लोकाभिमुख शासनाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेल्या एसटीसाठी भरीव तरतूद - परिवहनमंत्री ॲड.अनिल परब

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 6 - राज्यात कृषी, उद्योग क्षेत्राची प्रगती व्हावी, सर्व विभागांचा विशेषतः समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, तरूणांना रोजगार उपलब्ध व्हावे आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळाव्यात याचा विचार करून सर्वसमावेशक असा राज्याचा अर्थसंकल्प आज  विधानसभेत मांडला, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली.

ग्रामीण भागातील नागरिकांना आरामदायी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जुन्या एसटी बस बदलून अत्याधुनिक सुविधा असलेल्या वाय-फाय युक्त दर्जेदार मिनी बस खरेदी करण्यात येणार आहेत. महामंडळाच्या ताफ्यातील सर्व  जुन्या बस बदलून त्याऐवजी  नवीन बस देण्याचा शासनाचा मानस आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयीन  विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांच्या  वेळापत्रकानुसार ये-जा करण्यासाठी गरजेनुरूप मार्ग व्यवस्थापन व समय व्यवस्थापन करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस ताफ्यामधील  जुन्या बस  बदलून सुमारे १६०० नवीन बस विकत घेण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बसस्थानके अत्याधुनिक करण्यासाठी महामंडळास ४०१ कोटी रुपये देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, असेही श्री. परब म्हणाले.
०००० 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.