प्रकल्पग्रस्त सदनिका विकासकाने ‘झो.पु.’ प्राधिकरणाकडे हस्तांतरित न केल्यास दंडात्मक कारवाई - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबईतील विविध झो.पु.’ प्रकल्पांचा आढावा      

मुंबई, दि. 31 : काही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचे काम पूर्ण होऊन तिथे लोक राहायला गेले आहेत. परंतु विकासकाने प्रकल्पग्रस्त सदनिका झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणाकडे अद्यापपर्यंत हस्तांतरित केलेल्या नाहीत. तसेच याबाबतची कोणतीही माहिती शासनाकडे सादर केलेली नाही. काही प्रकल्पातील सदनिका विकासकाने विकून टाकल्या, तर काही सदनिका भाड्याने दिल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या ज्या विकासकांनी गेल्या 10 वर्षांत प्रकल्पग्रस्त सदनिका झो.पु.प्राधिकरणाकडे विहित कालावधीत हस्तांतरित केल्या नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत. श्री.आव्हाड यांनी मुंबईतील विविध झो.पु.प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

पंचशीलनगरमध्ये सुसज्ज बुद्ध विहार
श्री. आव्हाड यांनी पंचशील नगर, चेंबुर येथील झो.पुप्रकल्पाच्या कामांचा आढावा घेतला. पंचशीलनगरमध्ये सुसज्ज बुद्ध विहार बांधण्यासाठी विकासक व वास्तुविशारद यांनी सुधारित आराखडा तयार करुन झो.पुप्राधिकरणाकडे त्वरित सादर करावा असे निर्देश मंत्री श्री. आव्हाड यांनी दिले. हनुमाननगर पार्कसाइड विक्रोळी (प.) येथील झो.पुप्रकल्पाबाबत सुधारित आराखडा तयार करुन येत्या 15 दिवसात विकासकाबरोबर बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

सांताक्रुझ येथील शिवालिक व्हेन्चर्सच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या कामाचाही मंत्री श्री.आव्हाड यांनी आढावा घेतला. विकासकाने आवश्यक ती मंजुरी घेऊन प्रकल्पाचे प्रलंबित राहिलेले काम येत्या तीन आठवड्यात सुरु करावे व रहिवाशांचे थकित भाडे अदा करावे, असे निर्देश श्री. आव्हाड यांनी दिले.

चेंबूर येथील उत्कर्ष एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसनाच्या कामाचाही गृहनिर्माण मंत्र्यांनी आढावा घेतला. सदर झो.पुप्रकल्पाच्या व लगतच्या अशा दोन्ही विकासकांनी आपआपसात रस्त्याचा विषय मार्गी लावून योजनेचे काम येत्या महिन्याभरात सुरु करावे व विकासकाने रहिवाशांचे थकित भाडे तीन आठवड्यात अदा करावे, असे निर्देश श्री. आव्हाड यांनी दिले.

यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकारणाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर, अविनाश कोष्टी, मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे संबंधित अधिकारी यांच्यासह चेंबूर येथील पंचशील नगर, विक्रोळी येथील हनुमाननगर, चेंबूर येथील उत्कर्ष सहकारी गृहनिर्माण संस्था येथील रहिवासी व विकासक आदी उपस्थित होते.
000
देवेंद्र पाटील/वि.सं.अ./31/01/2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.