जय महाराष्ट्र

जय महाराष्ट्र/cate1

विशेष लेख

विशेष लेख/cate2

लोकराज्य

लोकराज्य/cate3

नोकरी शोधा

नोकरी शोधा/cate4

दिलखुलास

दिलखुलास/cate5

व्हिडिओ

ताज्या पोस्ट

शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक आधाराकरीता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘भारत के वीर’ नावाचे धनादेश सुपूर्द

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद 


मुंबई, दि. 18 : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार देण्याचे आपले कर्तव्य आहे. ही सामाजिक भावना लक्षात घेऊन महिला व बालविकास, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आर्थिक आधार देण्याचे आवाहन केले होते.

त्याअनुषंगाने मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी ग्रामविकास, महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पहिल्याच प्रहरी एक लक्ष रूपयांपेक्षा जास्त रकमांचे धनादेश अधिकारी-कर्मचारी आणि स्वीय सहाय्यकांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे सुपूर्द केले. शहीद जवान हे त्यांच्या कुटुंबाचे आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आणि आर्थिक आधार देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. हीच भावना लक्षात घेऊन आपल्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना, ऊमेद व माविमच्या महिला बचतगटांना, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कमीत कमी 21 रूपये देणगी स्वरूपात देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. भारत के वीरया नावाने रकमेचा धनादेश देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 


यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनीता वेद-सिंघल यांनी 11 हजार रूपये, महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी 14 हजार 300 रूपये, ग्रामविकास विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी 44 हजार 500 रूपये, महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांनी 34 हजार 800 रूपयांचा तसेच मंत्री कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि स्वीय सहाय्यकांनीही मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केले. 

सर्व पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करण्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 18 : मतदारांना आपले नाव मतदार यादीत असल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी संकेतस्थळ, टोल फ्री हेल्पलाईन, एसएमएस सुविधा तसेच  प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन मतदार यादीची पडताळणी करण्याची  सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतदारांचे निवडणूक प्रक्रियेतील सहभाग हा लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असून त्यासाठी सर्व पात्र व्यक्तिंनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज केले.

भारत निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या मतदार माहिती व पडताळणी कार्यक्रमाची (वोटर व्हेरिफिकेशन ॲण्ड इन्फॉर्मेशन प्रोग्राम- व्हीव्हीआयपी) माहिती देण्यासाठी मंत्रालय पत्रकार कक्षामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन  करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. यावेळी उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड उपस्थित होते.श्री.शिंदे यांनी यावेळी माहिती दिली की, लोकशाही प्रक्रियेमध्ये पारदर्शक, नि:पक्ष निवडणुकांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सर्व पात्र मतदारांची मतदार नोंदणी होणे, नोंदणी झालेल्या मतदारांचा प्रत्यक्ष  मतदान प्रक्रियेत सहभाग आदी बाबींसाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक  सूचनानुसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून जनजागृती व काम सुरू आहे. युवक व महिला मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी मतदार नोंदणी करण्यास 1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले नागरिक पात्र असणार आहेत.

आयोगाच्या सूचनेनुसार व्हीव्हीआयपीकार्यक्रमांतर्गत सध्या मतदार असलेल्या आणि मतदार नसलेल्या परंतु, मतदार नोंदणीस पात्र असलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती श्री.शिंदे यांनी यावेळी दिली. ते म्हणाले की, मतदार ओळखपत्र असले तरी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘1950’ ही टोल फ्री हेल्प लाईन, www.nvsp.in आणि https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा तसेच प्रत्यक्षरित्या मतदार सुविधा केंद्राला भेट देऊन खात्री करता येईल. मतदार यादीत नाव नसल्यास मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे.

‘1950’ ही टोल फ्री हेल्पलाईन

राज्यातील मतदारांनी कोणत्याही जिल्ह्यांतून ‘1950’ हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक फिरवल्यास त्याला मतदार यादीतील त्याच्या नावाची पडताळणी करुन घेणे शक्य होणार आहे.

मतदारांना SMS द्वारेही मतदार यादीतील नावाचा शोध घेता येईल. त्यासाठी मतदाराने<EPIC><SPACE><EPIC NO>असा संदेश (SMS) 1950 वर पाठवावा.

संकेतस्थळाला भेट देऊन नावाची पडताळणी

मुख्य निवडणूक अधिकारी यांचे https://ceo.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ आणि राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल अर्थात www.nvsp.in वरही मतदार यादी उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यावर आपल्या नावाचा शोध घेता येईल.

श्री. शिंदे यांनी माहिती दिली, एकाच मतदाराचे एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव असणे बेकायदेशीर असून एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंद असल्यास नमुना -7 भरुन इतर ठिकाणाहून आपले नाव वगळून घ्यावयाचे आहे. मतदार यादीतील आपल्या तपशिलामधील त्रुटींची दुरुस्ती करायची असल्यास नमुना- 8, विधानसभा मतदार संघांतर्गत मतदाराचा पत्ता बदलला असल्यास त्याने नमुना- 8अ किंवा इतर विधानसभा मतदार संघामध्ये स्थानांतर झाले असल्यास नमुना- 6 मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

नवीन मतदार नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर नमुना-6 भरुन मतदार नोंदणी करता येईल. याशिवाय मुख्य निवडणूक अधिकारी किंवा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरुन नमुना-6 डाऊनलोड करावा. हा नमुना भरुन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, वयाचा दाखला (18-21 वर्ष वयोगटासाठी) आणि रहिवासी दाखला ही कागदपत्रे मतदार नोंदणी अधिकारी (इआरओ) किंवा बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ)यांच्याकडे जमा केल्यासही मतदार नोंदणी केली जाईल.

राज्यात 8 कोटी 73 लाख 30, 484 मतदार

राज्यातील मतदारांची अंतिम यादी दिनांक 31 जानेवारी, 2019 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कोटी73 लाख 30 हजार 484 इतके मतदार आहेत. त्यामध्ये 4 कोटी 57 लाख 2 हजार 579 पुरुष व 4 कोटी 16 लाख 25 हजार 819 स्त्रिया आणि 2 हजार 86 तृतीय लिंगी (थर्ड जेंडर) मतदारांचा समावेश आहे. गेल्यावर्षी एकूण मतदारांची संख्या 8 कोटी 48 लाख 96 हजार 357 इतकी होती. त्या तुलनेत यावर्षीच्या मतदार यादीमध्ये एकूण 24 लाख 34 हजार 127 इतक्या मतदारांची वाढ झाली आहे, अशी माहिती देखील श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.


सशक्त युवा, सशक्त समाज, मजबूत देश...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
विशेष लेख


सहस्त्रकुंडचे एकलव्य निवासी मॉडेल पब्लिक स्कुल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की, ग्यान और शिक्षा सिर्फ किताबे नहीं हो सकती. शिक्षा का मकसद व्यक्ती के हर आयाम को संतुलित विकास करने का हैं. याचा प्रत्यय नुकताच आला.

देशाला खेळाच्या क्षेत्रात महासत्ता बनविण्यासाठी देशातील आदिवासी बहुल 150 जिल्ह्यात खेळाकडे विशेष लक्ष देण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासीचे मोठे योगदान आहे, असे प्रेरणादायी उद्‌गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच यवतमाळ येथे काढले. निश्चितच त्या दृष्टीने आपला देश व राज्य, आपली वाटचाल करीत आहे. याचेच एक महत्त्वपुर्ण उदाहरण म्हणजे किनवट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत तयार झाले. सहस्त्रकुंड येथील एकलव्य निवासी मॉडेल पब्लिक स्कुल'.

या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच नवीन इमारत संकुलाचे ई-उद्घाटन यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील प्रधामंत्र्यांच्या कार्यक्रमात करण्यात आले. या समारंभास राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर आदी उपस्थित होते.

हा कार्यक्रम एकलव्य शाळेच्या विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी सहस्त्रकुंड ता. किनवट येथे शाळेच्या नवीन इमारतीतच ऑनलाईन पाहिला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जिल्ह्यातील आदिवासींच्या विकासासाठी मंत्रालयात स्वतंत्र कक्ष उघडण्यात येईल आणि त्या माध्यमातून विशेष योजना राबविण्यात येतील, असे आश्वासित केले.

या निवासी पब्लिक स्कुलबद्दल माहिती देताना आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनिषा वर्मा यांनी मोठ्या अभिमानाने सांगितले, आम्हाला विश्वास आहे की, आमच्या आदिवासी बांधवांच्या मुलांना जर संधी मिळाली तर निश्चितच ते संधीचे सोने केल्याशिवाय राहत नाहीत. आपल्या कठोर मेहनतीने ते यशाचे सर्वोच्च शिखर सर करतात. त्यांच्या सुप्त गुणांना आवश्यक असलेले माध्यम मिळाले तर त्यांच्या हिम्मत व मेहनतीने देशाच्या विकासास मोठी मदत होईल.


किनवटसारख्या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सहस्त्रकुंड येथे हे निवासी मॉडेल पब्लिक स्कूल बांधण्यात आले. 15 एकर जागेवर असलेल्या या भव्यदिव्य अशा इमारतीचे बांधकाम सन 2016-17 मध्ये सुरु करण्यात आले. इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम 10 हजार 862 चौरस मीटर आहे. शाळा इमारत बांधकाम अंतर्गत शाळा इमारत, मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह, भोजनगृह, अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त प्रयोगशाळा, प्राचार्य निवासस्थान, शिक्षक निवासस्थान, खेळांचे मैदान, अभ्यागतासाठी शौचालय, विद्युतघर, खेळाडुसाठी मैदानावर चैजिंग रुम (शौचालयासह), वाहनतळ, अंतर्गत पक्के रस्ते, संरक्षक भिंत, स्ट्रिट लाईट, पाणी साठवण अंडरग्राऊंड टाकी आदी सुविधा आहेत. 24 कोटी 16 लाख रुपये खर्चून ही इमारत संकुल बांधण्यात आली आहे.

एकलव्य निवासी पब्लिक स्कुल ही योजना केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या शाळेत इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत वर्ग मान्यता आहे. या शाळेची एकुण प्रवेश क्षमता 420 असून 210 मुले व 210 मुलींना प्रवेश देण्यात येतो. अमरावती विभागातील एकुण 13 जिल्ह्यासाठी चिखलदरा व सहस्त्रकुंड या दोन शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पात्रता परीक्षा घेऊन गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येतो. या शाळेचा आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी लाभ होणार आहे. म्हणूनच आदिवासी विकास विभाग म्हणतो की, आमचे ध्येय सशक्त युवा, सशक्त समाज, मजबुत देश करण्याचा आहे.

डॉ.राजू पाटोदकर

विभागीय संपर्क अधिकारी

‘आरजे’ करणार आता मतदार जागृती...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 18 : मुंबईकरांना एफ.एम. रेडिओचे भलतेच वेड! सकाळी, संध्याकाळी लोकल प्रवासात, बस प्रवासात अनेकांच्या कानात इअरफोन नक्कीच दिसतील. आता याच एफ.एम. चा लाभ मतदार जागृतीसाठी करण्याचे भारत निवडणूक आयोगाने ठरविले असून एफएमच्या रेडिओ जॉकींचे (आर.जे.) मतदार जागृतीसाठी  सहाय्य घेण्यात येणार  आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुंबईतील एफ.एम. वाहिन्यांच्या रेडिओ जॉकीची बैठक अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी घेतली. यावेळी उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड यांच्यासह आकाशवाणी एफ.एम. गोल्डएफ.एम. रेनबो, रेडिओ मिर्ची, रेड एफएम, रेडिओ नशा, फीवर एफएम, मॅजीक एफएम, इश्क एफएम आदींचे आरजे उपस्थित होते.मतदार नोंदणीसाठी पात्र मात्र अद्याप मतदार नोंदणी केलेली नाही अशा व्यक्तींनी मतदार नोंदणीसाठी कोणत्या संकेतस्थळाला भेट द्यायची, हेल्पलाईनचा कसा वापर करायचा, मतदार नोंदणी, तपशीलात दुरुस्ती, पत्त्यात दुरुस्ती आदींसाठी कोणते अर्ज भरायचे, प्रत्यक्षरित्या कार्यालयात जाऊन मतदार नोंदणी अर्ज भरायचा असल्यास काय कार्यपद्धती राहील,आदींबाबत  श्री. शिंदे  यांनी आरजेंच्या शंकांचे  निरसन केले. युवा मतदार आणि महिला मतदारांचा निवडणूक  प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी आरजेंनी एफ एम रेडिओवरुन वेळोवेळी आवाहन करावे आणि या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी श्री. शिंदे  यांनी यावेळी केले. 

गोंदिया जिल्ह्यातील कचारगडला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
राष्ट्रीय गोंडवाना महाअधिवेशनाचे उद्घाटन


कचारगड (गोंदिया), दि. १८: कचारगड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशाच्या अनेक राज्यातून दरवर्षी या ठिकाणी भाविक येतात. कचारगडच्या विकासासाठी देवस्थानला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कचारगडचा विशेष विकास आराखडा तयार करण्यात यावा, महाराष्ट्र शासन आवश्यक तो सर्व निधी देईल असे त्यांनी सांगितले. सर्व सोई सुविधायुक्त आराखडा तयार करावा केंद्र सरकार सुद्धा निधी देईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रसंगी सांगितले.

राष्ट्रीयस्तरावरचा गोंडी समाजाचा सांस्कृतिक उत्सव, महाअधिवेशन तथा कोया पुनेमनिमित्त सालेकसा तालुक्यातील धनेगाव येथील कचारगड  येथे १७ फेब्रुवारीपासून पारी कोपार लिंगो मां काली कंकाली पेनठाना देवस्थान येथील यात्रेनिमित्त राष्ट्रीय गोंडवाना महा अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीश राव, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. परिणय फुके, संजय पुराम, विजय रहांगडाले व विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भव्य अटल आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कचारगडच्या यात्रेची परंपरा खूप मोठी आहे. या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात येतात. मी महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री आहे मला या ठिकाणी येऊन आशीर्वाद व दर्शनाचा लाभ घेता आला. या ठिकाणी मिळालेली आशीर्वादरुपी ऊर्जा राज्याच्या विकासासाठी प्रेरणा देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.


नागपूर शहर गोंड राज्याने वसविले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांची नगर रचना अप्रतिम होती. त्यांच्या काळातील किल्ले व विविध वास्तू पाहल्यानंतर गोंडराजे किती पुरोगामी विचारांचे व दूरदृष्टी होते याचा परिचय येतो असे ते म्हणाले.

जल, जमीन आणि जंगलाचे संवर्धन आदिवासी समाजाने केले आहे. या समाजाच्या प्राचीन अशा संस्कृतीचे जतन करण्याचा शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध असून शिक्षण व रोजगाराच्या क्षेत्रात चांगले काम केल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.


कचारगड देवस्थानाला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. पर्यटन स्थळाचा विकास आराखडा तयार करावा त्यास शासन हवा तेवढा निधी देईल असे ते म्हणाले. सरकार गोंडी आदिवासी समाजाच्या पाठिशी भक्कमपणे उभे असून गोंडी संस्कृतीवर अतिक्रमण होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.  आदिवासी समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


कुआढास नाला बंधारा, गोंडी भाषेला मान्यता देणे व कचारगड विकास आराखड्यास केंद्राकडून निधी मिळवून देण्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळीं सांगितले. सरकारने प्रत्येक गावा गावात व घरा घरात वीज पोहोचविली आहे. कचारगड विकासासाठी साडेतीन कोटी रुपये दिले, सहा कोटी कुटुंबाला उज्ज्वला योजनेचा लाभ दिला असे गडकरी म्हणाले. समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा हा काळ असून आरोग्य, शिक्षण, रोजगार व प्रगती यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. आदिवासी समाज निश्चितच प्रगतीच्या वाटेवर मार्गक्रमण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कचारगड येथे मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्री यांनी गेल्या चार वर्षात कचारगडच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी दिल्याचे सांगितले. कचारगड विकासासाठी शंभर कोटींचा निधी द्यावा, गोंडी भाषेला मान्यता मिळावी व कुआढास बंधारा बांधण्यात यावा अशा मागण्या आमदार संजय पुराम यांनी आपल्या भाषणात केल्या. समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी समाजाच्या अनेक मागण्या आपल्या प्रास्ताविकातून मांडल्या.

याप्रसंगी अटल आरोग्य शिबीराच्या माध्यमातून जनरल फिजीशियन, जनरल सर्जरी, स्त्रीरोग व प्रसुती सेवा, बालरोग, नेत्ररोग, नाक कान घसा, अस्थिरोग, समतोल आहार मार्गदर्शन, स्वच्छतेविषयक मार्गदर्शन, न्युरोलॉजी, कॅन्सर, हृदयरोग, नेफ्रोलॉजी व इतर विशेषोपचार तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. या आरोग्य  शिबिराच्या माध्यमातून बहुसंख्य भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमास आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘व्हिएसटीएफ’मध्ये लोकसहभागासाठी उद्यापासून सहकार विभागाची विशेष मोहीम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या  (व्हिएसटीएफ) एक हजार गावांमध्ये शासकीय योजनांमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग मिळविण्यासाठी दि. १९ ते २७ फेब्रुवारी, २०१९ दरम्यान विशेष मोहिम घेण्यात येत आहे. ही मोहीम शासनाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि सहकार विभागाच्या अटल महापणन विकास अभियान यांच्या संयुक्त विद्यमातून राज्यात घेण्यात येत आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानात राज्यातील १००० गावे आदर्श ग्राम करण्यासाठी लोकसहभागातून गट शेती, शिक्षण, ग्राम विद्युतीकरण, कौशल्य विकास, वृक्ष लागवड, संगणकीय साक्षरता, पक्की घरे, बालमृत्यू थांबविणे, स्वच्छता, जलसंधारण इ. कामे करण्यात येत आहेत. त्यामध्ये शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून, शेतकऱ्यांना सहकारी संस्थेशी जोडून गावांमध्ये शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्यावर भर देण्यात येत आहे, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

 दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गावागावांमध्ये प्रभात फेरी, व्याख्यान व व्यवसायपूरक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच दि. २१ फेब्रुवारी रोजी सहकारी संस्थेच्या बळकटीकरणासाठी शेतीपुरक व्यवसाय सुरू करणे, दि. २५ फेब्रुवारी रोजी गावातील यशोगाथा व शेतीपूरक व्यवसायाची माहिती लोकांना देणे, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन व दि. २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धा व शाळेतील मुलांना भारताचे मंगलयान मिशन आधारित चित्रफीत दाखविण्यात येणार आहे. 


सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, कॉर्पोरेट, डिस्ट्रिक्ट एक्झिक्युटिव्ह, ग्राम परिवर्तक, लीड डेव्हलपमेंट पार्टनर तसेच जिल्ह्यातील सहकार संस्थेचे जिल्हा व तालुका उपनिबंधक, पणन व व्यवसाय व्यवस्थापक आदींमार्फत परिश्रम घेण्यात येत आहे. सदर मोहिमेमध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन गाव विकासासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामार्फत करण्यात येत आहे.

शेतमाल आणि शहरी ग्राहकांना 'कॉप शॉप' द्वारे मिळणार रास्त दर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आवाहन


मुंबई, दि. १ : राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा आणि शहरी भागातील गृहनिर्माण संस्थेतील ग्राहकांना रास्त दरात ताजा आणि स्वच्छ शेतीमाल मिळावा म्हणून शासनाने कॉप शॉप हा उपक्रम सुरू केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्थांशी जोडल्याने या योजनेतून रोजगार निर्मितीस चालना मिळाली आहे. त्यामुळे अशा योजनांचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.


श्री.देशमुख म्हणाले की, शेतीमालाच्या थेट विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी अटल महापणन विकास अभियानाअतंर्गत राज्यातील शहरी भागातील सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये कॉप शॉप उपक्रम सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीतून थेट लाभ होत आहे.  आतापर्यंत शहरी भागातील शंभराच्यावर गृहनिर्माण संस्थांमध्ये कॉप शॉप सुरू झाले आहेत. ग्राहकांनासुद्धा योग्य दरात ताजा आणि वैविध्यपूर्ण भाज्या, फळे, धान्यासह गरजेच्या वस्तू मिळत आहे. शासनाने अटल महापणन विकास अभियानांतर्गत ५ हजार विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट यांच्या शेती उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी शहरी भागातील गृहनिर्माण संस्थामध्ये कॉप शॉप सुरू केले आहे.

मुंबईत - ६७, ठाणे १५, पालघर , रायगड , पुणे-२०, पनवेल - २, अमरावती  १ व नागपूर  १ असे एकुण १११ कॉप शॉप सुरू झाले आहेत. सदर कॉप शॉपसाठी लागणारा शेतीमाल विक्रमगड जव्हार, मोखाडा, वाडा, मुरबाड, शहापूर, पुणे, जुन्नर, नाशिक, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, अमरावती व नागपूर या भागातील सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांशी जोडले आहेत. शेतकऱ्यांचा शेतमाल आठवड्यातून ठरवून दिलेल्या दिवशी सोसायटयांपर्यत पोहचविण्यात येत आहे.


महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील १००० गावांतील शेतकऱ्यांना या कॉप शॉप सारख्या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना सहकारी संस्थांशी जोडण्यात येत आहे. शहरी भागात शेतीमाल आणताना सहकारी संस्थांची अडवणूक होणार नाही, शेतीमालाच्या वाहतूक, विक्री आणि साठवणूकीसाठी सोयी सुविधा पुरविण्यात येत आहे. तसेच गृहनिर्माण संस्थांमध्ये ग्राहकांना रास्त दरात ताजा आणि स्वच्छ शेतीमाल (अन्न धान्य, फळे, भाजीपाला)प्रक्रिया उत्पादने  उपलब्ध होत आहेत, असेही  श्री.देशमुख यांनी सांगितले.

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात २० ते २१ फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करण्याचे कृषि विभागाचे आवाहन


मुंबई, दि. 18 : विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे दि. 20 ते 21 फेब्रुवारी दरम्यान काही भागात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या काळात मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, नागपूर, जालना, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील काही भागांत देखील वादळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

वादळी पावसासोबत काही प्रमाणात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. या आठवड्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानात वाढ होऊन दि. 20 ते 22 फेब्रुवारी दरम्यान काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.


शेतकऱ्यांनी या हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करून शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्यादरम्यान सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळ्या मैदानात तसेच झाडाखाली अथवा पत्र्याच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

कोरियाच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. १८ : कोरियन गणराज्याचे (दक्षिण कोरिया) मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत डाँगयंग किम यांनी आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

कोरियाच्या एलजी, सॅमसंग, ह्यूूंदाई, जीएस कॅल्टक्स कॉर्पोरेशन, बुसान बँक यांसह अनेक कंपन्या महाराष्ट्रात काम करीत असून त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी नसल्याचे डाँगयंग किम यांनी राज्यपालांना सांगितले.

कोरियाचे ९०० विद्यार्थी पुणे येथे शिकत असल्याचे डाँगयंग यांनी सांगून वाणिज्यदूत या नात्याने आपले कार्यक्षेत्र महाराष्ट्रासह, गुजरात, तेलंगण, गोवा व मध्य प्रदेश हे आहे. तेथील कोरियन नागरिकांचे हित जपताना महाराष्ट्र व कोरिया यामध्ये व्यापार, सांस्कृतिक संबंध व विद्यार्थी देवाण- घेवाण वाढविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे डाँगयंग यांनी सांगितले.

भारतातून अनेक पर्यटक जपान मध्ये येतात, परंतु कोरियाबद्दल त्यांना माहिती नसल्यामुळे पर्यटक कोरियाला येत नाही. त्यामुळे उभय देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.


उभयपक्षी व्यापार आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवितानाच कोरियाने महाराष्ट्राकडून फळांची आयात करावी अशी सूचना राज्यपालांनी वाणिज्यदूतांना केली. महाराष्ट्र डाळिंब, केळी, द्राक्षे, संत्रे, आंबे तसेच स्ट्राॅबेरी उत्पादनात अग्रेसर असून फळनिर्यातीचा उभय देशांना लाभ होईल, असे राज्यपालांनी सांगितले.     

शिल्पकार राम सुतार यांना टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार प्रदान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
पद्मभूषण राम सुतार यांनी देशाचा गौरव वाढविला : प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी  नवी दिल्ली, दि. 18 : जगातील सर्वात उंच असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारून प्रसिध्द शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांनी भारत देशाचा गौरव वाढविला आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राम सुतार यांचा गौरव केला. 

शिल्पकलेच्या माध्यमातून दिलेल्या बहुमूल्य योगदानासाठी महाराष्ट्राचे सुपूत्र ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज प्रतिष्ठेचा टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कारप्रदान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान बोलत होते.

प्रधानमंत्री म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कार्यातून भारतीयांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ केली. श्री. सुतार यांनी सरदार पटेलांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारून पटेलांचा एकतेचा संदेश जगभर पोहचविला आहे. त्यांच्या कार्याच्यामाध्यमातून भारत देशाचा गौरव वाढला आहे. ज्या गुरुदेव रविंद्रनाथ टागौर यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येत आहे त्यांनी आपल्या साहित्य व कलेच्या योगदानातून भारतीयांमध्ये जनगनमनची भावना जागवली, तर सरदार पटेलांनी गुरुदेवांच्या याच विचारांना बळकटी दिली त्यामुळे पद्मभूषण राम सुतार हे गुरुदेव रविंद्रनाथ टागौर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांना जोडणारा सेतू असल्याचेही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.

अजुनही काम करायचे आहे  : पद्मभूषण राम सुतार
वर्ष 1947 पासून शिल्पकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आजपर्यंत असंख्य शिल्प, पुतळे उभारले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा 522 फुट उंच पुतळा उभारला असून हा जगातील सर्वात मोठा पुतळा ठरला आहे. यामुळे भारत देशाची मान जगात उंचावली आहे त्याचा आपणास अभिमान असल्याचे श्री. सुतार यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले. यापुढे अजूनही भरपूर काम करायचे असल्याच्या भावना श्री. सुतार यांनी यावेळी व्यक्त केल्या.

तत्पूर्वी, येथील प्रवासी भारतीय केंद्रात राष्ट्रपतींच्या हस्ते आज टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यावेळी उपस्थित होते. यावेळी वर्ष 2016 चा टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार पद्मभूषण राम सुतार यांना प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात 2014 चा टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार प्रसिध्द मनिपुरी नर्तक राजकुमार सिंघजीत सिंह आणि 2015 साठी बांग्लादेशातील छायानट या सांस्कृतिक केंद्राला प्रदान करण्यात आला. 1 कोटी रूपये मानपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पद्मभूषण राम सुतार यांच्या कला क्षेत्रातील योगदानाची दखल
मुळचे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोदूर या छोट्याशा गावात जन्मलेले पद्मभूषण राम सुतार यांनी शिल्पकलेत दिलेल्या बहुमूल्य योगदानाची दखल घेऊन त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. शिल्पकलेतील 40 वर्षांच्या कारकिर्दीत श्री सुतार यांनी 50 पेक्षा अधिक भव्य शिल्प साकारले आहेत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच श्री. सुतार यांनी जगप्रसिध्द अजिंठा व वेरूळ लेण्यांतील प्राचीन शिल्पांच्या जीर्णोध्दाराच्या कामात मोलाचे योगदान दिले आहे. मध्यप्रदेशातील गांधीसागर धरणातील 45 फुटाचे भव्य चंबळ स्मारक हे त्यांच्या कार्याची महानता पटवून देणारे पहिले शिल्प ठरले. चंबळ आणि तिच्या दोन मुलांची ही भव्य मूर्ती  म्हणजे मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यातील बंधुभावाचे प्रतीक ठरली. येथूनच भारतासह जगाला श्री. सुतार यांच्या कार्याची ओळख झाली.

संसद परिसरातील महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहु महाराज आदींसह 600 पेक्षा जास्त शिल्प श्री. सुतार यांनी आतापर्यंत साकारले आहेत. शिल्पकलेचे जतन व या कलेचा प्रचार-प्रसार करण्यात श्री. सुतार यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेवून त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


प्रसिध्द सितार वादक पंडित रवि शंकर यांना वर्ष 2012 चा पहिला टागौर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार जाहीर झाला होता. तर वर्ष 2013 मध्ये प्रसिध्द संगीतकार जुबीन मेहता यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.

पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या ८२ गावासांठी गडचिरोलीत १०० बेली-ब्रिज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गडचिरोलीत विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन

गडचिरोलीला स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी व भेटी देणारे हे सरकार - मुख्यमंत्री 


गडचिरोली, दि.१८ : गेल्या चार वर्षात स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोली जिल्ह्याला विकासासाठी सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. मी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संधी मिळेल तेव्हा गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला आहे. या जिल्ह्याचा सर्वांगिण विकासासाठी हे शासन कटिबध्द असून पावसाळ्यात  जिल्ह्याशी संपर्क तुटणाऱ्या 82 गावांमध्ये तात्पुरत्या स्वरुपाचे 100 बेली-ब्रीज उभारले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

गडचिरोली मधील सोनापूर येथे आज कृषी महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण, प्रमुख पुलांचे उद्घाटन, महामार्गांचे ई- भुमिपूजन व लाभार्थ्यांना विविध साहित्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम स्थानिक कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी राज्याचे वने व आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपिठावरुन बोलताना मुख्यमंत्री यांनी केंद्र व राज्य शासन शोषित, वंचित व गरिब लोकांना केंद्र स्थानी ठेवून लोकोपयोगी योजना आखत आहेत. त्यामुळे वेगळ्या मार्गाने भटकलेल्या युवकांनी लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवून विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास व्यासपीठावर खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार रामदास आंबटकर, आ.डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, आ. कीर्तीकुमार भांग‍डिया, न.प.अध्यक्ष योगिता पिपरे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मुख्य वनसंरक्षक एटबॉन, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड आदींची उपस्थिती होती.

पुलवामा येथे आत्मघाती स्फोटात सी.आर.पी.एफ.चे 40 जवान ठार झाले या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि इतर पाहुण्यांचे स्वागत अगदी साधेपणाने कोणत्याही पुष्पगुच्छाविना शब्दसुमनांनी करण्यात आले.

मुख्य समारंभ सुरु होण्यापूर्वी या शहीदांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी दोन मिनिटे मौन राखून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. भारावलेल्या गडचिरोलीकरांनी यानंतर 'भारत माता की जय' च्या घोषणा दिल्या.


यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये विपूल वनसंपदा असल्यामुळे मुबलक पाणी असतानासुध्दा मोठे सिंचन प्रकल्प उभे करता येत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या चार वर्षात केंद्रीत सिंचनाकडे लक्ष देताना 11 हजार विहिरी शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आल्या. विहिरी, शेततळे, छोटे पूल कम बंधारे यामाध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध केली जात आहे. विहिरी सोबतच मोटर पंप, वीज जोडणी नियमित मिळेल याकडे लक्ष वेधले आहे. कृषी विद्यापीठाच्या या ठिकाणच्या महाविद्यालयातून जिल्ह्याला पूरक ठरेल अशा मार्गदर्शनाची अपेक्षा आपण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात या जिल्ह्यातील संपर्क तुटणाऱ्या गावांना बेली-ब्रीजव्दारे जोडण्यात येईल. या गावांचा विकास थांबता कामा नये. सोबतच जिल्ह्यातील गोदावरी सोबतच आता प्राणहिता, इंद्रावती या नदीवरील पुलांचे काम लवकरच पुर्णत्वास येईल, असे त्यांनी सांगितले.

आमदार डॉ. देवराव होळी यांनी मांडलेल्या मेक इन गडचिरोली संकल्पनेला त्यांनी राज्य शासनामार्फत प्रोत्साहन दिले जाईल असे सांगितले. या भागात मोठे उद्योग उभे राहिले की, रोजगाराला निश्चितच चालना मिळणार आहे. त्यामुळे मेक इन गडचिरोली मोहिमेचे आपण स्वागत करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून आयुष्मान भारत योजना, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना, असंघटीत कामगारांना 3 हजार निवृत्तीवेतन देणारी योजना, किसान सन्मान योजनेतून वर्षाला 6 हजार देण्यासाठी देश पातळीवर 75 हजार कोटीची केलेली तरतूद, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला गॅस जोडणी, घराघरात वीज, आदी. योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. आवास योजनेच्या माध्यमातून 2022 पर्यंत देशात सर्वांना घरे देण्याचा त्यांचा उद्देश आहे. तथापि, महाराष्ट्रात 2020 पर्यंत सर्वांनाच घरे देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यानी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातील पेसा गावामध्ये आदीवासी सोबतच ओबीसींना देखील सवलती मिळण्याबाबत ट्रायबल ॲडव्हसरी कमेटीने काही शिफारशी केल्या आहेत. या शिफारशीच्या माध्यमातून ओबीसींना देखील आरक्षण दिले जाईल. ओबीसींच्या न्याय्य हक्काचे रक्षण केले जाईल, असे त्यांनी शेवटी सांगितले. 


केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विपूल वनसंपदा, मुबलक पाणी, खनिज संपदा बघता हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात प्रगत जिल्हा असायला  पाहिजे होता, मात्र दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित राहिला म्हणून गेल्या चार वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण स्वत: या जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष वेधत असल्याचे सांगितले.

कृषि विद्यापीठाच्या चार भिंतीतले संशोधन थेट शेतकऱ्यांच्या शिवारात भरभराट आणण्यासाठी कामी आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. ज्या गोष्टीमुळे आयात कमी होऊ शकते, मुबलक पैसा मिळू शकते, सामान्यांच्या आयुष्यात समाधान येऊ शकते त्या पिकांच्या संशोधनाला अधिक प्राधान्य देण्याबाबतची सूचना त्यांनी दिली. सोबतच जिल्ह्यात कोणते प्रयोग केल्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात बदल होईल या संदर्भातील योजना जिल्हा नियोजनातून तयार करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सुचविले.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कृषी महाविद्यालयाची इमारत, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कठाणी नदीवरील पूलाचे लोकार्पण केले.  यासोबतच आमगाव ते आलापल्ली, ब्रम्हपूरी ते धानोरा महामार्गाचे भुमिपूजन केले. जिल्ह्यामधल्या गती -2 योजनेअंतर्गत युवकांना 50 हजार रुपयाच्या गुंतवणूकीवर स्टँडअप इंडिया अंतर्गत 20 लाभार्थ्यांना टाटा ट्रक 40 टक्के सबसिडीवर देण्यात आला.  लॉयडस् स्टिल तथा खनिकर्म निधीतून ही मोहिम राबविण्यात येत आहे.  याप्रसंगी लॉयडस् चे अतुल खाडिलकर यांचीही उपस्थिती होती.


विकासाचा वेग वाढला
शासनाने गडचिरोलीतील विकास हा प्राधान्याचा विषय मानला आणि त्यामुळे 4 वर्षात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रातील योजनांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील पुढाकार घेतला त्यामुळे विकासाचा वेग वाढला आहे. या बद्दल मी दोघांचेही आभार याप्रसंगी मानतो या शब्दात पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गडचिरोली जिल्ह्यात 12 हजार कोटींचे रस्ते होत आहेत. हे प्रथमच घडत आहे. गेल्या 20 वर्षात बांधलेच गेले नाहीत अशा भागात रस्ते होत आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत हजार कोटी मंजूर करुन रस्त्यांची कामे होत आहेत. जिल्ह्यात प्रत्येक गावात वीजपुरवठा गेल्या 3 वर्षात झाला सोबतच पाणीपुरवठा व इतर कामेही मोठ्या प्रमाणावर होत आहेत असे ते म्हणाले.

कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवे तंत्र व शेतीची माहिती होऊन उत्पन्न वाढीसाठी मदत होणार आहे. सोबतच अहेरी येथील रुग्णालय उभारणीच्या निर्णयाबद्दल पालकमंत्र्यांनी आभार मानले.

यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी मनोगत व्यक्त केले.  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रास्ताविक केले.


कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी केले.