केमोथेरपी सुविधेचा विस्तार राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयात - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 7 : केमोथेरपीच्या सुविधेचा विस्तार राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयात करण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे केली. मंत्रालयात विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर विभागाची आढावा बैठक घेऊन त्यांनी ही सुविधा राज्यभर सुरु करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आरोग्य सेवेचा समग्र आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला.

राज्यात सध्या 11 जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपीची सुविधा उपलब्ध असून कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता रुग्णांना दिलासा देण्याकरिता सर्वच जिल्हा रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्याच्या सूचना विभागाला यावेळी देण्यात आल्या.

महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्यासाठी मिशन मोडवर काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत आरोग्य विभागाला अधिकचा निधी मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. जेणेकरुन आरोग्य संस्थांची अर्धवट बांधकामे, पायाभूत सुविधा आदी बाबींची पूर्तता करणे शक्य होणार असल्याचे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.

आरोग्य संस्थांचे जाळे राज्यभर पसरले असून त्यांचे बळकटीकरण, स्वच्छता, डॉक्टरांची उपलब्धता या बाबींवर भर देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

उपलब्ध सुविधेच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देऊन नागरिकांचा आरोग्य यंत्रणेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलूया, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

बदलत्या जीवनशैलीमुळे रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारखे आजाराचे प्रमाण वाढत असून याविषयी नागरिकांमध्ये अधिक जाणीवजागृती करणे आवश्यक असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.

डॉक्टरांची रिक्त पदे भरताना ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये औषधांचा साठा मुबलक राहील याची दक्षता आरोग्य यंत्रणेने घ्यावी, असे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीत विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले. यावेळी आरोग्य आयुक्त अनुपकुमार यादव, महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेचे सुधाकर शिंदे, राज्य कामगार विमा रुग्णालयाचे आयुक्त आप्पासाहेब धुळज, आरोग्य संचालक डॉ.साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील,डॉ. सतीश पवार आदी उपस्थित होते.

००००

अजय जाधव/विसंअ/७.१.२०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.