मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देणार - मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 6 : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करणार आहे. शासकीय कामकाजात अधिकाधिक मराठी भाषेचा वापर करण्यावर भर दिला जाईल. या माध्यमातून मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी दिली. मुंबई मंत्रालय वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमादरम्यान श्री. देसाई यांनी ही माहिती दिली.

श्री. देसाई म्हणाले की, मराठी भाषा विभागाच्या कामाचा आज आम्ही आढावा घेतला आहे. येत्या काळात नवे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत असून त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. मुंबईतील रंगभूमी या वास्तूमध्ये मराठी भाषा भवन सुरू केले जाईल. तर ऐरोली येथे उपकेंद्रासाठी जागा निश्चित केली आहे. मराठी साहित्य क्षेत्रातील पुरस्कारदेखील वेळेत जाहीर केले जातील.

शासकीय कामकाजात मराठी भाषेचा अधिकाअधिक वापर होतो की नाही, याचा आढावा घेण्याच्या सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. शासकीय कामकाजात सर्वत्र मराठीचा वापर अधिक प्रमाणात झाला पाहिजे. मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आमचे सरकार करेल, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

यावेळी वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.