'मिफ्फ'मुळे माहितीपटांना व्यासपीठ - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




'मिफ्फ 2020'चा समारोप


मुंबई दि. 3 : फिल्म्स डिव्हिजन मार्फत आयोजित करण्यात येणारा 'मिफ्फ' महोत्सवामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीपटांना  व्यासपीठ मिळाले असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज सांगितले.

वरळीतील नेहरु सेंटर येथे 16 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल फॉर डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिक्शन आणि ॲनिमेशन अर्थात 'मिफ्फ 2020' चा सांगता समारंभ आज नेहरु सेंटर येथे झाला. 

आज भारतीय सिनेमांना आंतरराष्ट्रीय प्रेक्षक आहेत. यावरून भारतात बनणाऱ्या सिनेमाची ताकद लक्षात येते. कमी वेळेत जास्तीत जास्त कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे काम आहे. येणाऱ्या काळात पर्यावरण, संस्कृती, इतिहास यावर अधिकाधिक कन्टेन्ट तयार करण्यात यावा असे आवाहन राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी केले.


राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, माहितीपट हे फिल्म चळवळीची परिभाषा करणारे महत्त्वपूर्ण अंग आहे. आज हा  महोत्सव जगभरातील डॉक्युमेंटरी आणि लघुपटांचा सर्वात प्रतिष्ठित उत्सव बनला  आहे. आज वेगवेगळया विषयांवर माहितीपट बनत असून या माध्यमातून अनेक सृजनशील तरुणांचे चित्रपट निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे.  मिफ्फ महोत्सवाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून महाराष्ट्र शासनाने या महोत्सवाला कायम पाठिंबा दिला आहे.
चित्रपटांच्या प्रमोशनसाठी शासन अधिक प्रयत्न करणार - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या विषयावर माहितीपट, चित्रपट बनत आहेत. हे माहितीपट, चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे यासाठी शासन अधिक प्रयत्न करणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

श्री. देशमुख म्हणाले, 'मिफ्फ' हा लघुपटांसाठी प्रेक्षक शोधणारा प्रशंसनीय चित्रपट महोत्सव आहे. या महोत्सवात कोणता माहितीपट निवडावा, कोणत्या माहितीपटाला किती मार्क द्यावे, कोणते निवडावे हे परीक्षकांना कठीण झाले यावरून या महोत्सवात येणार कन्टेन्ट कसा आहे हे समजते.

सांगता सभारंभात उत्कृष्ट माहितीपट, उत्कृष्ट निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, आदिती अमित देशमुख, माहिती आणि प्रसारण विभागाचे सहसचिव अतुल कुमार तिवारी,वेस्ट झोन इन्फॉर्मशन ब्युरोचे महासंचालक मनीष देसाई, दिग्दर्शक व निर्मात्या उषा देशपांडे, माजी नगरपाल किरण शांताराम, राहुल रवैल, मिफ्फ महोत्सवाच्या संचालक स्मिता वत्स- शर्मा, राष्ट्रीय माहितीपटासाठीचे जुरी थॉमस वॉग, आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.