विधानसभा प्रश्नोत्तर

रोबोटिक मशीनद्वारे स्वच्छतेसाठी निधी कमी पडू देणार नाही –  उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १८ : राज्यात हाताने मैला स्वच्छ करणे अथवा डोक्यावर महिला वाहून नेण्याचे काम संपुष्टात आणण्यासाठी शासन संवेदनशीलपणे प्रयत्न करीत आहे. ही सर्व कामे रोबोटिक मशीनद्वारे होण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यासंदर्भात शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

यासंदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी प्रश्न मांडला होता.

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याबाबत आणि मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या प्रश्नाबाबत लवकरच संबंधित विभागांची उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल. या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

या प्रश्नाच्या उत्तरात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार कार्यवाही करत रोबोटिक मशीन खरेदी करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने ५०४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी १०० कोटी रुपये नगर विकास विभागमार्फत मशीन खरेदीसाठी देण्यात आले आहे. उर्वरित मशीन पुढील तीन महिन्यांमध्ये खरेदी करण्यात येतील.

मैला स्वच्छ करताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ३० लाख रुपये, कायम अपंगत्व आलेल्यांना २० लाख आणि कमी अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. राज्यामध्ये ६ हजार ३२४ व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये आर्थिक मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे, असेही सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी सांगितले.

या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य सर्वश्री सुधीर मुनगंटीवार, विश्वजित कदम, संजय केळकर यांनी सहभाग घेतला.

0000

निलेश तायडे/विसंअ

पंढरपूर वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी २४ पाणवठे; आवश्यकतेनुसार नवे वनबंधारे बांधणार –  वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. १८ : मंगळवेढा (जि. सोलापूर) तालुक्यामधील पंढरपूर वनपरिक्षेत्रांतर्गत वन्य प्राण्यांना वनक्षेत्रात पिण्याचे पाणी उपलब्ध होण्याकरिता २४ पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. या वनपरिक्षेत्रात आवश्यकतेनुसार वनबंधारे बांधून वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली जाईल. तसेच अस्तित्वात असलेल्या पाणवठ्यामधील गाळ काढला जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.

विधानसभा सदस्य समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी पाणवठे निर्माण करण्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचा चर्चेत सदस्य भास्करराव जाधव यांनी उपप्रश्न विचारात सहभाग घेतला.

वनमंत्री श्री. नाईक यांनी सांगितले,  पंढरपूर वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या पाणवठ्यामध्ये  ऑक्टोबरनंतर पाणी कमी होते. डिसेंबरपासून पाझर संपतो, त्यामुळे जानेवारी ते पावसाळ्यापर्यंत वन्य प्राण्यांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी या  पाणवठ्यांमध्ये उन्हाळ्यात दर १५ दिवसांनी पावसाळ्यापर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो.

मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. याकामी सामाजिक संस्थांची मदत घेतली जाईल. तसेच वनविभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्यातून जंगलात लागणारे मानव निर्मित वणवे थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातील.  तसेच वणव्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि वनसंवर्धनासाठी जनजागृती मोहिम राबविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

 

बोगस बियाणे आणि खते विक्रेत्यांवर कडक कारवाई करणारकृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. १८ :- अन्नदात्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची शासन कोणत्याही प्रकारे गय करणार नाही. शेतकऱ्यांना बोगस बियाणे, कीटकनाशक खते विकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री, ॲड. माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विधानसभा सदस्य काशिनाथ दाते यांनी पाचेगाव (ता. नेवासा जि. अहिल्यानगर) मध्ये कपाशीच्या बियाणांच्या विक्रीमध्ये होत असलेला गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य विजय वडेट्टीवार यांनी उपप्रश्न विचारात सहभाग घेतला.

कृषिमंत्री ॲड.कोकाटे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना बोगस बियाणे, कीटकनाशके, खते यांची विक्री तपासणी मोहिमेत दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याबरोबरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

पाचेगाव येथील मे. त्रिमूर्ती ऍग्रो सेंटरची तपासणी केली असता तेथे जादा दराने बियाणांची विक्री होत असल्याचे आढळून आल्याने त्यांचा बियाणे विक्री परवाना व कापूस विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात १५ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत कृषी विभागाने बियाणे कायद्यांतर्गत २ आणि खत नियंत्रण कायद्यांतर्गत ३ गुन्हे दाखल करून १२.३४ लाखांचा साठा जप्त केला आहे. तसेच कायद्याचे उल्लंघन केलेल्या ३५ निविष्ठा विक्री परवान्यांवर निलंबन/रद्दची कारवाई केली आहे.

००००

एकनाथ पोवार/विसंअ