अनुराधा पाटील यांना यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मराठी भाषा गौरवदिनी प्रदान करणार पुरस्कार - मंत्री सुभाष देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई, दि. 12 : मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास 'विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार' व मराठी साहित्य निर्मितीमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या प्रकाशन संस्थेस ‘श्री.पु.भागवत पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. निवड समितीने यावर्षीच्या ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासाठी' ज्येष्ठ साहित्यिक अनुराधा पाटील यांची तसेच श्री.पु.भागवत पुरस्कारासाठी पद्मगंधा प्रकाशन, पुणे या संस्थेची निवड केली आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.


वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज यांचा  27 फेब्रुवारी हा जन्मदिन  राज्य शासनाकडून ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.  
श्री. देसाई म्हणाले, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून यादिवशी राज्यभर मराठी भाषेच्या संवर्धन व विकासासाठी पूरक ठरतील असे विविध उपक्रम साजरे करण्याबाबत सर्व मंत्रालयीन विभाग व त्याअंतर्गत सर्व शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये यांना सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.

राज्य शासनाकडून या दिवशी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, श्री.पु.भागवत पुरस्कार, डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार असे चार विशेष पुरस्कार व साहित्यिक योगदानाबद्दल उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीकरिता 35 वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यासाठी विशेष गौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षीचे यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार यापूर्वीच दिनांक 5.2.2020 रोजी जाहीर करण्यात आले आहेत.

मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस ‘भाषा संवर्धन पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. त्यानुसार या वर्षी डॉ.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक व कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धक पुरस्कारासाठी अनुक्रमे प्रा.आर.विवेकानंद गोपाळ व श्री.अनिल गोरे यांची निवड करण्यात आली आहे. 

हे सर्व पुरस्कार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणाऱ्या कार्यक्रमात राज्य शासनातर्फे प्रदान करण्यात येणार आहेत.                       
००००
अर्चना शंभरकर/ विसअ/ मराठी भाषा/ पत्रकार परिषद/ 12-2-20

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.