सोशल मीडियाच्या विधायक वापराने व्यापक समाजहित साधण्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा


मुंबई, दि. 8 : सुदृढ लोकशाहीसाठी वादविवाद स्पर्धेसारखे उपक्रम आवश्यक आहेत. सोशल मीडियाचा वापर विधायक पद्धतीने करुन व्यापक समाजहित साधावे, असे आवाहन राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री.कुंभकोणी बोलत होते.

'या सभागृहाची अशी धारणा आहे की, सोशल मीडिया ही लक्ष विचलित करणारी धोकादायक बाब आहे'. या विषयावर राज्यातील सर्व जिल्ह्यात आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पोलीस विभागाच्या 7 परिक्षेत्रातून नमूद विषयाच्या बाजूने आणि विरुद्ध बाजूने मते मांडण्याकरिता प्रत्येकी 2 याप्रमाणे एकूण 14 विद्यार्थ्यांची अंतिम स्पर्धा पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्या हस्ते झाले.

श्री.कुंभकोणी म्हणाले, सोशल मीडियाचा वापर राज्यातील पोलीस विभाग चांगल्या प्रकारे करीत असून गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम करत आहे. हा कार्यक्रम पोलीस मुख्यालयात घेतला असल्यामुळे राज्यातील सर्व अधिकारी एकत्र आले. सोशल मीडियाच्या कायद्यासंदर्भात पालकांनी पाल्यांशी सुसंवाद साधून यासंदर्भातील साधकबाधक बाबी पाल्यांच्या लक्षात आणून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांकरिता पोलीस वाहतूक विभाग, बॉम्ब शोधक व नाशक पथक, बिनतारी संदेश, शस्त्र प्रदर्शन, पोलीस बॅन्ड यांचे मुख्यालयाचे हिरवळीवर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

पारितोषिक विजेते :
बेस्ट टीम : नाशिक-पुरस्काराचे स्वरुप -चषक, प्रमाणपत्र व रुपये 1 लाख,  
द्वितीय बेस्ट टीम : कोल्हापूर- प्रमाणपत्र व रुपये 50 हजार.
बेस्ट स्पीकर :
1) अक्षता माधव देशपांडे, नाशिक -मेडल, प्रमाणपत्र व रु. 25 हजार
2) वैष्णवी रमेश जाधव- मेडल, प्रमाणपत्र व रु.25 हजार

द्वितीय बेस्ट स्पीकर :
1 ) यशवंत सुधीर खाडे, पुणे -मेडल, प्रमाणपत्र व रु.10 हजार.
2) पराग राजेंद्र बद्रिके, कोल्हापूर - प्रमाणपत्र व रु.10 हजार.

यावेळी पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, जयहिंद कॉलेजचे प्राचार्य श्री.अशोक वाडिया, पोलीस महासंचालक तांत्रिक व विधी श्री.हेमंत नगराळे, अपर पोलीस महासंचालक रजनीश सेठ, कुलवंत कुमार आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त अमितेश कुमार आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.