बदलापूर शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

कुळगाव बदलापूर शहरातील पाणीपुरवठा योजनेबाबत आढावा बैठक 


मुंबई, दि. 14 : कुळगाव - बदलापूर परिसरातील जुन्या पाईपलाईनमधून होणाऱ्या गळतीमुळे अपुरा पाणीपुरवठा होत आहे.  त्यामुळे जुन्या नळ योजनेतील पाईपलाईनची दुरुस्ती करावी व अमृत योजनेमधील टप्पा क्र. 1 मधील भोज धरण ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतच्या पाईपलाईनचे काम तातडीने सुरु करावे असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.  कुळगाव बदलापूर शहरातील पाणीपुरवठा योजनेबाबत आज मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. पाटील बोलत होते.

मंत्री श्री. पाटील म्हणालेअमृत योजना टप्पा- 1 चे काम तातडीने पूर्ण करावे.  टप्पा क्र. 2 च्या कामास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरी देऊन येत्या 15 दिवसात हा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवावा.  तसेच नळ जोडणीसाठी अंशदान रक्कम कमी करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा असे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी दिले.  नगर परिषद हद्दीत BSUP अंतर्गत घरकुलांना नळ जोडणीसाठी अंशदान न घेता कनेक्शन देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल.  असे श्री.पाटील यांनी सांगितले.

यावेळी आमदार किसन कथोरे, आमदार बालाजी किणीकर, कुळगाव- बदलापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष ॲड. प्रियेश जाधव, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे, म.जि.प्रा.चे सदस्य सचिव पी. वेलरासू, म.जि.प्र.च्या मुख्य अभियंता श्रीमती मनिषा पलांडे, बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरगाव मुंढे (चिपळूण) पाणीपुरवठा योजना

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज मंत्रालयात रत्नागिरी जिल्हयातील शिरगाव मुंढे पाणी पुरवठा योजनेचाही आढावा घेतला.  शिरगाव मुंढे पाणी पुरवठा योजनेत निगुडवाडी व वेताळवाडी या दोन वाडयांचा समावेश करुन त्यांची कामे सुरु करावी तसेच मुंढे ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या वाडया -वस्त्यांसाठी जलजीवन मिशन कार्यक्रमात समाविष्ठ करुन नवीन योजना हाती घेण्यात यावी असे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.  यावेळी आमदार शेखर निकम, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे व म.जि.प्रा.चे सदस्य सचिव पी. वेलरासू, मुख्य अभियंता श्रीमती मनिषा पलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तिवरे धरण

2 जुलै 2019 रोजी झालेल्या तिवरे धरणफुटीमुळे रत्नागिरी जिल्हयातील मौजे तिवरे नळ पाणीपुरवठा योजनेचे नुकसान झाले आहे.  त्याची दुरुस्ती करण्यासाठीच्या अंदाजपत्रकास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.  त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरीत सुरु करावे असे निदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.  यावेळी आमदार शेखर निकम व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
००००
देवेंद्र पाटील/विसंअ/14.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.