कर्णबधिरांसाठी मंत्रालयात स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणार - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 3 : राज्यातील कर्णबधिरांसाठी त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच शासनाने त्यांच्यासाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी सांकेतिक भाषा तज्ज्ञांसह मंत्रालयात स्वतंत्र माहिती कक्ष स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे दिली.

राज्यस्तरीय कर्णबधीर असोसिएशन संघटनेच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत श्री. मुंडे बोलत होते.

श्री. मुंडे म्हणाले, कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या शाळांचा दर्जा वाढविणार. कर्णबधीर विद्यार्थ्यांकरिता आयटीआयच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्यासाठी तंत्रशिक्षण विभागाशी चर्चा करुन निर्णय घेऊ. सांकेतिक भाषेचा डिग्री कोर्स सुरु करण्याबाबतही शासन सकारात्मक असून दिव्यांगांच्या संबंधित निर्गमित करण्यात येणारे शासन निर्णय याच्याप्रती कर्णबधीर शाळा व कर्णबधिरांसाठी काम करणाऱ्या संस्थांना पाठविण्यात येतील. कर्णबधीरांच्या शाळेत प्रशिक्षित शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार असून कर्णबधिरांसाठी भौतिक सुविधांसह शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव पराग जैन, समाज कल्याण आयुक्त प्रविण दराडे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, राज्यस्तरीय कर्णबधीर असोसिएशनचे संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.