भारत-पोर्तुगाल दरम्यान परस्पर गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे - पोर्तुगाल राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतइंडियन पोर्तुगाल बिझनेस फोरम परिषद

मुंबई, दि. 15 : भारत आणि पोर्तुगालचे फार पूर्वीपासून संबंध आहेत, आता औद्योगिक क्षेत्रातही दोन्ही देशातील परस्पर गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे, अशी अपेक्षा रिपब्लिक ऑफ पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा यांनी व्यक्त केली आहे. ट्रायडंट हॉटेल येथे आयोजित आर्थिक विषयावरील एका परिषदेत ते बोलत होते. फिक्की, सीआयआय आणि ॲसोचाम यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन पोर्तुगाल बिझनेस फोरमया परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल उपस्थित होते.

श्री. डी सौसा यांनी भारत भेटीने आपण आनंदी झालो असल्याचे सांगितले. ते म्हणाले, भारताची आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परिस्थिती आणि पोर्तुगाल मधील परिस्थिती यात बरीच समानता आहे. दोन्ही देशातील साधर्म्यामुळे या देशातील संवादाचा सेतू अधिक दृढ होत आहे. दोन्ही देशातील अनेकविध प्रगतीच्या वाटा खुल्या होण्यासाठी उभय देशांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे.


पोर्तुगालमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन
पोर्तुगाल येथे असलेली राजकीय स्थिरता बघता भारतीय उद्योजकांनी पोर्तुगालमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन श्री. डी सौसा यांनी यावेळी उपस्थित उद्योजकांना केले. आजही पोर्तुगालमध्ये वापरली जाणारी  80 टक्के औषधे ही भारतीय कंपनीमार्फत बनविली जातात. फार्मास्युटिकलसोबतच माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा या सारख्या उद्योगात गुंतवणूकीसाठी आमंत्रित आहे. यासाठी आवश्यक ते  वातावरण आणि पायाभूत सुविधा पोर्तुगालमध्ये उपलब्ध आहेत. दोन्ही देशातील तज्ज्ञांच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठी या सारख्या परिषदेतून विचार व्हावा, असेही ते म्हणाले. भारतातील युवा पिढी उद्योगात सक्रिय आहे हे बघून आपण विशेष आनंदित झालो असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
उद्योग वाढीसाठी द्वि-राष्ट्र भागीदारी आवश्यक - रेल्वेमंत्री पियुष गोयल
मुंबई आणि पोर्तुगालमधील संबंध सातत्याने वृद्धिंगत होत आहे. गोवा-पोर्तुगाल यांच्यातील औद्योगिक वाढ व्हावी यासाठी द्वि-राष्ट्रीय भागीदारी आणि त्यासाठी लवकरच संयुक्त अर्थ समितीची बैठक घेऊन त्यावर चर्चा करण्यात येईल, असे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.

श्री. गोयल म्हणाले, भारत-पोर्तुगाल या दोन्ही देशांना फार्मा, हेल्थ केअर, मसाले, कृषी उत्पादने, वाहन उद्योग, इलेक्ट्रिक मोबिलीटी यासारख्या उद्योगात गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. देश आज 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत असताना पोर्तुगालसोबतच्या या व्यावसायिक संबंधांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुंबईचा वडापाव खाऊन जा
पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष हे मुंबईवरून गोव्याला जाणार आहेत, तेव्हा जाण्यापूर्वी मुंबईचा वडापाव त्यांनी अवश्य खावा, कारण वडापाव मधील पावहा शब्द पोर्तुगाल भाषेतील आहे, अशी माहिती श्री. गोयल यांनी दिली. त्याचबरोबर इस्पात’, ‘कमरा’, ‘अलमारी’, ‘चाबीहे ही शब्द पोर्तुगाल भाषेतील आहेत. या परिषदेच्या माध्यमातून याच चाबीने संबंधांचे नवे दालन खुले होणार आहे, असेही श्री. गोयल यांनी सांगितले.

यावेळी फिक्कीचे कार्यकारी समिती सदस्य राहुल मुठा, सीआयआयचे अध्यक्ष बनमाली अग्रवाल, ॲसोचामचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांचीही समयोचित भाषणे झाली.
००००
विसअ/ अर्चना शंभरकर/ 15-2-20/ पोर्तुगाल राष्ट्राध्यक्ष भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.