कौशल्य विकास विभागाच्या योजनांसंदर्भात आढावा बैठक संपन्न

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. १२ : कौशल्य विकास विभागाच्या विविध योजना तसेच अभ्यासक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

श्री.पटोले म्हणाले, कौशल्य विकास विभागाकडून चालविले जाणारे आयटीआय, विविध इंटर्नशिप कार्यक्रम यामध्ये मोठी क्षमता असून राज्यातील बेरोजगारी संपविण्याच्या दृष्टीने हा विभाग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. या विभागाचे विविध अभ्यासक्रम, योजना यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.

विभागामार्फत राज्यात ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चालविल्या जातात. या ‘आयटीआय’चे आता वर्ल्ड क्लास ‘आयटीआय’मध्ये रुपांतरण करण्याचे काम कौशल्य विकास विभागाने हाती घेतले असल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी दिली. आयटीआयमधील अभ्यासक्रमांमध्येही कालानुरुप सुधारणा करण्यात येत असून साधनसामुग्री, इमारती यांचाही नजीकच्या काळात कायापालट केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमाचे विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांनी कौतुक केले. भुवनेश्वर (ओरिसा) येथे ‘आयटीआय’मध्ये मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. तेथील आयटीआयचाही अभ्यास करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

भंडारा जिल्ह्यातील ‘आयटीआय’चा होणार कायापालट
‘आयटीआय’चे वर्ल्ड क्लास संस्थांमध्ये रुपांतरण करण्याच्या कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील सर्व आठ शासकीय आयटीआयचा समावेश करण्यात यावा, अशा सूचना अध्यक्ष श्री. पटोले यांनी यावेळी दिल्या. लाखणी, साकोली, लाखांदूर यांसह जिल्ह्यातील आठही आयटीआयचा जागतिक दर्जा राखून विकास करण्यास यावेळी विभागामार्फत संमती दर्शविण्यात आली. त्यानुसार या आयटीआयमध्ये अत्याधुनिक सुविधा, साहित्य, उपकरणे, दर्जेदार इमारत आणि अभ्यासक्रमांमध्ये कालानुरुप सुधारणा केल्या जातील, असे कौशल्य विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिपेंद्रसिंह कुशवाह आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.