वारकरी आणि संत वाड्.मय अभ्यासक्रमासाठी समिती गठित -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 6 : महाराष्ट्राला संत, महंत आणि वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. संतांची परंपरा पुढे चालू रहावी आणि वारकरी सांप्रदायाचे संस्कारही या पिढीला मिळावेत, यासाठी वारकरी आणि संत वाड्.मय एकत्रित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात येईल, असे  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे सांगितले.

श्री क्षेत्र आळंदी येथे जोग महाराज शताब्दी महोत्सवनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री.सामंत बोलत होते.

श्री. सामंत म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत विद्यापीठ होणे आवश्यक असल्याने पैठण येथे संत विद्यापीठ लवकरच सुरु करण्यात येणार असून या विद्यापीठामध्ये वारकरी संप्रदाय आणि संत वाड्.मय असा एकत्रित अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार असून हा अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर विद्यापीठामध्ये सुरु करण्यात येईल. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. सर्वश्री संदिपान पाटील, चिटणीस बाजीराव चंदिले, विश्वस्त रामरावजी ढोक, केशव उखळीकर,त्र्यंबकदादा गायकवाड, दिनकर भुकेले, बद्रीनाथ देशमुख आदी उपस्थित होते.
००००
काशीबाई थोरात/विसंअ/6.2.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.