रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांची माहिती होण्यासाठी तालुकास्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्याचे रोहयोमंत्री संदिपानराव भुमरे यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


रोहयो, फलोत्पादन विभागाचा आढावा


मुंबई, दि. 15 : रोजगार हमी योजनेंतर्गत पालकमंत्री पाणंद रस्ते यासह विविध कामांची माहिती नागरिकांना होण्याकरिता राज्यातील प्रत्येक तालुक्यास्तरावर सरपंच, ग्रामसेवक, शेतकरी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात यावी. यामध्ये यशस्वी सरपंचांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात यावे, असे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री संदिपानराव भुमरे यांनी दिले.

रोजगार हमी योजना, फलोत्पादन विभागाची आढावा बैठक मंत्री श्री.भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

श्री.भुमरे म्हणाले, रोजगार हमी योजना व फलोत्पादन या दोन्ही विभागांमार्फत राज्यात ग्रामीण भागातील दुर्बल व वंचितांच्या विकासाला कायदेशीर अधिकार देणारी क्रांतीकारी चळवळ आहे. ही चळवळ क्षेत्रियस्तरावर अधिकाऱ्यांनी गांभीर्याने पोहोचवावी. यासाठी वरिष्ठ पातळीवरुन त्यांना सूचना देण्यात याव्यात, असे श्री.भुमरे म्हणाले.

'मागेल त्याला शेततळे' या योजनेत शेततळ्यांच्या लाभार्थ्यांच्या संख्येवरील मर्यादा आणि बंधन हटवून त्याला शेततळे देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे काही लाभार्थ्यांना अद्याप अनुदान प्राप्त झाले नाही, अशा सर्व लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान प्राप्त करुन द्यावे. तसेच पालकमंत्री पाणंद रस्ते या योजनेच्या माध्यमातून शेतरस्ते तयार करण्यास प्राधान्य द्यावे आणि शेतातील अतिक्रमणे काढून कामे मोठ्या प्रमाणावर करण्यास परवानगी देण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. एकात्मिक फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राष्ट्रीय आयुष अभियान याअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत. रोहयो अंतर्गत देण्यात येणाऱ्या विहिरींचे उद्दिष्ट वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावेत, असेही श्री.भुमरे यांनी सांगितले.

या बैठकीस आमदार आशिष जयस्वाल, कैलास गोरंट्याल, रोजगार हमी योजना सचिव एकनाथ डवले, आयुक्त सुहास दिवसे, ए.एस. रंगानायक, फलोत्पादन विभागाचे संचालक शिरीष जमदाडे, मृद व जलसंधारण विभागाचे संचालक कैलास मोते उपस्थित होते.
००००
राजू धोत्रे/विसंअ/15.1.2020

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.