विद्युत ग्राहकाला केंद्रबिंदू मानून ऊर्जा विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

          


मुंबई, दि. 7 : विद्युत ग्राहकाला केंद्रबिंदू मानून ऊर्जा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करावा. त्याकरिता विभागाने सकारात्मकता वाढवावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
          
ऊर्जा विभागातील विविध योजनांचे सादरीकरण व विभागाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी सादर केली. त्यानंतर ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, हा विभाग अतिशय महत्त्वाचा विभाग असून सर्वसामान्य लोकांना सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागाने दक्ष रहावे. नवीन ऊर्जा निर्मिती प्रकल्प राबविताना पर्यावरणाचा महत्त्वपूर्ण विचार होणे आवश्यक आहे. त्याकरिता वृक्ष लागवडीकडे अधिक लक्ष द्यावे. शहरातून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून मार्ग काढण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

ग्राहकाभिमुख सेवांवर भर द्यावा

कृषी पंपासंदर्भात ज्या काही अडीअडचणी असतील त्याबाबतही तातडीने मार्ग काढून राज्यातील शेतकऱ्यांना मदत करावी. विद्यार्थी वर्गाला वीजेअभावी अभ्यासात खंड पडू नये याकरिता सोलर दिवे यासारखे काही पर्याय देता येईल का हे पाहावे. काहीही झाले तरी भारनियमन होता कामा नये. त्याकरिता विद्युत संचाची पूर्व तपासणी, तातडीची दुरुस्ती करावी. त्याचबरोबर ज्या भागात विद्युत बिल भरणा करणासाठी लोक येतात त्या ठिकाणी त्यांना स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी यासारख्या सुविधा देणे आवश्यक असून त्या तातडीने देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
          
समुद्रलाटांपासून वीज निर्मिती करण्याबाबतच्या पर्यायाची तपासणी करण्यासाठी आयआयटी चेन्नईची मदत घेण्याबाबत त्यांनी सूचना केली. वीज दर कमी कसे होतील याकडेही लक्ष द्यावे. त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील अथवा अनावश्यक खर्च कसे टाळता येतील याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. त्याचबरोबर वीजग्राहकांच्या विविध वादासंदर्भातील न्यायनिवाड्याची कार्यपद्धती देखील अधिक गतिमान करावी. विद्युत ग्राहकांकडील वसुली, कोळसा वाहतूक, वीज निर्मिती उद्दिष्ट याबाबतही सविस्तर चर्चा आढावा बैठकीत झाली.
        
प्रधान सचिव संजीव कुमार यांनी ऊर्जा विभागाचे सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. बैठकीला महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, महाऊर्जाचे महाव्यवस्थापक कांतीलाल उमाप तसेच महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांचे संचालक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
000
डॉ.राजू पाटोदकर/वि.स.अ/7.01.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.