यवतमाळ, दि. 19 : केळापूर तालुक्यातील आसोली ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या पिंपळशेंडा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच प्रस्तावित कामांचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहायक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, पांढरकवड्याचे उपवनसंरक्षक किरण जगताप, जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाजकल्याण सभापती विजय राठोड, बांधकाम सभापती राम देवसरकर, महिला व बालकल्याण सभापती जया पोटे, जि.प.सदस्य गजानन बेझंकीवार, आसोलीच्या सरपंचा निर्मला धुर्वे, उपसरपंच हरीहर लिंगनवार आदी उपस्थित होते.
विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करतांना पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, जिल्ह्यात सिंचनाचा अनुषेश दूर करणे, विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणे, गावात शुद्ध पिण्याचे पाणी, नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा, शाळा आदी कामांना मंत्री म्हणून आपले प्राधान्य आहे. गावखेड्यातील गोरगरीब नागरिकांना कॅन्सर, ब्रेनट्युमर, किडनीचे आजार, हृदयाची शस्त्रक्रिया आदींसाठी दुसरीकडे जावे लागत असे. मात्र दिल्ली आणि मुंबईत सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल सुरु करण्यात आले आहे. सर्व आजारांचे उपचार आता या रुग्णालयात करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. टप्प्याटप्प्याने इतरही विभाग सुरू करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत.
पालकमंत्री पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे. संपूर्ण जिल्ह्याचा विकास करणे, हेच आपले ध्येय आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री तसेच वनखात्याचा मंत्री म्हणून नागरिकांना दिलासा देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी वनखात्याला सुचना देण्यात आल्या असून जनावरांसाठी चराई क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न आहे. वनखात्याला सहकार्य करणे ही नागरिकांचीसुद्धा जबाबदारी असून वनांचे संवर्धन आणि संरक्षण करणे गरजचे आहे. सध्या परतीच्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या मागे भक्कमपणे उभे असून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते पांदण रस्त्याकरीता असलेल्या जेसीबीचे पूजन करण्यात आले.
आसोली व पिंपळशेंडा येथील विकासकामे : मा. बाळासाहेब ठाकरे ग्रामसचिवालय (24 लक्ष), बाल संस्कार केंद्र (7 लक्ष), जि.प.शाळा इमारत (7 लक्ष), शाळेची संरक्षण भिंत (7 लक्ष), जलशुध्दीकरण केंद्र (आसोली आणि पिंपळशेंडा प्रत्येकी 6.5 लक्ष), हायमास्ट लाईट (7 लक्ष), आसोली येथील अंगणवाडी दुरुस्ती (50 हजार), पिंपळशेंडा येथील अंगणवाडी दुरुस्ती (70 हजार) या कामांचे लोकार्पण तर उंच पाण्याची टाकी (22 लक्ष), रस्ता बांधकाम (7.5 लक्ष), सिमेंट रस्ता (7.5 लक्ष), आसोली येथील जि. प. शाळा दुरुस्ती (1 लक्ष), पिंपळशेंडा येथील जि.प. शाळा दुरुस्ती (1.5 लक्ष) या कामांचे भुमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. |
कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड, केळापूरचे ठाणेदार श्री. महल्ले, घाटंजीचे ठाणेदार श्री. शुक्ला, केळापूरचे तहसीलदार सुरेश कव्हाळे, गटविकास अधिकारी सुरेश चव्हाण, राजेंद्र गायकवाड, आसोली ग्रामपंचायतीचे सचिव नितीन निमसटवार यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.
०००००००