बेरोजगारांच्या हाताला काम आणि शेतकऱ्यांना समाधान देणारा अर्थसंकल्प - बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


          
मुंबई, दि. 6 :  बहुजन कल्याण विभागासाठी सन 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 3 हजार कोटी रुपये व सारथी संस्थेसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प लोकाभिमुख व राज्याला आर्थिक शिस्त लावत अर्थकारणाला चालना देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून बेरोजगारांच्या हाताला  काम आणि शेतकऱ्यांना समाधान देईल असेही बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागामार्फत विजाभज विद्यार्थ्यांकरिता आश्रमशाळा, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा, विद्यानिकेतन, धनगर समाजासाठी विविध योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, डॉ.पंबाजराव देशमुख वसतिगृह योजना, तांडावस्ती मुक्त वसाहत योजना, इतर मागासवर्ग विद्यार्थी वसतिगृहे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती इत्यादी उपक्रम राबविण्यासाठी विभागाला 3 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून संस्थेच्या कामकाजासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. या संस्थेसाठी सन 2020-21 साठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई

जुलै-ऑगस्ट, 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर, 2019 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातील बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्याने केंद्र शासनाकडे रुपये 14 हजार 496 कोटीच्या रकमेची मागणी केली. केंद्र शासनाने त्यापैकी फक्त रुपये 956 कोटी 13 लाख रक्कम मंजूर केली. मात्र केंद्राकडून मदत प्राप्त होण्याची वाट न बघता आपल्या शासनाने स्वत:च्या निधीतून शेतकऱ्यांना मदत केली, हे याठिकाणी आवर्जून सांगितले पाहिजे, हा अर्थसंकल्प लोकाभिमुख व राज्याला आर्थिक शिस्त लावत अर्थकारणाला चालना देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असून बेरोजगारांच्या हाताला  काम आणि शेतकऱ्यांना समाधान देईल. असे श्री. वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
0000
दत्तात्रय कोकरे/विसंअ/6.3.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.