सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे चैत्यभूमीस अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 6 : दादर चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अभिवादन केले.
          
यावेळी श्री. मुंडे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांच्या उत्थानासाठी काम केले. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी समता, बंधुता आणि एकात्मतेचा पाया रचला. त्यांच्या शिकवणीनुसार राज्य शासन काम करेल.
          
दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचे नियोजन सूत्रबद्धरित्या करण्यात येईल. या ठिकाणी शासनाच्या वतीने भोजन व्यवस्थेचा अधिक विस्तार करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील. तसेच चैत्यभूमीचे सुशोभीकरणाचे कामही दर्जेदाररित्या करण्यात येईल, असेही श्री.मुंडे म्हणाले.
          
इंदू मिल येथे उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली आहे. स्मारकाचे काम 2022 पर्यंत पूर्ण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही ते यावेळी म्हणाले.
          
प्रारंभी श्री.मुंडे यांनी चैत्यभूमी येथील स्मारकात डॉ.आंबेडकर आणि भगवान बुद्धांना अभिवादन केले. त्यानंतर भदन्त डॉ.राहूल बोधी यांच्यासमवेत त्रिशरण पंचशील सामुदायिक वंदना केली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी बुद्धमूर्ती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक, शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
          
यावेळी स्मारक समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, समाजकल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे आदी उपस्थित होते.
0000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.6.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.