संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 11 : मुंबईतील बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जैविक विविधतेच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमावा, असे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे राष्ट्रीय उद्यान विकास कामांचा व उद्यान विकास आराखडा वितरीत निधी व खर्चाचे नियोजन याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी मंत्री श्री.राठोड यांनी हे निर्देश दिले.

मंत्री श्री.राठोड म्हणाले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात. जगातील इतर कोणत्याही महानगराच्या हद्दीत असे उद्यान आढळून येत नाही. जगात केवळ भारत, दक्षिण आफ्रिका, ब्राझील व केनिया या देशांमध्ये मानवी वस्तीच्या लगत राष्ट्रीय उद्याने आहेत. येथील जैवविविधता तसेच त्याचे लगतच्या नगरांना पर्यावरण, शैक्षणिक, ऐतिहासिक दृष्ट्या तसेच मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे त्याचे जतन, संवर्धन व विकास करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरवणे आवश्यक आहे. उद्यानात सुरू असलेल्या निसर्ग माहिती केंद्र, बालोद्यान, टॅक्सीडर्मी केंद्र आदींच्या विकासकामांना गती द्यावी. सुरू असलेले काम हे निसर्गपूरक  व वनाला शोभेल असे असावे. त्यामध्ये मातीच्या रंगाचा वापर करावा तसेच राष्ट्रीय उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना जैवविविधता वनस्पतींची माहिती देण्यासाठी निसर्ग माहिती केंद्राचा विस्तार करावा, असे निर्देशही मंत्री श्री.राठोड यांनी दिले.

नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात देखील ई सर्विलन्सची कामे करण्यात यावी असे सांगून वनमंत्री श्री.राठोड म्हणाले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या चारही बाजूंनी संरक्षित भिंती तातडीने उभारण्यात यावीत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रावर असलेल्या अतिक्रमकांच्या पुनर्वसनाची कामे गतीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देशही मंत्री श्री.राठोड यांनी दिले. उच्च व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचाही त्यांनी आढावा घेतला.

त्यानंतर वनमंत्री श्री.राठोड यांनी राष्ट्रीय उद्यानातील निसर्ग माहिती केंद्राच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.
००००
देवेंद्र पाटील/विसंअ/11.2.2020 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.