पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समिती अध्यक्षपदी मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
12

चंद्रपूर,दि.२१ : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे राज्यपाल तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष कलराज मिश्रा यांच्या अध्यक्षतेत अलीकडेच झालेल्या बैठकीत कार्यकारी समितीने एकमताने मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

राज्याच्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळल्यापासून सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या कामांची देशाच्या सांस्कृतिक विभागाने घेतलेली ही दखल असल्याचे मानले जात आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली देशात सात क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्रांचे कार्य चालते. यात उत्तर क्षेत्र सांस्कृतिक केंद्र पटियाला (पंजाब), पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर (राजस्थान), दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र तंजावर (तामिळनाडू), दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर (महाराष्ट्र), पूर्व क्षेत्र सांस्कृतिक केंद्र कोलकाता (पश्चिम बंगाल), उत्तर मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र इलाहाबाद (उत्तर प्रदेश) आणि उत्तर पूर्व क्षेत्र सांस्कृतिक केंद्र दीमापूर (नागालँड) या केंद्रांचा समावेश आहे.

भारतीय पारंपरिक लोककलांना प्रोत्साहन देण्याची या सांस्कृतिक केंद्रांची सुमारे साडेतीन दशकांची परंपरा आहे. यातील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी मंत्री श्री. मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता यांनी नियुक्तीच्या संदर्भातील पत्र मंत्री श्री. मुनगंटीवार यांना पाठविले आहे. तसेच कार्यक्रम समितीच्या बैठकीचे नेतृत्व करण्याचीही विनंती केली आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून आयोजित केलेले अनोखे सांस्कृतिक उपक्रम तसेच वेळोवेळी घेतलेले क्रांतिकारी निर्णय याची केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने दखल घेतली आहे. लोककला जतन करणे आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देणे, याबाबतीतही त्यांनी सातत्याने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, हे विशेष.

व्यापक कार्यक्षेत्र

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या अंतर्गत सहा राज्य येतात. यात राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांचा तसेच दमण दीव आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. त्यामुळे मंत्री श्री. मुनगंटीवार यांना सर्व सहा राज्यांमधील लोककलावंतांसाठी काम करण्याची उत्तम संधी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या माध्यमातून महाराष्ट्रातील लोककलांना राष्ट्रीय पातळीवर अधिक मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यावरही मंत्री श्री. मुनगंटीवार यांचा भर असणार आहे.

मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत मे महिन्यात बैठक

पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालकांनी नियुक्तीच्या संदर्भातील पत्रात आगामी बैठकीचेही निमंत्रण दिले आहे. २०२३-२०२४ या वर्षात आयोजित करावयाच्या कार्यक्रमांचे नियोजन या बैठकीत होईल. ही बैठक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत मे महिन्यात होणार आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here