शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 272

आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे; तज्ज्ञांची समिती स्थापन होणार

मुंबई, दि. २१ : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली असून. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे.

स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

आग्रा येथील ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, ती जागा-वास्तू महाराष्ट्र शासन या प्रकल्पात अधिग्रहीत करणार आहे. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात येणार आहे. या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाज्वल्य इतिहास मांडला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे उपक्रम संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी राबविण्यात येणार आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांना मावळ्यासह मुघलशाहीने कपटाने नजरकैदेत ठेवले होते. परंतु आपल्या चातुर्याने आणि पराक्रमाने महाराजांनी नजरकैदेतून स्वतःसह शंभुराजे आणि सर्व मावळ्यांची सुटका करून घेतली. या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असलेल्या घटनेबाबात मराठीच नव्हे तर इतिहासप्रेमी पर्यटकांत औत्सुक्य असते. आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते. त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचा प्रयत्न पर्यटक करतात, मात्र या ठिकाणी कोणतीही ऐतिहासिक बाब, स्मारक, संग्रहालय नसल्याने या पर्यटकांपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहचत नाही. महाराष्ट्राच्या बाहेर अशाप्रकारचा अत्यंत दुर्मिळ असा पराक्रम ही इतिहासातील अत्यंत महनीय आणि अभ्यासपूर्ण बाब आहे. अशा स्थळासाठी आणि त्या देदिप्यमान इतिहासाचे उदात्तीकरण आणि तो वारसा पुढच्या पिढ्यांकडे कायम रहावा, त्या स्थळांची, त्या वारशांचे जतन, सवंर्धन आणि विकास करण्याकरिता शासनाने इतर राज्यातील अशी स्थळे सुध्दा विकसित करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे.

००००

 

 

इचलकरंजी शहर पाणीपुरवठ्यासाठी तिसऱ्या योजनेसाठी पर्यायांचा अभ्यास करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २१ : इचलकरंजी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी पंचगंगा नदी स्त्रोत, कृष्णानदीवरील मजरेवाडी उद्वभव या अस्तित्वातील योजनांचे बळकटीकरण करावे. त्याबरोबरच तिसरी योजना तयार करण्यासाठी पर्यायांचा अभ्यास करावा. पूरस्थितीतील पाणी साठवून त्याचा वापर करण्यासंदर्भातही विचार करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात विधानभवनातील समिती कक्षात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे आदी उपस्थित होते.

इचलकरंजी शहराला सध्या पंचगगा नदी तसेच मजरेवाडी उद्भव योजनेतून ४५ दललि पाणी पुरवठा करण्यात येतो. शहराची वाढ तसेच भविष्यातील गरज लक्षात घेऊन पाणी पुरवठ्यासाठी तिसऱ्या योजनेची आवश्यकता आहे. त्यासाठी म्हैसाळ बंधारातून पाणीपुरवठा, दूधगंगा कॅनालमधून रेंदाळ येथील खाणीमध्ये पाणी साठवण करणे तसेच दूधगंगा कॅनॉलवरील पाझर तलावांचा स्त्रोत म्हणून उपयोग करणे या पर्यायांचा विचार करून अभ्यास अहवाल सादर करावा. त्याचबरोबर जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात पुरामुळे वाहून जाणारे पाणी साठविण्यासाठी स्ट्रक्चर उभारण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. इचलकरंजीसाठीही असा प्रकल्प उभारता येईल का याचाही विचार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले. दूधगंगामधून कॅनॉलद्वारे येणारे पाणी बंद पाईपलाईनमधून आणता येईल का याचाही अभ्यास करण्याचे निर्देश मुख्यमंत्री दिले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी इचलकरंजी शहराला म्हैसाळ बंधाऱ्यातून किंवा शिरटी योजनेतून शाश्वत व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची सूचना केली.

यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सध्या अस्तित्वातील योजना सुरू ठेवून दूधगंगा कॅनालमधून येणारे पाणी रेंदाळ गावजवळील खाणींमध्ये साठवून वापर करता येईल, असे सांगितले. दूधगंगा कॅनॉलची दुरुस्ती व अस्तरीकरण करून तसेच कॅनॉल ऐवजी बंद पाईपलाईन करण्यासंबंधीचा पर्याय असल्याचे आमदार राहुल आवाडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार धैर्यशील माने दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीस सहभागी झाले होते. इचलकरंजी शहरातील भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन तसेच शेतकऱ्यांचा विरोध होणार नाही, अशा योजना राबविण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता वैशाली आवटी, अधीक्षक अभियंता प्रवीण पाटील यांच्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आदी यावेळी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

 

राज्य शासनाचे पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वोत्तम काम बँकांसाठी आश्वासक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.२१ : महाराष्ट्र प्रगतीशील राज्य असून राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व बँकाचे सहकार्य नेहमीच मिळत आले आहे. राज्यातील रस्त्यांची गरज लक्षात घेवून रस्ते विकासासाठी नियोजन  करण्यावर भर देण्यात येत आहे. समृध्दी महामार्गासारख्या यशस्वी पायाभूत सुविधांच्या कामामुळे आज अनेक बँका राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी पुढे येत आहेत. राज्य शासनाचे पायाभूत सुविधा प्रकल्पांतील सर्वोत्तम काम हे बँकासाठी आश्वासक बाब ठरत असून बँकाकडून शासनाला यापुढेही असेच सर्वोत्तम सहकार्य मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विधानभवन येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) आढावा   बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रराजे भोसले, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव रस्ते सदाशिव साळुंखे, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, हुडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय कुलक्षेत्र, आय. आय. एफ. सी. एल. (इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड) चे मुख्य प्रबंधक राजकुमार राल्हन, कॅनरा बँकेचे महाप्रबंधक अलोक कुमार अग्रवाल, पंजाब नॅशनल बँकेचे जनरल मॅनेजर एस राजगुरू, युको बँकेचे कार्यकारी संचालक नितीन बोडके, बँक ऑफ महाराष्ट्राचे जनरल मॅनेजर अमित कुमार शर्मा, नाफेडचे उपाध्यक्ष हर्षल महावरकर, पंजाब अँड सिंध बँकेचे मुख्य महाप्रबंधक विनोद कुमार पांडे, एस. बी. आय. कॅपिटल लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष असित रंजन सिकंदर विविध बँकाचे अधिकारी उपस्थित  होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत सर्व बँकांच्या सहकार्याने राज्यात २५ कोटी ८७५ कोटींचे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे ही अत्यंत चांगली बाब आहे.राज्यातील पायाभूत सुविधांसाठी यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्यात १ लाख कोटी रूपयांची कामे पूर्ण होतील हे सांगताना मला आनंद होत आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करूनच राज्य विविध बँकांकडून नियमित कर्ज घेवून त्याची परतफेड करत असते. राज्यातील रस्ते दर्जेदार होण्यासाठी राज्य शासन कोणाच्याही शिफारशीशिवाय प्रत्यक्ष रस्त्यांची गरज कोणत्या भागात आहे हे लक्षात घेवून रस्ते विकासासाठी नियोजन करून उत्तम दर्जाचे रस्ते देण्यासाठी प्रयत्नशील आहे.सर्व बँकानी राज्यातील पायाभूत सुविधांसाठी राज्यशासन करत असलेले नियोजन व अंमलबजावणी याची माहिती जरूर घ्यावी, असे आवाहनही त्यांनी त्यांवेळी केले.

राज्यातील पायाभूत सुविधा बळकटीकरणावर भर : शिवेंद्रराजे भोसले

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. सुधारित हॅम पहिल्या टप्प्यातील कामे प्रगतीपथावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये एमएसआयडीसी मार्फत ३४ जिल्ह्यात जवळजवळ ५९७० किमी लांबीचे रस्ते  सुरू करण्याचे प्रस्तावित होते, ती सर्व कामे  झाली आहेत उदिष्टापेक्षा जास्त कामे सुरू केली असून केली असून ती लवकर पूर्ण करण्यात येतील असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले की, शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पुणे ते शिरूर उड्डाणपूल, तळेगाव- चाकण-शिक्रापूर हायवे, हडपसर यवत हायवे या कामांना आवश्यक असलेली मंत्रीमडळाची मान्यता घेवून नॅशनल हायवेची कामे गतीने पूर्ण करण्यात येतील.

००००

संध्या गरवारे/विसंअ

 

पंढरपूर- लोणंद रेल्वे प्रकल्पाच्या कामाचा विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याकडून आढावा 

सोलापूर, दि. २१ (जिमाका): पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गाच्या क्षेत्राच्या संपादनाबाबत विभागीय महसूल आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नियोजन भवन येथे आढावा घेतला. महसूल विभागाकडील नोंदी, गाव नकाशे तसेच भूमी अभिलेख यांच्याकडील नोंदी व नकाशे याद्वारे या रेल्वे मार्गाच्या क्षेत्राची तपासणी करण्यात यावी, असे त्यांनी सूचित केले.

यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, माळशिरस च्या उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक श्री. घोडके, रेल्वे विभागाचे अधिकारी तसेच मंडल अधिकारी व तलाठी उपस्थित होते.

पंढरपूर – लोणंद रेल्वे प्रकल्पाचे भू-संपादनाबाबतचे जुने रेकॉर्ड रेल्वे विभागाकडे असू शकते त्या अनुषंगाने रेल्वे विभागाच्या रेकॉर्डची जबाबदारी असलेल्या कार्यालयाने त्यांच्या स्तरावर अभिलेखाची तपासणी करावी व ते रेकॉर्ड सोलापूर जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून द्यावे. या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासन चांगले काम करत असून रेल्वे विभागानेही त्यांना तेवढेच सहकार्य करावे, अशी सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी केली.

या रेल्वे प्रकल्प अंतर्गत माळशिरस तालुक्यातील बारा व पंढरपूर तालुक्यातील 5 गावांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जुन्या गावांची विभागणी झाल्याने माळशिरस तालुक्यात तीन गावे तर पंढरपूर तालुक्यात दोन गावे वाढलेली असून एकूण गावांची संख्या 20 इतकी झाली आहे. हा रेल्वे मार्ग ब्रिटिशकालीन रेल्वे मार्ग आहे. या मार्गाच्या क्षेत्राचे संपादन हे मूळ जमाबंदीच्या वेळी झाल्याने त्याचा स्वतंत्र सातबारा तयार झालेला नाही. प्रत्येक गावाच्या आकारबंधाचे तेरजस रेल्वेचे क्षेत्र नमूद आहे. सन 1929 मध्ये या जमीन गटाच्या नोंदी घेण्यात आलेल्या होत्या तर सन 1949 साली वरील संपादित जमीन अधिक धान्य पिकवा या योजनेखाली एकसाली लागवडीने देण्यात आलेल्या आहेत.

०००

न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सोन यांचे मुंबईतून प्रयाण

मुंबई, दि. २० : न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सोन यांचे त्यांच्या शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून विमानाने रात्री १०.०० वाजता न्यूझीलंडसाठी प्रयाण झाले.

यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर-पाटणकर, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर इ. मान्यवर उपस्थित होते.

0000

संदीप आंबेकर/स.सं

उन्हाळ्यात एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

  •  वीज जोडणी अपूर्ण असलेल्या योजनांची जोडणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

जळगाव, दि. २१ (जिमाका): उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष सतर्क राहावे, असे निर्देश पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत त्यांनी स्पष्ट आदेश दिले की, वीज जोडणीअभावी रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना तातडीने वीज जोडणी द्यावी, जेणेकरून या योजना त्वरित कार्यान्वित होऊन नागरिकांना पिण्याचे पाणी मिळू शकेल.

बैठकीस जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल महाजन, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजेंद्र लोखंडे, सर्व गटविकास अधिकारी, कर्मचारी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान महावितरणचे अधीक्षक अभियंता महाजन यांना वीज जोडणीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जलसंपदा व पाणीपुरवठा विभागाने ठेकेदारांवर लक्ष ठेवून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी, असेही आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट सांगितले की, जनतेच्या मूलभूत सुविधांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियोजनबद्ध कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर जबाबदारी निश्चित केली जाईल. गावागावांत पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी प्रशासनाने ग्रामपंचायतींशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

या बैठकीत जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, पाणीपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्तीस विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, जेणेकरून नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये.

०००

 

सर्वसामान्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार!

  • ▪ जिल्ह्यात ९०,१८८ घरकुलांचे उद्दिष्ट; ८६,००० घरकुलांना मंजुरी
  • ▪ ७१,००० लाभार्थ्यांना मिळणार स्वप्नपूर्तीचा आनंद

जळगाव, दि. २१ (जिमाका): जळगाव जिल्ह्यासाठी 90,188 घरकुलांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून, आतापर्यंत 86,000 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 71,000 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. शहरी घरकुल योजना जवळपास 99% पूर्ण झाली असून, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर प्रगती होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी घरकुल योजनांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक राजेंद्र लोखंडे, नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, कर्मचारी आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शहरी घरकुल 99% पूर्ण! ग्रामीण घरकुलांना गती

शहरी घरकुल योजना जवळपास 99% पूर्ण झाली असून, ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर प्रगती होत आहे. आतापर्यंत 86,000 घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी 71,000 लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिली.

27 मार्चपासून घरकुल सुरू करण्यासाठी विशेष अभियान!

पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांनी त्वरित घरकुल बांधकाम सुरू करावे यासाठी 27 मार्चपासून विशेष अभियान हाती घेतले जाणार आहे. या मोहिमेत प्रशासन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून अधिकाधिक घरकुले सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.

रमाई आणि शबरी आवास योजनांनाही गती!

राज्य पुरस्कृत रमाई आणि शबरी आवास योजनांना मंजुरी देण्यात आली असून, मंजूर घरकुलेही या अभियानात सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

आता थांबायचं नाही, घरकुलांचं स्वप्न पूर्ण करायचंपालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “आम्ही वचन दिलं होतं, घरकुलांचं स्वप्न पूर्ण करणार! हे फक्त कागदावर नाही, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरलं पाहिजे. 27 तारखेपासून अभियान राबवायचं, लाभार्थ्यांनी काम सुरू करायचं आणि आपलं घर पूर्णत्वास न्यायचं. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सर्व संबंधितांनी यात पूर्ण ताकदीने सहभागी व्हावं!”

हे घरकुल अभियान म्हणजे केवळ योजना नव्हे, तर लाखो कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे पाऊल आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या घरकुल बांधकामास तातडीने सुरुवात करावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

०००

लातूर शहराच्या उन्हाळी पाणी पुरवठ्यासाठी ठोस नियोजन करावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. २१ : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी ठोस नियोजन करावे. लातूर महानगरपालिकेने जलसाठ्यांचा आढावा घेत पाणीवापराचे नियोजन करावे. तसेच आवश्यक ठिकाणी टँकरची संख्या वाढवून नागरिकांना दिलासा द्यावा. पाण्याचा सुयोग्य वापर करावा आणि पाणी वाचविण्याबाबत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या.

विधानभवनात लातूर महानगरपालिका अंतर्गत कचरा, वाहतुक व्यवस्था, पाणी टंचाई, दूषित पाणीपुरवठा आढावा व लातूर शासकीय रुग्णालयाच्या जागेच्या हस्तांतरणाबाबतचा आढावा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी घेतला. यावेळी लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, लातूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक व एस.टी.महामंडळाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शहरातील प्रमुख जलस्रोत, विहिरी व बोरवेलची स्वच्छता व दुरुस्ती करावी. पाणी वाचविण्यासाठी जलसाक्षरता मोहिती राबवावी. लातूर शहराला शुद्ध पाणीपुरवठा करावा, पेट्रोल पंप व बस स्टँण्ड अशा सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छता गृह तयार करुन स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्यात यावी. लातूर येथे भूंकप झालेल्या भागात उद्याने तयार करण्यात आली असून या उद्यानांचे संवर्धन करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

डॉ.नीलम गोऱ्हे यांनी यावेळी लातूर शहरातील कचरा, वाहतुक व्यवस्था, पाणी टंचाई, दूषित पाणीपुरवठा यासंदर्भात व लातूर शासकीय रुग्णालयाच्या जागेच्या हस्तांतरणाबाबतचा आढावा घेतला. लातूर शहरात मोकळ्या जागेवर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने नागरिकांना बंदी करावी. नागरिकांना अवकाळी पाऊस किंवा आपत्ती परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी, असेही यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

0000

मोहिनी राणे/विसंअ

 

सर्व शासकीय यंत्रणांनी ३१ मार्चपूर्वी आपली कामे पूर्ण करावीत – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव दि. २१ (जिमाका ): जिल्हा वार्षिक नियोजनमधून जिल्ह्यात अत्यंत चांगली विकास कामे झाली आहेत. जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण, विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजनाचे एकूण 756 कोटी रुपये मंजूर होते. त्यापैकी आता पर्यंत 91.60 टक्के निधी संबधित शासकीय यंत्रणांनी वितरित करण्यात आले आहेत. याबाबतीत जळगाव जिल्हा राज्यात  आघाडीवर आहे. ज्यांची कामे सुरु आहेत त्यांनी 31 मार्च पूर्वी ही कामे पूर्ण करून जिल्ह्याचा राज्यातील विकासाचा वेग कायम नव्हे अधिक वेगवान होतो आहे, हे दाखवून द्या असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज आढावा बैठकित सर्व विभाग प्रामुखांना निर्देश दिले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, आदिवासी विभाग प्रकल्प अधिकारी अरुण पवार आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक नियोजन गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. गेल्या दोन वर्षात तर आपण राज्यात विकास कामासाठी निधी खर्च करण्यात भरारी घेतली आहे. या विकास कामाचे परिणाम दिसायला लागली आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाचे बळकटीकरण केल्यामुळे शेकडो गरीबांचे बाहेर अत्यंत खर्चिक असलेले उपचार इथे मोफत होत आहेत. असेच बळकटीकरण पशुसंवर्धन विभागाचे करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पशुधनावर गुणवत्तापूर्ण उपचार होणार असल्याचे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

आठ प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण होणार

जिल्ह्यातील अत्यंत सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा नियोजनच्या निधीतून बांधण्यात आले असून त्याचे लवकरात लवकर लोकार्पण करावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना दिले. तसेच या ठिकाणी डॉक्टर, नर्सेस आणि पूरक कर्मचारी द्यावेत, अशा सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.

वन विभागाला मोठा निधी दिला आहे, त्यांनी त्यांचे काम अधिक गतीने करून दाखवावे, अशी अपेक्षा व्यक्त करून पर्यटनवाढीसाठी वन सफारी लवकरात लवकर सुरु करावी, अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.

महिला भवन आणि वन स्टॉप यांच्या सुसज्ज इमारती तयार झाल्या असल्याचे सांगून आता क्रीडा विभागाने व्यायाम शाळा देण्यासाठी काम करावे असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

पारोळा किल्याचे सुशोभिकरण सुरु असून अत्यंत चांगले होत आहे. तिथे अतिक्रमण काढण्या बाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.   सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचा वेग वाढवावा, महानगरपालिकेचे प्रलंबित काम आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून पूर्ण करून घ्यावेत असे या बैठकीत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.

०००

राज्यपालांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पुरस्कार प्रदान

मुंबई, दि. २१ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विविध वैयक्तिक, सांघिक तसेच जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

एमसीए क्लब बीकेसी मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक तसेच सर्वोच्च समितीचे सदस्य, आजी माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक व प्रशासक उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते एमआयजी क्रिकेट क्लबचे संस्थापक प्रविण बर्वे, प्रशासक प्रा. रत्नाकर शेट्टी व माजी कर्णधार डायना एडलजी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाचे चौथे जीवनगौरव पुरस्कार विजेते दिलीप वेंगसरकर कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

यावेळी दिवंगत क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांच्या कुटुंबीयांचा राज्यपालांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते २०२३ रणजी चषक विजेत्या संघाचा तसेच वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी चषक विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

Governor presents MCA Annual Awards

Maharashtra Governor C.P. Radhakrishnan presented the various Annual Awards of the Mumbai Cricket Association at MCA Club ground in BKC Mumbai.

The Governor felicitated the family members of the late cricketer Padmakar Shivalkar on the occasion.

The Ranji Trophy Championship winning team for 2023 and the Senior Women’s T20 winning team were also felicitated by the Governor.

The Governor presented the Lifetime Achievement Awards to MIG Club founder Pravin Barve, former cricketer Diana Edulji and former cricket administrator Prof. Ratnakar Shetty on the occasion. The fourth recipient of the Lifetime Achievement Award Dilip Vengsarkar could not remain present.

 

The Governor felicitated representatives of the Victory Cricket Club, organisers of Police Shield, Vasai Colts Inter School Tournament organisers, Karnataka Sporting Association, Bombay Gymkhana, Mumbai School Sports Association, Dadar Parsi Zoroastrian Cricket Club and sports veterans on the occasion.

Minister of Information Technology and Cultural Affairs Ashish Shelar, President of Mumbai Cricket Association Ajinkya Naik, Milind Narvekar, present and former cricketers and administrators were present.

0000

 

 

ताज्या बातम्या

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

0
बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे,...