विधानसभा प्रश्नोत्तरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतराज्य परिवहन महामंडळात दुष्काळी भागातील
1250 उमेदवारांचे चालकपदाचे प्रशिक्षण सुरु

मुंबई दि. ११ : राज्य परिवहन महामंडळाने दुष्काळी भागातील तरूणांना नोकरी देण्यासाठी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत १२ जिल्ह्यातून २४ हजार ५२६ विद्यार्थी उत्तीर्ण असून, १५ हजार ८५५ पात्र ठरले आहेत. ११ जिल्ह्यात १२५० वाहनचालक आणि वाहक पदाचे प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानसभेत दिली.

दुष्काळी भागातील तरूणांना राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील प्रश्न ॲड.आशिष शेलार यांनी उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ॲड. अनिल परब बोलत होते.

ॲड.परब म्हणाले, राज्य परिवहन महामंडळाने फेब्रुवारी २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदासाठी परीक्षा घेतली. १२ जिल्ह्यांसाठी ४ हजार ४१६ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. २४ हजार ५२६ उमेदवार परीक्षार्थी उत्तीर्ण झाले असून, १५ हजार ८५५ उमेदवार गुणवत्तेनुसार पात्र ठरले आहेत. ११ जिल्ह्यात २३७२ पैकी १२५० उमेदवारांचे चालक पदाचे प्रशिक्षण सुरू आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील अंतिम यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
०००

प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करणार - पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ६०७ उद्योगांपैकी ३११ कंपन्यांचा सर्व्हे केला असून, मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या ५० औद्योगिक कंपन्यांना नोटीस देण्यात आली असून, २१ कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता पाणी बाहेर सोडण्यात येणाऱ्या प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्‍य ठाकरे यांनी विधानसभेत सांगितले.

कल्याण-डोंबिवली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कारखान्यांमुळे होत असलेल्या वायू प्रदूषणासंदर्भात सदस्य गणपत गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.ठाकरे बोलत होते.

पर्यावरणमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, कोणत्याही औद्योगिक कंपनीमधून बाहेर पडणारे सांडपाणी हे प्रक्रिया होऊनच बाहेर सोडले जाणे सक्तीचे आहे. तसे न केल्यास संबंधित उद्योगांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली येथील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेचे आधुनिकीकरण लवकरच करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी जे अनधिकृतपणे डम्पिंग करतात, ते रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालणारे पथक नेमण्यात आले आहे. याचबरोबर नगरविकास आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचीही माहिती मंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी दिली.

याचबरोबर मौजे शेलार येथील बेकायदेशीर कारखान्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाबात शांताराम मोरे यांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना मंत्री श्री. ठाकरे म्हणाले,  या परिसरातील दोन कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. दोन कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे. चार उद्योगांना प्रस्तावित आदेश बजावण्यात आले आहेत. या कंपन्यात कामगार काम करत असतात त्यामुळे ते पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येते. मात्र, नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांनाच परवानगी देण्यात येते. तसेच, स्थानिक परिसरातून येणारे सांडपाणी आणि औद्योगिक कंपन्यांतून येणारे रासायनिक पाणी यावर प्रक्रिया करूनच हे पुढे जलस्त्रोतात सोडण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मौजे शेलार भागात ७ हजार बेकायदेशीर इमारती होत्या. अनधिकृत इमारतींना नोटीस देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. वारंवार नोटीस देऊनही जर कारवाई होत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती श्री. ठाकरे यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री रविंद्र वायकर, योगेश सागर, सुनील प्रभु, रईस शेख, किसन कथोरे, मंदा म्हात्रे यांनी सहभाग घेतला.
०००
बुलढाणा : धाडी गावचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश - मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. 11 :  बुलढाणा येथील मामुलवाढी ग्रामपंचात अंतर्गत असलेल्या मौजे धाडी गावचा हिंगणे गव्हाण १३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश करून संबंधित समस्या सोडविण्यात येतील. क्षारयुक्त पाण्यासाठी आरओ प्लांट लावण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलावबराव पाटील यांनी विधानसभेत दिली.

मामुलवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मौ.धाडी गावाचा हिंगणे गव्हाण १३ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्याबाबत सदस्य राजेश एकडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, मामुलवाडी ग्रामपंचायतमध्ये आलेल्या मौ. धाडी गावाचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत समावेश करण्यात येत आहे. दोन किलोमीटरची पाईपलाईन देण्यात येणार आहे.  पुढील तीन ते चार महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. क्षारयुक्त पाणी असल्याने तात्काळ आरओ प्लांटही लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मंत्री श्री.पाटील यांनी दिली.
०००


औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अपूर्ण बांधकामांसाठी जबाबदार असलेल्यांना काळ्या यादीत टाकणार
- कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक

मुंबई, दि. 11 : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत १७ शासकीय संस्थांपैकी १२ औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ३ वसतिगृह व २ शासकीय तांत्रिक विद्यालये आहेत. यापैकी १२ संस्थांच्या इमारतींचे हस्तांतरण झाले आहे. उर्वरित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची कामे अपूर्ण असून, त्यासंदर्भात तीन महिन्यांमध्ये चौकशी करून संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेत दिली.

राज्यात बांधकाम झालेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या इमारतींच्या अपूर्णावस्थेसंदर्भात सदस्य अमिन पटेल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री. मलिक बोलत होते.

श्री.मलिक म्हणाले, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मांडवी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगाव आणि पेण तसेच शासकीय तंत्र विद्यालय जव्हार या पाच संस्थांच्या इमारतीमधील काही कामे अपूर्ण आहेत. लवकरात लवकर या इमारतींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेण्यात येतील. व अपूर्णावस्थेसंदर्भातील कामांची तीन महिन्यात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच, कालमर्यादेपूर्वी कामे केल्यास प्रोत्साहन देण्यात येईल तर कालमर्यादा उलटून गेल्यावर कामे न केल्यास संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात येईल अशीही माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.
०००

परभणीसाठी नवीन १८ बस उपलब्ध करणार
- परिवहनमंत्री ॲड. अनिल परब

मुंबई, दि. ११ : परभणी आगारातील एस.टी. महामंडळाच्या आगारात ६६ वाहने उपलब्ध आहेत. राज्यासाठी सोळाशे नवीन गाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी १८ नवीन गाड्या परभणीसाठी देण्यात आल्या आहेत. आणि सहा बस दुरूस्ती करून देण्यात आल्या आहेत. बसमध्ये प्रथमोपचार साहित्य व अग्निशमन उपकरण उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानसभेत दिली.

परभणी आगारातील एस.टी. महामंडळाच्या बसेसच्या दुरवस्थेसंदर्भात सदस्य संजय कुटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री. परब बोलत होते.

मंत्री श्री. परब म्हणाले, परभणी आगारातील बस सुस्थितीत असून, यासंदर्भात अधिकारी चुकीची माहिती देत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राज्यासाठी नवीन बस खरेदी करण्यात येणार असून, त्यापैकी १८ नवीन गाड्या परभणीस देण्यात येणार आहेत. गरज भासल्यास याची संख्या वाढविण्यात येईल. प्रवाशांना योग्य सेवा देण्याचा प्रयत्न एस टी महामंडळ करीत आहे. बसेस किती किमी चालल्या याची नोंद घेण्यात येईल  व नियमानुसार ठराविक कालावधीनंतर त्यांना बाद करण्यात येईल. भाडेतत्वावर इलेक्ट्रिकल वाहन घेताना वाहन चालकाचे योग्य प्रशिक्षण पूर्ण झाले आहे का याची तपासणी करण्यात येईल. बस डेपोचे दुरूस्तीकरण सुरु असून, परमिट दिलेल्या बससंदर्भात कुणी गैरव्यवहार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. स्कूल बससाठी प्रवास करण्याचे निकष तंतोतंत पाळण्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. अपघात होणार नाही याची काळजी शासन घेणार असल्याची माहितीही मंत्री श्री.परब यांनी यावेळी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सदस्य सर्वश्री रविंद्र वायकर, राम कदम, सुनील प्रभु, मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला.
०००

पाताळगंगा नदीवर जलशुद्धीकरण सयंत्रणेद्वारे गावांना शुद्ध पाणीपुरवठा - पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई, दि. 11 : खोपोली नगरपरिषद हद्दीतील सांडपाणी नदीत मिसळत असल्याने, नदीच्या पाण्याची गुणवत्ता नियमितपणे तपासली जाते. जलसंधारण उप विभाग कर्जत यांच्या अहवालानुसार खालापुर तालुक्यातील पाताळगंगा नदीवर नदी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण सयंत्रणा बसवून गावांना शुद्ध पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत दिली.

पाताळगंगा नदी प्रदूषणात वाढ होत असल्यासंदर्भात सदस्य प्रशांत ठाकूर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री. ठाकरे बोलत होते.

मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, खोपोली नगरपरिषदेकडून भुयारी गटार योजनेचे सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाकडे तांत्रिक मंजुरीसाठी प्रलंबित आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.

यावेळी उपप्रश्नास उत्तर देताना ते म्हणाले, नीति आयोगाकडे दोन वर्षापूर्वी राज्यातील २१ नद्यांबाबत प्रस्ताव पाठवला आहे. उर्वरित 8 नद्यांमध्ये एसटीपी बसविण्यात येईल, प्रकल्प लावण्यासंदर्भात पाण्याची तपासणी करून अहवाल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल.अशी माहितीही श्री. ठाकरे यांनी यावेळी दिली. मिठी नदीत कचरा मिसळला जातो, त्यावर गेल्या तीन वर्षापासून काम सुरू आहे. मिठी नदी प्राधिकरण आणि मुंबई महानगरपालिका मिठी नदी शुद्धीकरणावर काम करत असून, लवकरच आपल्याला ही नदी शुद्ध दिसेल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री राहूल कुल, संग्राम थोपटे यांनी सहभाग घेतला.
००००

श्रद्धा मेश्राम/11.3.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.