औरंगाबाद शहर कचरामुक्त करण्यास प्राधान्य देणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या पाणी, रस्ता आणि कचरा आदी प्रश्नांवर सविस्तर आढावा
औरंगाबाद, दि. : औरंगाबाद शहर कचरामुक्त करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून याकामी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात आज औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या पाणी, रस्ता आणि कचरा आदी प्रश्नांवर सविस्तर आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलिल, आमदार सर्वश्री हरिभाऊ बागडे, अतुल सावे, प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह इतर मान्यवर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

औरंगाबाद शहरातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कचरा होय या संवेदनशील समस्येकरिता लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन दिला जाईल आणि शहर कचरामुक्त करण्यास शासनाचा प्राधान्याने अग्रक्रम राहील, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शहरात महत्त्वाचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येतील. स्मार्ट शहर उपक्रमासाठी  स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

नवीन पाणीपुरवठा योजनेसाठीचा प्रस्ताव येत्या आठवड्यात तपासून लवकरच यासंबंधीची कार्य प्रक्रिया पूर्ण करुन आदेश देण्यात यावा असे निर्देश देखील सबंधितांना मुख्यमंत्र्यांनी दिले. रस्ते विकासअंतर्गत एक आठवड्यात कोणत्या भागात रस्ता करावयाचा याचा अहवाल तयार करुन शासनास देण्यात यावा जेणेकरुन लवकर निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे सांगून श्री.ठाकरे पुढे म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रातील पथ दिव्यांची देखभाल, रस्ते दुरुस्तीसाठी महानगरपालिका व  एमआयडीसीने समन्वयाने प्रश्न मार्गी लावावेत. तसेच शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी मागणी केलेला अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, औरंगाबाद शहरात दररोज 400 मॅट्रीक टन कचरा गोळा केला जातो. त्यात 150 मॅट्रीक टन कचरा वर्गीकृत करण्यात येतो. सध्या चिकलठाणा, पडेगाव येथे कचरा व्यवस्थापन करण्यात येत असून हर्सुल व कांचनवाडी येथे लवकरच कचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती दिली.

शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्वच्छ सर्वेक्षण संदर्भात बोलताना म्हणाले कीया उपक्रमात औरंगाबाद शहर अग्रमानांकनासाठी महानगरपालिकेने प्रयत्न करावेत.

यावेळी स्वच्छ सर्वेक्षण 2020, राज्य सरकारकडून प्राप्त झालेल्या 100 कोटींच्या निधीतून तयार होणारे रस्ते तसेच मुख्यमंत्री शहर सडक योजनेंतर्गत प्रस्तावित 267 कोटींचे रस्ते, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, सातारा देवळाईचा 183 कोटींचा डीपीआर, स्मार्ट सिटी योजना, शिक्षण, आरोग्य, प्रधानमंत्री आवास योजनेची सद्यस्थिती, 1680 कोटींची नवीन पाणी पुरवठा योजना यांचा आढावा घेण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.