पालघर, दि. १२ :- पाणीपुरवठा व स्वछता विभागाचे अपर मुख्य सचिव तथा पालघर जिल्ह्याचे पालक सचिव डॉ. संजय चहांदे यांनी पालघरला भेट देऊन जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे हा आढावा घेण्यात आला. विविध विभागांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे आवश्यक असल्याचे मत आढावा बैठकीत श्री .चहांदे यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात झालेल्या विकास कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तर प्रत्येक विभागाचा आढावा घेत असताना विभागाला असलेल्या अडीअडचणी जाणून घेतल्या. जिल्हा मुख्यालय उभारत असलेल्या सिडको प्रशासनाकडून त्यांनी अनेक बाबीचा. आढावा घेतला बैठकीच्या सुरुवातीला जिल्ह्यातील करोना स्थितीची माहिती पालक सचिव श्री.चहांदे यांनी प्रशासनाकडून घेतली. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू, सद्यस्थितीत दाखल रुग्ण, आतापर्यंत बरे झालेले रुग्ण याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
त्यानंतर जिल्ह्यातील महसूल, कृषी, भूसंपादन, क्रीडा, नगररचना, वनहक्क आदी विभागांचा आढावा त्यांनी विभागप्रमुख यांच्याकडून घेतला. आतापर्यंत जिल्ह्यात वाटप झालेल्या पिक विम्या बद्दल पालक सचिव यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडलेल्या बैठकीनंतर पालक सचिव यांनी जिल्हा परिषदेच्या संकुल सभागृहात जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्राधान्याने जिल्ह्यातील अंगणवाड्यांची माहिती घेतली. त्यानंतर ग्रामपंचायत विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य, पाणी पुरवठा, जलजीवन मिशन अशा विभागाच्या कामकाजाचा व विकासात्मक दृष्टीने होत असलेले काम याचा आढावा घेतला. यावेळी डॉ. संजय चहांदे यांनी प्रत्येक विभागाच्या रिक्त पदांबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, वसई- विरार महापालिका आयुक्त डी. गंगाधरन, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन सर्व विभागप्रमुख, कर्मचारी आढावा बैठकीस उपस्थित होते.