विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


'कॅटलायझिंग इनक्युबेशन' कार्यशाळेचे उद्घाटन 


मुंबई, दि. 6 : शैक्षणिकदृष्ट्या प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शासन आणि विद्यापीठे एकाच नाण्याच्या बाजू आहेत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले.
        
मुंबई विद्यापीठ, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षा अभियान (RUSA) महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात 'कॅटलायझिंग इनक्युबेशन' या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री. सामंत म्हणाले,  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि संवादाची गरज असते. यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षणाच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे तसेच राज्यातील सनदी अधिकाऱ्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांशी संवाद साधावा.  त्यामुळे विद्यार्थांना फायदा होईल.
     
विद्यापीठाचा परिसर हा तंबाखू, धूम्रपान, प्लास्टिक आणि कचरामुक्त असावा. आपली विद्यापीठे हीआदर्श विद्यापीठे असली पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असते पण त्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घ्यावा असेही  श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, रुसाचे प्रकल्प संचालक पंकज कुमार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक धनराज  माने, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर तसेच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, प्राध्यापक आणि विद्यार्थी या एकदिवसीय कार्यशाळेला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.