‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत राज्यातील ३५ लाख लाभार्थ्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
7

पालघर दि. 15 : ‘शासन आपल्या दारी’ या अभियानामध्ये रोजगार मेळावादेखील घेण्यात आला आहे. 2 ते 3 हजार तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना पोहोचविल्या आहेत. राज्य शासनाने वर्षभरात सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोणालाही वैयक्त‍िक लाभ होईल असा निर्णय या शासनाने घेतला नाही. शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण वर्ग यांना केंद्रबिंदू मानून राज्य शासन काम करत आहे. पालघर जिल्ह्यामध्ये 2 लाख 12 हजार 683 लाभार्थ्यांना 212 कोटी रुपयांचा लाभ ‘शासन आपल्या दारी’ या अभियानांतर्गत देण्यात आला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पालघर जिल्ह्यातील कोळगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत हाते

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार हितेंद्र ठाकूर, श्रीनिवास वनगा, क्षितीज ठाकूर, विवेक पंडित, निरंजन डावखरे,  रविंद्र फाटक, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानूदास पालवे, वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पालघरच्या नगरध्यक्ष उज्वला काळे, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत तसेच विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि लाभार्थी उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यासाठी रुग्णालयाचे भूमीपूजन, जलजीवन मिशनचे ई-भूमीपूजन करण्यात आले. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडविणे, त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणणे, सकारात्मक अमुलाग्र बदल घडविणे हाच उद्देश शासनाचा आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी राज्य शासनाने जवळपास चारशे निर्णय घेतले आहेत. अनेक लोकाभिमुख प्रकल्प होताहेत, उद्योग वाढीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. आदिवासी समाजाचे राहणीमान उंचावले पाहिजे. इतर सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात देखील बदल घडविण्याचा उद्देश शासनाचा आहे. बांद्रा-वर्सोवा हा प्रकल्प पुढे नेण्यात येणार आहे. विरार ते पालघर हा प्रकल्प देखील सुरु करण्यात येणार आहे. पूर्वी रखडलेले सर्व प्रकल्प या शासनाने सुरु केले आहेत.

मुंबईसह राज्यात सर्व पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरु आहेत. मागील 11 महिन्यामध्ये परदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानासाठी 1500 कोटी रुपये देण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये मच्छीमार बांधवासाठी तरतूद करण्यात आली. पंचामृत अर्थसंकल्पामध्ये सर्वसमावेशक विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्ह्यातील पोलीस विभागाने देखील रोजगार मेळावा घेतला. यात दहा हजार तरुणांनी सहभाग  नोंदविला होता, या रोजगार मेळाव्यात 1 हजार 850 तरुणांना रोजगार मिळाला आहे. पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे.

महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. ‘लेक लाडकी लखपती’ या योजनेअंतर्गत मुलगी जन्माला आल्याबरोबर एक लाख रुपयाचे अनुदान जाहीर करण्यात आले. शेतकरी वर्गासाठी केंद्र सरकार 6 हजार अनुदान देते तर राज्य शासन 6 हजार असे एकूण 12 हजार रुपयांचे अनुदान शेतकरी बाधवांना देण्यात येत आहे. केंद्र सरकारचा भक्कम पाठींबा राज्य शासनाला असल्यामुळे सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी सुचविलेले प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. एमएमआरडीएची व्याप्ती देखील संपूर्ण जिल्ह्यात करण्यात येणार आहे. पालघर जिल्हा मुख्यालय हे देशात सर्वात प्रशस्त इमारत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.

तळागळापर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पालघर जिल्ह्यात शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून एका छताखाली सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते परंतू पालघर जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ देवून प्रशासनाने हे अभियान यशस्वी केले आहे.

राज्य शासन सामान्यांच्या जीवनात गुणात्मक बदलासाठी काम करत आहे. जो पर्यंत योजनांचा लाभ तळागळातील जनतेपर्यंत पोहोचणार नाही, तोपर्यंत सर्व यंत्रणा कार्यरत राहणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘नमो शेतकरी’ या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पिक विमा योजनेचा लाभ मिळवून दिला. पालघरमध्ये जिल्हा रुग्णालयाचे भूमीपूजन करण्यात आले. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्याला 5 हजार कोटी रुपयाचा निधी देण्यात आला. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात रुग्णालय उभी केली जात आहेत. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनअंतर्गत दीड लाखांपर्यंत उपचार मोफत दिले जात होते. परंतू आता 5 लाखांपर्यंतचा उपचार मोफत केला जाणार आहे. त्यामुळे कोणताही गरजू लाभार्थी उपचाराविना राहणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली. प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आदिवासी बांधवांसाठी पाच लाख घरे बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील एकही व्यक्ती बेघर राहणार नाही. याची संबंधीत अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची सूचना देखील यावेळी त्यांनी केली. केवळ आदिवासी बांधवांसाठीच नाही तर इतर मागास वर्गातील बांधवांसाठी देखील प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत बांधवांसाठी 10 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी विविध योजना मैलाचा दगड ठरत आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या शुभारंभाकरिता जनतेची उपस्थिती ही योजनेची यशस्वीता दर्शविते.

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या माध्यमातून दोन लाख गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळण्याकरिता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पाहिलेले ‘शासन आपल्या दारी’ हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता राबत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here