मास्क, सॅनिटायझरची विनापरवाना विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची धडक कारवाई - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


25 ठिकाणी धाडी; 1.50 कोटींचा माल जप्त

मुंबई, दि. 20; कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपयोगात येणारे मास्क आणि सॅनिटायझर्सची विनापरवाना तसेच बनावट उत्पादने तयार करणाऱ्यांवर तसेच विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई सुरु केली असून आता पर्यंत राज्यातील विविध भागात 25 धाडी टाकून सुमारे दीड कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

मास्क व सॅनिटायजर्सच्या तपासणी व शोध कार्यात अमरावती, औरंगाबाद, बृहन्‍मंबुई, कोकण विभाग, नाशिक नागपूर,  पुणे विभाग तसेच गुप्तवार्ता मुख्य व इतर विभाग यांच्या मार्फत आता पर्यंत 2 हजार 604 ठिकाणी  तपासणी करण्यात आली.  यात  विनापरवाना उत्पादित सॅनिटायजर्स, मुदतबाह्य सॅनिटायजर वर नवीन मुदतीचे लेबल चिटकवून विक्री करण्यात येणे त्याच प्रमाणे अवैधरित्या उत्पादित आणि खरेदी बिलं सादर न करता माल विक्रीस ठेवणे या प्रकारची अनियमितता दिसून आली. आता पर्यंत राज्य भरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने 25 ठिकाणी धाडी घालण्यात आल्या आहेत. आणि अंदाजे1 कोटी 47 लाख 54 हजार 559 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोरोना आजार दूर करणारेआयुर्वेदिक औषधे व कोरोना प्रतिबंधक गाद्या या प्रकारच्या  खोट्या जाहिराती करणारे, विक्री करणारे व या प्रक्रीयेत सहभागी होणारे यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. 

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक उपाय योजनांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाला सतर्क राहून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात नुकतीच सर्व औषध विक्रेत्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत ग्राहकांना सॅनिटायजर्स आणि मास्क योग्य त्या किंमतीत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसात सर्व दुकानांवर मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध होतील. नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आपल्या तसेच आपल्या आजुबाजूच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही डॉ.शिंगणे यांनी केले आहे.
००००
विसअ/ अर्चना शंभरकर/ अन्न व औषध प्रशासन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.