विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई पब्लिक स्कूल उपक्रम स्तुत्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

मुंबई, दि. 5 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरू होत असलेला 'मुंबई पब्लिक स्कूल' हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

'मुंबई पब्लिक स्कूल'च्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात झाले, त्यावेळी ते बोलत होते. पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, मराठी भाषा प्रत्येकाला ज्ञात असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इंग्रजी ही जागतिक भाषा असल्याने त्याचे ज्ञानही गरजेचे आहे. त्या दृष्टीने महानगरपालिकेचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यासाठी तयार करण्यात आलेले बोधचिन्हदेखील उत्कृष्ट आणि अर्थपूर्ण असल्याचे सांगून त्यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. या माध्यमातून शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, विविध महनीय व्यक्तींच्या सहकार्याने 'चला वाचू या' हा उपक्रम राबविणे यासह विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रमांवरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0000
ब्रिजकिशोर झंवर/विसंअ/5.2.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.