दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंमलबजावणीवर कार्यशाळेत झाले विचारमंथन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 11 : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 च्या कायद्याची प्रभावीपणे जनजागृती होणे व त्या कायद्याबाबतची संवेदनशिलता या विषयावरील कार्यशाळा आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे संपन्न झाली. यावेळी याक्षेत्रातील तज्ज्ञांनी दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांविषयी ऊहापोह केला. तसेच हा कायदा प्रभावीपणे राबविण्यात येण्याच्या दृष्टीने विचारमंथन केले. ही कार्यशाळा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे कार्यालय यांनी आयोजित केली होती.

या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे म्हणाले, दिव्यांग हक्क अधिनियम 2016 या कायद्याची जनजागृती व या कायद्याबाबत संवदेनशीलता यासंदर्भात आयोजित केलेली ही कार्यशाळा दिव्यांगांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था तसेच शासनाच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. मा. उच्च न्यायालय या प्रकरणात खूपच संवेदनशील आहे. आजची कार्यशाळा मंत्रालयीन स्तरावरील अधिकाऱ्यांसाठी आहे. यानंतर ती संपूर्ण राज्यात विभागीय स्तर आणि जिल्हा स्तरावर दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणार आहेत.या कार्यशाळेमध्ये कायद्याचे अभ्यासक डॉ. वर्षा गाठू व श्री. रविप्रकाश सिंग यांनी RPWD ACT 2016 च्या कायद्याविषयी माहिती दिली. दिव्यांग कल्याणासाठी नागरी संस्थांना देण्यात येणारा निधी, दिव्यांगांच्या पदांची सुनिश्चित तथा दिव्यांगांचे आरक्षण, दिव्यांगांप्रती शासनाची जबाबदारी व कर्तव्य याबाबत श्री. समीर घोष यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठीचे राज्यसल्लागार मंडळ, दिव्यांगांसाठींची विशेष न्यायालये याबाबत ॲङ उदय वारुंजीकर यांनी माहिती दिली. तसेच ॲङ क्रांती एल. एस. यांनी दिव्यांगांची सामाजिक सुरक्षा याविषयी माहिती दिली.

यावेळी मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे प्रधान सचिव, सचिव, सह सचिव, उप सचिव, मंत्रालयीन विभागातील दिव्यांग व्यक्तींच्या तक्रार निवारण अधिकारी, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी तसेच मुंबईतील दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.