबार हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २६९ मतदार व १० दिव्यांग मतदार, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील १०३ मतदार व ११ दिव्यांग मतदार, कुलाबा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २४४ मतदार व ०९ दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

०००  

 

२० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

मुंबई, दि. १७ : राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते  सायं. ६ वाजेपर्यंत राहील. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूका 2024 बाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे :

अ.क्र. मतदार संघांची संख्या मतदान केंद्रे सहाय्यक मतदान केंद्र

 

क्रिटीकल मतदान केंद्रे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या बॅलेट युनिट (बीयु) कंट्रोल युनिट

(सीयु)

व्हीव्हीपॅट
1 288 100186 241 990 4,136 1,64,996 1,19,430 1,28,531

राज्यातील एकूण 1,00,427 इतक्या मतदान केंद्रांपैकी, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दरम्यान 67,557 इतक्या मतदान केंद्रांवर वेबकास्टींग प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

  1. मतदारांची संख्या
अ.क्र. मतदारांचा तपशील. (दिनांक 30.10.2024 रोजी) पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी मतदार एकूण
1 मतदारांची संख्या 5,00,22,739 4,69,96,279 6,101 9,70,25,119
2 दिव्यांग (PwD) मतदार 3,84,069 2,57,317 39 6,41,425
3 सेना दलातील मतदार (Service Voters) 1,12,318 3,852 1,16,170
  1. राज्यातील लोकसभेच्या 16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
अ.क्र. मतदार संघाचे नाव पुरुष मतदार महिला मतदार तृतीयपंथी मतदार एकूण निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या
1 16 नांदेड लोकसभा मतदार संघ 9,78,234 9,30,158 154 19,08,546 19

 

  1. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे.
  2. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारी पुरविण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे सरमिसळीकरण (Randomization) करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
  • मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही सरमिसळीकरण (Randomization) देखील झाले आहे. तसेच या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय सिलींग करण्यात आले आहे.
  1. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.
  2. मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
  3. 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार राज्यभरात प्राप्त अर्जांपैकी 86,462 अर्ज मंजूर करण्यात आले. दिनांक 16.11.2024 पर्यंत गृह मतदान सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
  • आदर्श आचार संहितेचे उल्लंघन झाले तर उचित कार्यवाही करण्यात येत आहे.
  • विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.
  1. मतदान करण्याकरीता सर्वसाधारण वेळ सकाळी 07.00 ते संध्याकाळी 06.00 वाजेपर्यंत आहे. तसेच संध्याकाळी 06.00 वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना टोकन क्रमांक देऊन त्यांना मतदान करु देण्यात येईल.
  2. मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी सर्व 288 विधानसभा मतदार संघामध्ये शांतता काळ आहे. सबब या विधानसभा मतदार संघांमध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच त्या मतदार संघातील रहिवासी नसलेली व राजकीय प्रचारासाठी आलेली राजकीय व्यक्ती त्या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत.

राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता सर्व तयारी झालेली आहे. या निवडणूकीमध्ये  मोठया प्रमाणात    मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे.

 4)   राज्याची माहिती:

अ)  Law and Order (कायदा व सुव्यवस्था):- दिनांक  17.11.2024  पर्यंतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ. क्र. तपशील संख्या
1. राज्यातील वितरीत केलेले एकूण शस्र परवाने 78,267
2. जमा करण्यात आलेली शस्रास्रे 56,604
3. जप्त करण्यात आलेली शस्रे 235
4. जप्त करण्यात आलेल्या अवैध शस्त्रात्रे 2,206
5. परवाने रद्द करून जप्त करण्यात आलेली  शस्रे 611
6. परवाना जमा करण्यापासून सुट देण्यात आलेली शस्त्रे 20,495
7. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून बीएनएसएस कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या इसमांची संख्या 79,856

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यातील 288 विधानसभा मतदार संघासाठी 142 सामान्य निरीक्षक (General Observer) 41 पोलीस निरीक्षक (Police Observer) व 72 खर्च निरीक्षक (Expenditure Observer) यांची नियुक्ती केली आहे. तसेच, 288 मतदार संघांमध्ये 146 अतिरिक्त  मतमोजणी निरीक्षक मतमोजणीसाठी उपस्थित असणार आहेत.

ब)    राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीची माहिती :-

राज्यामध्ये दि. 15.10.2024 ते दि. 17.11.2024 या कालावधीत राज्यातील केंद्र व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातू इ. बाबींच्या जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

अ.क्र. जप्तीची बाब परिमाण रक्कम (कोटी मध्ये)
1 रोख रक्कम 153.01
2 दारु 68,51,364 लिटर 68.63
3 ड्रग्ज 1,01,42,452 ग्राम 72.00
4 मौल्यवान धातू 1,64,72,596  ग्राम 282.49
5 फ्रिबीज 57,949  (संख्या) 3.78
6 इतर 13,73,775 (संख्या) 75.60
एकुण 655.53

क)         दि. 15.10.2024 ते 17.11.2024 या कालावधीत राज्यभरात सी-व्हिजील ॲप वर आचारसंहिता भंगाबाबतच्या 8386 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 8353 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टल वरील  13,807 तक्रारीपैकी 9,132 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

ड)       माध्यम देखरेख व संनियत्रण समिती (PRE CERTIFICATION / APPELLATE – MCMC):- राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने दि. 17.11.2024 पर्यंत 228 प्रमाणपत्रे देण्यात आली असून 1559 जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

०००

गडचिरोली जिल्ह्यातील संवेदनशील भागात मतदान पथके रवाना

गडचिरोली, दि. १७ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाकरिता जिल्ह्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यास आजपासून सुरूवात करण्यात आली. 69-अहेरी मतदारसंघात 76 निवडणूक पथकातील 304 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि इतर युनिटसह आज सकाळी भारतीय वायुसेनेच्या एम.आय.-17 हेलिकॉप्टरच्या मदतीने 14 बेसकॅम्पवर सुरक्षितपणे पोहचिविण्यात आले.

यावेळी निवडणूक विभागाद्वारे मतदान पथकातील अधिकाऱ्यांचे बँडबाजा, पुष्पहार व औक्षण करून स्वागत करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीन विधानसभा मतदार संघातील 972 मतदान केंद्रापैकी 211 मतदान केंद्रावर 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत हेलिकॉप्टरद्वारे मतदान अधिकारी व मतदान साहित्य पोहचविण्यात येणार आहे. अहेरीत आज 76, उद्या 25 व 19 नोव्हेंबर रोजी 44 पथकांना एअर लिफ्ट करण्यात येत असून गडचिरोली मतदारसंघात 18 नोव्हेंबर रोजी 13 पथके तर आरमोरी मतदार संघात 18 नोव्हेंबर रोजी 39 पथके व 19 नोव्हेंबर रोजी 14 पथके हेलिकॉप्टरने रवाना करण्यात येणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने व जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात निवडणूक पथकांना सुरक्षितपणे पोहचविण्यात येत आहे.

०००

 

स्वीप अंतर्गत शिरपूर तालुक्यात मतदार जनजागृती रॅली उत्साहात

धुळे, दि. १७ (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगच्या निर्देशानुसार धुळे जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध स्तरावर प्रयत्न सुरु असून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

शिरपूर येथे प्रांतधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, शिरपूरचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी महेंद्र माळी, शिरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. नीता सोनवणे यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण शिरपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय यांच्यामार्फत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.

या रॅलीत ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ मतदान करा, लोकशाही बळकट करा’ अशा घोषणा देत मतदान करण्याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या रॅलीत शाळेचे बँड पथक, इयत्ता पाचवी ते दहावी मधील विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीस सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एकाच दिवशी संपूर्ण शिरपुर तालुक्यात मतदार जनजागृती रॅलीच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

 

०००

ताज्या बातम्या

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

0
रायगड जिमाका दि.२०: आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे अमरावती विभागातील गरजूंना ६ कोटी ८२ लाखांची मदत राज्यभरासह अमरावती विभागातील गरजू रुग्णांना अडचणींच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुख्यमंत्री वैद्यकीय...

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुखमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. २०: आगामी जानेवारीमध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६'च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत असून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने...

कामगार विमा योजनेतील रुग्णालयांबाबत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

0
मुंबई, दि.20 :  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत...

विंचूर येथे पोलिस चौकीच्या बांधकामांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भूमिपूजन

0
नाशिक, दि. २० : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत विंचूर, ता. निफाड येथे...