धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी ५० कोटी रुपयांचा निधी - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 6 : गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 च्या कामासाठी 150 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यासाठी सन 2019-20 मध्ये 50 कोटी रुपये देण्यात येतील आणि उर्वरित रक्कम पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल. या प्रकल्पाच्या कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. त्यासाठी प्रकल्प कामास गती देऊन प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधितांना दिल्या.

विधानभवनात धापेवाडा टप्पा-2, 3 आणि गोसीखुर्द प्रकल्प पुनर्वसन संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या माध्यमातून चोरकमारा आणि बोदलकसा या दोन्ही प्रकल्पात पाणी सोडून 11 हजार 300 हेक्टर सिंचना क्षमता निर्माण होणार आहे. त्यातून गोंदिया जिल्ह्यातील 76 गावांना त्याचा लाभ मिळणार आहे. धापेवाडा टप्पा २ तातडीने पूर्ण करावा यादृष्टीने सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच टप्पा ३ साठी देखील दरवर्षी ४०० कोटी रूपये प्रमाणे तरतूद करण्यात येईल. येत्या ४ वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात यावा अशा सूचना यावेळी श्री पटोले यांनी दिल्या. या प्रकल्पामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील तिरोडा, गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली या ९ तालुक्यातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असेही श्री.पटोले यांनी सांगितले.

भंडारा जिल्ह्यातील धारगाव उपसा सिंचन योजनेचे काम दोन टप्प्यात करुन याबाबतचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा आणि हा प्रकल्प गोसीखुर्द प्रकल्पाचा भाग म्हणून न करता स्वतंत्र प्रकल्प म्हणून प्रस्ताव शासनास सादर करावा. गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर समन्वय ठेवावा तसेच संबंधित विभागातील रिक्त पदे तातडीने भरावीत, असे निर्देश श्री.पटोले यांनी दिले.

बैठकीस जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस. चहल, वित्त विभागाचे सचिव राजीव कुमार मितल, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
००००
काशीबाई थोरात/विसंअ/6.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.