विधानसभा अध्यक्षांनी घेतला आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. ११ : क्षयरोग कंत्राटी कर्मचारी, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील रूग्णालयांचा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याबाबत, तसेच राज्य कामगार विमा व साकोली उपजिल्हा रूग्णालयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास उपस्थित होते.


श्री.पटोले म्हणाले, वीस वर्षांपूर्वी क्षयरोगाचे स्वरूप अतिशय भयानक होते. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अविरत कार्य केलेले २२०० कर्मचारी अद्यापही कमी वेतनावर व कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. त्यांची सेवा नियमित करण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत आरोग्य विभाग, कामगार विभाग आणि वित्त विभाग यांच्या समन्वयाने विचार करण्यात यावा. या कामगारांना नियमित करण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे श्री. पटोले आणि मंत्री श्री.टोपे यांनी यावेळी सांगितले.


नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील रूग्णालयांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत समावेश करण्याबाबत निर्णय घेण्याची सूचना श्री. पटोले यांनी यावेळी दिली. भंडारा जिल्ह्यातील साकोली उपजिल्हा रूग्णालयाचे १०० खाटांच्या क्षमतेमध्ये रूपांतरित करण्याच्या सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी सूचनाही करण्यात आली.


आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत येणारी तीन रूग्णालये मुंबईत कार्यरत असून, त्यामध्ये अद्ययावत सुविधा देणे गरजेचे आहे. ज्या शासकीय इमारती रूग्णालयासाठी आणि निवासस्थानासाठी आहेत त्या अद्ययावत करून मनुष्यबळ वाढविणे गरजेचे आहे. याचबरोबर ग्रामीण रूग्णालयात शल्यचिकित्सक असणे गरजेचे असून, यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. टोपे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
००००
श्रद्धा मेश्राम/११.०२.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.