यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या प्राधिकारपत्रासाठी १६ जानेवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत





मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील तानाजी जयवंत सावंत यांनी राजीनामा दिल्यामुळे दि. 24 ऑक्टोबर, 2019 रोजी रिक्त झालेल्या जागेकरिता भारत निवडणूक आयोगाने दि. 3 जानेवारी, 2020 च्या प्रसिद्धीपत्रकान्वये पोट निवडणूक, 2020 चा कार्यक्रम घोषित केला आहे.

या निवडणुकीचे मतदान दि. 31 जानेवारी, 2020 (शुक्रवार) रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 4.00 पर्यंत व मतमोजणी दि. 4 फेब्रुवारी, 2020 (मंगळवार) रोजी होणार आहे.

या निवडणुकीच्या मतदान/मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता विविध प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाची विहित प्राधिकारपत्रे प्रथम प्राप्त करणे आवश्यक आहे. प्रतिनिधींच्या शिफारसी महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई, यांनी दि. 16 जानेवारी, 2020 पर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई, यांच्याकडे सादर करावयाच्या आहेत. प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना वरील पोट निवडणुकीकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील अशा प्रतिनिधींनी आपली नावे, आपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या 2 प्रतीसह (मतदान/मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास 3 प्रतींसह) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई, यांच्याकडे दि. 16 जानेवारी, 2020 पर्यंत पाठवावीत. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच दि. 16 जानेवारी, 2020 नंतर या कार्यालयात प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/10.1.2020


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.