संविधान (१२६वी सुधारणा) विधेयक २०१९च्या अनुसमर्थनार्थ ८ जानेवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 6 : संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019च्या अनुसमर्थनाबाबतच्या ठरावास संमती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. दि. 8 जानेवारी रोजी एक दिवसाचे विशेष अधिवेशन होणार आहे.

हे विशेष अधिवेशन नवीन वर्षातील पहिलेच अधिवेशन असल्याने राज्यपालांचे अभिभाषण होणार असून दोन्ही सभागृहामध्ये राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवण्यात येईल. त्यानंतर मंत्र्यांचा परिचय, अभिभाषणाबद्दल आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव, संविधान (126वी सुधारणा) विधेयक 2019च्या अनुसमर्थनाबाबत ठराव, असे कामकाज होणार आहे. विधानसभेत शोकप्रस्ताव मांडण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
          
विधानसभा सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल परब, आमदार सर्वश्री आशिष शेलार, अमिन पटेल, सुधीर मुनगंटीवार, सुनील प्रभू आदी उपस्थित होते.



तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती बैठकीस उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल परब, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सर्वश्री हेमंत टकले, शरद रणपिसे, सुजितसिंह ठाकूर, जयंत पाटील, रामहरी रुपनवर, सतीश चव्हाण,  आदी उपस्थित होते.
००००
अजय जाधव/विसंअ/6.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.