बहुजन कल्याण विभागातर्फे नवीन १६ शुल्काचे अनुदान मिळणार - मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि.13 : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता 16 इतर शुल्कांचा समावेश केला असून त्याचे अनुदान अनुदानित व विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा मिळणार असल्याची माहिती बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, सन 2005-06 पासूनच्या कालावधीमध्ये महाविद्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे इतर शुल्कांच्या बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपर्यंत हा लाभ फक्त अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य या शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अभ्यासक्रमांना विजाभज,  इमाव व  विमाप्र विद्यार्थ्यांना मिळत होता. परंतु सदरचा लाभ हा अनुदानित व विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक अभ्यासक्रमांना मिळत नव्हता.

यामध्ये प्रवेश फी, विविध गुणदर्शन उपक्रम शुल्क (Extra Curriculum/Activity fee), विद्यापीठ विकास निधी, विद्यापीठ विद्यार्थी सहाय्य निधी/ कल्याण निधी, प्रयोगशाळा शुल्क, कॉलेज मॅगेजीन फी, विद्यापीठ क्रीडा निधी, विद्यापीठ विद्यार्थी विमा निधी, ग्रंथालय शुल्क, संगणक प्रशिक्षण फी, विद्यापीठ अश्वमेध निधी, युथ फेस्टिवल शुल्क, जिमखाना शुल्क, नोंदणी शुल्क, विद्यापीठ वैद्यकीय मदत निधी, विद्यार्थी ओळखपत्र शुल्क अशा 16 शुल्कांचा समावेश करण्यात आला आहे.
000
दत्ता कोकरे/वि.सं.अ./13/02/2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.