सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे मिनी चित्रपटगृह उपक्रम - सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत




मुंबई, दि. 13 : मराठीत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट येत आहेत. हे चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावेत यासाठी राज्यात 'मिनी चित्रपटगृह' (मिनी मिल्टिप्लेक्स) उभारण्यासारखे उपक्रम राबविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या शिष्टमंडळाने आज सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. महामंडळाकडून मेघराज राजे भोसले, वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे- विज, दिपाली सय्यद, अर्चना नेवरेकर, सुशांत शेलार, चैत्राली डोंगरे, विजय कोचीकर, पितांबर काळे, सतीश रणदिवे, रत्नकांत जगताप, दिलीप दळवी, महेश मोटकर यावेळी उपस्थित होते.



चित्रपट संमेलनासाठी आर्थिक मदत मिळावी, महामंडळासाठी राज्य शासनाकडून 5 कोटी रुपयांचा निधी, मराठी चित्रपटांना देण्यात येणारे अनुदान गुणांकन पद्धतीने न करता पुन्हा दर्जा पद्धतीने करण्यात यावे, कलाकारांना देण्यात येणारी पेन्शन आणि‍‍ चित्रपटांना मिळणारे अनुदान ऑनलाईन पद्धतीने मिळावे, पडद्यामागील कलाकारांनाही सांस्कृतिक कार्य विभागाच्या योजनांचा लाभ मिळावा, नाट्य- सिनेमा- वाचनालय असे ‘नाट्य- चित्र सांस्कृतिक संकुल’ प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात यावे, मराठी सिनेमांना अधिकाधिक चित्रपटगृहे मिळावीत असे निवेदन महामंडळामार्फत सांस्कृतिक कार्यमंत्री यांना देण्यात आले. मंत्री श्री. देशमुख यांनी या सर्व निवेदनांचा अभ्यास सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात येईल, असे यावेळी महामंडळाच्या सदस्यांना सांगितले.
००००
वर्षा आंधळे/विसंअ/13.2.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.