सहकार वाढीसाठी बँकांनी युवा पिढीचा सहभाग वाढवावा - उपमुख्यमंत्री अजित पवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


‘एमएससीबीए’चा 24 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ


मुंबई, दि. 10 : बँकांनी अत्याधुनिक सुविधांचा वापर करून सहकार क्षेत्र वाढीसाठी युवा पिढीचा अधिक  सहभाग बँकांच्या संचालक मंडळात करून घ्यावा, नवीन बदल बँकांनी स्वीकारावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

प्रभादेवी येथे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (रवींद्र नाट्य मंदिर) येथे  महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स असोसिएशन लि. मुंबई यांचा 24 वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार बोलत होते. 

श्री. पवार म्हणाले, अर्बन बँका, जिल्हा बँकाकडे युवा पिढीचे येण्याचे प्रमाण कमी आहे. युवा पिढीच्या गरजा लक्षात घेऊन बँकांनी कामकाजात बदल करून युवा पिढीला सभासद म्हणून बँकांच्या संचालक मंडळात स्थान दिले पाहिजे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना तात्काळ सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे.

सहकारी बँकांनी नवीन बदल स्वीकारून कामकाजात मूलभूत बदल करीत स्वतःचे भागभांडवल उभे करावे. तसेच बँक अडचणीत येणार नाही याचा विचार संचालक मंडळाने करावा, बँकांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक राहील, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख  म्हणाले, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. समाजमाध्यमांवरून बँकिंग क्षेत्राशी संबंधित चुकीचे संदेश, दूरध्वनी येतात. यापासून बँका आणि ग्राहकांनी सतर्क राहावे. राज्यातील सायबर सेल हा देशातील सर्वाधिक अद्ययावत असा सेल आहे. अडचणींच्या काळात याचीही मदत बँकांनी घ्यावी. नियमानुसार वसुली करण्यास अडचणी असतील तर त्यासाठीही पोलीस संरक्षण संदर्भात सहकार्य करण्यात येईल.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी असोसिएशनचा महत्त्वाचा सहभाग आहे. बँकांनी वाढते सायबर गुन्हे लक्षात घेऊन त्यापासून सावध राहत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण कर्मचारी आणि अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. सहकार क्षेत्र अधिक समृद्ध होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून सहकारातून जनतेला उत्तम सेवा दिली पाहिजे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती स्वाती पांडे, बँकेचे कार्याध्यक्ष मुकुंद कळमकर, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर उपस्थित होते.

यावेळी सन २०१८-१९ चे बँक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान  करण्यात आले.
००००
काशीबाई थोरात/विसंअ/10.2.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.